रंगभूमीच्या समृद्ध इतिहासाचा पट

समृद्ध परंपरा लाभलेली मराठी रंगभूमी म्हणजे मराठीजनांसाठी मर्मबंधातली ठेवच. मराठी समाजाचं भावनिक, मानसिक आणि बौद्धिक भरण-पोषण करण्यात मराठी रंगभूमीचा मोठा वाटा आहे.
book
booksakal
Updated on

समृद्ध परंपरा लाभलेली मराठी रंगभूमी म्हणजे मराठीजनांसाठी मर्मबंधातली ठेवच. मराठी समाजाचं भावनिक, मानसिक आणि बौद्धिक भरण-पोषण करण्यात मराठी रंगभूमीचा मोठा वाटा आहे. या रंगभूमीच्या वाटचालीची पताका आपल्या खांद्यावर समर्थपणे पेलणाऱ्या शिलेदारांच्या समग्र चरित्रात्मक माहितीचा महत्त्वाचा दस्तावेज नुकताच प्रकाशित झाला आहे.

साप्ताहिक ‘विवेक’च्या ‘आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण : शिल्पकार चरित्रकोश’ या प्रकल्पातल्या ‘नाट्यकोशा’चं प्रकाशन नुकतंच झालं. या प्रकल्पातला हा अकरावा खंड आहे. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रांतल्या प्रगतीत सिंहाचा वाटा उचलणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींचा परिचय साप्ताहिक ‘विवेक’च्या या प्रकल्पातून करून देण्यात येत आहे. इतिहास, विज्ञान-तंत्रज्ञान, साहित्य, संस्कृती, अर्थकारण अशा विविध विषयांनुसार हे खंड विभागण्यात आले आहेत. याच मालिकेतला अकरावा खंड म्हणजे ‘नाट्यकोश.’

अभिनेते-अभिनेत्री, नाटककार, दिग्दर्शक, संगीतदिग्दर्शक, पार्श्वसंगीतकार, प्रकाशयोजनाकार, रंगभूषाकार, वेशभूषाकार, नेपथ्यकार, तंत्रज्ञ, निर्माते, नाट्यसमीक्षक-अभ्यासक अशा सुमारे पाचशे व्यक्तींच्या माहितीपूर्ण चरित्रनोंदी या कोशात आहेत. चरित्रनायकांची यादी अधिकाधिक परिपूर्ण करण्याचा प्रयत्न यात झालाच आहे, त्याचबरोबर अन्य कोशांचा विचार करून पुनरावृत्ती टाळण्याची खबरदारीही घेण्यात आली आहे.

चरित्रनायकांच्या या नोंदींमधून अनेक रंजक गोष्टीही समोर येतात. नाट्यचळवळीच्या प्रवासासह त्याबरोबर बदलत गेलेल्या समाजमनाची झलकही यात आढळते. कोशाची प्रस्तावना अतिशय वाचनीय आहे. कोशात वेळोवेळी समाविष्ट केली गेलेली छायाचित्रं, हे याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे.

व्यक्तींच्या छायाचित्रांसह नाटकाच्या प्रयोगांची छायाचित्रं आणि विशेषतः नाटकांच्या जाहिरातींच्या छायाचित्रांनी कोशाचं दृश्यात्मक सौंदर्य वाढवलं आहे. कोशाच्या प्रारंभी कोशरचना सविस्तर विशद करण्यात आल्यामुळे संदर्भ शोधणं सुलभ झालं आहे.

नाट्यचळवळीतल्या व्यक्तींच्या चरित्रनोंदींच्या निमित्तानं मराठी रंगभूमीच्या समृद्ध इतिहासाचा पट उलगडण्याचं काम हा ‘नाट्यकोश’ करतो. केवळ नाट्यकलावंतांसाठी आणि नाट्यप्रेमींसाठीच नव्हे तर, समीक्षक-अभ्यासक-रसिक यांच्यासाठीही हा मौलिक संदर्भग्रंथ म्हणून संग्राह्य आहे.

पुस्तकाचं नाव : आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण शिल्पकार चरित्रकोश : ‘नाट्यकोश’ (खंड ११)

संपादक : डॉ. विलास खोले

सहसंपादक : डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी

प्रकाशक : साप्ताहिक ‘विवेक’ (हिंदुस्थान प्रकाशन संस्था)

पृष्ठं : ७४४

मूल्य : १२०० रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.