संयम रुजवणारा संवाद हवा!

कुटुंबातील संवाद हरवत चालला आहे. एकत्र कुटुंबाच्या जागी विभक्त कुटुंब पद्धत आली.
woman
womansakal
Updated on

- रूपाली चाकणकर, rchakankar95@gmail.com

कुटुंबातील संवाद हरवत चालला आहे. एकत्र कुटुंबाच्या जागी विभक्त कुटुंब पद्धत आली. आजी, आजोबा गावी आणि आम्ही ‘हम दो हमारे दो’च्या जमान्यात ‘हम दो हमारा एक’च्या वाटेवर आलो. स्पर्धेच्या जगात बाबाबरोबर आईही कामावर जातेय. घरातल्या मुलाच्या एका हातात रिमोट आणि दुसऱ्या हातात मोबाईल आलाय. मनं मोकळी आणि संयमाची होण्यासाठी घरातल्या माणसाशी संवाद असेल, तर विचारांच्या पारंब्या विस्तारतील. समृद्ध होतील; पण संवादाचाच अभाव जाणवत आहे.

आषाढी एकादशीला विठुरायाच्या दर्शनासाठी वारकरी ऊन, वारा, पाऊस झेलत माउलींच्या भेटीसाठी किंबहुना सावळ्या विठूरायाला डोळे भरून पाहण्यासाठी तळमळीने चालत असतो. या वारीत चालताना खेड्यापाड्यातील, वाड्यावस्त्यांपासून बायाबापड्या महिनाभराची घरची तजवीज करून सगळा क्षीण मागे टाकून ज्या आध्यात्मिक ओढीने, तल्लीन होऊन निघतात ते आपणास तरी सहजशक्य नाही. डोक्यावर तुळस, नऊवारी लुगडं, गळ्यात तुळशीची माळ आणि मुखी ‘विठुराया’.

वारीतील या माउलींना पाहून मला माझ्या आजीची आठवण झाली. अगदी अशीच कायम डोक्यावर पदर, कपाळावर आडवं रेखीव कुंकू, गोरी पान; पण तितकीच कडक शिस्तीची. सात मुलं, सात सुना, दोन मुली आणि डझनभर नातवंडं आणि नावं लक्षात न राहतील एवढी पतवंडं. भलं मोठं थोरलं घर. ४०-४५ माणसं घरात. शेतात काम करणारी गडी-माणसं आणि त्यांचीही पोरंबाळं. मोठे कौलारू घर.

अंगणात दररोज पहाटेचा शेणाचा सडा. छपराचं स्वयंपाक घर. घरामागे मोठी बाग. मोगऱ्याची फुलं, कंदमुळं, निलगिरी सगळ्यांचा घमघमाट पहाटेच्या वाऱ्याच्या झुळुकेबरोबर दरवळत राहायचा. पहाटे पाचपासून चुलीवर गवती चहा तयार व्हायचा. घरी पाहुण्यांचा राबता. आज सहज आठवलं की हसू येतं. डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टर सांगतात, बीट खा. टोमॅटो खा. काकडी खा.

लहानपणी हे बीट, काकडीचे ढीग दारात असायचे. कायम जनावरांसमोर खायला ठेवलेले असल्यामुळे ते त्यांचेच खाद्य आहे, हे डोक्यात पक्कं बसलेलं. जे माणसाने खायला पाहिजे ते जनावरांना चारत होतो; पण सगळंच पौष्टिक खाणं असल्यामुळे डॉक्टरकडे कधी जायची गरज पडत नव्हती. फेसाळलेल्या दुधाच्या बादल्या.

चुलीवरच्या गरम निखाऱ्यावरच्या कडक बाजरीच्या भाकऱ्या आणि आजीनं मुरवलेलं चवदार लोणचं. मेथीच्या भाजीचा वास घरभर पसरायचा. सोबत ओल्या शेंगदाण्याची चटणी. सारा बेतच निराळा असायचा. पावसाळा सुरू झाला की घमेल्यात चुलीतील गरम निखारा मोठ्या घरामध्ये ठेवला जायचा. थंडीत काय ऊब मिळायची!

दिवसभर सगळ्या भावंडामध्ये विटीदांडू, सुरपारंब्या, लिंगोरेच्या खेळायचो. इतकं दमून जायचो तरी झोपताना अंगणात चांदण्या मोजण्याची स्पर्धा असायची. रातराणीच्या वासाने थंडगार गारव्यात झोप लागून जायची. मध्येच जाग आली, तर आईच्या कुशीत असायचे. तसं शेंडफळ असल्यामुळे दोन्ही भावंडापेक्षा आईजवळची हक्काची जागा माझीच.

एकत्र कुटुंबात इतकं एकरूप होऊन राहिलो, की मी तिसरी-चौथीला जाईपर्यंत मला सख्खे आणि चुलत भाऊ-बहीण कोण, हेच माहीत नव्हतं. कार्यक्रमात, सणवारात पाहुणे आले की विचारत, तुझी सख्खी बहीण कोण? भाऊ कोण? आमच्या या घरातल्या भावंडांनी मला इतका जीव लावून सांभाळलं की मला असे प्रश्न कधीच पडले नाहीत.

किंबहुना माझ्या इतक्या मोठ्या घरात तसं कोणी वागलंही नाही. परकेपणा, आपलेपणा, तुझं-माझं हे असले शब्दही आम्हाला कधी ऐकायला मिळाले नाहीत. त्यामुळे असं कोणी विचारलं तर मी आईकडे जायची. ती म्हणायची सगळी तुझीच भावंडं आहेत. कदाचित हाच विचार मनात इतका खोलवर रुजला तो आजतागायत राहिला.

आजही महाराष्ट्रात फिरताना मोठं कुटुंब पाहिलं की मला ती माणसं आणि घर गर्भश्रीमंत वाटतात. कारण मोठ्या एकत्र घरात आजी-आजोबांच्या सहवासात कधी वेगळ्या संस्कार वर्गाची गरज पडत नाही. आम्हालादेखील विचारांचा, संस्कारांचा आणि सामंजस्याचा खजिना एकत्र कुटुंबातून मिळत गेला. मोठे काका त्यांच्या पत्नीला म्हणजे मोठ्या काकूला ‘अहो जाहो’ बोलत.

एकेरी उल्लेख कधी करत नसत. आजही तो आदर पत्नीविषयी जपलेला आहे. साहजिकच त्यांच्या पाठची भावंडं त्यांचं अनुकरण करत. आजी सगळ्या नातवंडांना धाकात ठेवत. अगदी पहाटे मोगऱ्यांची फुलं आणण्यापासून खुराड्यातील अंडी गोळा करून ठेवण्यापर्यंतची काम ठरवून दिलेली असत. त्यामुळे वडीलधाऱ्यांनी कामं सांगितली, तर ती झालीच पाहिजेत, ही शिस्त.

घरात इतकी भावंडं राहत होतो, मस्ती, बडबड, गप्पा शाळेतल्या आठवणी, धमाल या सगळ्यांमध्ये दिवसभराचा वेळ निघून जायचा. लग्न झालेली मोठी बहीण ते घरात नुकतंच जन्माला आलेलं चार दिवसांचं बाळ, असं प्रत्येक पिढीचं, प्रत्येक विचाराचं, प्रत्येक वयातील माणसांचा सततचा वावर.

‘संवादाची’ दारं सताड उघडी ठेवणारी होती. त्यामुळे मनात राग, द्वेष, संताप, मत्सर या अंधाऱ्या वाटेला जास्त वाव मिळत नसे. आधुनिक सोयीसुविधा नव्हत्या. फार मोठी जीवघेणी स्पर्धाही नव्हती आणि म्हणूनच माणसं ‘घरात’ राहून ‘घरपण’ जपणारी, कुटुंबाला वेळ देणारी आणि ‘कुटुंब’ सांभाळणारी होती.

घरातील प्रत्येक नात्यातील ‘संवादाच्या’ दालनाला वेगवेगळे कंगोरे होते. त्यामुळे आयुष्यातील राजकीय जीवनातील एखादा निर्णय चुकलाही असेल; पण वैयक्तिक जीवनातील निर्णय होकायंत्राने दाखवलेल्या दिशेसारखे चोख ठरत राहिले, ते केवळ आणि केवळ कुटुंब आणि कुटुंबातील संवादामुळे.

कोणतंही मोठं संकट घरावर आले, तर ते सहज परतावून लावण्याची ताकद माणसात होती. कारण पाठीशी कुटुंब उभं होतं. घरातली माणसं बरोबर राहिली, त्यांनी साथ दिली तर आपल्याला जग जिंकण्याचा आत्मविश्वास मिळतो. ‘हो मी लढेन, हो मी करेन, नाही हरणार, नाही मागे फिरणार, नाही खचणार, हे सोनेरी आत्मनिर्भराचं बळ याच घरट्यातून मिळतं... मी स्वतः हे अनुभवतेय आणि म्हणूनच आयुष्याची काटेरी वाट सुगंधित फुलाने भरून जावी, ही स्वप्नं आकार घेतात आणि साकारताही येतात. ती जिद्द आणि आत्मविश्वास मिळतो याच घरातून.

आज प्रकर्षाने जाणवतंय, ते म्हणजे कुटुंबातील संवाद हरवत चालला आहे. एकत्र कुटुंबाच्या जागी विभक्त कुटुंब पद्धत आली. आजी, आजोबा गावी आणि आम्ही ‘हम दो हमारे दो’च्या जमान्यात ‘हम दो हमारा एक’च्या वाटेवर आलो.

स्पर्धेच्या जगात टिकण्यासाठी बाबांबरोबर आईही कामावर जातेय. घरातल्या मुलाच्या एका हातात रिमोट आणि दुसऱ्या हातात मोबाईल आलाय. शाळेतले शिक्षक त्यांना पाठ्यपुस्तकात ज्ञान शिकवतात; पण आई रागावली तर आजीच्या कुशीत शिरायचं स्वर्गसुख चांदण्यातच विरून जातंय.

घरात कोणीच नसल्यामुळे शाळेतला पाठांतराचा निबंध मोठ्या ताई किंवा दादासमोर म्हणण्याऐवजी आम्हाला आरशासमोर म्हणावा लागतोय. घरातच माणसं नसल्यामुळे आणि आईलाही आता तितका वेळ नसल्यामुळे मी माझ्याशीच बोलतो. नाहीतर मोबाईलवरील ‘unknown friend list’मधल्या आभासी मैत्रीशी, प्रेमातला एक नकारही आम्ही पचवू शकत नाही.

म्हणून हिंसेच्या वाटेने जात हाडामांसाचा गोळा, फुलपाखराला घट्ट मुठीत पकडावं तितक्या सहजतेने आम्ही संपवतो. प्रत्येकाला जगण्याची स्वतःला परिभाषा असते, त्यावर इतरांची अरेरावी आणि हिंसा का? घरातला संवाद, मिळणारी माया, आपुलकीची भाषा आणि मोकळेपणाने होणारी चर्चा यासाठी नात्याबरोबर कुटुंबाची गरज आहे. जगातल्या दुनियेत आणि पुस्तकाच्या भंडारात प्रेमाची अभंगवाणी जी कोठेच गुणगुणताना दिसणार नाही. ती सापडेल फक्त आजीच्या ओठी.

खेळण्यांच्या मॉलमध्ये घोडा गाडीचा ढीग लागेल; पण नातवाला पाठीवर बसवून फिरणारा आजोबाचा घोडा अंगणातच दिसेल. घरातल्या पाल्याबरोबर आपली संवादाची दारं सगळ्या बाजूने उघडी ठेवा. मनं मोकळी आणि तितके संयमाची होण्यासाठी घरातल्या माणसाची मनं ‘पाळामुळांसारखी’ खोलवर रुजायला हवीत. म्हणजे विचारांच्या पारंब्या विस्तारित आणि समृद्ध होतील...

अन्यथा साधासा नकार कोणी दिला, तर हातात कोयता घेऊन वार करायला आम्ही मोकाट आहोतच!

(लेखिका राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असून, गेली सोळा वर्षे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांत कार्यरत आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.