अलविदा ‘रिडा’

८६ वर्षांनंतर रीडर्स डायजेस्ट मासिकाचं यूकेमधील कामकाज बंद झालं आहे. आपलेपण राखून असलेलं नियतकालिक अशी त्याची ओळख होती.
readers digest magzine
readers digest magzinesakal
Updated on

- वैभव वाळुंज

८६ वर्षांनंतर रीडर्स डायजेस्ट मासिकाचं यूकेमधील कामकाज बंद झालं आहे. आपलेपण राखून असलेलं नियतकालिक अशी त्याची ओळख होती. आजकालच्या तरुण पिढीला त्याची तितकी आस नसली, तरी त्या पत्राचा सुवर्णकाळ पाहिलेल्या वाचकांना ‘अरेरे, रिडा बंद झालं’ अशी हुरहूर लागणं स्वाभाविक आहे. विविध विषयांवर अमेरिकन समाजाची आणि पाश्चात्त्य जगाची मते अन् दृष्टिकोन बनवण्याचं काम ‘रीडर्स डायजेस्ट’ने ८६ वर्षांपासून केलं.

इंग्लंडमधील वृत्तपत्रांच्या इतिहासाचा आणि वर्तमानाचा एकूण आढावा घेताना त्यातील चमकून गेलेल्या अन् तरीही आपलेपण राखून असलेल्या नियतकालिकांपैकी एक म्हणजे ‘रीडर्स डायजेस्ट’... ‘रीडर्स डायजेस्ट’ नावाच्या जगप्रसिद्ध मासिकाने एप्रिल महिन्यात आपल्या प्रकाशित अंकांच्या रूपात शेवटचा श्वास घेतला.

आजकालच्या तरुण पिढीला त्याची तितकी आस नसली, तरी त्या पत्राचा सुवर्णकाळ पाहिलेल्या वाचकांना ‘अरेरे, रिडा बंद झालं’ अशी हुरहूर लागणं स्वाभाविक आहे. मराठीत दिवाळी अंकांची परंपरा बंद होण्याशीच त्याची तुलना करता येईल.

आजही मुंबईतील ग्रँट रोडवर मांडण्यात येणाऱ्या पुस्तकांच्या पथारीमध्ये ‘रिडा’च्या अंकांच्या गुंडाळ्या किंवा विविध अंक एकत्र करून छापलेली पुस्तके विकायला पडलेली दिसतात. कित्येक प्राध्यापकांच्या घरी वरच्या माळ्यावर रचून ठेवलेली लाल हार्डबाऊंडची पुस्तकं म्हणून प्रकाशित होणारी ‘रिडा’ भारतीय मध्यमवर्गासाठी युरोपची एकमात्र खिडकी होती.

मुंबईत ट्रांजिस्टर किंवा रेडिओ व अद्ययावत सामग्री फक्त स्मगलिंगद्वारे बंदरातून मिळायच्या काळात अटलांटिक महासागराच्या दोन्ही किनाऱ्यांवर सध्या कोणती सांस्कृतिक व वैचारिक घुसळण सुरू आहे किंवा नवे ट्रेंड्स कोणते आहेत, याचा एकमात्र आरसा ‘रीडर्स डायजेस्ट’ नियतकालिक सादर करत असे. आजच्या पिढीला सांगायचं झालं, तर इंस्टाग्राम आणि न्यूज ॲप या दोन्ही गोष्टी एकत्र करणारं हे माध्यम होतं.

नामी लेखक व अभिनेत्रींच्या चर्चांपासून ते राजकारणातील घडामोडींपर्यंत रसपूर्ण चर्चा होत असत. ७० आणि ८० च्या काळात युवकांना ‘रीडर्स डायजेस्ट’मध्ये काय आलं, यावरून आपल्या वेळात आपण काय केलं पाहिजे किंवा कोणत्या चर्चा पबमध्ये केल्या जातील, याची माहिती मिळत असे.

विविध विषयांवर अमेरिकन समाजाची आणि पाश्चात्त्य जगाची मते अन् दृष्टिकोन बनवण्याचं काम करणाऱ्या ‘रीडर्स डायजेस्ट’ नियतकालिकाने ८६ वर्षांपासून सामान्य नागरिकांच्या धारणांना धार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सुरुवातीच्या दशकात रशियन राज्यक्रांतीमुळे हुरळून जाऊन युरोपीय समाजातील दुखण्यांवर भाष्य करणाऱ्या निर्भिड नियतकालिकाच्या रूपात ‘रीडा’ सुरू झालं होतं.

नंतरच्या काळात अमेरिकन राजकारणाच्या स्वरूपात त्याचा पोत बदलत गेला असला, तरी जगभरातील विविध प्रकारच्या माहितीसाठी अनेकांची ‘रीडा’ ही पहिली पसंती होती. आपल्यापासून दूर असणाऱ्या विविध समाजघटकांवर मते कशी बनवली पाहिजेत, याचं प्रात्यक्षिक त्यातून दाखवलं जात असे. अनेक भूतपूर्व वसाहतवादी आणि वसाहतीच्या देशांसाठी ‘रीडर्स डायजेस्ट’ ही बदलणाऱ्या जगाची माहिती देणारी एकमात्र खिडकी होती.

तंबाखूमुळे तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो, अणुबॉम्ब हे जगासाठी हानिकारक आहेत, अशी आज फॅक्ट म्हणून वाटणारी माहिती कधी काळी संशोधन आणि शोध पत्रकारिता म्हणून ‘रीडर्स डायजेस्ट’मध्ये छापून आली होती. त्याचा आज जगभर पडलेला प्रभाव पाहून एका लहानशा मासिकाच्या पानावर हे नोंदवले जाऊन जगाचा इतिहास बदलला होता, यावर विश्वास ठेवणे अवघड वाटतं.

सामान्य जनांपासून ते राष्ट्रपती किंवा पंतप्रधान तसेच गुप्तचर संस्थांच्या प्रमुखांपर्यंत अनेकांनी जगभरातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या नियतकालिकांच्या पानांचा आसरा घेतला. जगाच्या इतिहासात नोंदवली गेलेली मार्टिन ल्युथर किंग किंवा माल्कम एक्स यांसारखी नागरिकांचा लढा देणारी माणसे याच पानांवर आपलं दुःख व्यक्त करत.

या मासिकासाठी घेतलेल्या कित्येक मुलाखतींमधून राजकारण्यांची आणि सेलिब्रिटींची मोठी मोठी गुपिते बाहेर आली. ब्रिटिश राजघराणे किंवा प्रकाश स्वतः असणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यात डोकावण्याची संधी अनेकांना या मासिकाच्या वाचनातून मिळाली होती.

मात्र काळाच्या ओघात टिकताना या मासिकाचा जोर ओसरत चालला होता आणि त्याची पहिली पावती २०१३ मध्ये मिळाली. अमेरिकेत ते चालवणाऱ्या कंपनीने आपली दिवाळीखोरी घोषित केली आणि त्यातून पुरेसा नफा येत नसल्याची आणि खर्च भरमसाट वाढत असल्याची कारणे देऊन काहीच दिवसांत त्याचं प्रकाशन बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

कित्येक दशके विक्रीच्या बाबतीत सर्व उच्चांक मोडून टाकणाऱ्या मासिकाच्या एकूण विक्रीला ‘तुमचं घर आणि गार्डन कसं सांभाळावं’ असं सांगणाऱ्या मासिकांनी मागे टाकलं आणि लोकांच्या या बदलत्या प्लास्टिक अभिरुचीच्या स्पर्धेमध्ये या व्यासंगी मासिकाचा जोर लागला नाही. कधी काळी विद्वानांच्या मांदियाळीत दिसणारं मासिक हळूहळू फक्त डॉक्टरची वाट पाहताना टेबलावर चाळण्यापुरतंच उरलं.

हळूहळू या मासिकाचं नावही माहीत नसणारी पिढी जागतिक बाजाराच्या केंद्रस्थानी आली आणि तिथूनच या मोठ्या इतिहासाचा अस्त सुरू झाला. म्हणूनच की काय अगदी मासिक शेवटाला येऊनही अखेरच्या महिन्यापर्यंत कित्येकांना ‘रिडा’ बंद होत आहे याची कल्पनाच नव्हती. मात्र जेव्हा ते चालवणाऱ्या संपादकांनी केलेली लिंक्डईन पोस्ट चर्चेत आली, तेव्हा कुठे समाजमाध्यमांना याचा सुगावा लागला आणि त्याविषयी थोडीफार चर्चा सुरू झाली.

‘रीडर्स डायजेस्ट’ कायमचं वाचकांच्या हातातून जाणार असलं, तरी त्याच्या ऑनलाईन आवृत्तीद्वारे त्याचा आस्वाद घेता येणार आहे. शिवाय १९२० पासून १९८० पर्यंत प्रसिद्ध झालेल्या अनेक अंकांना आता ऐतिहासिक स्वरूप आल्यामुळे ते पुन्हा घेऊन जपून ठेवण्याची चढाओढ जगभरात सुरू आहे.

स्वतः ‘रीडर्स डायजेस्ट’नेही तुमच्याकडे असे अंक असतील तर ते आम्हाला परत करा, अशी विनवणी वाचकांना केली आहे. म्हणूनच कदाचित मुंबईच्या रस्त्यांवरील एखादा पुस्तक विक्रेता या रद्दीत दिल्या जाणाऱ्या मासिकांच्या रूपात किती मोठी दौलत बाळगून बसला आहे, याचा अंदाज त्याचे वाचक नसणाऱ्या कित्येक लोकांना येणे कठीण आहे.

vaiwalunj@gmail.com

(लेखक इंग्लंडमध्ये यूके सरकारच्या शिष्यवृत्तीअंतर्गत ‘नीती व धोरण’ या विषयावर संशोधन करत आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.