- ऋचा थत्ते
ज्येष्ठ कवी आणि साहित्यिक मंगेश पाडगावकर यांचा ‘मंगेश पाडगावकर’ नावाचा नऊ अक्षरी मंत्र एका लेखात सामावणारा नाही. त्यांनी बहाल केलेला आनंदऋतू आजही नित्य बहरत आहे...
हासत दुःखाचा केला मी स्वीकार
वर्षिले चांदणे पिऊन अंधार
प्रकाशाचे गाणे अवसेच्या रात्री
आनंदयात्री मी आनंदयात्री!
आयुष्यावर असं उदंड प्रेम करणाऱ्या आणि आयुष्याची सुरेल मैफील जगणाऱ्या मंगेश पाडगावकर यांनी आपल्या सहजसुंदर शब्दांमधून, कविता, गीत, अनुवाद, गद्य लेखन अशा विविध पैलूंद्वारे आपल्याला खूप समृद्ध केलं. त्यांनी आपल्या आयुष्याला ‘नवा दिवस’ बहाल केला. आपल्या आयुष्यात ‘आनंदऋतू’ फुलवला. आपण आपल्याशीच ‘गिरकी’ घ्यायला शिकलो. त्यांच्यातला ‘जिप्सी’ बघून आपणही भटके पक्षी होऊन गेलो आणि मग जगण्याचा ‘उत्सव’ झाला आणि शब्दांची झाली ‘बोलगाणी’.
पाडगावकरप्रेमी जाणकार वाचकांनी ओळखलंच असेल, की ही सगळी आहेत त्यांच्या कवितासंग्रहांची शीर्षकं. नुसती शीर्षकं पाहिली तरी किती प्रसन्न वाटतं... गुलाबपाणी शिंपडल्यावर वाटतं ना, अगदी तसंच! विषय निघालाच आहे, तर सुरुवात करूया त्यांच्या कवितांपासूनच. मला स्वतःला आणि त्यांच्या असंख्य चाहत्यांना सर्वात जास्त आवडतात, ती त्यांची बोलगाणी! बोलगाण्याची व्याख्याच स्वतः पाडगावकर करतात, बोलल्यासारखं गाणं ते बोलगाणं! आणि कुठलंही बोलगाणं ऐकताना, वाचताना, म्हणताना अगदी तोच प्रत्यय आपल्याला येतो.
कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं
ओठावरती आल्याखेरीज गाणं नसतं आपलं
किंवा
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं...
तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं
कोणतंही बोलगाणं घ्या. सहजसुंदर आणि साधंसोपं! आवडतं, पटतं आणि शिकवतंसुद्धा... पण उपदेशाचा आविर्भाव चुकूनही नाही. कधी मिश्किलपणे; तर कधी चिमटे काढत पाडगावकर आपल्याला हसवता हसवता सहज अंतर्मुख करतात.
पाडगावकर आणि आपण खरं तर एकाच ग्रहाचे रहिवासी; पण कोणताही ‘ग्रह’ करून घेताना दृष्टी कशी असावी हे ते आपल्याला शिकवून जातात. मला तर वाटतं, त्यांच्या चष्म्याचं भिंगच असं काही अद्भुत होतं, की त्यांना पेला नेहमी भरलेलाच दिसायचा! ही बोलगाणी काय किंवा इतर अनेक कविता सादर कराव्यात तर त्यांनीच.
आपलं भाग्य, की त्यांचे व्हिडीओ आज उपलब्ध आहेत. जशी त्यांची लेखनाची शैली तशीच सादरीकरणाचीही... अगदी वेगळी आणि हवीहवीशी. कविता गावोगावी सादर करून मनामनात पोचवण्यात त्यांचं फार मोठं योगदान आहे. विंदा करंदीकर आणि वसंत बापट यांच्यासह पाडगावकरांनी केलेलं सादरीकरण अनेकांच्या स्मरणात असेल.
मग नंतरच्या काळात त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन कविता सादरीकरणाची एक समृद्ध परंपराच महाराष्ट्रात निर्माण झाली, जी आजही चालू आहे. मात्र त्या काळात कविता ही फक्त पुस्तक हातात धरून वाचकाने वाचायची हा समज पक्का असल्याने, ‘बघे निर्माण केले’ अशी टीका विंदा-बापट-पाडगावकर यांच्यावर झाली होती. पण, एक नवा पायंडा पडत असताना हे तर घडतच असतं.
अशा सादरीकरणात बोलगाण्यांनी नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली हे खरंच! पण बोलगाणी गाजली, म्हणून तीच लिहीत राहावीत हा मोह पाडगावकरांनी टाळला. ते आपल्या प्रतिभेशी इमान राखत वैविध्यपूर्ण लेखन करत राहिले आणि त्यामुळेच ‘उदासबोध’, ‘मोरू’, ‘सलाम’ ही विविधता वाचकांनी आपलीशी केली.
बोलगाण्यांप्रमाणेच वात्रटिका, क्षणिका हे काव्यबंधही पाडगावकरांचेच आणि त्यांचं नामकरणही त्यांनीच केलं. वात्रटिका म्हणजे काय, तर वात्रट टीका! वात्रट आणि टीका या दोन शब्दांचा संधी करून पाडगावकरांनी शब्द तयार केला वात्रटिका! ही वात्रटिका पाहा -
एका माणसाला स्वप्न पडले, त्याने उठून लग्न केले
आणि लग्न करून झोपी गेला, पुन्हा नाही जागा झाला
असं चेहऱ्यावर हसू फुलवणाऱ्या वात्रटिका निखळ आनंद देऊन जातात. अशीच छोटी मूर्ती असलेली म्हणजे क्षणिका. ही सहजसुंदर, तरल क्षणिका पाहा - आभाळ बघतं डोकावून पाण्यात अगदी तसंच आयुष्य गाण्यात
पाडगावकर हे मुंबईत स्थायिक झाले होते, तरी मूळचे ते कोकणातले. त्यामुळेच त्यांच्या अनेक कवितांमधून निसर्गचित्रं रेखाटलेली दिसतात. एवढंच नाही, तर त्यांच्या कवितेत निसर्ग आणि शब्द अगदी एकरूपच होऊन जातात. जसं -
एक शब्द पक्षी झाला, आकाशात उडाला
एक पक्षी शब्द झाला, शाईमध्ये बुडाला
निसर्गासारखीच माणसं, माणसाची वृत्तीही त्यांनी
शब्दबद्ध केली.
यांचं असं का होतं कळत नाही
किंवा
तुमचं काय गेलं
यामधून नकारात्मक वृत्तीला त्यांनी जणू आरसाच
दाखवला आहे.
‘माणूस’ या शब्दाची त्यांनी केलेली व्याख्याच फार सुंदर आहे. ‘जो आनंद देतो तो माणूस’... पाडगावकरांच्या कवितांनीही सतत आनंदच दिला. मोठ्यांनाच नाही, तर लहानांनाही दिला.
सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय
शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय
या गाण्यातून त्यांनी जणू सुट्टीप्रेमी बालमनच प्रकट केलं. ॲनिमेशन रूपातही हे बालगीत इतकं लोभस वाटतं, यातच या गाण्याची चित्रमयता लक्षात येते. आजच्या लहानग्यांनाही पाडगावकरांची गाणी आपली वाटणं ही खरंच त्यांच्या
प्रतिभेची कमाल!
पाडगावकरांच्या कवितेचा उद्देश त्यांच्याच शब्दात सांगायचा तर -
माझी कविता वाचून तुला जगावंसं वाटावं असं वाटतं मला...
खरंच त्यांच्या कविता, त्यांचे शब्द संजीवक आहेत.
‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ या गाण्याने कित्येकांना नैराश्यातून बाहेर काढलंय, जगण्याची उमेद दिलीय. पाडगावकरांच्या लेखनाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकत ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांनी चार ओळींत म्हटलंय -
बालगीत भावगीत गझल बोलगाणे
छंदमुक्त व्यंगबद्ध असेही तराणे
तरल स्निग्ध भावांनी कुरवाळीत दाढी
मंगेश पाडगावकर हा सुभग चित्र काढी...
असे शब्दप्रधान गायकीचे पुरस्कर्ते यशवंत देव असोत किंवा चालीवर शब्द लिहिणं म्हणजे आधीच शिवलेल्या झबल्यात बाळाला कोंबणं, असं मत असलेले थोर संगीतकार श्रीनिवास खळे असोत, या दोघांनीही मंगेश पाडगावकर यांच्यासह सर्वाधिक काम केलं, यातच सर्व आलं. ...आणि या त्रयमूर्तींची आणि अर्थातच या भावकवीची सर्वाधिक गाणी गायली कुणी? तर कवितेवर जीवापाड प्रेम करणारे आणि या त्रयींना अक्षरशः ब्रह्मा- विष्णू-महेश मानणारे भावगीत गायक अरुण दाते.
त्यांच्या स्वराचा मखमली स्पर्श सर्वाधिक झाला, तो पाडगावकर यांच्याच गीतांना. ‘शुक्रतारा’ या गीताने सुरू झालेला हा सिलसिला पहिलीच भेट झाली, या जन्मावर, भातुकलीच्या खेळामधली, भेट तुझी माझी स्मरते... असा चालूच राहिला. साठी ओलांडूनही ही गाणी तशीच चिरतरुण आहेत! तशीच लतादीदींचीही भावगीतं - सावर रे, भावभोळ्या, नीज माझ्या नंदलाला, श्रावणात घन निळा बरसला. दीदींच्या स्वर्गीय स्वरातून पाडगावकरांच्या शब्दांच्या रेशीमधारा आपल्या मनावर रिमझिमत राहतात.
त्यांचं एकेक भावगीत म्हणजे जणू सुरेल झालेली सुमधुर कविताच आहे.
इतक्या कविता आणि इतकी भावगीतं! पण या सगळ्याची सुरुवात झाली कधी? तर वयाच्या १४ व्या वर्षी. कविश्रेष्ठ बा. भ. बोरकर यांचा पाडगावकरांच्या संवेदनशील मनावर खूप प्रभाव होता. सौंदर्यदृष्टी हा या दोघांतील समान धागा हे जाणवल्यावाचून राहत नाही. पाडगावकरांनीच याबद्दल लिहिताना सांगितलंय, की बोरकरांची काव्यपंक्ती होती -
तव चिंतनी, मन गुंतुनी,
मी हिंडतो रानीवनी
त्याच धर्तीवर पाडगावकरांनी लिहिलं -
तुज पाहिले, तुज वाहिले,
नवपुष्प हे हृदयातले
असा हा पाडगावकरांच्या कवितेचा श्रीगणेशा झाला आणि मग त्यांचे हात लिहितेच राहिले. कोणत्याही प्रतिभावान कवीसाठी असा प्रेरणास्रोत निमित्त ठरतो आणि मग त्याला स्वतःची वाट, शैली गवसत जाते. मंगेश पाडगावकर हे याचंच मूर्तिमंत उदाहरण म्हणता येईल. त्यांचे स्वतःचे शब्द तर प्रेरणा देतातच; पण एका बोलगाण्याची जन्मकथाही अशीच प्रेरणादायी आहे...
एकदा सकाळी पाडगावकर फिरायला गेले असताना त्यांना ओळखीचे आजोबा दिसले. स्वाभाविकपणे विचारपूस केली गेली - काय कसे काय आजोबा? त्यावर आधाराशिवाय चालूही न शकणारे, एका व्याधीने ग्रस्त आजोबा हसत हसत मोठ्या आनंदाने म्हणाले. काय सांगू पाडगावकर, १५ दिवस मी कुंडीतील रोपाला पाणी घालत होतो आणि आज तिथे एक फूल उमललं! इतक्या छोट्या छोट्या गोष्टीत आनंद गवसू शकतो हे पाडगावकरांच्या मनाला स्पर्शून गेलं आणि कागदावर बोलगाणं उमटलं -
सांगा कसं जगायचं, कण्हत कण्हत की गाणं म्हणत... तुम्हीच ठरवा!
खरंच आपल्याला कधी सुख दुखू लागलं, तर आजोबांचा तो प्रसंग आठवावा!
असेच आपल्याला वेळोवेळी दीपस्तंभ होऊन मार्गदर्शक ठरतात, ते संतांचे शब्द! पाडगावकरांनाही कबीर, मीरा, सूरदास यांच्या शब्दांनी भारावून टाकलं आणि मराठी साहित्याच्या दालनात त्यांच्या अनुवादाने लाखमोलाची भर पडली. उदाहरणादाखल कबिरांचे काही दोहे पाहा...
आधी कबीरजींचा दोहा आणि मग पाडगावकरांचा अनुवाद सांगायचा झाल्यास -
ज्यो तील मे तेल है
जैसे चकमक मे आग
तेरा साई तुझमें है
जाग सके तो जाग
याचा अनुवाद पाहा -
तिळात जैसे तेल रे चकमकीत जशी आग
तुझ्यात रे स्वामी तुझा जाग शक्य तर जाग
किंवा हा दुसरा एक दोहा पाहा -
धीरे धीरे रे मना धीरे सबकुछ होय
माती सींचे सौ घडा ऋत आए फल होय
याचा अनुवाद असा -
धीर धरी तू रे मना धीरे सगळे होई
माळी शिंपी शत घडे ऋतु येता फळ येई
दोन दोहे मुद्दाम देण्याचं कारण असं, की दोन्हीमध्ये एक गोष्ट ठळकपणे जाणवते, ती म्हणजे मूळ दोह्याचा आशय आणि लय याला कुठेही धक्का न लावताही मराठी रचनेत सहजता जपली आहे. किती मोठे हे कौशल्य! याचबरोबर अजून एक शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे, स्वतः नावारूपाला आलेले प्रतिभावान भावकवी आणि गीतकार असूनदेखील पाडगावकरांनी अनुवादाला दुय्यम मानलं नाही. उलट कवी म्हणून ते स्वतःमधील सर्व शक्यता तपासत राहिले.
शब्दांची साधना करीत राहिले. अर्थात प्रयोग करण्याचा त्यात आविर्भाव नव्हता, तर ते जीवनाविषयीचं अपार कुतूहल होतं. भरभरून जगणं होतं. तो अनुभव शब्दबद्ध करणं होतं आणि जगण्यावर प्रेम करणं होतं. या सगळ्यासाठी शब्दांनी त्यांच्यावर आणि त्या माध्यमातून आपल्यावर खरोखरीच कृपा केली. हे सगळं वाचताना नक्कीच जाणवलं असेल, की ‘मंगेश पाडगावकर’ हा नऊ अक्षरी मंत्र एका लेखात सामावणारा नाही.
पाडगावकरांच्या काव्य-गीतांबद्दल कितीही वेळा कार्यक्रमांमधून बोललं-लिहिलं, तरी हा अवलिया दशांगुळे उरतोच! पण अमृत थेंबभर गवसलं तरी त्याची गोडी अवीट आणि स्वर्गीयच नाही का! आणि एवढंच नाही, तर त्यांच्याच शब्दांचं बोट धरून जो तो ‘माझे जीवनगाणे’ गात त्यावर ‘शतदा प्रेम’ करतो आणि मन अगदी मोकळं करून पाखरू होऊन पाखराशी बोलूही लागतो!
आनंदयात्रीची लौकिक जीवनयात्रा संपली असली, तरी त्याने बहाल केलेला आनंदऋतू नित्य बहरणारा आहे आणि आनंदगाणे छेडणारा आहे हे नक्की. अशा या थोर भावकवीच्या स्मृतींना विनम्र अभिवादन!
(लेखिका निवेदिका आणि व्याख्यात्या आहेत. लहान मुलांसाठी त्या लेखन व कथा-कविता सादरीकरणही करतात.)
rucha19feb@gmail.com
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.