एकलीच दीपकळी ती !

९ ऑक्टोबर १९६० रोजी ‘पंडितराज जगन्नाथ’ आणि दुसऱ्याच दिवशी, १० ऑक्टोबरला ‘सुवर्णतुला’ या दोन नाटकांचे शुभारंभाचे प्रयोग झाले.
kirti shiledar, vishwanath bagul and vidyadhar gokhale
kirti shiledar, vishwanath bagul and vidyadhar gokhalesakal
Updated on

‘विज्ञान आणि संगीत हे प्रवाही व लवचीक असते. काळानुरूप ते बदलत राहते. आपले स्थान टिकवण्यासाठी हे बदल स्वीकारणे आवश्यकच असते...’ असं मत स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांनी आपल्या एक्याण्णव्या वाढदिवसानिमित्त नुकत्याच झालेल्या एका समारंभात व्यक्त केलं. भारतीय शास्त्रीय संगीतानं जागतिक स्तरावर निर्माण केलेल्या अढळस्थानाबद्दल हे त्या बोलत होत्या. अर्थात बदल स्वीकारण्याची गरज संगीतासह सर्वच कलांना लागू होते, मराठी रंगभूमीच्या संदर्भात, विशेषत: संगीत नाटकांबद्दल आजवर दशकानुदशके आपण हे बोलत आलो आहोत.

एकोणीसशे पन्नासच्या दशकाच्या शेवटी शेवटी अशा बदलांची निकड अधिक तीव्र झाली होती. पौराणिक कथानकांच्या गाजलेल्या पण त्याच त्याच नाटकांच्या प्रयोगांनी संगीत रंगभूमीला आपला प्रेक्षकवर्ग टिकवणं चित्रपटांच्या वाढत्या प्रभावात अवघड झालं होतं. उतरत्या काळात नव्या उन्मेषासाठी नव्या विषयांवरच्या नव्या संहितांची गरज भासतच नव्हे तर भेडसावत होती.

पारंपरिक प्रेक्षकांना रिझवू शकतील पण नव्यांना जुनाट वाटणार नाहीत अशी नाटकं हवी होती. सुदैवानं एकोणीसशे साठच्या दशकात प्रवेश करता करताच म्हणजे साठ सालापासूनच संगीत रंगभूमी नव्या जोमानं उभी राहू लागली.

९ ऑक्टोबर १९६० रोजी ‘पंडितराज जगन्नाथ’ आणि दुसऱ्याच दिवशी, १० ऑक्टोबरला ‘सुवर्णतुला’ या दोन नाटकांचे शुभारंभाचे प्रयोग झाले. एकाच नाटककाराची दोन नाटकं अशी पाठोपाठच्या दिवशी येणं आणि आणि दोन्हीही तुफान गाजणं हा अनोखा विक्रम मराठी रंगभूमीनं जगाला करून दाखवला. ही दोन्ही नाटकं लिहिली होती विद्याधर गोखले यांनी. साठचं हे दशक संगीत रंगभूमीला नवसंजीवनी देणारंच ठरलं. विद्याधर गोखलेंबरोबरच वसंत कानेटकर, वि. वा. शिरवाडकर आणि पुरुषोत्तम दारव्हेकर या नाटककारांचा यातला वाटा मोठा होता.

मात्र पुढच्याच दशकात उदार आश्रयासाठी मायबाप रसिकांना पुन्हा साकडं घालावं लागण्याची स्थिती दिसू लागली. साठनंतरच्या पुढच्या बारा वर्षांत फक्त बाराच संगीत नाटकांना शतकी प्रयोगसंख्या ओलांडता आली होती. या विषयीची खंत आपलं नवं नाटक रसिकांपुढे नेताना विद्याधरपंतांना बोलून दाखवावीशी वाटली. नव्या नट-नटींना संगीत नाटकांविषयी आकर्षण वाटू नये आणि गोखलेंच्याच शब्दात ‘आपल्या मोठेपणाचा डिंडिम पिटणाऱ्या नाट्यसंस्थांनी व सरकार दरबारातील महाभागांनी संगीत नाटकांना दुय्यम नागरिकत्व द्यावे’ याविषयी त्यांनी मनस्वी दुःख व्यक्त केलं होतं.

या नव्या नाटकाच्या संहितेच्या प्रस्तावनेत त्यांनी लिहिलं, ‘मायबापांनो, आपण या कलाकृतीला आशीर्वाद तर द्याच, पण असाही आशीर्वाद द्या, की ‘महाराष्ट्रीय संस्कृतीचं एक अनन्यसाधारण वैशिष्ट्य असलेले संगीत नाटक जतन करणे व वाढवणे हे माझे ध्येय आहे, धंदा नव्हे; त्यासाठी मी स्वतःला वाहून घेईन,’ अशी प्रतिज्ञा करणारे नट, नाटककार नी नाट्यसंस्था उदयास याव्यात!’ ज्या नाटकाच्या निमित्तानं या आशीर्वादाची त्यांनी आस बाळगली होती, त्या नाटकाला मात्र उदंड प्रतिसाद आणि वाखाणणीही लाभली. ते नाटक होतं -‘सं. स्वरसम्राज्ञी’!

संगीत रंगभूमीचे जिद्दीचे ‘शिलेदार,’ जयराम व जयमाला शिलेदार यांच्या ‘मराठी रंगभूमी’ या संस्थेने दोन डिसेंबर एकोणीसशे बहात्तर रोजी थाटामाटात ‘स्वरसम्राज्ञी’ रंगमंचावर आणलं. भारतीय अभिजात संगीताच्या निस्सीम अभिमानी ‘स्वरसम्राज्ञी’ला यंदा पन्नास वर्षे पूर्ण होताहेत तर संगीत रंगभूमीला आयुष्यच नव्हे तर कुटुंबही बहाल करणाऱ्या ‘मराठी रंगभूमी’ संस्थेनं नुकतेच अमृतमहोत्सवी वर्षात प्रवेश केला आहे. त्याही पुढं, मराठी संगीत रंगभूमीसाठी सर्वतोपरी झटलेल्या दिग्गज नाटककार विद्याधर गोखलेंचं हे जन्मशताब्दी वर्षं आहे. आजच्या मराठी रंगभूमी दिनी या त्रिवेणी सुयोगालाच अभिवादन!

अगाथा ख्रिस्तीच्या ‘विटनेस फॉर द प्रॉसिक्युशन’वर आधारित ‘साक्षीदार’ या रहस्यनाट्यानं जरी विद्याधर गोखलेंनी आपल्या नाट्यलेखनाला सुरुवात केली असली, तरी संगीत नाटकांच्या आपल्या अनिवार ओढीतून त्यांनी पुढं सगळी संगीतप्रधान नाटकंच लिहिली.

‘पंडितराज जगन्नाथ ’, ‘सुवर्णतुला’, ‘मंदारमाला’, ‘मदनाची मंजिरी’, ‘जय जय गौरीशंकर’, ‘बावनखणी’ अशी त्यांची एकाहून सरस एक नाटकं भरपूर लोकप्रिय ठरली. ‘स्वरसम्राज्ञी’ हे त्यांनी लिहिलेलं बारावं नाटक. मुख्यत: संगीत नाटकांच्या निर्मितीसाठीच त्यांनी ‘रंगशारदा’ ही संस्थाही काढली. मराठी रंगभूमीसाठीच्या मोठ्या योगदानासाठी त्यांना मानाचा ‘विष्णुदास भावे सन्मान’ प्रदान करण्यात आला होता. विशेष म्हणजे प्रतिष्ठेच्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदापाठोपाठ त्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही लाभले !

अर्थात नाटककार ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. ते हाडाचे पत्रकारही होते. एका अग्रगण्य मराठी दैनिकाच्या संपादकपदाची जबाबदारी दीर्घकाळ त्यांनी सांभाळली. शिवसेनेकडून निवडणूक लढवून ते मुंबईतून लोकसभेला निवडून सुद्धा आले होते!.. त्यांच्या प्रखर सामाजिक आणि राजकीय विचारांचा एक वेगळा लौकिकही होता... एक अनाकलनीय कलंदरपणा त्यांच्या ठायी होता. कायमच काँग्रेसच्या विरोधात, पण आणीबाणीचं काही प्रमाणात समर्थन. त्यांनी ''घाशीराम''ला आक्रमक विरोध केला, पण वैयक्तिक आयुष्यात तेंडुलकरांशी उत्तम मैत्र.. संस्कृत एवढंच उर्दूवरही तेवढंच प्रेम अन प्रभुत्व!..

त्यांचं हे बहुआयामी व्यक्तीत्व मराठी माणसाला आचार्य अत्रेंची आठवण करून देणारं होतं, एवढं म्हंटलं तरी पुरे!

संगीत रंगभूमीचं प्रेम आणि नाट्यमहर्षी अण्णासाहेब किर्लोस्करांची प्रेरणा या भांडवलावर जयराम आणि जयमाला शिलेदारांनी ‘मराठी रंगभूमी’ ही संगीत नाटकांना वाहिलेल्या संस्थेचा श्री गणेशा केला; आधी संस्थेचा आणि मग स्वतःचा संसार सुरू केला आणि हयातभर संगीत रंगभूमीची सेवा केली. संगीत रंगभूमीचं गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी व्रतस्थपणे आजन्म प्रयत्न करत राहिले. संगीत रंगभूमीच्या पुनरुज्जीवनाचं बालगंधर्वांचं स्वप्न पूर्ण करणं हेच जणू जीवितकार्य झालं. गंधर्व शताब्दी वर्षात बालगंधर्वांनी अजरामर केलेल्या बारा नाटकांच्या सव्वाशे प्रयोगांची सेवा त्यांनी चरणी वाहिली.

अण्णासाहेबांचं ‘शाकुंतल’, ‘सौभद्र’ दिमाखात सादर करत रसिकांना संगीत नाटकांची पुन्हा मोहिनी घातली. नव्या पिढीलाही ‘मानापमान’, ‘स्वयंवर’ व ‘संशयकल्लोळ’चीही पुन्हा गोडी लावली. लता व कीर्ती या त्यांच्या कन्यांनीही पुढे अल्पावधीतच गानकलेतील नैपुण्याबरोबरच आपल्या नाट्यनिष्ठेचीही प्रचिती दिली. जयमालाबाईंनी आपल्या या मुलींचे सूर घडवले तर जयरामपंतांनी त्यांचे विचार!

विद्याधर गोखलेंना ‘मराठी रंगभूमी’च्या असामान्य योगदानाबद्दल आदर होता. शिलेदार कुटुंबीयांचं कौतुकही होतं अन् ममत्वही. ‘मराठी रंगभूमी’ संस्थेला आपलं नवीन नाटक देऊन मराठी संगीत रंगभूमीच्या सेवेचं पाईक होण्याची भावनाही होती अनेक वर्षं, पण त्यांच्या असंख्य व्यवधानांमुळं ते घडत नव्हतं.

मात्र ‘मराठी रंगभूमी’च्या प्रयोगांनी आणलेलं नवं चैतन्य अनुभवून त्यांना पुन्हा नव्या नाटकाचा हुरूप आला. (‘...शिलेदारांचे गुणी कलाकार मला घनांधकारातील दीपदर्शनाप्रमाणे वाटले!’ या शब्दांत त्यांनी गवसलेल्या वेगळ्याच ऊर्जेचं कारण शोधलं आहे!) त्यातच कीर्तीचा ‘शारदा’मधला अभिनय आणि ‘स्वयंवर’मधली तिची गायकी आजमावून त्यांनी तिला डोळ्यापुढं ठेवूनच नवं नाटक लिहायला घेतलं…

पांडुरंगराव शिरोडकर या गोखलेंच्या एका ज्येष्ठ स्नेह्यांनी काही वर्षांपूर्वी त्यांना बर्नाड शॉचं ‘पिग्मॅलियन’ हे विख्यात नाटक वाचायला दिलं होतं. त्यातल्या कथाबीजावर एका वेगळ्या विचाराचं कलम मनात झालं. ‘मूळ नाटकातला सुविद्य उच्चभ्रू नायक आणि त्यानं गावंढळ नायिकेत कायापालट घडवून आणण्याचा उचलेला विडा’ ही कल्पना आपल्या संगीतकलेच्या साच्यात टाकून बघितली तर?... मनात एक आराखडा उभा राहू लागला..

नटवर्य केशवराव दाते आणि ज्येष्ठ समीक्षक माधव मनोहर यांनीही पसंती दिल्यानंतर मात्र नाटक कागदावर उतरू लागले -‘स्वरबंधन’! पुढं बऱ्याच कालावधीनंतर शिलेदारांकडं जेव्हा ते वाचलं गेलं, तेव्हा जयरामपंतांनी नाव सुचवलं - ‘स्वरसम्राज्ञी’!!

हैबतराव सातारकर (सह मैना सातारकर)च्या संगीतबारीला गायनाचार्य गंगाधरपंत एकदा हजेरी लावतात. ‘टुमदार कुणाची छान, नवति भरज्वान, पुसारे आली कुठून?...’ ही मर्दानं म्हणायची लावणी मैनेला कणसूर आणि बदसूरत पद्धतीनं म्हणताना ऐकून बुवांचा पारा गगनाला भिडतो आणि ते थेट बोर्डावर चाल करतात!... न्याराच वाद झडतो पण मैनेला तडफेनं प्रतिवाद करताना पाहून पंतांच्या मनात वेगळीच वीज चमकते.

‘या तेजस्वी तडफदार वृत्तीला तितक्याच तडफदार गायकीची जोड द्यायची’ ते ठरवतात. या अडाणी पोरीला शास्त्रीय संगीताचे धडे देऊन ‘स्वरसम्राज्ञी’ बनवून दाखवण्याचं आव्हान ते घेतात. भली मोठी रक्कम मोजून ते तिला तिच्या तालमीसाठी आपल्या घरी घेऊन येतात… तिच्यातल्या गाण्याला पैलू पाडताना एक संस्कारीत व्यक्ती आणि एक प्रगल्भ स्त्री म्हणूनही ते तिला घडवत जातात.. त्याचवेळी त्यांच्यात एक नातं, एक जवळीक निर्माण होत जाते... ती ‘स्वरसम्राज्ञी’ बनतेही, पण दोघांत जन्मलेल्या भावबंधाचं शेवटी काय?...

नाटकाचा शेवट काय असावा? याच्यावर तालमीतही चर्चा झाल्या. तालमींना भालबा केळकर यायचे, गुरु-शिष्येमध्ये प्रेमबंध अगर लग्न नसावं असं त्यांचं मत सगळ्यांना पटणारं होतं… तिला गवसलेलं उच्चभ्रू जग आणि तिची तळागाळातली मुळं यांच्यात फरपट होऊन शेवटी ती दोन्हीकडून तुटून एकटी पडते… ‘एकलीच दीपकळी मी…’ असा शेवट स्वतः गोखलेंना दिसत होता. मात्र संगीत नाटकांना करुण शेवट मानवत नाही असं शिलेदारांचं म्हणणं!... शेवटी सुवर्णमध्य काढत उदात्तेकडं झुकणारा शेवट करण्यात आला. आपल्या गुरुंना अनुसूरत मैना संगीताच्या सेवेत आपलं अवघं आयुष्य वाहण्याचा निश्चय करते.

निळकंठबुवा अभ्यंकरांचं मर्मलक्षी वैविध्यपूर्ण संगीत हे तो पर्यंतच्या संगीत नाटकांच्या रूढ पठडीपेक्षा खूपच वेगळं होतं. त्यात नाटकाचा आणि व्यक्तिरेखांचा विचार होता. कीर्ती शिलेदार आणि विश्वनाथ बागुल यांचा अभिनय आणि गाणं दोन्हीही रसिकांच्या मनात दीर्घकाळ स्मरणात उरले हेही तितकंच खरं… त्यांच्या मनात कीर्ती कायमच ‘स्वरसम्राज्ञी’च राहणार!

*ऋणनिर्देश : दीप्ती भोगले (पूर्वाश्रमीच्या लता जयराम शिलेदार) आणि शुभदा दादरकर (पूर्वाश्रमीच्या शुभदा विद्याधर गोखले) यांच्याशी झालेल्या चर्चा या लेखासाठी उपयोगी पडल्या.

जाता-जाता : ‘पिग्मॅलियन’चाच डीएनए असलेली ‘स्वरसम्राज्ञी’ची एक बहीणही नंतर मराठी रंगभूमीवर अवतरली.. आठवलं?... तिच्याविषयी पुढच्या लेखात !

तंबोरी !.. की तंबोऱ्याचं बाळ?

‘स्वरसम्राज्ञी’च्या एका प्रयोगाला मिरजेचे प्रख्यात व्यावसायिक आबासाहेब सतारमेकर शहामृगाचं अंडं वापरून बनवलेली एक ‘तंबोरी’ घेऊन आले. लता शिलेदार या नाटकात ‘गायिका रक्षण समिती’च्या संचालिका तारिणीदेवी हिची भन्नाट भूमिका करायच्या. त्या विक्षिप्त भूमिकेत त्या दर प्रयोगात नवनव्या गमती करायच्या. त्यादिवशी सोबत ती तंबोरी घेऊन रंगमंचावर आल्या ! भय्यासाहेबांच्या भूमिकेतील जयरामपंतांनी विचारलं, ‘आहे काय नेमकं हे?’

तारिणीदेवी उत्तरल्या ‘गाताना ‘तंबोरा’ वापरत नाही मी, ही अशी ‘तंबोरी’च वापरते!’.. यावर प्रेक्षकांमध्ये हशा पिकला. पण पंत पुढं बोलले, ‘ही ‘तंबोरी’?... खरं तर तंबोऱ्याचं बाळच म्हणायचं!’ – आधीपेक्षा दुपटीनं हशा उसळला!

मिरजकरांनी लताला पन्नास प्रयोगांच्या बोलीवर दिलेली ही ‘तंबोरी’ तिच्या तारिणीच्या कामावर खूष होऊन तिला बक्षीस दिली. लतासाठी हे कुठल्याही पुरस्कारापेक्षा कमी नव्हतं!.. विशेष म्हणजे अशा केवळ दोनच ‘तंबोऱ्या’ अस्तित्वात होत्या.. दुसरी गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकरांकडे होती!

(लेखक नाट्य व चित्रपट क्षेत्राचे जाणकार अभ्यासक असून पटकथाकार आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.