- श्याम पेठकर, pethkar.shyamrao@gmail.com
पावसाळा एका वळणावर आला तसा परतीच्या पावलांनी निघून जायला लागतो. देवदर्शन घेतल्यावर भाविक मंदिराच्या गाभाऱ्याच्या पायरीवर काही क्षण विसावा घेतो. देवाद्वारी विसावा, पुढचा जन्म नसावा, असे मनात म्हणतो. परतीचा पाऊस मात्र पुढचा जन्मही पावसाचाच मागतो. नव्हे, त्याने नाही मागितला तरीही पावसाचे अनेक जन्म केवळ आणि केवळ पावसाचेच असतात. पावसाळा म्हणजे ऋतूंनी केलेली सृष्टीची पूजा असते.
त्याच्या येण्याच्या वार्ता होतात. राजेशाहीच्या काळात राजा येण्याची बाअदब ललकारी दिली जायची. आता त्याच्या येण्याची दिली जाते. पावसाळाच तो; पण आता त्याला आधुनिक पर्यावरणशास्त्रीय भाषेत मॉन्सून म्हणतात. यंदाचा तो कसा असेल, सरासरीइतका पडेल का... असे सगळेच अंदाज वर्तविले जातात.