मृत्योर्मा अमृतं गमय!

मृत्यू म्हणजे अंतिम सत्य, असे आपण म्हणतो आणि मानतोदेखील; पण ते तेव्हाच स्वीकारतो जेव्हा आपल्या जवळचे कुणीतरी त्या मृत्यूच्या फेऱ्यातून जात असते.
Vinayak Sakhdev
Vinayak SakhdevSakal
Updated on

अपघातात मृत्युमुखी पडलेले, पाण्यात पडून राहिलेले, खून करून पुरलेले, कुजलेले, छिन्न-विच्छिन्न झालेले मृतदेह सावळून तो शीतगृहात घेऊन जायचा. जखमींना उपचारानंतर त्यांच्या घरापर्यंत पोहोचवायचा. प्राण गेलेल्या देहांचा तो कैवारी होता. विनायक नारायण सखदेव ऊर्फ सोन्या मारुती त्याचे नाव...

मृत्यू म्हणजे अंतिम सत्य, असे आपण म्हणतो आणि मानतोदेखील; पण ते तेव्हाच स्वीकारतो जेव्हा आपल्या जवळचे कुणीतरी त्या मृत्यूच्या फेऱ्यातून जात असते. सत्याच्या जवळ जाण्याची धमक कुणात नसली तरीदेखील आयुष्याच्या वळणावर कुठेतरी आपली वारंवार गाठ पडत असते. तेव्हा त्यावाचून पर्यायही नसतो. हल्लीच्या घाईगर्दीच्या हलकल्लोळात सगेसोयरे जिवंतपणी ढुंकूनही पाहत नसताना, एक माणूस असाही होता जो मेलेल्या शरीरातही माणुसकीचा प्राण फुंकत होता. त्याचं नाव होतं विनायक नारायण सखदेव. पनवेल, नवी मुंबई परिसरातले लोक त्याला सोन्या मारुती या नावाने ओळखत होते.

साधारण आठ-दहा वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. मी तेव्हा एका इंग्रजी दैनिकासाठी वार्तांकन करीत असे. तळोजा एमआयडीसीमध्ये डम्परखाली येऊन एका कामगाराचा मृत्यू झाल्याची बातमी कानी आली होती. प्रत्यक्षात जाऊन पाहिले तेव्हा लक्षात आले की घटना त्याहीपलीकडची आहे. एमआयडीसीचा परिसर असल्याने मोठमोठ्या अवजड वाहनांची गर्दी. त्यातही दिवस पावसाचे. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे. रात्रीची वेळ. परिसरात अंधार. त्यामुळे एखाद्या वाहनाच्या धक्क्याने किंवा अन्य कुठल्या तरी कारणाने एक कामगार रस्त्यावरील अशाच मोठ्या खड्ड्यात पडला. त्यात त्याचा जीव गेला असावा... एवढ्यावरच या अपघाताची भीषणता थांबली नाही. त्या कीऽऽर्र अंधारात रात्रभर रस्त्यावरून जाणारी वाहनं त्या कामगाराला तुडवून गेली होती. त्यामुळे त्याचे शरीर अगदी छिन्नविच्छिन्न झाले होते. शेकडो टन वजनाचे मोठमोठे ट्रक-ट्रेलर त्या शरीरावरून गेल्यामुळे त्या देहाचे काय झाले असेल, याचा विचार केला तरी आपला थरकाप उडतो. बातमी पूर्ण करण्यासाठी आवश्यक छायाचित्रे मिळतील का, या हेतूने मी पोलिस स्टेशन गाठले. झालेल्या प्रकाराची इत्यंभूत माहिती घेतली. त्या परिसरातील स्थानिक पत्रकार मित्र संतोष सावंत मला ती माहिती मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत होते. पोलिसांकडे मृतदेहाचे छायाचित्र नव्हते. फोटो कुणी काढले असतील, याची माहिती मिळवली आणि संतोष मला त्या छायाचित्रकाराकडे घेऊन गेले. त्या विस्कटलेल्या देहाचा फोटो पाहिला तेव्हा माझ्या मनात पहिला प्रश्न उभा राहिला, या देहाला कुणी सावरले असेल? संतोषने अगदी सहज उत्तर दिले, ‘‘सोन्या मारुती! दुसऱ्या कुणालाही हे शक्यच नाही!’’ छायाचित्र पाहूनही हृदयाला घाम फुटावा असा तो क्षण होता. या अपघातात अक्षरश: रात्रभर अंधारात चिरडत जाताना त्या कामगाराला किती यातना झाल्या असतील, या अंतरद्वंद्वाच्या मानसिकतेत मी पहिल्यांदा सोन्या मारुतीबद्दल ऐकले.

सोन्या मारुती हा पनवेलमध्ये राहणारा एक साधा रिक्षाचालक. अत्यंत सर्वसामान्य देहबोली. कमीत कमी शब्दांत बोलणारा; पण डोळे मात्र पाणीदार. पोलिसी मिजास आणि आपण करतोय त्यात काही वेगळे, अचाट आहे याचा थोडाही अहंम नसलेला हा माणूस. गेली कित्येक वर्षे नवी मुंबई, पनवेल परिसरातल्या पोलिसांच्या डायल लिस्टमध्ये सोन्या मारुतीचा क्रमांक अत्यंत महत्त्वाचा. मुंबई-पुणे महामार्गावर झालेला अपघात असो किंवा खून, आत्महत्या अशा कुठल्याही स्वरूपाचा मृत्यू असो, दिवसेंदिवस पाण्यात पडून राहिलेल्या, रस्त्यावरच्या अपघातात छिन्न-विच्छिन्न झालेल्या, खून करून जंगलामध्ये पुरल्यामुळे सडलेल्या, कुजलेल्या कुठल्याही मृतदेहाला हात लावायला सोन्या मारुती यांनी कधीही मागेपुढे पाहिले नाही. पोलिसांकडून निरोप येताच सोन्या मारुती दक्ष म्हणून सेवेत हजर असायचा. अपघात झाल्यावर सरकारी यंत्रणेऐवजी सोन्या मारुतीच आधी अपघातस्थळी पोहचायचा. जखमींना इस्पितळात दाखल करायचा. प्राण गेलेल्या देहांचा तो कैवारी होता. मृतदेह सावळून शीतगृहात घेऊन जायचा, जखमींना उपचारानंतर त्यांच्या घरापर्यंत पोहोचवायचा. कधीकधी मृत व्यक्तीची ओळख पटली नाही तर, त्यांचे पालकत्व स्वीकारून तोच अंत्यसंस्कारही करायचा. सोन्या मारुतीने हाताळलेली प्रकरणं नुसती ऐकली तरी अंगावर सरसरून काटा येतो, तुमच्या-आमच्या डोळ्यांच्या कडा पाणावतात; पण हे काम सोन्या मारुती गेली तीसेक वर्षे अव्याहतपणे करत होता.

ऐंशी-नव्वदीच्या दशकात आता उपलब्ध होतात तशा रुग्णवाहिका सहज मिळत नव्हत्या. त्या काळात महामार्गांवर झालेल्या अपघातातील जखमींना आपल्या रिक्षातून सोन्या मारुती दवाखान्यात घेऊन जायचा. जेवढा कळवळा त्याला जखमी आणि जिवंत माणसांचा होता, तेवढाच प्राण गेलेल्या जिवांचाही तो तारणहार होता. स्वर्ग-नरकाच्या संकल्पना मला मान्य नाहीत; पण ज्याला स्वर्गात जागा हवी असते ते लोक काशीला जाऊन मरण पत्करणे पसंत करतात. काशीचे माहीत नाही; पण ज्याचे जगात कुणी नाही त्याला पनवेल, नवी मुंबईत मृत्यूने गाठले तर चिंता करण्याची गरज नव्हती. कारण तेथे सोन्या मारुती होता, जो मेलेल्यांचीही काळजी घेत होता.

सोन्या मारुतीने त्याच्या आयुष्यभरात १५ हजारांपेक्षा अधिक मृतदेहांची देखभाल केली होती. त्याच्या कामाने भारावून लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्याला रुग्णवाहिका घेऊन दिली होती. तेव्हापासून तो अधिकच जोमाने हे काम जनसेवा म्हणूनच करीत होता. त्याच्या या अविरत सेवेसाठी पोलिस त्याच्या पाठीवर कधी तरी शाबासकीची थाप मारायचे. याच परिसरातल्या काही सामाजिक संस्थांनी हारतुरे घालून त्याचे काही सत्कारदेखील केले होते. मात्र फक्त एवढ्यावर भागायचे नाही.

सोन्या मारुतीच्या असाधारण मानसिक धैर्याने तुमच्या आमच्यासारखे हरखून जातात. मृत्यू उघड्या डोळ्यांनी व शाबूत बुद्धीने पाहणे सर्वांनाच जमणारे नसते. धैर्य जीवनात आनंद निर्माण करते तसेच ते माणुसकीच्या सौंदर्यात अधिक भर घालते. संपूर्ण जीवन आनंदमय करणे हे जसे सौंदर्याचे काम आहे, अगदी तसेच संध्यारागाप्रमाणे दु:खितांचे दु:ख नाहीसे करणे हेदेखील सौंदर्याचेच लक्षण आहे. सोन्या मारुती हा त्याच कुळातील मसिहा होता. आयुष्यभर केलेल्या त्याच्या जगावेगळ्या सेवाव्रताने तो जगप्रसिद्ध व्हायला हवा होता. माणुसकीच्या संग्रहालयात जपून ठेवण्यासारखा तो माणूस होता. मात्र एवढे करूनही तो आयुष्यभर बेदखलच राहिला. एरवी सरकारदरबारी लहान-मोठ्या गोष्टींसाठी गळेकाढू पुरस्कार दिले जातात. सोन्या मारुतीच्या कार्याची सरकारने मरणोपरांत तरी दखल घ्यावी. त्याने केलेले काम इतरांसाठी प्रेरणा देईल, असा उपक्रम राबवून त्याचे सेवाव्रत अमर करता येईल.

पाच दिवसांपूर्वी सोन्या मारुतीने स्वतःचा देह ठेवला. देहांमधील माणूसपण शोधणारा अनंतातला यात्री झाला. त्याने केलेल्या कामाची परतावणी करणे कुणालाही कधीही शक्य होणार नाही; पण यानिमित्ताने त्याचे स्मरण करताना एवढंच म्हणावं, मृत्योर्मा अमृतं गमय!

rahulgadpale@gmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.