संकटात शोधली संधी !

गेल्या वर्षभरात कोरोना महामारीचा अर्थव्यवस्थेला आणि रोजगाराला फटका बसला असताना स्टार्टअप उद्योगांनी चमकदार कामगिरी केली आहे.
Opportunity Discovered in Crisis
Opportunity Discovered in CrisisSakal
Updated on

‘तू चाल पुढं, तुला रं गड्या भीती कशाची’, या जुन्या मराठी गाण्याचे बोल अनेकांनी कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात प्रत्यक्षात आणून दाखविले आहे. युध्दात जसा एखादी बॉम्ब आदळतो आणि क्षणात सर्वकाही उद्ध्वस्त होते. तसेच काहीसे अनेकांच्या जीवनात झाले. कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा बॉम्ब अचानक आदळला. अनेक उद्योग, कंपन्या, व्यवसाय बंद पडले. यात लाखो रोज बेरोजगार झाले. पण, या संकटातही रडत न बसता अनेकांनी संधी शोधली व स्वत:चा स्टार्टअप किंवा व्यवसाय सुरू केला. हिमतीने नव्या क्षेत्रात उभे राहण्याचे कसब दाखविण्याचे काम काही तरुण-तरुणींनी करुन दाखविले.

गेल्या वर्षभरात कोरोना महामारीचा अर्थव्यवस्थेला आणि रोजगाराला फटका बसला असताना स्टार्टअप उद्योगांनी चमकदार कामगिरी केली आहे. गेल्या सहा महिन्यात दहा हजार नवीन स्टार्टअप सुरू झाले आहेत. वर्षभरात स्टार्टअपमधून १ लाख ७० हजार रोजगार निर्माण झाले आहेत.

सरकारी आकडेवारीनुसार गेल्या १४ महिन्यात सरकारी निकषानुसार ५० हजार स्टार्टअपची ६२३ जिल्ह्यांत नोंदणी झाली आहे. बहुतांश स्टार्टअप हे अन्न प्रक्रिया आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या आहेत . नेमकेपणानं सांगायचं झालं तर अन्न प्रक्रिया, उत्पादन विकास, अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेंट, माहिती तंत्रज्ञान आणि बिझनेस सपोर्ट सर्व्हिस या क्षेत्रांमध्ये सर्वाधिक स्टार्टअपची नोंदणी झाली आहे. आनंदाची बाब म्हणजे या स्टार्टअपमध्ये ४५ टक्के महिला आंत्रेप्रेन्युअर आहेत. आज आपण कोरोना आणि लॉकडाऊनच्या संकटात संधी शोधणार्‍यांची माहिती जाणून घेणार आहोत. आयआयटी कानपूरचे विद्यार्थी डॉ.संदीप पाटील या मराठमोळ्या तरुणाने ई स्पीन नॅनोटेक स्टार्टअप सुरु करत एन-९५ मास्कची निर्मिती केली. यास अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली. आज त्यांच्या कंपनीचे स्वासा या ब्रॅण्डचे मास्क खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, अभिनेत्री कंगना राणावत यांच्यासह अनेक मोठ्या व्यक्ती वापरत आहेत. केंद्र सरकारच्या अनेक कार्यालयांसह देशातील प्रमुख रुग्णालयांमध्ये याच मास्कचा वापर होत आहे. या कंपनीने लॉकडाऊनच्या काळात कोट्यावधी रुपयांची उलाढाल तर केलीच मात्र अनेकांना रोजगारही दिला आहे.

दुसरे उदाहरण देखील एका मराठमोळी तरुणीचे आहे. पुण्यातील ३० वर्षीय चिन्मयी डुंबरे आणि तिचा ३८ वर्षीय सहकारी आरिफ अमिरानी यांनी मिळून कोरोना काळात रुग्णांना बेड्स मिळवून देण्यासाठी भन्नाट स्टार्टअप सुरु केले. जवळच्या एखाद्या व्यक्तीस कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यावर पुढील उपचार करण्यासाठी बेड कुठे मिळेल? हा प्रश्न सध्या अनेकांना सतावतो. त्यासाठी रुग्णाला घेऊन अनेक दवाखाने फिरावे लागत होते. रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांची होणारी ही ससेहोलपट थांबविण्यासाठी ‘इंडिया क्रिटिकल रिसोर्स नेटवर्क’ नावाचे स्टार्टअप सुरु केले. या माध्यमातून मार्च २०२१ अखेरीस सुरू झालेल्या या प्लॅटफॉर्मच्या आत्तापर्यंत ११ लाखाहून अधिक नागरिकांनी वापर केला आहे. केवळ बेडच नाही तर प्लाझ्मा आणि रुग्णवाहिका कोठे उपलब्ध होऊ शकते याची देखील माहिती या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

सुरत येथे राहणार्‍या दिशांत गांधी आणि आलोक कुमार या दोन तरुणांनी लॉकडाऊनमध्ये ग्रेडइझी नावाचा एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुरू केला. ‘ग्रेडइझी’ शैक्षणिक संस्थांसाठी काम करते. विविध शैक्षणिक संस्थांच्या ऑनलाईन परीक्षा घेण्याचे काम ‘ग्रेडईझी’ करते. लॉकडाऊनच्या काळात सर्वच शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्था ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देत होत्या. त्यांना परीक्षादेखील ऑनलाईनच घेण्याची गरज होती. दिशांत गांधी आणि आलोक कुमार या दोघांनी यात संधी शोधली आणि ‘ग्रेडईझी’ने शैक्षणिक संस्थांसाठी परीक्षा घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. ‘ग्रेडईझी’च्या माध्यमातून अनेक शिक्षण संस्थांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या. आयआयटी दिल्लीमधील दोन स्टार्टअपनी मिळून कमी किंमतीत अ‍ॅण्टीव्हायरल टी शर्ट व कोरोना व्हायसरपासून सुरक्षा देणारे लोशन्स तयार केले. या अनोख्या प्रयोगाला लोकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली. यामुळे या स्टार्टअप्सने कमी कालावधीत मोठी उलाढाल केली. बंगळूरु येथील हेल्थ-टेक स्टार्टअप निरामय आणि भारतीय विज्ञान संस्थान ने मिळून ‘एक्स-रे सेतु’ तयार केला. यामाध्यमातून कृत्रिम बुध्दिमत्तेचा वापर करुन कोरोना रुग्णांना शोधले जाते.

या नव्या प्रयोगामुळे हेल्थ टेक स्टार्टअपला मोठा आर्थिक फायदा तर झालाच मात्र वैद्यकीय क्षेत्राला मोठी मदत देखील झाली. चेन्नईची स्टार्टअप कंपनी ‘माइक्रोगो’ने एक मॅकॅनिकल हॅण्ड सॅनिटाजिंग डिस्पेंसर मशीन तयार केले. हे मशिन रियल टाईम मॉनिटरिंगच्या माध्यमातून सॅनिटायजेशन करते. यात नॅनो टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. या स्टार्टअपने देखील मोठी आर्थिक उलाढाल करत अनेकांना रोजगार उपलब्ध करुन दिला.

आयआयटी दिल्ली मधील स्टार्टअप रामजा जेनोसेंसर या स्टार्टअपने नॅनोशॉट स्प्रे तयार केला जो कोरोना व्हायससला पसरण्यापासून रोखतो. जेंव्हा कोराना बाधित रुग्ण शिंकतो तेंव्हा त्याच्या नाका तोंडातून काही ड्रॉपलेट्स निघतात. ज्या माध्यमातून कोरोना पसरतो मात्र नॅनोशॉट स्प्रे चा वापर केल्यास हा फैलाव रोखता येतो. हा स्प्रे तब्बल ९६ तास अर्थात चार दिवसापर्यंत काम करतो. एका छोट्याशा स्टार्टअपने तयार केलेल्या या स्प्रेची मागणी आता देशभरातून होत आहे. असे कितीतरी उदाहरणे आपल्या आजूबाजूला देखील पहावयास मिळतील. याकरती हिम्मत न हारता संकटात संधी शोधता आली पाहिजे.

काय म्हणतो, ‘कोव्हिड-१९ अँड द अँटीफ्रॅजिटी ऑफ इंडियन स्टार्टअप इकोसिस्टिम’ अहवाल. लॉकडाऊन पश्चात भारतीय स्टार्टअप्स पुन्हा एकदा उंच भरारी घेण्यासाठी सज्ज होत असल्याचे ‘कोव्हिड-१९ अँड द अँटीफ्रॅजिटी ऑफ इंडियन स्टार्टअप इकोसिस्टिम’ या अहवालातून निदर्शनास आले आहे. भारतीय इकोसिस्टिमवरील लॉकडॉउनचा तात्कालिक परिणाम खूप गंभीर होता, त्यामुळे एवढ्या वेगाने भारतीय संस्थापकांनी नव्या पद्धतीने आपल्या बिझनेसमध्ये बदल केलेला पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो आहोत. यापेक्षा जास्त प्रभावी बाब म्हणजे, स्टार्टअपने आपला खर्च कमी करत आर्थिक स्थिती वेगाने मजबूत केली असे मत टाय दिल्ली-एनसीआरचे अध्यक्ष रंजन आनंदन यांनी व्यक्त केले. देशातील लॉकडाऊन शिथिल होत असतांना सुमारे ३० टक्के स्टार्टअपनी उत्पन्नाचे नवे मार्ग शोधण्यासाठी बाजाराकडे धाव घेतली आहे. तर ५५ टक्के स्टार्टअप खर्च कमी करून अधिक नफा कमावण्यावर लक्ष केंद्रित करत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. भारतीय युनिकॉर्नमध्ये २०२० आणि २०२१ मध्ये निरंतर वृद्धी पहायला मिळाली. भारत २०२५ पर्यंत १०० युनिकॉर्न मिळवण्याच्या मार्गावर आहे, असा विश्‍वास या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.

(सदराचे लेखक प्रयोगशील उद्योजक आणि विविध स्टार्टअपचे मार्गदर्शक आहेत. )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.