Grey Divorce: ग्रे घटस्फोट म्हणजे नक्की काय, कायद्याच्या बाबी काय? याचा ऊहापोह

Abhishek Bachchan Aishwarya Rai: अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्‍वर्या राय-बच्चन यांच्याविषयी नुकतेच समाज माध्यमांवर एक गॉसिप रंगले होते की ते दोघे ‘ग्रे घटस्फोट’ (Grey Divorce) घेणार आहेत.
‘ग्रे घटस्फोटा’चा सुकर प्रवास
‘ग्रे घटस्फोटा’चा सुकर प्रवासsakal
Updated on

फोकस

आशुतोष कुलकर्णी

amkulkarniadv@gmail.com

अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्‍वर्या राय-बच्चन यांच्याविषयी नुकतेच समाज माध्यमांवर एक गॉसिप रंगले होते की ते दोघे ‘ग्रे घटस्फोट’ (Grey Divorce) घेणार आहेत. त्या अनुषंगाने ग्रे घटस्फोट म्हणजे नक्की काय? त्यामागील कारणे काय? त्याचे वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक परिणाम काय? आणि अशा सर्व प्रश्‍नांना धरून उद्‍भवणाऱ्या कायद्याच्या बाबी काय? याचा ऊहापोह...

‘ग्रे घटस्फोटा’चा सुकर प्रवास
Co parenting: हार्दिक - नताशा सारखे सहपालकत्व हे खरंच शक्य आहे का?

ग्रे डिव्होर्स म्हणजे काय? What is Grey Divorce

साधारणपणे वयाची पन्नाशी गाठलेले पती-पत्नी जेव्हा घटस्फोट घेतात तेव्हा त्याला ‘ग्रे डिव्होर्स’ असे म्हणतात. म्हणजे नेहमीच्या घटस्फोटासारखाच तो असतो, फक्त घटस्फोटित होणारी जोडपी साधारण त्यांच्या वयाची पन्नाशी गाठलेली असतात. अगदी सोप्या शब्दांत सांगायचे, तर बराच काळ एकत्र संसार करून वयाच्या पन्नाशीमध्ये जेव्हा घटस्फोट घेतला जातो तेव्हा त्याला ‘ग्रे डिव्होर्स’ असे म्हणतात. त्यालाच ‘सिल्व्हर स्प्लिटर्स’ (Silver Splitters) असेही म्हणतात. या दोन परिभाषेमधील ‘ग्रे’ आणि ‘सिल्व्हर’ या शब्दांवरूनदेखील या संकल्पनांचा अंदाज येतो. म्हणजे ज्यांचे केस वयानुरूप अर्धवट काळे-पांढरे किंवा ज्याला रूढ परिभाषेमध्ये ‘सॉल्ट ॲण्ड पेपर’ असे संबोधले जाते, अशा अवस्थेत आलेल्या व्यक्तींनी घेतलेला घटस्फोट.

सर्वसाधारणपणे वयाची पन्नाशी येते तोपर्यंत जोडपी आर्थिकदृष्ट्या, कौटुंबिकदृष्ट्या, शारीरिक व मानसिकदृष्ट्या बऱ्यापैकी स्थिरस्थावर झालेली असतात. मुलांच्या जबाबदाऱ्यादेखील कमी झालेल्या असतात. आयुष्याचे वळण आणि क्रम बऱ्यापैकी लागलेले असतात. त्याचबरोबर कुठे तरी निवृत्तीची पुसटशी जाणीव, पूर्वीसारखी न उरलेली शारीरिक ऊर्जा, बऱ्यापैकी मोठ्या जबाबदाऱ्या मार्गी लागल्यामुळे आलेली एक पोकळी, संपलेल्या वर्षांमध्ये करायच्या राहून गेलेल्या काही गोष्टी अशा व तदनुषंगिक अनेक बाबींमुळे होणाऱ्या मतभेदांमधून जोडप्यांमध्ये एक तर दुरावा निर्माण होतो किंवा पूर्वीसारखा ओलावा राहत नाही. एकत्रित असतात तेव्हा कोणत्या ना कोणत्या कारणाने जोडीदार एकमेकांशी बांधून असतात. त्या बाबी संपुष्टात आल्यामुळे असा कालवा तयार होतो. अशा परिस्थितीत उर्वरित आयुष्य काढण्यापेक्षा विभक्त होऊन आपला स्वत:चा मार्ग चोखंदळायचा विचार जोडपी करतात आणि मग ती वेगळी होण्याचा निर्णय घेतात.

आर्थिक स्वातंत्र्य आणि सुबत्ता हेदेखील विशेषत: महिलांच्या बाबत लागू होणारे कारण आहे. पूर्वी बहुतांशी महिला घरी राहत असत. आर्थिकदृष्ट्या त्या नवऱ्यावर अवलंबून असत. त्यामुळे भलेही त्यांना विभक्त व्हावेसे वाटत असले, तरी अर्थार्जनाच्या उणिवेपोटी त्या तसा निर्णय घेऊ शकत नसत. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. सध्या मोठ्या प्रमाणावर महिला घर सांभाळून, नोकरी वा व्यवसाय करत आहेत. चांगले उत्पन्न मिळवत आहेत. त्यामुळे एखाद्या महिलेच्या मनात विभक्त होण्याचा विचार आला, तर त्यात अर्थार्जनाची उणीव ही बाधा राहिलेली नाही.

सध्या अनेक जोडप्यांना एकच वा दोन मुले असतात. त्या मुलांभोवती दोघेही संसारातील बरीच वर्षे गुंतलेले असतात. मग अचानक एके दिवशी मुले शिक्षण वा नोकरीनिमित्त भुर्रकन घरट्यातून उडून जातात. त्यानंतर मोकळे झालेले घर जोडप्यांना खायला उठते. त्याचबरोबर आता एकमेकांसोबत कसे वागायचे कळून येत नाही. त्यातून वाद-विवाद आणि गैरसमज होतात अन् त्या सगळ्या प्रकारात एक दुरावा उत्पन्न होतो. याच कारणाला धरून असेही घडते, की जोडप्यांमधील पती पहिल्यापासून कामानिमित्त घराबाहेर असतो. पत्नी घरी असते. कालांतराने पत्नीला एकटेपणा येतो. पती मात्र पहिल्यासारखाच कामात गुंतत जातो आणि मग तफावत येते.

समाजदेखील आता घटस्फोट ही संकल्पना मानू लागला आहे. पूर्वीच्या काळी घटस्फोट म्हणजे पाप वा ठपका, असे समजले जायचे; पण आता समाजही घटस्फोटाकडे अधिक संवेदनशीलपणे बघू लागला आहे. घटस्फोटित जोडप्यांना नवे जोडीदार मिळू लागले आहेत.

‘ग्रे घटस्फोटा’चा सुकर प्रवास
Parent Guide For Diet: टीनएजर मुलांचा आहार काय असायला हवा?

उद्‍भवणारे परिणाम... Grey divorce impact on life

कोणताही घटस्फोट हा जोडप्यांच्या दृष्टीनेच नाही; तर त्यांचे पालक, मुले आणि इतर कुटुंबीय अशा सर्वांसाठीच त्रासदायक, क्लेशदायक असतो. त्या मानाने हा त्रास ‘ग्रे घटस्फोटा’त कमी होतो. त्याला मूलत: कारण असे असावे, की असा घटस्फोट हा जोडप्यांनी केवळ त्या दोघांमध्ये उद्‍भवणाऱ्या मानसिक आणि भावनिक गुंत्यामुळे घेतलेला असतो. मुलेदेखील मोठी आणि समजूतदार झालेली असतात. पालक एक तर हयात नसतात किंवा असले तरी वृद्धत्वाकडे झुकलेले असतात आणि जोडप्यांनी घेतलेला निर्णय मानून घेतात.

कायदेशीर बाबींचा विचार करता, ज्या तरतुदी सर्वसाधारण घटस्फोटास लागू आहेत त्या सर्व म्हणजेच पोटगी, मुलांचा ताबा, राहण्या-खाण्याची सोय, एकत्र असलेल्या मिळकतींची विल्हेवाट या बाबी ‘ग्रे डिव्होर्स’ घेणाऱ्या जोडप्यांनाही लागू आहेत. पण, सर्वसाधारण घटस्फोटापेक्षा या बाबींचा होणारा त्रास ‘ग्रे डिव्होर्स’मध्ये कमी होण्याची शक्यता असते. याचे मुख्यत: कारण म्हणजे बऱ्यापैकी परस्पर सामंजस्याने हा निर्णय जोडप्यांनी घेतलेला असतो. पोटगी व राहण्या-खाण्याच्या खर्चाविषयी योग्य तोडगा निघू शकतो. मुले कमावती असतील किंवा जोडीदार कमवत असेल, तर त्यावरून वाद कमी होतात. मुलांच्या ताब्याचा प्रश्‍न कदाचित उद्‍भवतच नाही. कारण बहुतांशी वेळा मुले सज्ञान वा कमीत कमी कळत्या वयाची झालेली असतात आणि त्यांचा स्वत:चा निर्णय ते घेऊ शकतात. अपवादात्मक परिस्थितीत म्हणजे जिथे लग्नच उशिरा झाले आहे वा मुले उशिरा झालेली आहेत, अशा प्रकरणांमध्ये मात्र सर्वसाधारण घटस्फोटांमध्ये निर्माण होणारे वाद उद्‍भवू शकतात. एकत्रित असलेल्या मिळकतीबाबत मात्र जोडप्यांनी परस्पर सामंजस्याने योग्य असा मार्ग काढणे श्रेयस्कर होईल.

शेवटी ग्रे घटस्फोट होणे, हे योग्य-अयोग्य, चांगले-वाईट असे काही नसते. शक्यतो घटस्फोट होऊ नये हे योग्यच आहे. मात्र तशी परिस्थितीच समोर आली, तर काही तरी बांधून ठेवण्याच्या नादात, एखाद्या जोडीदाराचा अपेक्षाभंग आणि दुसऱ्या जोडीदाराची फरपट होण्यापेक्षा, सामंजस्याने अन् संवेदनशीलपणे योग्य तो निर्णय घेऊन, पुढे चालणे हितावह ठरते. जेणेकरून ‘ब्लॅक’ ते ‘ग्रे’च्या सुंदर प्रवासाप्रमाणेच ‘ग्रे’ ते ‘व्हाईट’ प्रवास सुकर होईल.

(लेखक मुंबई उच्च न्यायालयात वकील आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.