विवेकनिष्ठ मानसशास्त्र, अर्थात (Rational Emotive Behaviour Therapy), या विषयावरचा एक दीर्घकालीन प्रशिक्षण कार्यक्रम घेत होतो मी आणि माझी सहकारी (मुलगी देखील) डॉ. सुखदा अभिराम. इतकी वर्षे एकत्र काम केल्यामुळं, आमच्या सादरीकरणामध्ये एकाचवेळी वेगळेपणा आणि एकजीवपणा असतो. एकाच घराण्यातले दोन कलाकार बरोबर गात आहेत, असा माहोल असतो.
सुखदा बोलत असताना मला एक ‘चिंतन अवकाश’ (reflective space) मिळतो. तिचं ऐकता ऐकता, मला आशयात भर घालणाऱ्या तपशिलांची जाण येते. भावनिक नियमन म्हणजे (Emotional Regulation) (कंट्रोल नव्हे, तर नियंत्रण) या सूत्रावर, आम्ही सहभागी शिबिरार्थींकडून विविध प्रात्यक्षिकं करून घेत होतो.
सुखदानं आवाहन केलं, की, सामील मंडळींपैकी कुणाच्या जीवनात प्रत्यक्ष घडलेल्या भावनिक वादळाची उकल करायची असेल, तर त्या व्यक्तीनं समोर यावं. पस्तीस सहभागी लोकांसमोर स्वतःचं वैयक्तिक भावनिक कपाट (वॉर्डरोब) आडपडदा न ठेवता उघडं करायला धैर्य लागतं.
आमच्या एका तरुण विद्यार्थिनीनं ते धैर्य दाखवलं. ती प्लॅटफॉर्मवर येऊन बसली. सुखदानं तिच्याशी बोलायला सुरुवात करताना प्रशिक्षणार्थींना प्रथम संबोधित केले. ‘‘जेव्हा एक व्यक्ती स्वतःच्या खासगी भावना समूहासमोर मांडण्याचं साहस दाखवते, तेव्हा तिच्या मनात आपल्या साऱ्यांबद्दल असतो विश्वास... आपण त्या विश्वासाला पात्र ठरणार असू, तर यापुढं सामोऱ्या येणाऱ्या सर्व भावनांचा आपण आदर करू.
त्यांच्याबद्दलची गुप्तता बाळगू आणि आस्थेवर आधारित अशा ह्या नात्यालाही प्रामाणिकपणे जपू.’ आम्ही सर्वांनी आपला उजवा हात हृदयावर ठेवून, ह्या शपथवचनाला दुजोरा दिला आणि नंतर ह्या ‘थेरपी सेशन’चे ‘ डेमॉन्स्ट्रेशन’ सुरू झालं.
आता आपण या प्रसंगातील ‘खासगी’पण आणि ‘सार्वजनिक’पण असे दोन्ही पैलू समजून घेऊ या. सर्व जण तो विषय शिकू पाहत आहेत, तो आहे मानसशास्त्र. शिकण्यासाठी करायचे असतात प्रयोग. त्यासाठी लागते प्रयोगशाळा. जैविक विज्ञानाच्या प्रयोगांसाठी लागतात विशिष्ट उपकरणांनी सुसज्ज अशा प्रयोगशाळा. मानसोपचार शिकण्याच्या प्रयोगशाळेमध्ये लागणार, जित्याजागत्या माणसाच्या विचार आणि भावना! कारण शिकण्या-शिकवण्याचे साहित्य तेच!
'प्रयोगशाळा' म्हणजे उपचार आणि भावस्वयंसेवक ह्यामधील अवकाश, म्हणजे Space. शल्यक्रिया शास्त्राच्या विकासामध्ये, पूर्वीच्या ऑपरेशन थिएटर्सभोवती गॅलरीज असायच्या. तज्ज्ञांच्या शल्यक्रिया प्रत्यक्ष पाहून विद्यार्थी शिकायचे. आज आपल्याकडे रेकॉर्डिंग करायच्या सोयी सहज उपलब्ध आहेत; पण मानसोपचाराचे कौशल्य शिकायचे तर प्रत्यक्ष अनुभवाला पर्याय नसतो.
अडचण ही असते, की मदत मागण्यासाठी आलेल्या व्यक्तीच्या मनाचे अगदी खासगी दालन ती व्यक्ती स्वेच्छेने किती खुले करेल? विरूप भावनांकडून अनुरूप भावनांकडे जाण्याची ‘शल्यक्रिया’ काही ॲनेस्थेशियाखाली करता येत नाही. समजा व्यक्तीने अतिशय खासगी भावना निर्मळपणे शेयर केल्या, तर त्याची ‘पवित्र गुप्तता’ राखायची जबाबदारी प्रत्यक्ष जीवनात उपचारकाची (थेरपिस्ट) आणि अशा शैक्षणिक प्रसंगांमध्ये सर्व सहभागी व्यक्तींची.
डॉ. सुखदा आणि ही भावस्वयंसेवक मुलगी ह्यांचा संवाद सुरू झाला. त्यामध्ये सर्व जण आदरयुक्त आणि आस्थापूर्ण अंतःकरणाने सहभागी झाले. पुढची तीस मिनिटे सर्वांसाठी फक्त शिकवणारी नाही तर साक्षात्कारी होती. आमच्यापैकी प्रत्येकाचा भावनिक विकास करणारी होती. आम्ही सारे एकाच अवकाशाचा भाग होतो. संवादादरम्यान एका क्षणी त्या मुलीच्या भावना अनावर झाल्या. मी माझा रुमाल त्याच क्षणी तिला दिला.
संवादाची सांगता मात्र ह्या मुलीच्या उलाघालीची उकल करणारी झाली. व्यक्ती म्हणून जगण्याच्या प्रवासाची नवी दिशा तिला मिळाली. विवेकनिष्ठ मानसोपचारपद्धती योग्य पद्धतीने वापरली गेली, तर त्याचा परिणाम एखाद्या शारीरिक शल्यक्रियेमध्ये ट्यूमर काढून टाकावा, तसा होऊ शकतो हे साऱ्यांना कळले. ह्या भावस्वयंसेविकेच्या निमित्ताने, ऐकणाऱ्या अनेकांच्या भावनांच्या निरगाठी सुटल्या. हे शिकणे सर्वांची समज समृद्ध करणारे होते.
भावनिक अभिव्यक्तीचे ‘खासगी’पण आणि ‘सार्वजनिक’पण ह्यातील तोल कसा राखायचा; ह्या गणितामधला एक पैलू संस्कृतीचासुद्धा असतो, असे माझ्या लक्षात आले आहे. आपल्या समाजामध्ये, व्यक्तीने त्या त्या वेळी समोर असलेल्या समूहाला ‘आपले’ म्हणणे ही महत्त्वाची पूर्वअट असते. भारतीय संस्कृतीत कुटुंबापासूनच ‘आपले’पणाची व्याख्या व्यापक बनवलेली असते. मानसिक आरोग्याच्या वेगवेगळ्या गटउपचारांमध्ये ग्रामीण ते शहरी अशा सर्व गटांमध्ये आपल्याकडची माणसे तुलनेने लवकर मोकळी होतात. त्यांचे शेअरिंग खूप प्रामाणिक होते.
‘पवित्र गुप्तता’ राखणाऱ्या गटांमध्ये ह्यामुळे भावनिक परिवर्तनाला उठाव मिळतो. व्यसनाधीन व्यक्तींच्या पत्नी असू देत किंवा ह्या प्रवासातील पतीपत्नींचे ‘सहजीवन’ उपचारगट, चर्चा जिवंत असतात. आम्ही थेरपिस्ट कार्यकर्ते त्यात योग्य पद्धतीने गुंतलेले असतो, समरस असतो. दिव्यांग मुलांचे पालक, कॅन्सरशी सामना देणारे रुग्ण, स्किझोफ्रेनियाने ग्रस्त व्यक्तींचे कुटुंबीय, टाईप वन डायबेटीस असलेली मुले... अशा अनेक गटांबरोबर अनेक वर्षे नियमित अनुभव घेतल्यावर मला हे कळले आहे, की आपल्या संस्कृतीतली खासगीपणाची साडी, सार्वजनिकपणाच्या काठापदराची असते. उपचारकांच्या दृष्टीने, आता ही साडी मनावर डौलदार पद्धतीने लपेटली जायला हवी.
महानगरी संस्कृतीमध्ये ‘खासगी’ आणि ‘वैयक्तिक’ अवकाशाची ‘मागणी’ वाढू लागते. ‘माझी प्रायव्हसी’ ह्या अवस्थेला जास्त महत्त्व मिळू लागते. सामाजिक अवकाशात मर्यादित व्यक्तींची अगदी नियंत्रित स्वरूपाची ये-जा होत असते. ह्या व्यक्तींमधली विविधता कमीकमी होत जाते. खासगीपणाची सार्वजनिक किनार कमी होते.
‘जवळच्या’ मानल्या जाणाऱ्या नात्यांपासूनही ह्या वैयक्तिक भावना दूर ठेवाव्या, अशी सवय मनाला लागते. समोरच्या माणसाने माझी ‘पवित्र गुप्तता’ मोडली तर, ही शंका सतत येऊ लागते. महानगरी संस्कृतीचा असा भाग असलेल्या व्यक्ती मदतीसाठी येतातस तेव्हा मनआरोग्य व्यावसायिकाकडेही संशयाने पाहतात.
आमच्या आय.पी.एच. (इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ) संस्थेच्या कार्यालयात माझ्यासोबत अनेक प्रसंगी सहकारी व्यावसायिक असतात. इंटर्नस् आणि विद्यार्थी असतात. कधी कधी परदेशी पदव्युत्तर विद्यार्थीसुद्धा असतात. माझ्याकडं येणाऱ्या काही जणांसाठी, ‘डॉक्टरां’बरोबर असतात ते सारेच ‘आपले’; असा भाव असतो.
अशी मंडळी ह्या सगळ्यांशीसुद्धा आपलेपणानं संवाद साधतात. परदेशी व्यक्तीसाठी स्वतःहूनच काही वाक्यं इंग्रजी भाषांतर करतात. इतकी खेळीमेळी पाहून काही परदेशी विद्यार्थी इतके थंड पडतात... “आमच्या देशात हे अशक्य आहे... ते तुमच्याशी इतक्या घरगुती, अकृत्रिमपणे वागताहेत,' अशी त्यांची प्रतिक्रिया असते.
मार्गदर्शनासाठी येणारी तरुण मुले-मुली, मला मिठी मारून निरोप घेतात. अशावेळी एखादा इंटर्न विचारतो, "ही तुमची नातेवाईक आहे का?" मी हसून “हो” म्हणतो. दिवसभरामध्ये त्या इंटर्नला माझे ''नातेवाईक'' क्रमवार भेटत राहतात.
मदतीसाठी येणाऱ्या काही जणांची नजर आणि त्यातली संशयी अस्थिरता पाहून मी सहकाऱ्यांना बाहेर जाण्याची खूण करतो. स्वभावामुळे आणि विशिष्ट आजारांमुळे आलेला संशयीपणा सपशेल बाजूला ठेवूनही एक गट असा असतो, ज्यांना आपले ‘खासगी’पण हा अतिमौल्यवान दागिना वाटत असतो. मनआरोग्यातही व्यावसायिक टीम म्हणून आम्ही काम करत असल्याने, व्यावसायिक तज्ज्ञ टीमचा सहभाग तुमच्या फायद्याचा आहे आणि गुप्तता पाळणे हे आमचे व्यावसायिक मूल्य आहे, हे अशा मंडळींना पटवून द्यावे लागते. कुमारवयामध्ये असतानाच काही मुलेमुली अतिखासगीपणाकडे जातात. त्यांना खुबीनं शिकवावा लागतो हा ‘खासगी-सार्वजनिक’ तोल.
पण त्या दिवशीच्या अनुभवामध्ये हा तोल स्वयंस्फूर्तीनं आणि गांभीर्यानं कसा राखावा, ह्याचं प्रत्यक्ष उदाहरण सगळ्यांना मिळालं होतं. आमच्या प्रशिक्षणार्थी गटाने, त्या भावस्वयंसेविकेला अधिकच स्वीकारलं. अधिक आपलेपणानं जवळ केलं. नंतरच्या शास्त्रचर्चेमध्ये ती सुद्धा विद्यार्थी भूमिकेतून सहभागी झाली. शिकण्याशिकवण्यासाठीची ही स्पेस तयार होणे, हा ज्ञानसंस्कारांसाठी किती मौल्यवान शक्तिसाठा. त्या दिवशीची कार्यशाळा संपली आणि ही मुलगी माझ्याकडं आली, माझा रुमाल मला द्यायला.
'तुझ्याचकडे ठेव तो... असे समज, तुझ्या xx नी पाठवला होता तो माझ्यामार्फत,' मी म्हणालो. (तिच्या कहाणीत एका जवळच्या नात्याचा वियोग होता).
तिच्या डोळ्यात पाणी तरारलं. “जपून ठेवणार मी... आता माझे डोळे भरून आले, तर ते पुसायला हा असा स्पेशल रुमाल असणार आहे माझ्याकडं...' 'थँक यू सर', ती म्हणाली.
माझ्या पापण्यांच्या कडाही चांगल्याच ओलावल्या होत्या. त्या कोरड्या करण्यासाठी माझ्याकडं रुमाल नव्हता आणि त्याची गरजही नव्हती.
(लेखक हे विख्यात मनोविकारतज्ज्ञ, विचारवंत, नाटककार, संगीतकार, कवी, चित्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.