भामरागडच्या नोंदी : दूरस्थ भामरागडचा पाऊस

Rains_EPS1212.jpg
Rains_EPS1212.jpg
Updated on

1986 सालापर्यंत आलापल्ली ते भामरागड हा 62 किलोमीटरचा रस्ता बैलगाडीचा होता. या 62 किलोमीटरच्या प्रवासात 8 नाले, ओढे आणि मोठ्या नद्या (बांदीया नदी आणि भामरागड लगतची पर्लकोटा नदी). भामरागडच्या पुढे साधारण 18 किलोमीटरवर लाहेरी नावाचे गाव आहे. या 18 किलोमीटरच्या प्रवासातसुद्धा एक मोठी नदी पामुलगौतमी आहे आणि काही ओढेसुद्धा आहेत. पूर्वी पावसाळा सुरू झाला की 5-6 महिने भामरागडला पोहोचणे शक्‍य नसायचे. नदीचे पाणी कमी झाले की मग नदीच्या पात्रातून ट्रक-जीप जाऊ शकायची. ही परिस्थिती 1986 पर्यंत होती. पुढे नद्यांवर पूल झालेत. ओढ्यांवर रपटे तयार झालेत. 90-92 च्या सुमारास रस्त्यावर डांबरीकरण झाले. आलापल्ली ते लाहेरी येथे आता डांबरी सडक आहे. इतके सगळे असून अजूनही पावसाळ्यात हा रस्ता किमान 20 ते 25 दिवस पुरामुळे बंद असतो. कारण हे सर्व पूल कमी उंचीचे बांधण्यात आले आहेत. रस्त्याचे डांबरीकरण सुमार दर्जाचे असल्याने दरवर्षी रस्ता उखडतो आणि मोठमोठे खड्डे पडतात. 2019 च्या पावसाळ्यात म्हणजे गेल्यावर्षी भामरागड गाव 70 टक्के पुराच्या पाण्यात बुडाले होते, तसेच अनेक आदिवासी पाड्यात पाणी शिरल्याने प्रचंड नुकसान झाले होते. घरांची पडझड झाली. नदीने प्रवाह बदलल्याने अनेकांच्या भात शेतीचे नुकसान झाले. जिल्हा परिषदेच्या काही शाळांमध्ये पाणी शिरले होते. अनेकांचे बकऱ्या/कोंबड्या/गुरंढोरं/डुकरं यांसारखे पाळीव प्राणी वाहून गेलेत. भामरागड गावात पाणी उतरल्यावर चिखल आणि घाणीचे साम्राज्य निर्माण झाले. प्रशासनाने आणि भामरागडातील जागरूक नागरिकांनी श्रमदान करून गाव स्वच्छ केले. आमच्या लोकबिरादरी प्रकल्पातील कार्यकर्ते, शिक्षक आणि शाळेतील विद्यार्थ्यांनी चिखल साफ करून रस्ते धुऊन काढले. भामरागड तालुक्‍यातील आदिवासी बांधवांच्या गुंडूरवाही, कोपर्सी, मरकनार, कोठी, कृष्णार, कारमपल्ली, मिडगुडवांचा इत्यादी नदीकाठच्या व नाल्याकाठच्या गावांना पुराचा मोठा फटका बसला. या सर्व गावांत आजही पावसाळ्यात पोहोचणे अवघड आहे. पूर ओसरल्यावर आमच्या कार्यकर्त्यांनी पूरग्रस्त गावांना भेटी दिल्या. नुकसान झालेल्या गरीब कुटुंबांना जीवनावश्‍यक मदत पोहोचविली. नशीब यात मनुष्यहानी झाली नव्हती. आदिवासी बांधव अर्धपोटी राहतील; पण हे कधीही भीक किंवा मदत मागत नाहीत. संकटाच्या वेळी सर्व गाव संकटग्रस्तांच्या मदतीला धावून येते. प्रशासनाने या पुरामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावली. तहसील प्रशासन, जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन या सर्वांनी गरजूंना मदत पोहोचावी म्हणून पूर ओसरल्यावर 10 दिवसांत तालुक्‍यातील पूरग्रस्त गावांचा सर्व्हे केला आणि मदतसुद्धा दिली. सर्वांत महत्त्वाची भूमिका या वेळी मीडिया व सोशल मीडियाने पार पाडली. भामरागडसारख्या दुर्गम भागातील पुराच्या बातम्या सातत्याने वेगवेगळ्या न्यूज चॅनल्सवर झळकत होत्या. वृत्तपत्रात पुराचे फोटो, बातमी छापून येत होती. सोशल मीडियावरसुद्धा पूरग्रस्त गावांचे आणि पुराचे फोटो सातत्याने व्हायरल होत होते. मीसुद्धा माझ्यापरीने सोशल मीडियावर इकडच्या बातम्या आणि फोटो शेअर करीत होतो. मीडिया आणि सोशल मीडियाचा किती फायदा होऊ शकतो हे तेव्हा आम्हाला प्रकर्षाने जाणवले. या माध्यमांचा उपयोग करून सकारात्मक कार्य नक्कीच करता येते, याची त्यावेळी अनुभूती आली. मुंबई, पुणे, अहमदनगर, बीड, जालना, अकोला, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, वरोरा, ब्रह्मपुरी, आरमोरी, भंडारा, गडचिरोली, अहेरी, आलापल्ली इत्यादी शहरांतून प्रचंड प्रमाणात कपडे, चादरी, ब्लॅंकेट्‌स, भांडी, सर्व प्रकारचे धान्य अशा अनेक प्रकारची मदत भामरागड तालुक्‍यातील पूरग्रस्तांसाठी आली. तहसील प्रशासनाने ही मदत गरजू लोकांपर्यंत पोहोचवायला खूप मदत केली. तहसील कार्यालयामध्ये कोतवाल म्हणून काम करणाऱ्या विविध गावांतील आदिवासी मुलामुलींनी यात बहुमोल काम केले. याच तालुक्‍यातील जे आदिवासी बांधव शिकून आज विविध ठिकाणी शासकीय नोकरीत आहेत त्या सर्वांनी एकत्र येऊन आपल्या बांधवांसाठी बरीच मदत जमा करून प्रत्यक्ष पूरग्रस्त गावात जाऊन मदतीचे वाटप केले. गडचिरोली जिल्ह्यातील मेंढा-लेख्याचे सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा यांनी अनेक ग्रामसभांच्या माध्यमातून तांदूळ जमा करून गुंडूरवाही गावात जाऊन प्रत्यक्ष पूरग्रस्तांना मदत पोहोचविली. गडचिरोलीमधील गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी ट्रक भरून मदत पाठविली. परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांनी पण मदत प्रत्यक्ष जाऊन वाटप केली. काही डॉक्‍टरांनीसुद्धा या भागात साथीचे रोग पसरू नये म्हणून मोफत सेवा दिली. पूर ओसरल्यावर जवळपास 2 महिने रोज मदत येणे सुरू होते. तहसीलचे गोडाउन आणि वनविभागाचे गोडाउन मदतीच्या साहित्याने भरून गेले होते. त्या सर्व सामानांची वेगवेगळी किट बनवायची जबाबदारी महिला बचतगटाने व नागरिकांनी पार पाडली. लोकबिरादरी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी कारमपल्ली गावातील जिल्हा परिषद शाळेत श्रमदान करून शाळेची रंगरंगोटी, दुरुस्ती करून दिली. पर्लकोटा नदीचे पाणी या शाळेत 4 फूट उंचीपर्यंत शिरले होते. शाळेची दुरवस्था झाली होती. एक 900 चौरस फुटांचे नवीन शेड आम्ही लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून उभे केले.
इंटरनेट आणि सोशल मीडियाचा समाजहितासाठी वापर केल्यास खूप मोठ्या प्रमाणावर मदत मिळू शकते, हे आम्ही अनुभवले. इलेक्‍ट्रॉनिक मीडिया व सर्व वृत्तपत्रांनी येथील कमी उंचीचे पूल आणि रस्त्याची दुर्दशा या संदर्भात सातत्याने बातम्या दिल्याने शासनदरबारी चांगल्याप्रकारे दखल घेतली गेली. मदत पोहोचविण्याच्या निमित्ताने शहरातील अनेकांनी माडिया गोंड आदिवासी पाड्यातील जीवन प्रत्यक्ष अनुभवले. उपेक्षित समाजाप्रति संवेदनशीलता अजूनही जागृत आहे हे सिद्ध झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.