कधी कधी वास्तवाचा झटका इतक्या जोरात बसतो, की काही मूलभूत प्रश्नांकडे परत परत वळावंसं वाटायला लागतं. बाई म्हणून जगताना मला किती वेळा ‘समजून घ्यावं’ लागतं? किती वेळा मन मारावं लागतं? किती वेळा ‘घरासाठी’ म्हणून असंख्य गोष्टी कराव्या लागतात? कितीदा मनातलं सांगायला कोणी नाही म्हणून भिंतींशी गप्पा माराव्या लागतात?
कधी कधी काय लिहावं कळत नाही... विषयांची कमतरता म्हणून नाही... पण जगात इतक्या गोष्टी चाललेल्या असतात आणि आपण त्यात नक्की कधी कशावर व्यक्त होत आहोत, हे कळेनासं होतं. माझंही तसंच काहीसं झालंय! याला कारण आहे, माझी इतक्यात झालेली काही नातेवाईकांची भेट. म्हणजे मुंबईत राहून एक अत्यंत स्वतंत्र आयुष्य घालवताना अनेक गोष्टींकडे जरा दुर्लक्षच होतं.
नुकतीच मुलगी जन्माला आली, तर माझ्या सुशिक्षित नातेवाईकांना कसं दुःख झालं आणि त्या नवीन बाळाला कसं सासूबाईंनी हातातही घेतलं नाही, ही कथा जेव्हा मी ऐकली तेव्हा काय प्रतिक्रिया द्यावी, हे कळतच नव्हतं! किंवा काम करणाऱ्या सुनेला आता पोरांकडे बघ म्हणून घरी बसवलं गेलं आणि आता तिला हातात कमीत कमी पैसे देऊन प्रवासाला पाठवलं, याची कहाणी! आणि सगळ्यात महान म्हणजे, घरात सून हवी, कारण ‘घराकडे बघायला कोणी नाही’!! या कारणावर तर मी हताश झाले. म्हणजे इथे बसून पितृसत्ता किंवा लग्नसंस्थेतले प्रश्न याबद्दल लिहिताना हे लोक माझ्या डोक्यातून गायब झाले होते का? प्रगती होतेय, हल्ली असं काही नसतं, असं मलाही वाटायला लागलं होतं की काय?
तशी मी इतकी भाबडी नाहीये! आसपासच्या जगाचं मला भान आहे; पण कधी कधी वास्तवाचा झटका इतक्या जोरात बसतो की काही मूलभूत प्रश्नांकडे परत परत वळावंसं वाटायला लागतं. बाई म्हणून जगताना मला किती वेळा ‘समजून घ्यावं’ लागतं? किती वेळा मन मारावं लागतं? किती वेळा ‘घरासाठी’ म्हणून असंख्य गोष्टी कराव्या लागतात? कितीदा मनातलं सांगायला कोणी नाही म्हणून भिंतींशी गप्पा माराव्या लागतात?... अनेकदा! कितीही बंडखोर असले तरी मी स्वतः लग्नसंस्थेत राहून एक मूल जन्माला घातलं आहे! त्यामुळे घरासाठी म्हणून घ्यायच्या जबाबदाऱ्या मला घ्याव्याच लागतात. अर्थात, नवरा फेमिनिस्ट असला की अनेक गोष्टी सोप्या होतात. आणि आर्थिक स्थिती! ती जशी बळकट होत गेली तशी घरातल्या मदतनीसांची संख्या वाढत गेली आणि मी घरातल्या अनेक जबाबदाऱ्यांतून मुक्त होत गेले; पण त्या जबाबदाऱ्या माझ्याच होत्या! असं मीही मानलंच होतं की!
माझीही जोपासना अनेक रोमँटिक कथा कादंबऱ्यांवर झालेली असल्याने लग्नाचा गाभा हा प्रेम असावा, असंच वाटायचं! त्यामुळे ठरवून लग्न करणाऱ्यांबद्दल एक कुतूहल असायचं! त्यांच्यातही अनेकदा नंतर प्रेम निर्माण होतं किंवा प्रेमविवाह करणाऱ्यांमधलं प्रेम नंतर सुकत जातं! अशी अनेक उदाहरणं पाहिल्यानंतर आपण ‘मित्रा’शी लग्न केलं हे बरंच झालं, असं वाटायला लागलं. आणि त्यानंतर येणारा जबाबदारीचा डोंगर! हा चढ खरं तर दोघांसाठीही असतो; पण घरची जबाबदारी ही बाईची. हे कुठे लिहिलंय हे खरंतर शोधून काढावं लागणार आहे. आणि लिहिलं असेल तर पुसून टाकावं लागणार आहे.
आणि घर सांभाळायचं म्हणजे? घर स्वच्छ, नीटनेटकं आहे किंवा नाही हे पाहणं, ते सुंदर दिसत राहील यासाठी प्रयत्न करणं, स्वयंपाक, भांडी, परत स्वच्छता, मुलं असतील तर त्यांचा अभ्यास, घरात वृद्ध असतील, तर त्यांची औषधं इत्यादी. या सगळ्यांबरोबर ऑफिस असेल, तर ते वेगळं (ते घरकामात धरलं जाणार नाही, ते आपापलं बघायचं!), परत आल्यावर अनेकदा स्वयंपाक, भांडी, परत स्वच्छता आणि शक्य असल्यास (किंवा अनेकदा शक्य नसतानाही) नवऱ्याबरोबर संभोग! या सगळ्या जबाबदाऱ्या झाल्या? अरे नाही, अजून सण समारंभ आहेत, आजारपणं आहेत, सुट्ट्या आहेत, यंव आहे आणि त्यंव आहे!
घर सांभाळण्यासाठी कोणीतरी हवं म्हणून लग्न! या वाक्यानं मला आतून-बाहेरून हादरवून टाकलंय! आणि ते मी मुंबईत येऊन अनेक मित्र-मैत्रिणींशी बोलत राहिले, तर प्रत्येकाकडे अशी किमान एक गोष्ट होती. म्हणजे आताच्या काळात, सुशिक्षित शहरी लोकांमध्ये असं होत नाही हा भ्रमच! मला एकदम आठवलं, मला जेव्हा मुलगी झाली, आणि हे कळल्यावर आमच्या घरच्यांनी जेव्हा प्रचंड आनंद व्यक्त केला तेव्हा तिथली नर्स भांबावली होती! इतका आनंद कुणाला होत नाही म्हणाली, मुलीचं कळल्यावर! तेव्हा मी दुर्लक्ष केलं होतं!
खरंतर मला आज त्या बांगडीवालीबद्दल लिहायचं होतं. जिचं खोपट बुलडोझरनं पाडलं गेलं! बांगड्या, सौभाग्याची खूण, तेही हिंदू धर्मात... विकणारी मुसलमान बाई... पण तिच्याबद्दल विचार करायला कोणाला वेळ आहे? घर, ऑफिस, मुलांचा अभ्यास हे सगळं करताना मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली इथे काय घडत आहे, याचा विचार करायला कोणाला वेळ आहे? मुळात हे लेख वाचायला किती बायांना वेळ आहे? कारण घर चालवणं हे एक न संपणारं काम आहे. मला लाख लिहायचंय हो, बायकांच्या हक्कांबद्दल, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाबद्दल, अत्याचाराबद्दल, त्याविरोधात काम करणाऱ्या स्त्रियांबद्दल; पण ते वाचायला बायांना वेळ आहे का? बायांना सकाळी उठून शांतपणे वृत्तपत्र वाचायचा वेळ आहे का? त्यांच्या हातात चहाचा कप येतो का? का घरातल्यांची आवराआवरी, पोरांना शाळेत पाठवायची गर्दी, सुट्टी असेल तर त्यांच्या मागे खाण्याची गडबड, या सगळ्यात आपला चहा हातात घेऊन शांतपणे वृत्तपत्र वाचणाऱ्या महिला जोवर तयार होत नाहीत, तोवर त्या कुणाचं तरी घर सांभाळण्यासाठी लग्न करत राहतील. मूल जन्माला घालून ‘आता याची बायको येईल, तेव्हा मला सुट्टी’ असाच विचार करत राहतील!
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.