ब बुरख्याचा ब बिकिनीचा

हिजाब, बुरखा, मंगळसूत्र, घुंघट अगदी ओढणीही मला व्यक्तिश: बंधन वाटते; पण ते घालणाऱ्या व्यक्तींना शिक्षण नाकारणे हा मार्ग नाही.
ब बुरख्याचा ब बिकिनीचा
Updated on
Summary

हिजाब, बुरखा, मंगळसूत्र, घुंघट अगदी ओढणीही मला व्यक्तिश: बंधन वाटते; पण ते घालणाऱ्या व्यक्तींना शिक्षण नाकारणे हा मार्ग नाही.

हिजाब, बुरखा, मंगळसूत्र, घुंघट अगदी ओढणीही मला व्यक्तिश: बंधन वाटते; पण ते घालणाऱ्या व्यक्तींना शिक्षण नाकारणे हा मार्ग नाही. विद्यार्थिनीने हिजाब घालायचा नाही, पण शिक्षिका मात्र मंगळसूत्र घालणार, हा कुठला न्याय आहे? या सर्व पितृसत्तेच्या, धर्मसत्तेच्या निशाण्या आहेत आणि स्वेच्छेने जिला जे घालावंसं वाटतं ते तिला घालता आल पाहिजे.

सध्या कर्नाटकात हिजाब घालण्यावरून वातावरण तापवण्यात आले आहे. हिजाब घालून येणाऱ्या मुलींना भगवे स्कार्फ, पगड्या घातलेली मुले/मुली शाळा-कॉलेजच्या आवारातून विरोध करताना दिसत आहेत. त्यांच्यावर हल्ला होताना समाजमाध्यमांवर दिसत आहेत. यावर अनेक जण ‘असंच व्हायला पाहिजे’, ‘शाळा कॉलेजमध्ये गणवेशाचे महत्त्व’ यावर तावातावाने बोलताना दिसत आहेत. दुसऱ्या बाजूला ‘पहले हिजाब फिर किताब’सारखी विधानेही केली जात आहेत. विविध प्रकारचे मिम्स तयार केले जात आहेत. जुने-नवे फोटो दाखवले जात आहेत. यातच एक फोटो पाहिला. इराणमध्ये पन्नास वर्षांपूर्वी काही स्त्रिया कशा बिकिनी घालून बसल्या आहेत आणि आता कशा सर्व स्त्रिया बुरख्यात आहेत. ‘कुठे नेऊन ठेवला इराण आमचा’ अशा आशयाचा हा फोटो व्हायरल होत आहे.

यात दोन महत्त्वाचे मुद्दे मागे पडत आहेत. हिजाबला विरोध करणारे, तो स्त्री स्वातंत्र्याच्या आड येणारा आहे आणि हिजाब सोडला तर स्त्रिया मुक्त होतील, अशा कुठल्याही भावनेतून हा विरोध होत नाहीये. हे चालू असलेलं राजकारण हिजाबबद्दल नाही. हा मुस्लिमविरोध आहे. तो देशात विविध ठिकाणी कधी गोमांस, कधी नमाज, तर सध्या हिजाब असे मुद्दे उकरून चालू आहे. वर्षानुवर्षे हिजाब घालून येणाऱ्या मुली अचानक हिंदुत्ववादी गटाच्या रडारवर आल्या आहेत.

दुसरे म्हणजे यात त्या मुलींचे आणि पर्यायाने त्यांना विरोध करणाऱ्या मुलांचे शैक्षणिक नुकसान तर होतच आहे; पण त्याचबरोबर धार्मिक कट्टरतेसाठी त्यांचा वापरही होत आहे. हिजाब या कपड्यासारख्या डोक्याला गुंडाळणाऱ्या वस्त्रामुळे काही मुलींना शिक्षणापासून दूर ठेवण्यात येत आहे. यावर कोणीही बोलत नाही. कारण धर्म महत्त्वाचा की शिक्षण, याचे उत्तर सध्याच्या भारतात ठरलेले आहे. एक तर बुरखा, हिजाब यांच्यात फरक असतो. बुरख्याच्या आत गणवेश घातलेला असतो आणि अनेक मुली रस्त्यातून येता-जाताना बुरखा घालतात आणि वर्गात बुरखा काढून गणवेशातच बसतात. हिजाब हा गणवेशाबरोबरच घातला जातो, जशी शीख मुले पगडी घालतात किंवा लग्न झालेल्या (आणि कॉलेजात जाणाऱ्या) मुली गणवेशाबरोबर मंगळसूत्र घालतात, कुंकू लावतात किंवा ब्राह्मण मुले जानवे घालतात, शेंडी ठेवतात इत्यादी...

गणवेश सर्व मुला-मुलींनी घातलाच पाहिजे याला कोणीच विरोध करत नाही; पण त्याबरोबर अनेक मुलं-मुली स्वेच्छेने तर कधी पालकांचा, सामाजिक आग्रह म्हणून ही धार्मिक प्रतीके आपल्याबरोबर वागवत असतात. त्यामुळे त्यांचा शिक्षणाचा अधिकार काढून घेतला जाऊ शकत नाही. त्यांना त्यांचे धार्मिक स्वातंत्र्य जपण्याचा अधिकार घटनेने दिला आहे. त्यामुळे गणवेशाचे समर्थन करताना कुणाची शिक्षणाची संधी डावलली जात नाहीये ना, हे बघणे जास्त महत्त्वाचे आहे.

आपण अजूनही अशा समाजात आहोत जिथे दोन अपत्यांपैकी एकालाच शिकवू शकू अशी परिस्थिती असेल, तर मुलीला डावलून मुलाला शिकवले जाते. दहावी, बारावीपर्यंत मुलगी शिकली तर उच्चशिक्षण आणि लग्न यामध्ये लग्नाला प्रधान्य दिले जाते. मुलीला घराबाहेर पडताना असंख्य बंधनासकट बाहेर पडावे लागते. मुस्लिम समाज जिथे स्त्रीशिक्षण आत्ता कुठे रुजते आहे, तिथे काही मुलींवर ‘शाळेत जायचं असेल तर हिजाब घालून जायचं’ असे निर्बंध असणारच आहेत; पण त्यासकट आल्या तर त्यांना शिक्षण मिळत आहे, ही वस्तुस्थिती आहे. अचानक हिजाब बंदी केली तर कित्येक पालक मुलींना बाहेर पाठवणार नाहीत, हेही सत्य आहे.

मला व्यक्तिशः हिजाब, बुरखा, मंगळसूत्र, घुंघट अगदी ओढणीही बंधन वाटते. पण म्हणून ते घालणाऱ्या व्यक्तींना शिक्षण नाकारणे हा मार्ग आहे का? म्हणजे विद्यार्थिनीने हिजाब घालायचा नाही, पण शिक्षिका मात्र मंगळसूत्र घालणार, हा कुठला न्याय आहे? या सर्व पितृसत्तेच्या, धर्मसत्तेच्या निशाण्या आहेत आणि स्वेच्छेने जिला जे घालावंसं वाटतं ते तिला घालता आल पाहिजे.

हा स्वेच्छा शब्द खूप गमतीशीर आहे. अनेकदा सामाजिक दबाव, लहानपणापासूनचे चांगले-वाईट संस्कार (कंडिशनिंग) यांचा जसा आपल्या स्वेच्छेवर परिणाम होतो, तसाच नावीन्याच्या, प्रगत होण्याच्या भ्रामक कल्पना, अमुक नाही केलं तर आपण जगापासून मागे पडू या भावनाही स्वेच्छेला वेगवेगळी वळणे देत राहतात. एखादीला बुरखा घालावयास वाटणं किंवा बिकिनी घालावेसे वाटणे या दोन्हींमध्ये, पुरुषी नजरेचा किती सहभाग आहे, हे आधी तपासले पाहिजे. बुरखा हा ज्या प्रातांतून आला तिथे अंगभर वस्त्र घालणे ही भौगोलिक गरज होती; पुरुषांसाठीही! आता त्याचा वापर पुरुषी नजरेपासून बचावासाठी केला जातो. बिकिनीचा वापर पोहण्यापेक्षा जास्त पुरुषांच्या नजरसुखासाठी जगभर केला जातो. आता या विचाराचे प्रबोधन शिक्षणातूनच होऊ शकते; पण हे प्रबोधन आहे, जबरदस्ती नाही. तरीही एखाद्या स्त्रीला हे घालावसं वाटत असेल तर तिला ते स्वातंत्र्य आहे.

ता.क. इथे कुठे बुरखा किंवा बिकिनी घालून शाळेत किंवा कॉलेजमध्ये जा असे म्हटलेले नाही; पण गणवेशाबरोबर वाढीव (ॲडिशनल) धार्मिक गोष्टी घालण्याची आपल्याकडे ‘परंपरा’ आहे आणि त्यामुळे कुणाचेही शिक्षण थांबू नये एवढीच इच्छा!

beingrasika@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.