‘जिजाऊ’च्या लेकींसाठी

बोलता बोलता काका म्हणाले, अविनाशला त्याच्या आईपेक्षा प्रिय जिजाऊ स्मृती सृष्टी होती.
rajmata jijau srushti project avinash kadam
rajmata jijau srushti project avinash kadamSakal
Updated on

वेगवेगळ्या सामाजिक चळवळींमध्ये काम केल्याचं अंग असलेल्या अविनाश यांनी त्यांच्या राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या माध्यमातून जिजाऊ सृष्टी स्वप्न साकारण्यासाठी पुढाकार घेतला. २० वर्षांच्या मेहनतीनं जिजाऊ सृष्टी अंतिम टप्प्याकडं नेण्यासाठी त्यांची वाटचाल सुरू आहे.

जिजाऊंच्या जन्मापासून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकापर्यंत सारा इतिहास इथं चित्रांच्या माध्यमातून अतिशय सुंदररीत्या दाखवण्यात आला होता.

अविनाश कदम पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते. गेल्या बावीस वर्षांपासून त्यांचा आणि माझा नातेसंबध. त्यांच्या आईंचं निधन झाल्यामुळं मी अविनाशला भेटायला नांदेडला गेलो. माझ्यासोबत दोघेजण होते.

घरात अविनाश यांच्या आई - कमलबाई यांच्या फोटोला मोठा हार घातला होता. घरात अविनाशचे वडील नामदेव कदमगुरुजी, काका होते. आम्ही घरात बसलो. काकू कशा गेल्या, हे काकांनी सांगितलं.

बोलता बोलता काका म्हणाले, अविनाशला त्याच्या आईपेक्षा प्रिय जिजाऊ स्मृती सृष्टी होती. त्याची आई कित्येक महिने दवाखान्यात होती, त्यानं आईची सेवा केली नाही. काकांच्या बोलण्यातून सतत जिजाऊ सृष्टी, जिजाऊ सृष्टी, असा उल्लेख येत होता.

माझ्या चेहऱ्यावरचा प्रश्न पाहून माहुरेदाजी म्हणाले, गेल्या २० वर्षांपासून याच भागात असलेला ‘राजमाता जिजाऊ सृष्टी ’असा मोठा प्रकल्प शासन, प्रशासन, लोकसहभाग यांच्या मदतीनं अविनाश उभे करीत आहेत.

या ‘जिजाऊ सृष्टी’नं नांदेडच्या वैभवामध्ये मोठी भर घातली. जसा नांदेडमध्ये गुरुद्वारा सर्वांना प्रिय आहे, तसं या जिजाऊ सृष्टीचं सर्वांना आकर्षण आहे. माहुरे, चित्ते आणि कदमकाका तिघंही ‘जिजाऊ सृष्टी’ बाबत भरभरून बोलत होते. मी काकांना म्हणालो, अविनाश जिजाऊ सृष्टीकडेच गेलेत का? काका म्हणाले, हो. आम्ही उठलो आणि जिजाऊ सृष्टीच्या दिशेने चालायला लागलो.

अविनाश यांच्या घरापासून अगदी हाकेच्या अंतरावर भव्य जिजाऊ सृष्टी साकारली होती. बाहेरून वाटत होतं आपण एखाद्या किल्ल्यामध्ये प्रवेश करतोय. आम्ही आतमध्ये गेलो. काकांनी अविनाशला आवाज दिला. अविनाशचं लक्ष आमच्याकडं गेलं.

अविनाश ताताडीनं आमच्याकडं आले. माझ्याजवळ येताच अविनाश यांनी मला मिठी मारली. आमच्याकडं पाहून काकांच्या डोळ्यात पाणी आलं. आई गेल्याचं दु:ख आणि खूप वर्षांची भेट अशी दोन्ही कारणं त्या मिठीमागं होती.

आईविषयी बोलावं की जिजाऊ सृष्टीविषयी बोलावं, अशी गडबड अविनाश यांच्या मनामध्ये सुरू होती. त्यांनी माझ्याशी बोलायला सुरुवात केली ती जिजाऊ सृष्टीपासूनच. जिजाऊ सृष्टी, ती उभी करण्याची भूमिका, त्यातून काय काय होणार आहे. आईनं सर्वांचा घेतलेला निरोप हे सर्व काही अविनाश सांगत होते.

या चित्रांचं स्केच काढलं होतं चित्रकार दिलीप कदम यांनी. चित्र बनवलं शिल्पकार व्यंकट पाटील यांनी. प्रत्येक चित्राच्या खाली ऐतिहासिक प्रसंग लिहिले आहेत श्रीमंत कोकाटे यांनी. जिजाऊ सृष्टीबद्दल काय सांगू आणि काय नाही असं अविनाश यांना झालं होतं. महिला, मुली ज्यांना कुणाला राजमाता जिजाऊचा सच्चा पाईक बनायचं आहे त्यांनी ‘जिजाऊ सृष्टी’त जाऊन तिथला इतिहास एकदा डोळ्याखालून घाला.

एका मोठ्या हॉलकडं आमचं लक्ष वेधत काका म्हणाले, ही मुलींची अभ्यासिका आहे. या ‘जिजाऊ सृष्टी’चं सगळ्यात वैशिष्ट्य काय असेल तर ही मुलींची अभ्यासिका. या अभ्यासिकेसाठी माझा खूप आग्रह होता.

या अभ्यासिकेमध्ये दीडशे मुली एकावेळी अभ्यास, जिजाऊ चरित्राचे पारायण करणार आहेत. जिजाऊ, सावित्री, रमाई असा सर्वांची आई म्हणून भूमिका बजावणाऱ्या मातांचं आत्मचरित्र, त्यांची माहिती देणारी, स्पर्धा परीक्षाची पुस्तकं इथं असतील.

अविनाश कदम ( ७९७२३७८०८४) म्हणाले, या जिजाऊ सृष्टीच्या माध्यमातून खूप काळ टिकणारी संस्कृती उभी राहावी. अनेक महिला, मुली येथे घडाव्यात हा उद्देश आहे, असं अविनाश मला सांगत होते. आम्ही जिजाऊ सृष्टीमध्ये अजून एक चक्कर मारली.

ते पुढं म्हणाले, आतापर्यंत दोन कोटी रुपयांवर यासाठी खर्च झालाय. पदरमोड, शासन, राजकीय मंडळी, नांदेड मनपा, अनेक दाते यांच्या माध्यमातून हे काम मार्गी लागले. ते काम अजून पुढं जाण्यासाठी किमान एक कोटी रुपयांची गरज आहे. हे एक कोटी रुपये गोळा कसे करायचे? हा माझ्या समोर प्रश्न आहे.

मी अविनाशच्या खांद्यावर हात टाकत म्हणालो, सुरुवात करत असताना तुमच्याकडे दोन रुपये नव्हते. झाले ना दोन कोटी रुपये जमा. हेही एक कोटी जमा होतील. नका काळजी करू, धडपड सुरू ठेवा.

rajmata jijau srushti project avinash kadam
Farmer Protest : शेतकऱ्याचे शोले स्टाईल आंदोलन! 'या' आहेत मागण्या...

तुमच्या धडपडीतून पुढची चारशे वर्ष हेवा वाटावा असा इतिहास निर्माण होणार आहे. जिजाऊ सृष्टीत काढलेले प्रत्येक चित्र पाहिल्यावर, त्या चित्राच्या खाली लिहिलेला प्रत्येक संदेश वाचल्यावर अंगावर काटा राहत होता.

असं वाटत होतं, की किमान अजून पाचसहा तास तिथेच बसून राहावं. खूप मोठं काहीतरी निर्माण केलं, याचा अभिमान जसा अविनाश यांच्या रोमारोमात होता, तसा तिथली कलाकृती पाहताना आपण काहीतरी वेगळं अनुभवतोय याची जाणीव पावलोपावली होत होती. वेगळेपणाला चिरंतन टिकणारी झालर लागली पाहिजे. असं काम प्रत्यक्षामध्ये साकार करणारा अविनाश माझ्यासमोर एक उत्तम उदाहरण आहे.

हल्ली आपल्याकडं पुतळे आणि स्मारक उभारण्याची स्पर्धा लागलेली आहे. पण त्या पुतळे-स्मारकाच्या माध्यमातून चिरंतर टिकणारे काहीतरी उभारणार आहोत, याचं उदाहरण फक्त नांदेडच्या अविनाश यांच्या सारखं एखादं सापडू शकते. बरोबर ना.. ?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.