OYO बनला युवा बिलिनियर...

Ritesh-Agarwal
Ritesh-Agarwal
Updated on

ओयो हे नाव जरी कुणी घेतलं तरी आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात, हॉटेल्स आणि त्यामधील लफडी ! हो, वाचायला जरी विचित्र वाटत असलं तरी ते कुणी नाकारू शकणार नाही. आपल्याकडची मुलं ओयोची केवळ टिंगल टवाळी करण्यात पुढं राहिली मात्र तिकडं ओडिशा मधील नक्षलग्रस्त भागात जन्मलेलेल्या एका कॉलेज ड्रॉपआऊटने दिल्लीत येऊन गुडगावमध्ये एका खोलीत छोटासा प्रयोग करत, बघता बघता वयाच्या २६ वर्षी जगातील दुसर्‍या क्रमांकाचा श्रीमंत तरुण होण्यापर्यंत मजल मारली. ही कुण्या हिंदी चित्रपटाची स्टोरी नसून एका छोट्याशा स्टार्टअपच्या जोरावर जगातील दुसर्‍या क्रमांकाचा युवा बिलिनियरची रियल लाईफ आहे.

ही स्टोरी आहे, आयोचे संस्थापक रितेश अग्रवाल यांची. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी आपल्या जीवनप्रवासाची सुरुवात करणारा हा तरुण वयाच्या सव्वीसाव्या वर्षी बिलिनेयर होतो. रितेशचा हा प्रवास निश्‍चितपणे अनेकांना प्रेरणा देणारा आहे. हुरुन ग्लोबल रिच लिस्ट २०२० ने रितेशला जगातील दुसर्‍या क्रमांकावरील सेल्फ मेड बिलिनियर म्हणून गौरविले आहे. आजच्या घडीला सुमारे ४० कोटी डॉलर म्हणजे अंदाजे २८ हजार कोटी रुपये एवढे ओयो रूम्स या कंपनीचे मूल्य झाले आहे. तुम्हाला आज मी रितेशबद्दल सांगण्याचे कारण म्हणजे, त्याचा स्ट्रगलचा काळ मी जवळून पाहिला आहे. काही वर्षांपूर्वी गुरगावच्या आयरिस टेक पार्कमध्ये चौथ्या मजल्यावर माझे ऑफिस होते. याच सेंटरमध्ये तळमजल्यावर एक १६-१७ वर्षाचा चुणचुणीत मुलगा कोपर्‍यातील एका डेस्कवर काम करायचा.

जेव्हा माझे ऑफिस वरच असल्याचे त्याला कळल्यानंतर त्याने मला फेसबूकवर रिक्वेस्ट पाठवली व त्याला मेंटॉरिंग करण्याची विनंती केली. तो मुलगा दुसरा कुणी नव्हे तर रितेश अग्रवाल होता. त्याच्याबद्दल मला अजून एक गोष्ट आठवते. एके दिवशी तो त्याच्या मुळगावी गेला होता तेथून परतल्यानंतर त्याने पाहिले की गुरगावमधील त्याच्या घरमालकाने त्याचे सामान बाहेर काढून ठेवले होते. त्याकाळी त्याच्याकडे स्वत:चे घरभाडे भरण्याचे देखील पैसे नव्हते. यामुळे तो बराच काळ एका बॅगेसोबत धर्मशाळेत राहिला. मात्र हाच कठीण काळ त्याच्यासाठी फलदायी ठरला, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. कारण गुरगावमधील वेगवेगळ्या धर्मशाळा, छोट्या हॉटेल्समध्ये राहिल्यामुळे रितेशला तेथील अडचणी काय आहेत, याची सविस्तर माहिती झाली.

याकाळात तो अनेकवेळा मला येवून भेटायचा व वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करायचा, तेंव्हाच मला कळले होते की, हा लंबी रेस का घोडा आहे म्हणून. या पठ्ठ्याची अजून गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते. एके दिवशी रितेश फंडींगसाठी लाईफ स्पीड फंडचे बेजूल सोमय्या यांच्याकडे प्रेझेंटेशन देण्यासाठी गेला. तेंव्हा त्याच्या हातात एक मोठी बॅग होती. सोमय्या यांनी विचारले, की हे काय आहे? तेंव्हा रितेश म्हणाला हेच माझं विश्‍व आहे! 

रितेश त्यांना थेट मार्केटमध्ये घेवून गेला. तेथे त्याने हॉटेल्स मिळवतांना ग्राहकांना काय अडचणी येतात? त्यांच्या अपेक्षा काय आहेत? हॉटेल्स व ग्राहकांमध्ये कशाप्रकारे समन्वय राखण्याची गरज आहे, आदींविषयी प्रॅक्टीकल डेमो दिला. कारण याबाबत त्याचा खूप अभ्यास झालेला होता असे म्हणण्यापेक्षा तो तेच आयुष्य जगत होता, असे म्हणणेच जास्त सयुक्तिक राहील. 

या अनुभवाच्या जोरावर रितेशने ५ मिलीयनचं फंडींग मिळवलं. येथे तुम्हाला अजून एक गोष्ट सांगाविशी वाटते. तेंव्हा  एकाच प्रकारच्या मॉड्यूलवर ओयो रुम्स आणि झो रुम्स ही दोन स्टार्टअप्स मैदानात होती. दोघांमधील बदल मी खूप जवळून पाहिला आहे आणि अनुभवला देखील आहे. एकीकडे एका कॉलेज ड्रॉपआऊटने सुरु केलेले ओयो आणि त्याला फारशा चर्चेत नसलेल्या लाईफ स्पीडकडून मिळालेले ५ मिलीयनचे फंडींग तर दुसरीकडे सात फाऊंडर्सने सुरु केलेले झो रुम्स, त्यातही काही आयआयटीएन आणि त्याकाळी फंडींगमध्ये मोठं नाव असलेल्या टायगर ग्लोबकडून मिळालेले ५ मिलीयनचे फंडींग....दोघांची तुलना केल्यास अनेकांचा कल झो रुम्सकडे होता मात्र आज तुम्ही बघतायं झो जवळपास संपलेय आणि ओयो उच्च यशोशिखरावर आहे. 

दोघांचं बिझनेस मॉड्यूल सेम, फंडींग सेम तरीही असे का झाले? कारण रितेश अग्रवालने स्पीड अ‍ॅण्ड स्केलचा मंत्रा वापरला. कोणत्याही स्टार्टअपमध्ये स्लो अ‍ॅण्ड स्टेडी फार काळ चालत नाही तो नियम पारंपारिक बिझनेस किंवा व्यवसायाला लागू होतो. त्यावेळी रितेशने वापरलेला एक फंडा मला खूप आवडला होता आणि याबद्दल मी त्याचे कौतूक देखील केले होते. तो म्हणजे. दिल्ली एअरपोर्टमधून बाहेर पडतांना महिपालपूरकडे जाणार्‍या मार्गावर अनेक छोटे-मोठे गेस्ट हाऊस, हॉटेल्स आहेत. त्यावेळी रितेशने सर्व हॉटेल्समधील एक रुम तब्बल वर्षभरासाठी बुक केली हे करत असतांना त्याने केवळ एक अट ठेवली होती की हॉटेलबाहेर ओयो रुम्सचा बोर्ड लागेल. याचा हॉटेल्स चालकांना काही फरक पडत नव्हता मात्र त्याचा फायदा रितेश मोठ्या प्रमाणात झाला. यामुळे ओयोची जोरदार बॅ्रण्डींग झाली. प्रत्येकाला वाटायचे या संपूर्ण हॉटेलचा करार ओयोसोबत आहे त्यांना कुठे माहित होती की रितेशने तेथे केवळ एक रुम बुक केली आहे. 

याकाळात सोशल मीडियावर त्याच्यावर खूप टीका देखील व्हायची त्याला ट्रोल केलं जायचं मात्र त्याने सर्वांना इग्नोर करत आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत केलं यामुळेच आज ओयो यशस्वी झाली आहे. गुडगाव येथून सुरु झालेल्या ओयोचे आता भारतात चार हजारपेक्षा जास्त हॉटेल्स आहेत तसेच  १६० पेक्षा अधिक शहरांमध्ये ओयो रुम्सला लाँच केले आहे. फक्त पाच वर्षात या कंपनीने जागतिक बाजारपेठेत आपला ठसा उमटवला आहे. ओयो हॉटेल्सला २०२३ सालापर्यत जगातील सर्वात मोठी हॉटेल साखळी बनवण्याचा कंपनीचे संस्थापक रितेश अग्रवालचा प्लॅन आहे. 

ओयो सध्या आखाती देश, आग्नेय आशिया आणि युरोपमध्ये आपल्या व्यवसायाचा मोठ्या प्रमाणावर विस्तार करते आहे. गुरगाव येथून २०१३ साली फक्त एका हॉटेलने सुरू झालेली कंपनी जगातील ५०० शहरांमध्ये ३ लाख ३३ हजार रुमसहीत विस्तार पावली आहे. गंमतीची गोष्ट म्हणजे ओयोच्या भारतापेक्षा जास्त रुम्स चीनमध्ये आहेत. भारतात कंपनी १८० शहरांमध्ये १ लाख ४३ हजार रुम्ससहित कार्यरत आहे. तर चीनमध्ये ओयो २६५ शहरांमध्ये १ लाख ८० हजार रुम्सने कार्यरत आहे.

अशी सुचली ओयोची आयडीया
रितेशला लहानपणापासूनच फिरण्याची आवड होती. स्टीव्ह जॉब्ज, बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग यांच्यासारख्यांच्या कहाण्यांनी तो लहान वयातच प्रभावित झाला होता. आपणही त्यांच्यासारखे काहीतरी नवीन सुरू करावे या विचाराने तो प्रेरित झाला होता. आपण नोकरी करायची नाही, तर उद्योग करायचा या ध्येयाने एवढा पछाडला होता की सुरुवातीला छोटे-मोठे उद्योग त्याने सुरू केले. सुरुवातीला ६० हजार रुपये जमवून २०११ मध्ये ओरोवेलची सुरुवात केली. भविष्यात मोठं होण्याची स्वप्न पाहणाऱ्या माझ्या मित्र-मैत्रिणींनो मला असे वाटते की, रितेश अग्रवालचा हा जीवन प्रवास तुम्हाला निश्‍चितच प्रेरणादायी ठरेल.

(सदराचे लेखक प्रयोगशील उद्योजक व विविध स्टार्टअपचे मार्गदर्शक आहेत.)

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.