कोल्हापूर जिल्ह्यातल्या हेरवाड ग्रामपंचायतीने घेतलेला विधवा प्रथा बंदीचा निर्णय महाराष्ट्र सरकारने संपूर्ण राज्यभर लागू करण्याचे ठरवले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातल्या हेरवाड ग्रामपंचायतीने घेतलेला विधवा प्रथा बंदीचा निर्णय महाराष्ट्र सरकारने संपूर्ण राज्यभर लागू करण्याचे ठरवले आहे. नवरा गेल्यानंतर कुंकू पुसणे, बांगड्या फोडणे, मंगळसूत्र काढून घेणे यांसारख्या वैधव्य घोषित करणाऱ्या गोष्टींना यामुळे आळा बसेल अशी अपेक्षा आहे. हा निर्णय नक्कीच स्वागतार्ह आहे; पण मुळात ही सौभाग्याची निशाणी का घातली जाते, त्याची जबरदस्ती का आहे, यावर चर्चा होणे गरजेचे आहे.
सौभाग्य म्हणजे चांगले भाग्य आणि चांगले भाग्य हे फक्त आणि फक्त लग्न झाले तरच असू शकते. हे फक्त स्त्रियांच्या बाबतीत घडते. म्हणजे लग्नपत्रिकेत मुलींच्या नावाच्या आधी चि.सौ.कां. म्हणजे सौभाग्य कांक्षिणी लिहिण्याची पद्धत आहे. मुलांच्या नावामागे असे काहीही लिहीत नाहीत. कारण सोप्पे आहे, पुरुष लग्न करून सौभाग्याची आशा करत नाहीत. त्यांचे चांगले भाग्य त्यांनी मेहनत केली, संपत्ती कमावली, घर विकत घेतले तर असणार आहे. बाईला फक्त असा पुरुष मिळवायचा आहे, म्हणजे तिचे चांगले भाग्य सुरू!
तुम्ही म्हणाल की आता तर मुली काम करायला लागल्या आहेत. कमवायला लागल्या आहेत. आता कुठे हा प्रश्न आहे! कितीही कमावती स्वतंत्र मुलगी असेल तरी तिच्या आईवडिलांची इच्छा काय असते? आता चांगला मुलगा पाहून सेटल व्हावे एकदाचे! हे सेटल होणे फक्त लग्नामुळेच साध्य होणार आहे आणि लग्न झाले नाही तर...? ‘बिचारी’चे अजून कुठे जुळतच नाही, असे आजही म्हटले जाते!
लग्नानंतर सौभाग्य अलंकारांची जबरदस्ती आहेच. अनेक ठिकाणी स्पष्ट सांगतात आणि बाकी ठिकाणी गृहीत धरतात. लग्न झाले म्हणजे मंगळसूत्र घालणारच, कुंकू लावणार किंवा सिंदूर भरणारच. नाही लावलं तर नवरा मरण्याची भीती! हे लहानपणापासून आतपर्यंत पोहोचवलं आहे... टिकली तिरकी असेल तर तुझा नवरा तिरका झाला आहे, असं म्हणणं किंवा शूटिंगमध्ये मंगळसूत्र घालून देणारी हेअर ड्रेसर ‘बघा हां आता माझे ऐकावे लागेल’ असे मस्करीत ती जेव्हा म्हणते तेव्हा ज्याच्या नावाचे, ज्याच्या हाताने मंगळसूत्र घातले आहे, त्याचे सगळे ऐकायचे असते. बांगड्या, जोडवी हे उपप्रकार स्थळ, जात यानुसार येत असतातच. आता या सगळ्यात व्हाट्सॲप विद्यालयाचाही हातभार लागलाय.
टिकली लावली की बायकांच्या आतली गर्मी कमी होते, असे मला एक उच्चशिक्षित परदेशी राहणारी मुलगी सांगत होती. मग हिंदूव्यतिरिक्त जगभरातल्या इतर महिला काय सतत गरम असतात? टिकली, कुंकवाचे फायदे सांगणारे मेसेज सतत फिरत असतात. त्याच्या खाली कुठल्या तरी डॉक्टर किंवा वैद्याचे नाव लिहिलेले असले की ते खरे आहे असे मानण्याची एक प्रथा आहे आणि टीव्हीवर सतत गळत राहणाऱ्या मालिका.हे सगळेच त्याचे महत्त्व अधोरेखित करत राहतात. या गोष्टी न लावणाऱ्या विविध जातीय, धर्मीय, आदिवासी, परदेशी बायका सुखात नाहीयेत असं आपण मानतो का?
माझा एक मित्र मला म्हणाला, ज्याचा त्याचा चॉईस आहे. वाटले तर घालाव्यात नाही तर नको. इतका सोप्पा असतो चॉईस? पिढ्यान् पिढ्या रक्तातून वाहत आलेले, कानीकपाळी ओरडून डोक्यात अगदी फार घट्ट बसवलेले, ‘संस्कार’ अशा गोंडस नावाखाली टाकलेले बंधन हे! हीच चर्चा हिजाबच्या निमित्तानेही झाली होती! जिला वाटेल तिने घालावा! वाटेल म्हणजे? मुलींना आपोआप काही वाटते, हे मानणे म्हणजे नसता भंपकपणा आहे... मुलींनाच का? त्यांच्या गळ्यात मंगळसूत्र आणि अंगठ्या घालून, आता यांना आयुष्यभरासाठी दावणीला बांधून ठेवले आहे. वाटणे ही एक सामाजिक प्रक्रिया आहे. जे आसपास घडत असते, रोज निगुतीने तुमच्या पानात वाढले जात असते, अगदी मेंदूच्या मुळाशी जाऊन शिजवले जात असते तेच आपल्याला वाटत असते. हे वाटणे हळूहळू चिन्हांमध्ये बदलत राहते. पक्के होत राहते. मग त्या त्या कृतीची निशाणी बनते. लग्न झाल्यावर मंगळसूत्र घालणे हे जसे अनिवार्य तसे नवरा मेल्यावर ते काढून घेणेही अनिवार्यच. ते काढून घेताना स्त्रीला वाईट वाटत असेल, असे मानून तिच्या भल्यासाठी हा कायदा करताना खूप गोष्टी आहेत, ज्या करायला पाहिजेत.
उदाहरणार्थ स्त्रीचे नवऱ्याच्या संपत्तीत अधिकार असणे, नवरा गेल्यानंतर मुलांवर अधिकार असणे, तिला हालअपेष्टा सहन करायला लागू नयेत, या गोष्टी तिला स्वावलंबी आणि स्वाभिमानी बनवण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. विधवा पुनर्विवाह हाही असाच एक विषय. मुळात त्या बाईला परत लग्न करायचे आहे की नाही हे विचारले पाहिजे कुणी तरी... विधवा पुनर्वसन म्हणजे परत लग्न करून टाका तिचे, कारण लग्न केले तरच सौभाग्य येणार आहे, हे तिच्यावर लादले जातेच.
विधवांना अपमानास्पद वागणूक मिळू नये म्हणून कायदे येणे हे स्वागतार्ह आहे; पण मुळात लग्नात ‘सौभाग्यचिन्हां’ची जबरदस्ती नाही केली तर अजून सोप्पं नाही होणार का? त्याहूनही आधी नवरा जिवंत असेल तर आणि तरच तुमचे भाग्य चांगले आहे, हा विचार पुसून टाकण्यापासून याची सुरुवात व्हायला हवी. विषय मोठा आहे, खोल आहे; पण सुरुवात आपल्याच घरापासून करायची आहे!
raskinbond@gmail.com
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.