ड्रग्जच्या विळख्यात ईशान्य भारत

आता आसाममध्ये जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांचा साठा पाहिला तर पंजाबची नशा फारच किरकोळ वाटू लागेल अशी स्थिती आहे.
Drugs
DrugsSakal
Updated on

कधीकाळी देशभर चर्चेचा विषय ठरलेल्या ‘उडता पंजाब’ या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डानं काही काळासाठी ब्रेक लावला होता. अमली पदार्थांच्या तस्करीमागील एक साखळीच या चित्रपटातून दाखविण्यात आली होती. या पदार्थांची दोन उगम स्थानं होती. एक म्हणजे पाकिस्तान आणि दुसरे म्हणजे हिमाचल प्रदेशातील खासगी प्रयोगशाळा. आजही पंजाब सीमेवरील कुंपणाखालून हेरॉईनची मोठ्या प्रमाणावर तस्करी होते. पंजाबला लागून असणाऱ्या राज्यातून द्रव स्वरूपातील अमली पदार्थांचा छोट्या बाटल्यांतून कसा पुरवठा केला जातो? याचं वास्तव या चित्रपटातून मांडण्यात आलं होतं. केवळ दोनच अमली पदार्थांनी राज्यातील अवघ्या तरुणाईला कसं झिंगवलं? याचं धक्कादायक चित्र या चित्रपटानं अवघ्या जगाला दाखविलं होतं.

आता आसाममध्ये जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांचा साठा पाहिला तर पंजाबची नशा फारच किरकोळ वाटू लागेल अशी स्थिती आहे. मागील काही दिवसांत ईशान्येकडील राज्यात करण्यात आलेल्या कारवाईतून विविध प्रकारच्या अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. ‘कोकेन’ आणि ‘एलएसडी’ ही उच्चभ्रूंना विशेष प्रिय असलेले पदार्थ सोडले तर अन्य सगळेच घटक राज्यात सापडू लागले आहेत. उपरोक्त दोन्ही घटक परदेशातून आयात केले जात असल्याने त्यांची किंमत देखील अधिक असते शिवाय त्यांचा वापर देखील एका विशिष्ट श्रीमंत वर्गापुरताच मर्यादित असतो.

आसाममध्ये ब्राऊन शुगर किंवा हेरॉइन क्र : ३, कफ सिरप आणि झोपेच्या गोळ्यांचा नशेसाठी मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याचे दिसून आले आहे. याच पदार्थांचा मोठा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. याशिवाय गांजा, अफू, हेरॉइन क्र : ४ आणि याबा यांची झिंगही चढू लागली आहे. जानेवारीपासूनचा काळ लक्षात घेतला तर याप्रकरणी हजारो लोकांना अटक करण्यात आली असून अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी तब्बल ६०८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आसाममध्ये तीन ठिकाणांवरून अमली पदार्थ येत आहेत त्यात प्रामुख्याने म्यानमार, उत्तर भारतातील काही राज्ये आणि ईशान्येकडील काही भागांचा समावेश होतो. म्यानमारमधील उत्तरेकडील भाग अमली पदार्थांच्या व्यापारामुळे कुख्यात झाला आहे. मागील अनेक दशकांपासून याच भागातून मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांची तस्करी होत असल्याचे आढळून आले आहे.

सुरुवातीला शान प्रांतातल्या प्रयोगशाळांमध्ये हेरॉईनची निर्मिती केली जात असे. नव्वदच्या दशकांमध्ये अमली पदार्थांची संख्याही वाढल्याचे दिसून येते. ड्रग्ज माफियांनी ‘याबा’ सारखे कृत्रिम अंमली पदार्थ तयार करायला सुरुवात केली. यामागे कारणही तसेच होते. त्याचे उत्पादन करणे सोपे होते, तसेच लहान पाकिटांमधून त्याची सहज तस्करी केली जात असे. या पदार्थांची वाहतूक करण्यासाठी तसा फारसा खर्चही लागत नाही. उच्च प्रतीच्या हेरॉईनच्या निर्मितीसाठी ॲसिटिक ॲनहायड्राईड हा घटक आवश्‍यक असतो, म्यानमारमधील प्रयोगशाळा अन्य देशांतून तस्करीच्या मार्गाने तो आणतात. तसं पाहता ‘याबा’ हे कॅफिन आणि मेटाहॅमफेटामाईन यांचे मिश्रण असलेल्या गोळ्या असतात. सर्वसामान्यपणे धूम्रपानाच्या माध्यमातून या ड्रग्जचा नशेसाठी वापर केला जातो. तोंडावाटे किंवा नाकावाटे देखील ते घेता येते. ‘आईस’ नावाचे एक ड्रग्ज देखील सध्या चर्चेचा विषय ठरले आहे, ते केवळ मेटाहॅमफेटामाईनच्या माध्यमातून तयार करण्यात येते.

काही सरकारी अधिकाऱ्यांच्या मते बांगलादेशातून तस्करीच्या मार्गाने अमली पदार्थ हे ईशान्य भारतामध्ये येत आहेत. आसाम आणि बंगालला लागून असणाऱ्या सीमांवरूनच मोठ्या प्रमाणावर या अमली पदार्थांची तस्करी होत असल्याचे दिसून आले आहे. ब्राऊन शुगर आणि हेरॉइन क्र : ४ यांची बड्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री केली जात असल्याचे आढळून आले आहे. येथे वापरकर्त्यांना एजंट्सच्या माध्यमातून त्यांचा पुरवठा केला जातो. प्रत्यक्षात याची पाळेमुळे दूर कोठेतरी अथवा ईशान्येकडील अन्य भागांत असू शकतात.

आसामातून आतापर्यंत नेमके किती प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आले याची माहिती पोलिसांनी दिलेली नाही. मागील काही दिवसांत देशाच्या अन्य भागांतून तस्करीच्या मार्गाने आसाममध्ये येणाऱ्या अमली पदार्थांचे प्रमाण वाढले आहे, एवढे मात्र नक्की. या ट्रेंडला देखील अनेक घटक कारणीभूत आहेत. म्यानमारमधील ड्रग्जचे निर्मिती केंद्र असणाऱ्या प्रयोगशाळांनी आता शान प्रांताच्या बाहेर देखील हातपाय पसरले आहेत.

संयुक्त राष्ट्र संघाच्या अमली पदार्थ आणि गुन्हे विभागाने याबाबत तयार केलेला अहवाल बराच बोलका आहे. सीमेपलीकडच्या एका मोठ्या पट्ट्यामध्ये अफूची लागवड करण्यात येते. हाच पट्टा ईशान्य भारताला देखील स्पर्श करतो. चामफाई आणि मोरेह या सीमावर्ती भागांतील शहरांमध्ये राहणारे स्थानिक नागरिक या पदार्थांची निर्मिती करणारी केंद्रे भारत- म्यानमार सीमेला अगदी लागूनच असल्याचे सांगतात. ईशान्येकडील राज्यांत येथूनच मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज येतात. १ हजार ६४३ किलोमीटर लांबी असलेल्या डोंगराळ भागातील सीमेवर कुठल्याही स्वरुपाचा बंदोबस्त करण्यात आलेला नाही. यामुळे दोन्ही देशांचे नागरिक बिनधास्तपणे ये-जा करत असतात. ते दोन्ही बाजूंकडे जवळपास सोळा किलोमीटरपर्यंत प्रवास करत असल्याचे दिसून आले आहे. आतापर्यंत पोलिसांनी जप्त केलेल्या अमली पदार्थांचा मूळ स्रोत नेमका काय आहे? हे जाहीर केलेले नाही. बऱ्याचदा तपास संस्था या पदार्थांचे मूळ उघड करत नाही पण आतापर्यंत जप्त करण्यात आलेले पदार्थ हे उत्तरप्रदेशातील असल्याची खात्री त्यांना पटली आहे.

केवळ ईशान्य भारतापुरताच विचार केला तर मणिपूर, अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि आसाममधील डोंगराळ भागांमध्ये गांजा आणि अफूचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. सरकारी तपास संस्था देखील वेळोवेळी त्यांची शेते नष्ट करण्याचे काम करतात. या दोन्ही घटकांना राज्यातच मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. शहरांमध्येही त्यांची विक्री केली जाते तसेच शेजारी बांगलादेशामध्येही त्यांचा पुरवठा होत असल्याचे आढळून आले आहे. भूतानला लागून असणाऱ्या सीमेवरून देखील मोठ्या प्रमाणावर गांजाची तस्करी होत असल्याचे आढळून आले आहे.

ईशान्य भारतातील आसामच्या वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक स्थानामुळे येथून मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांची तस्करी होत असल्याचे आढळून आले आहे. आसाममध्येही मागील काही दिवसांत या पदार्थांचे सेवन करणाऱ्यांची संख्या वाढल्याने तपास यंत्रणा सावध झाल्या आहेत. मध्यंतरी आसाम आणि मेघालयच्या राज्यपातळीवरील समन्वयक संस्थेचे मुख्य कार्यकारी प्रमुख डॉ. सोनदीप होन्से यांनी केलेले विधान सूचक मानावे लागेल. केवळ आसाममध्ये अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांची संख्या तीन लाख एवढी असल्याचे ते सांगतात, त्यामुळे सध्या सुरू असलेल्या छापासत्रामुळे हे सगळे काही संपेल असे म्हणणे देखील धाडसाचे ठरेल.यामुळे तस्करीला काही काळ चाप बसणार असला तरीसुद्धा त्याच्या समूळ उच्चाटनासाठी दीर्घकालीन धोरण तयार करावे लागेल असे त्यांनी म्हटले आहे. यामध्ये व्यसनाच्या आहारी गेलेल्यांचे पुनर्वसन आणि त्यांच्यात ड्रग्जच्या दुष्परिणामांबाबत जाणीव जागृती करणे गरजेचे आहे.

- राजीव भट्टाचार्य saptrang@esakal.com

(लेखक ईशान्य भारतातील ज्येष्ठ पत्रकार आहेत )

(अनुवाद : गोपाळ कुलकर्णी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.