दहावीत असताना शाळेच्या नामविस्तार कार्यक्रमाला आलेले लोकनेते शरद पवार. तेव्हा त्यांचे औक्षण करण्याची संधी मिळाली होती.
- रूपाली चाकणकर rchakankar95@gmail.com
दहावीत असताना शाळेच्या नामविस्तार कार्यक्रमाला आलेले लोकनेते शरद पवार. तेव्हा त्यांचे औक्षण करण्याची संधी मिळाली होती. पंचवीस वर्षांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना औक्षण करीत होते. या पंचवीस वर्षांमध्ये सावित्रीची लेक म्हणून अनेक गोष्टींना, अनेक संघर्षांना सामोरे गेली; पण हे संघर्ष पेलताना कायम शाळेतील साहेबांच्या भाषणाने मनात रुंजी घातली...
दोन महिन्यांपासून शाळेच्या भल्यामोठ्या इमारतीच्या रंगरंगोटीपासून मैदानापर्यंत सगळीकडे जय्यत तयारी चालू होती. ढोल, लेझीम पथकांचा सराव, कवायतीच्या कसरती, समूहगानच्या ग्रुपची रंगीत तालीम, मैदानावरील मांडवासाठी मोजमाप आणि खोदकाम, मुख्य रस्त्यापासून शाळेच्या गेटपर्यंत कमानीची सजावट, सूत्रसंचालन करणाऱ्या मुलींची स्टेजवरची उभं राहण्याची व्यवस्था, मुख्य रस्त्याची साफसफाई, रस्त्याची दुरुस्ती, शाळेतील फलकावरची डिझाईन बापरे... बाप.. किती म्हणून सांगू?
होय, एवढी सगळी तयारी होती शाळेच्या नामविस्तार कार्यक्रमाची आणि या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून येणार होते लोकनेते शरद पवार... मी दहावीत होते, शाळेची मॉनिटर असल्याने सगळीकडेच लक्ष देत सुरू असलेली तयारी पाहण्याचा आनंद लुटत होते. हे सगळं पाहायला मज्जा वाटत होती. त्या वातावरणात उत्साह होता, चैतन्य होते आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यांचं नाव कायम फक्त ऐकत आलो, ज्यांना टीव्हीवर पाहत आलो, त्यांना प्रत्यक्ष समोर पाहता येणार होतं. सगळी तयारी अंतिम टप्प्यात होती, जवळजवळ दीड-दोन हजार मुलींमधून ७२ मुलींना या पाहुण्यांना औक्षण करण्यासाठी निवडले होते. मंगळवारी कार्यक्रम होता.
शनिवारचा पी.टी.चा तास संपवून शाळा सुटण्याआधी आमच्या साळुंखेताईंनी आम्हा ७२ मुलींना रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेत बोलावलं. नऊवारी साडी, अंबाडा, हिरव्या बांगड्या, औक्षणाचे ताट कसं असेल आणि त्यात काय असेल... इथपासून कोणी कसं आणि कुठं उभं रहायचं इथपर्यंत सूचना. साहेबांसोबत खूप मान्यवर, मंत्री, नेते येणार होते. त्यांना कोणी औक्षण करायचे याची यादी साळुंखेताई वाचत होत्या. आमच्या ७२ मुलींमधून आम्ही ठरवलं होतं, ज्या मुलीस साहेबांना औक्षण करायला संधी मिळेल तिला ‘मिस चंद्रभागा’ नाव द्यायचं, कारण ‘साधना मुलींचे विद्यालया’चा नामविस्तार ‘कै. चंद्रभागा बाबुराव तुपे साधना कन्या विद्यालय’ असा होणार होता.
साळुंखेताई यादी वाचताना आम्ही सगळ्या एकमेकींकडे पाहून खुणवायचो, शेवटी सगळी नावं संपली आणि साहेबांच्या नावापुढे औक्षणासाठी माझं नाव घेतलं. खूप आनंद झाला.
साहेबांना जवळून पाहता येणार, औक्षण करता येणार या आनंदाने तर दोन दिवस नीट झोप लागली नाही. दहावीत फार राजकारण समजत नव्हतं; पण महाराष्ट्रात पहिलं महिला धोरण राबविणारे साहेब म्हणून त्यांच्याप्रति प्रचंड आदराने विश्वास दुणावत होता. महिलांसाठी आरक्षण, सुरक्षितता, सगळ्या क्षेत्रांत संधी दिली म्हणून आम्हा विद्यार्थ्यांनासुद्धा ते कर्मवीर अण्णांसारखेच आमचे आधारवड वाटत होते.
अखेर मंगळवार उजाडला. सकाळी दहा वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन. त्यापूर्वी औक्षण, शाळेत तयार होऊन आम्ही सगळे हजर. स्वच्छ गणवेशात विद्यार्थिनींनी भरगच्च भरलेले मैदान. रंगीबेरंगी पताका, कमानी, फुलांची आरास. रांगोळीचा आणि फुलांच्या पायघड्या. सनई वादन, स्वागतासाठी तयार असलेले ढोल-लेझीम पथकांची भलीमोठी फौज... इतक्या वर्षांनंतरही आहे तसा क्षण डोळ्यांसमोर उभा आहे.
अन् तो क्षण आला... साहेब आले, भोवताली पोलिसांचा ताफा. सोबत मंत्री. आजूबाजूला कार्यकर्ते. पहिल्यांदाच साहेबांना पाहत होते. नमस्कार करत साहेबांना औक्षण केले. छान स्मितहास्य करत साहेबांनी प्रतिसाद दिला. संपूर्ण शाळेची पाहणी करून साहेबांनी सगळ्यांना मार्गदर्शन केले. आनंदाच्या भरात साहेब काय बोलले ते फार समजलं नाही; पण विद्यार्थिंनींनी चांगले शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहा. जिजाऊ, सावित्रीच्या लेकी म्हणून विविध क्षेत्रांत कर्तृत्वसंपन्न व्हा, शाळेचे नाव उज्ज्वल करा. ज्ञानाने, विचाराने समृद्ध झालात तर स्वतःबरोबर समाजाच्या प्रगतीत सहभागी व्हाल. साहेबांनी हे सांगितलेलं पक्कं आठवतं. अतिशय उत्साहात, धामधुमीत कार्यक्रम संपला; पण या कार्यक्रमातील साहेबांच्या कर्तृत्वसंपन्न व्हा, ज्ञानाने, विचाराने समृद्ध व्हा... या वाक्यांनी मनाला प्रेरणा दिली.
कार्यक्रमाच्या निमित्ताने अनुभवलेल्या दोन महिन्यांच्या वातावरणाने आपणही असंच राजकारणात जाऊ, हा विचार नंतर हवेत विरला. कारण हे हास्यापद आहे हेही त्यावेळी जाणवलं आणि शिक्षणाच्या जोरावर भरारी घेत क्लासवन अधिकारी व्हायचं असं ठरवून झोकून देऊन अभ्यास केला. खो-खो, कबड्डीची प्रमुख म्हणून मैदानावर स्पर्धा जिंकायची, तसंच वर्गातही पहिल्या पाचमध्ये यायचं हा निश्चय असायचा आणि तो नंबरदेखील पटकवायचे.. शैक्षणिक आयुष्याची अनेक वर्षे गेली. बारावीनंतर बी.सी.एस, एम.बी.ए. (एच.आर) घेऊन स्पर्धा परीक्षाही दिल्या आणि या सगळ्यांमध्ये राजकारणात प्रवेश झाला. योगायोगाने साहेबांच्या पक्षात काम करण्याची संधी मिळाली. गेल्या वर्षी १२ डिसेंबरला साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील महिला भगिनींच्या वतीने औक्षण करण्याची संधी मला मिळाली. २५ वर्षांनंतर तोच योग पुन्हा आला होता. त्यावेळी ‘रयत’ची विद्यार्थिनी म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांना म्हणजेच साहेबांना औक्षण केले होते.
त्याआधी संघटनेत महिला विभागाच्या राज्याच्या अध्यक्षपदाचा नुकताच कार्यभार स्वीकारला होता आणि राज्यातून सर्व महिला भगिनींची मुंबई येथे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मीटिंग आयोजित केली होती. या मीटिंगमध्ये साहेब मार्गदर्शन करत असताना मला म्हटले होते, ‘‘रूपाली, तुम्ही पुण्यातून आला आहात, सावित्रीच्या लेकींच्या जन्म गावातून आलात, सावित्रीच्या विचारांचा वसा, वारसा घेऊन संपूर्ण महाराष्ट्र फिरा आणि संघटन वाढवा.’’ साहेबांचा हाच विचार घेऊन अडीच वर्षांत संपूर्ण महाराष्ट्र, ग्रामीण वाड्या-वस्त्या, आदिवासी पाड्यांपर्यंत फिरले. ‘सावित्रीची लेक’ म्हणून महाराष्ट्रानेदेखील मनापासून स्वागत केलं आणि तितकाच प्रतिसाद संघटनेलाही दिला. संघटनेतील कामांची पावती म्हणून साहेबांनी आपणच आणलेल्या महिला आयोगाची अध्यक्ष पदाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी मला दिली. अनेक महिलांमधून मला दिलेली ही संधी प्रामाणिक काम करणाऱ्या संघटनेच्या कार्यकर्तीचा ‘सन्मान’ आहे.
आज पंचवीस वर्षांनंतर महाराष्ट्राची महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना औक्षण करीत होते. या पंचवीस वर्षांमध्ये सावित्रीची लेक म्हणून अनेक गोष्टींना, अनेक संघर्षांना सामोरे गेली; पण हे संघर्ष पेलताना कायम शाळेतील साहेबांच्या भाषणाने मनात रुंजी घातली, ती म्हणजे ‘अभ्यासाने, विचाराने समृद्ध झालात तर समाजाच्या प्रगतीला वेग देता येईल...’
साहेब, सावित्रीच्या लेकी घरोघरी आहेत, तुमच्यासारख्या विचारांची गरज महाराष्ट्राला होती, जोतिबाच्या विचारांची पताका खांद्यावर घेऊन तुम्ही चालत आहात... सोबत सावित्रीच्या लेकी घडवत आहात!
(लेखिका राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असून, गेली सोळा वर्षे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांत कार्यरत आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.