कळपातील ‘श्वापदं’

बापाने ‘फुलपाखरांचं’ जीवन हिरावून घेतलं असेल, तर अशा विकृत प्रवृत्तीला मूठमाती द्यावी
Rupali Chakankar writes about domestic violence women crime Distorted humans
Rupali Chakankar writes about domestic violence women crime Distorted humans
Updated on
Summary

बापाने ‘फुलपाखरांचं’ जीवन हिरावून घेतलं असेल, तर अशा विकृत प्रवृत्तीला मूठमाती द्यावी

- रूपाली चाकणकर

ज्याने एका आईच्या पोटी जन्म घेतला, मातृत्वाचं प्रेम अनुभवलं, त्याने जन्माला येणाऱ्या लेकीसाठी तिची सावली व्हावं. बाप हा लेकीचं आभाळ असतं, अंगण असतं. त्याच बापाने ‘फुलपाखरांचं’ जीवन हिरावून घेतलं असेल, तर अशा विकृत प्रवृत्तीला मूठमाती द्यावीच लागेल. आपण बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही, हातावर हात ठेवून जमणार नाही. हातात संघर्षाची मशाल घेऊन आत्मभानाचा वणवा पेटवला पाहिजे. होय, आपला लढा मानसिक विकृतीशी, माणसातल्या हिंस्त्र श्वापदांशी आहे!

राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारून एक वर्ष पूर्ण झालं होतं. वर्षभराच्या कामाचं सिंहावलोकन करताना मनाला समाधान वाटेल असं काम आपण केलं, पण अजून खूप ‘बाकी’ आहे, यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागेल याची जाणीव होती.

प्रत्येक जिल्ह्यातील जनसुनावणी, आयोगाची कार्यालयातील सुनावणी, ई-मेल, पत्राने आलेल्या समस्यांचे निवारण, प्रत्यक्ष भेटण्यासाठी आलेल्या तक्रारदारांच्या प्रश्नांचे समाधान, कौटुंबिक हिंसाचारासाठी राबवत असलेल्या समुपदेशन केंद्राचे नियोजन व शालेय विद्यार्थिनींसाठी ‘माय बॉक्स’च्या माध्यमातून संवाद साधत छेडछाडमुक्त महाराष्ट्र, विधवा महिलांसाठी आत्मसन्मान उपक्रम तृतीयपंथींसाठी आरोग्य सुविधा व कोरोनामध्ये ‘आ’वासून या कोवळ्या जीवांना गिळंकृत करणारा ‘बालविवाहचा’ विळखा, मानवी तस्करी... एक ना अनेक प्रश्न... त्यावर वर्षभरात प्रभावीपणे काम केले; पण दररोज नवे प्रश्न समोर उभे राहत होते.

आयोगाच्या कार्यालयात महत्त्वाच्या मिटिंग होत्या. त्यामध्ये सक्तीने बालविवाह आणि विधवा प्रथा बंदचे ठराव ग्रामपंचायतींकडून संमत करण्यासंदर्भातील पत्रावर सही केली. तेवढ्यात फोन वाजला. पलीकडून एका मुलीचा आवाज आला. ‘‘मी राधिका (नाव बदलले) बोलतेय वर्धा येथून. मला एक पत्र तुम्हाला द्यायचे आहे. पाठवू का?’’ ‘‘हो पाठव ना,’’ मी उत्तर दिले.

‘‘फक्त तुम्हीच वाचा. मला फार भीती वाटतेय, पण... पण मी मनाची खूप तयारी करून पाठवते. प्लीज, मला मदत करा. मला आता आत्महत्येशिवाय पर्याय नाही, म्हणून शेवटचा मार्ग म्हणून मी तुम्हाला पत्र लिहिते. तुमचं नाव ऐकून आहे. तुम्ही मदत कराल ही अपेक्षा आहे.’’‘‘हो, तू पाठव पत्र. काळजी करू नको, मी बघते...’’ असं बोलून फोन ठेवला.

दिवसभराच्या मिटिंग आणि आलेले व्हिजिटर्स या सगळ्यांमध्ये चारपाच तास निघून गेले. एकदोनदा पत्र आले का? म्हणून पाहिले; पण काहीच नव्हते. नंतर माझ्या बैठका सुरू झाल्या. सायंकाळी ऑफिसमधून बाहेर पडले. आज ऑफिसमध्ये वर्दळ फार असल्याने उशीर झाला होता. परत फोन तपासून पाहिला. अजूनही राधिकाचा मेसेज आला नाही. मी थोडी बेचैन झाले. तिला फोन करणार तेवढ्यात तिचे पत्र माझ्या मोबाईलवर आले. प्रवासातच असल्याने लगेच पत्र वाचायला सुरुवात केली. पत्र वाचून मनाचा थरकाप उडाला, इतक्या केसेस आतापर्यंत हाताळल्या; पण कधी इतकी अवस्थता वाटली नाही...

तिने पत्रात लिहिले होते, की ‘‘मी आठवीत शिकत होते तेव्हापासून हे सर्व सहन करतेय. माझे वडीलच माझ्यावर अत्याचार करतात. सुरुवातीला वाटलं वडील आहेत, वडीलकीच्या मायेने जवळ घेत असतील; पण तो घाणेरडा स्पर्श मला जाणवू लागला आणि एक दिवस तर घरात कोणीच नाही बघून माझ्यावर या वासनांध बापाने बलात्कार केला. मी आईला आणि मोठ्या बहिणीला सांगितले, तर जीवे मारण्याची धमकी दिली. दोन वर्षे मी सहन केलं. त्या माणसाची घाणेरडी नजर मला नकोशी होत होती. माझं अभ्यासामध्येही लक्ष लागेना. वर्गात पहिला, दुसरा नंबर यायचा; पण आता कशीबशी काठावर पास होतेय. मला धमकी देऊन हा जनावर माझ्यावर सारखा बलात्कार करत होता.’’

पुढे लिहिलं होतं, ‘‘मी दहावीत गेल्यावर शेवटी आईला आणि बहिणीला विश्वासात घेऊन सांगितलं, त्यांच्या तर पायाखालची जमीनच सरकली. आई बेशुद्धच पडली, बहिणीला थंडी वाजून आली. घरी आल्यावर या नराधम बापाला आईने आणि बहिणीने जाब विचारला, त्या वेळी या बापाने त्या दोघींनाही खूप मारहाण केली. कोठे बाहेर बोललात तर तुमच्या तिघींचे खून पाडेन, अशी धमकी दिली. मी आता बारावीत आहे. आठवीपासून या सगळ्या गोष्टी आतापर्यंत सहन करत आले आहे. शाळेत शिक्षकांना सांगू शकत नाही, बाहेर मैत्रिणींशी बोलू शकत नाही. गुदमरून गेलाय जीव. जीवन इतकं वाईट असू शकतं याची कल्पनाच केली नव्हती. जेव्हापासून नीट कळतंय तेव्हापासून हे घाणेरडं जीवन जगतेय. कुंपणानेच शेत खाल्लं सारं. सगळं जग भकास वाटतंय. जगायचंच नाही मला. संपलं आयुष्य माझं, उद्‌ध्वस्त झालं... ज्याने जन्म दिला त्यानेच गिळंकृत केलं, ओरबाडून खाल्लं.’’

पत्र वाचून माझे तर डोळे भरून आले. राग, संतापाने तळपायाची आग मस्तकात गेली होती. मी तातडीने वर्धा पोलिस अधीक्षकांना फोन केला. पोलिसांनी तात्काळ त्या नराधमाला अटक केली. दोन्ही मुलींना मानसिक आधार देण्यासाठी समुपदेशकांनी मार्गदर्शन केले. मुलींची आई घरकाम करून मुलींचे शिक्षण करते. कायदा-सुव्यवस्था, न्याय देवता आपापले काम करत आहेत. मग आपण का चुकतोय? चार भिंतींच्या आत बापच हिंस्त्र श्वापद म्हणून वावरत असेल, तर रक्षणकर्ता कोण? कायद्याने किती कलम बदलावेत? घरातल्यांनी काय भूमिका घ्यावी? पोलिसांनी कुठपर्यंत रक्षण करावं? न्यायदेवतेने काम कसं करावं? असंख्य प्रश्न फेर धरून भोवताली आक्रोश करत होते. माणसाला नाती समजू नयेत, इतकं का तो बेभान होतोय? ज्याने आपण एक आईच्या पोटी जन्म घेतला, मातृत्वाचं प्रेम अनुभवलं, आपल्या पोटी जन्माला येणाऱ्या लेकीसाठी तिची सावली व्हावी, त्यासाठी बापासारखं दुसरं आभाळ नसतं, अंगण नसतं, हा विचार क्षणभरही नसेल का मनात आला? जन्माला येणाऱ्या ‘फुलपाखरांचं’ जीवन जगण्याचा अधिकारच हिरावून घेणाऱ्या अशा विकृत प्रवृत्तीला मूठमाती द्यावीच लागेल.

दुसरी खंत मनात सलतेय, आठवी ते बारावीपर्यंत राधिका शिक्षण घेत असताना तिला या पाच वर्षांत नरकयातना भोगाव्या लागल्या. या पाच वर्षांत आपल्या मनातील वेदना सांगण्यासाठी कोणीच भेटलं नाही का? मैत्रीण, शिक्षक, दामिनी पथक म्हणून आमचा संवाद कमी पडला का? इतक्या मोठ्या दुनियेत आपलं दुःख मांडायला कोणतेच व्यासपीठ राधिकाला मिळू नये? शोकांतिका आहे आमची आणि आमच्या समाजाची... आता बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही, हातावर हात ठेवून जमणार नाही. हातात संघर्षाची मशाल घेऊन आत्मभानाचा वणवा पेटवता आला पाहिजे. होय, आपला लढा मानसिक विकृतीशी, माणसातल्या हिंस्त्र श्वापदांशी!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.