‘सामर्थ्यवान स्त्रीशी सहजीवन हवे असेल तर एकमेकांविषयी आदर ठेवा. एकमेकांत भावनिक गुंतवणूक जरूर करा, पण ‘एकमेकांच्या व्यावसायिक जीवनाआड आपण येत नाही ना’ याची काळजी नक्की घ्या.
- रूपाली चाकणकर, rchakankar95@gmail.com
‘सामर्थ्यवान स्त्रीशी सहजीवन हवे असेल तर एकमेकांविषयी आदर ठेवा. एकमेकांत भावनिक गुंतवणूक जरूर करा, पण ‘एकमेकांच्या व्यावसायिक जीवनाआड आपण येत नाही ना’ याची काळजी नक्की घ्या. स्वातंत्र्य महत्त्वाचं. तुमचंही आणि त्यांचंही. स्वातंत्र्य म्हणजे व्यभिचार नव्हे. तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर-मैत्रिणींबरोबर बसून तासन् तास गप्पा मारू शकता. तशा त्याही! पण त्याचा अर्थ असा नाही की, तुम्ही किंवा त्या व्यभिचारी आहेत. त्यांची तुमच्यातली भावनिक गुंतवणूक, प्रेम, आदर आणि तिला तिच्या मित्र-मैत्रिणींबरोबर वेगळ्या आयुष्याचा पूर्ण अधिकार आहे.
सामर्थ्यवान, स्वतंत्र, यशस्वी स्त्री आकर्षक वाटते? तुम्हाला अशी स्त्री जोडीदार किंवा जीवनसाथी म्हणून हवी आहे? सावधान! कारण काय आहे... पोळं आहे म्हटल्यावर माश्या तर घोंघावणारच... पण अशा स्वतंत्र, सामर्थ्यवान, कर्तव्यतत्पर, काव्यशास्त्र विनोद पारंगत, संभाषणकला प्रवीण स्त्रीशी सहजीवन तुम्हाला झेपणार आहे? तुमच्या मनाची ती तयारी आहे? तिचा बाणेदार स्वभाव आणि तिचं यश तुम्ही पचवू शकणार आहात?
हे लिखाण वाचून जर राग येणार असेल, चलबिचल होणार असेल, तर परत एकदा विचार करा. जोडीदार माझी सशक्त बरी की हवी मला अबला नारी, मात्र एक लक्षात घ्या, समर्थ असो वा अबला- चांगुलपणा ऑप्शनल नसतो. आणि हो, सामर्थ्यवान महिलांना तुमची गरज नसते. तुम्हाला जर एखाद्या स्वतंत्र वृत्तीच्या सामर्थ्यवान महिलेचं मन जिंकायचं असेल, तर पहिली गोष्ट लक्षात घ्या की त्यांना तुमची ‘कशाहीसाठी’ गरज नसते. ना तुमच्या पैशांची, ना तारणहार म्हणून, ना संरक्षणकर्ता म्हणून, ना तुमच्या भेट वस्तूंची, ना तुमच्या कौतुकाची.
तिला तुमची गरज नसते; पण हो, तुम्ही खरंच छान माणूस असाल, तर तुमच्यात तिला रुची मात्र नक्की असू शकेल. तिला छान जोडीदार असावा अशी तिची इच्छा असते, पण ती तिची गरज नसते. उगीच तिचा रक्षणकर्ता, पालनकर्ता बनण्याच्या भानगडीत पडू नका. कारण ‘तसं’ बनणं ही तुमची भावनिक गरज असू शकेल, तिची नाही. त्यामुळे उगीच ‘मोठेपणा’चा आव आणण्याऐवजी त्यांना ‘बरोबरी’ची जागा दिलीत, तर तुमच्या स्वप्नाची सुंदरी तुम्हाला मिळण्याची शक्यता जास्त असते. ‘समर्थ आणि स्वतंत्र’ स्त्रीला तोडीस तोड भागीदार पाहिजे असतो, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारा कुणी पोलिस नाही. लक्षात घ्या, तिला तुम्ही ‘हवे’ आहात म्हणून हे नातं असतं, तुमची ‘गरज’ आहे म्हणून नाही. आणि जर प्रत्येक बारीकसारीक गोष्टीत जर तिला तुमची गरज पडत असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या- प्रॉब्लेम तुमच्यात आहे, तिच्यात नाही.
स्वतंत्र आणि सामर्थ्यवान स्त्रियांनी तुम्हाला सुधारण्याचा आणि तुमचं बेबी सिटिंग करण्याचा मक्ता घेतलेला नाही. त्यांना तुमच्यात लहान मूल नको आहे, त्यांना हवा आहे तोडीस तोड भागीदार. हातातल्या सगळ्या गोष्टी टाकून त्यांनी आयुष्यभर तुमचं संगोपन करावं ही अपेक्षाच मुळात गैर आहे. त्यासाठी तुम्हाला आईची गरज आहे, बायकोची नाही.
तर अशा स्त्रीचं मन जिंकायचं असेल तर स्वतःचे छंद स्वतः जोपासा, स्वतःची ध्येय स्वतः ठरवा, स्वतःची दिनचर्या स्वतः सांभाळा. एखादं छान काम करा, एखादी सुंदर कलाकृती साकारा, And you have her heart. स्त्री ही काही तुमचं Rehab केंद्र नाहीत. कुठलीही स्त्री असो, अबला की सबला, त्यांचं मूळ काम ‘तुमचं गाडं रुळावर आणणं’ हे नाही आहे. ते स्वतःचं स्वतः करा, त्यादेखील करतात.
आपलं तिकीट सांभाळणं ही आपली जबाबदारी असते, रेल्वेची नाही. त्यामुळे आपलं गाडं घसरू न देणं, हे आपलं आपण सांभाळा... एक लक्षात घ्या, समर्थ स्त्री ही समर्थ असते, कारण ती स्वत:च्या हिमतीवर स्वतःच्या गोष्टी स्वतः वेळेत उरकते- वेळच्या वेळी योग्य निर्णय घेते. तिची अपेक्षा तुमच्याकडून हीच असणार आहे. दमून आला असाल तर ती प्रेमापोटी चहा नक्कीच करून देईल; पण लोळत पडला आहात आणि ‘अगं चहा आण गं’ केलंत तर त्या गरम चहाचं काय होईल, हे सांगायची गरज नाही.
सामर्थ्यवान स्त्रियांच्या स्वतःच्या खूप गोष्टी चालू असतात, ज्यांचा तुम्ही भाग असण्याची गरज नसते आणि कदाचित तो तुमचा आवाकाही नसेल. त्यांच्या priorities वेगळ्या असतात. त्यांच्यावर जबाबदाऱ्यादेखील खूप असतात. तिला तुमच्या ‘सेवेत जुंपण्याअगोदर’ हा विचार जरूर करा. नुसता विचार करू नका, तर तिच्या वेगवेगळ्या वलयांचा आदर ठेवा. कारण तुम्ही त्या वलयांचा भाग नाही आहात. ती तिच्या प्रेमापोटी तुम्हाला त्या वलायांचा भाग करून घेते आहे, हे लक्षात घ्या. त्या वलयांचा केंद्रबिंदू होण्याचा प्रयत्न करू नका. भ्रमनिरास होईल.
थोडक्यात ‘सामर्थ्यवान स्त्रीशी सहजीवन हवे असेल, तर एकमेकांविषयी आदर ठेवा. एकमेकांत भावनिक गुंतवणूक जरूर करा, पण ‘एकमेकांच्या व्यावसायिक जीवनाआड आपण येत नाही ना’ याची काळजी नक्की घ्या. स्वातंत्र्य महत्त्वाचं. तुमचंही आणि त्यांचंही. स्वातंत्र्य म्हणजे व्यभिचार नव्हे. तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर-मैत्रिणींबरोबर बसून तासन् तास गप्पा मारू शकता. तशा त्याही! पण त्याचा अर्थ असा नाही की, तुम्ही किंवा त्या व्यभिचारी आहेत. त्यांची तुमच्यातली भावनिक गुंतवणूक, प्रेम, आदर आणि तिला तिच्या मित्र-मैत्रिणींबरोबर वेगळ्या आयुष्याचा पूर्ण अधिकार आहे.
एकमेकांच्या आयुष्याचा भाग जरूर बना; पण केंद्रबिंदू बनण्याचा प्रयत्न करू नका. एकमेकांवर खरं प्रेम असेल तर फार जास्त प्रयत्न करण्याची गरज पडत नाही. बाकी सगळं राहिलं बाजूला, आधी माझ्याकडे बघ हे शब्द जर तुम्ही उच्चारले असतील तर अवघड आहे. कारण तुम्हाला अशी स्त्री जोडीदार म्हणून नको आहे. तुम्हाला अशी स्त्री जिंकायची आहे. तिचा ताबा मिळवायचा आहे. तुमचा अहंकार सुखावण्यासाठी. कित्येक वेळेला सामर्थ्यवान स्त्रिया या ‘स्त्री स्वातंत्र्य, स्त्री मुक्ती, व्यक्ती स्वातंत्र्य’ अशा तत्त्वांच्या खंद्या पुरस्कर्त्या असतात. जमणार आहे तुम्हाला? नांदायला?
स्त्री जेवढी कर्तबगार तेवढी तिच्या वाट्याला अधिकाधिक उपेक्षा येत गेलेली असते. खासकरून पितृसत्ताक पद्धतीमध्ये; पण त्या बियांसारख्या असतात. जेवढ्या खोल पुरायला जाल तेवढ्या तरारून-बहरून वर येतात आणि स्वत:च्या तत्त्वांचा अजून हिरीरीने पुरस्कार करतात. झेपणार आहे? जर तुम्ही खरंच सामर्थ्यवान, स्वतंत्र स्त्रीच्या प्रेमात असाल तर लक्षात घ्या. त्यांना खरंच कशाची गरज असेल तर, ती असते अशा जोडीदाराची जो त्यांची मेहनत, त्यांची धडपड, त्यांचा संघर्ष समजू शकतो. आणि नुसता समजू शकत नाही, तर कायम त्यांच्या खांद्याला खांदा देऊन बाजूला उभा असतो. त्यांच्या वाट्याला जेव्हा लैंगिकतेमुळे भेदभाव येतो, घायाळ होतात, तेव्हा त्यांच्या जखमांवर फुंकर घालतो. And acts like a sounding board... A reflecting mirror... Who helps them balance their thoughts, especially when the going gets tough. तिचं मन ऐकायला शिका. आणि हे फक्त ‘समर्थ आणि स्वतंत्र’ स्त्रियांना नाही, तर सर्वच स्त्रियांसाठी लागू आहे. जर हे करू शकत नसलात तर त्यांच्यापासून लांबच बरे.
तुम्हाला समर्थ, स्वतंत्र स्त्री कशासाठी हवी आहे? तिला कशी काबूत आणली, असा विचार करून तुमचा पुरुषी अहंकार सुखावायला की खरंच तिच्या गुणांना प्रेमाने खतपाणी घालून तिला अजून बहरलेलं बघायला? लक्षात घ्या... सामर्थ्यवान स्त्री ही काही फक्त ‘देदीप्यमान’ यश मिळवलेली नसते. ती एक कुमारिका माता असू शकते, जिने समाजाच्या विरोधात जाऊन स्वतःचं मूल वाढवलं.
ती एक जातीपातीची बळी असू शकेल, जी कायम हिणवली गेली तरी स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभी राहिली.
ती एक डॉक्टर असू शकते. लहानपणात ‘चुकीच्या तऱ्हेने’ स्पर्श केली गेलेली; पण आता इतरांच्या दुःखावर फुंकर घालणारी.
ती एक वेश्या असू शकते. स्वतःच्या मुलांना उत्तम शिक्षण देऊन त्या घाणीतनं बाहेर काढायचा प्रयत्न करणारी. ती एक विधवा, घटस्फोटिता, परित्यक्ता असू शकते. नव्याने जगण्याची उमेद गोळा करून स्वतःचं अस्तित्व टिकवण्याची धडपड करणारी.
लक्षात घ्या... या स्त्रिया ‘तुमच्या कल्पनेतील’ किंवा ‘खऱ्याखुऱ्या’ संभोगाच्या उपभोग्य वस्तूही नाहीत. तुमचं काम करायला ठेवलेल्या दासी नाहीत की तुमचे लाड करायला तुमची आई नाही. त्या आहेत अतिशय उमद्या, मानाने जगायचा प्रयत्न करणाऱ्या, कित्येकदा तुमच्या कैकपट सरस व्यक्ती. त्यांना हवा आहे समजून घेणारा आणि त्यांच्याविषयी आदर बाळगणारा जोडीदार! जर काही पटलं नाही तर त्या तुम्हाला ऐकवणार आहेत. तयारी आहे तुमची?
‘स्वतंत्र-सामर्थ्यवान-यशस्वी स्त्री?’
(लेखिका राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असून, गेली सोळा वर्षे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांत कार्यरत आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.