युद्ध आणि स्त्रिया

नकाशावर रेखाटलेल्या सीमारेखा या फक्त युद्ध घडवतात. त्या रेषा देशाचं अस्तित्व बनवत नाहीत. जंगल नष्ट होतं, पर्वतांचं स्खलन होतं, सीमा बदलतात... बदलत नाहीत ती माणसं...
युद्ध आणि स्त्रिया
Updated on
Summary

नकाशावर रेखाटलेल्या सीमारेखा या फक्त युद्ध घडवतात. त्या रेषा देशाचं अस्तित्व बनवत नाहीत. जंगल नष्ट होतं, पर्वतांचं स्खलन होतं, सीमा बदलतात... बदलत नाहीत ती माणसं...

नकाशावर रेखाटलेल्या सीमारेखा या फक्त युद्ध घडवतात. त्या रेषा देशाचं अस्तित्व बनवत नाहीत. जंगल नष्ट होतं, पर्वतांचं स्खलन होतं, सीमा बदलतात... बदलत नाहीत ती माणसं... जी त्यांनीच निर्माण केलेल्या संकल्पनांसाठी एकमेकांचे जीव घेत राहतात आणि बाई या युद्धाच्या यंत्रासाठी सामग्री जन्माला घालत राहते... एकदा हे विचारून बघितलं पाहिजे की बाईला युद्धाविषयी काय वाटतं!

‘पाश’च्या कवितेमधल्या काही ओळी...

धर्मगुरू

एकुलता मुलगा आहे

नवरा आता राहिला नाही

कुठल्याही वयात

तुझ्या तलवारीपेक्षा कमीच सुंदर दिसत होते

मी नव्हतेच कधीही

कायम तूच होतास धर्मगुरू!

हा अनुवाद युक्रेनवर हल्ला झाला तेव्हापासून मनात घोळत आहे. ही कविता तेव्हा धार्मिक उन्मादाबद्दल होती. युद्धउन्माद हाही काही फार वेगळा नाही. सोशल मीडियावर युद्धाच्या बाजूने बोलणाऱ्या पोस्टचा सुळसुळाट झाला आहे. युद्ध ही गोष्टच रक्त खवळणारी आहे. हार्मोन्सला उत्तेजित करणारी. वृत्तपत्रामंध्ये, टीव्हीवर तरुण-तरुण पोरं हातातला कॅमेरा, लेखणी टाकून बंदूक उचलताना दिसत आहेत. त्यांच्या देशप्रेमाचे गोडवे गायले जात आहेत. आक्रमण करणाऱ्या देशातील युद्ध लढणारी मुलं, पुरुष दिसत आहे. बॉम्ब, गोळ्या, संहार हे सगळं दिसत आहे. दिसत नाहीयेत त्या या पुरुषांच्या घरातल्या स्त्रिया!

राष्ट्रप्रेम ही संकल्पना इतकी भव्य आहे की घर, प्रेम या सगळ्या संकल्पना त्यांच्यासमोर छोट्या वाटायला लागतात. मला या युद्धावर जाणाऱ्या मुलांच्या आया दिसत राहतात, धुरात कोंडलेल्या त्यांच्या प्रेयसी दिसतात. खिडकीतून वाट पाहणारी त्यांची मुलं-मुली दिसतात. त्यांच्यासाठी राष्ट्र/देश या संकल्पनेचं काय होतं? धीरोदात्तपणे आपापल्या मुलाचा किंवा नवऱ्याचा मरणोत्तर सन्मान स्वीकारणाऱ्या बायका आपण भारत, पाकिस्तानातही बघतो. त्यांचं कौतुक करतो. ‘तिने’ देशासाठी आपला मुलगा/नवरा समर्पित केला, अशा मोठ्या गप्पा मारतो; पण त्यांच्या आयुष्यातली ही पोकळी कधी भरून निघत असेल का? त्या त्यांचं आयुष्य कसं जगत असतील?

युद्ध आपल्या देशातील नाही, तरी आपण ज्वलंतपणे या युद्धाबद्दल बोलत आहोत. युद्ध, युद्धसदृश परिस्थिती, यामध्ये त्या भागात राहणाऱ्या बायकांचं काय होतं? घरातले कर्ते, कमावणारे पुरुष कधीही परत न येणं ही तर कधीही भरून न येणारी हानी आहे.

इतर सर्व गोष्टींप्रमाणे युद्ध हाही एक धंदा आहे. त्याला राष्ट्रप्रेमाची झालर लावली की ते एकदम उदात्त वाटत राहतं; पण युद्ध लढणाऱ्या जवानांना मिळणारी पेन्शन, इतर सोयी-सुविधा या त्यांच्या विधवांपर्यंत पोहचेपर्यंत त्यांनी कसं जगायचं असतं, याचा किती विचार केला जातो? ‘माझे युद्धात गेलेले वडील युद्ध नाही जिंकले तरी चालेल, पण घरी जिवंत परत आले पाहिजेत’ म्हणणाऱ्या सैन्य अधिकाऱ्यांच्या मुलींना ट्रोल होत राहावं लागतं! ‘ते सीमेवर लढतात म्हणून घरी सुरक्षित वातावरणात तुम्ही हे लिहू-बोलू शकता,’ असा एक युक्तिवाद नेहमी केला जातो; पण त्यांना का लढावं लागतंय सीमेवर, याचा विचार होण्याची गरज आहे. त्यांना किंवा कुणालाही इतर ‘माणसांशी’ का युद्ध करावं लागतं? देश, संस्कृती, सीमारेखा कशाचं रक्षण करायचंय? माणसांचं रक्षण करायचंय, माणसांपासून! कारण हल्ला करणारेही, त्याचा देश, वंश, धर्म किंवा संस्कृतीच्या महानतेच्या आजारांनी ग्रासले आहेत.

मुळात बायकांना युद्धाबद्दल काय वाटतं? किंवा राष्ट्र या संकल्पनेत बायकांचं महत्त्व काय आहे, का अर्ध्या लोकसंख्येला गृहीत न धरता ही संकल्पना उभी आहे, याचा विचार करण्याची गरज आहे. म्हणजे बायकांना देशप्रेम नसतं का? (असा प्रश्न विचारून ट्रोल करणाऱ्यांसाठी हे विशेष) का देश ही त्यांच्यासाठी पुरुषांपेक्षा थोडी वेगळी संकल्पना आहे? असायला हवी?

मानवी संस्कृतीचा इतिहास हा युद्ध आणि हिंसेचा इतिहास आहे. अमुकनी तमुकांवर हमला केला. यांनी हे राज्य जिंकलं, त्यांनी तो देश जिंकला. युद्धभूमीवर मारणारा सैनिक हा फक्त आकडा बनून राहतो, एक संख्या आणि त्यांच्या स्त्रिया... त्याची गणतीही नसते. उगाचच गोष्टीला वेलबुट्टी लावावी, तशा दोन-चार वीरांगनांच्या गोष्टी येतात. त्यांनाही मर्दानी वगैरे म्हटलं जातं.

आपला देश जिंकला याचं कौतुक मानवी मृत्यूच्या दुःखापेक्षा जास्त असतं? नकाशावर रेखाटलेल्या सीमारेखा या फक्त युद्ध घडवतात. त्या रेषा देशाचं अस्तित्व बनवत नाहीत. जंगल नष्ट होतं, पर्वतांचं स्खलन होतं, सीमा बदलतात... बदलत नाहीत ती माणसं... जी त्यांनीच निर्माण केलेल्या संकल्पनांसाठी एकमेकांचे जीव घेत राहतात आणि बाई या युद्धाच्या यंत्रासाठी सामग्री जन्माला घालत राहते... एकदा हे विचारून बघितलं पाहिजे की बाईला युद्धाविषयी काय वाटतं!

beingrasika@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.