कात्यायनीचा अनोळखी कायापालट...

वंशवृक्ष ही स्थलकाल अवकाशातीत मानवी भावनांची काव्यात्म कहाणी आहे. मानवी भावना सर्वकाळ सर्वत्र सारख्याच असतात, ही गोष्ट ती आपल्या मनावर ठसवते.
S L Bhyrappa masterpiece English translation of the novel Vamshavruksha
S L Bhyrappa masterpiece English translation of the novel VamshavrukshaSakal
Updated on

- अ‍ॅड. निखिल संजय रेखा

विदेशातील आणि देशभरातील दूरदूरचे प्रवास, तातडीच्या बाबी वेळेत पूर्ण करण्याची घाई, कबूल केलेले कार्यक्रम. धावपळ नुसती. त्यामुळं गेले काही महिने अतिशय घाईगडबडीत गेले. अखेरीस पुस्तकांच्या आणि निसर्गाच्या सुखद सान्निध्यात थोडा मोकळा वेळ स्वत:साठी काढायचाच असं ठरवलं.

यासाठी म्हैसूरपेक्षा चांगलं ठिकाण दुसरं कुठलं असेल? ‘ मालगुडी डेज’ लिहिणाऱ्या आर. के. नारायण यांचं आणि कुसुमाबळे या महान कथासंग्रहाचे स्फूर्तिदायक कर्ते देवनुरु महादेव यांचं हे गाव.

माझं बेंगळुरुमधलं काम आटोपताच मी त्या इतिहासप्रसिद्ध शहराची वाट धरली. जिथं असेन तिथलं स्थानिक साहित्य वाचायचं या माझ्या रिवाजानुसार माझ्या बॅगेत कन्नड साहित्यातील झळाळती रत्ने होतीच. हॉटेलमध्ये स्थिरावल्यावर थोड्याच वेळात मी तिथलं एक बिनगर्दीचं कॅफे गाठलं आणि एका कोपऱ्यातली जागा हेरून कॅफेमालकाला दर पाऊण तासानं मला मस्त फिल्टर कॉफी पुरवायला सांगितलं.

अशा रीतीनं एस. एल. भैरप्पांची श्रेष्ठतम निर्मिती मानली जाणाऱ्या वंशवृक्ष या कादंबरीच्या इंग्रजी अनुवादाचा माझा रंजक वाचनप्रवास सुरू झाला. मी नाटकवाला होतो तेव्हापासून एस. एल. भैरप्पा यांच्या लेखनाशी माझा परिचय होता. महाभारतावरील एका नाटकाविषयी संशोधन करत असताना ‘पर्व’ या त्यांच्या अभिजात कलाकृतीचा मराठी अनुवाद मी काळजीपूर्वक वाचला होता.

वंशवृक्ष ही स्थलकाल अवकाशातीत मानवी भावनांची काव्यात्म कहाणी आहे. मानवी भावना सर्वकाळ सर्वत्र सारख्याच असतात, ही गोष्ट ती आपल्या मनावर ठसवते. म्हैसूरच्या अवतीभोवतीच राहणाऱ्या पात्रांच्या कथांतून भैरप्पा वाचकांच्या डोळ्यासमोर मानवी भावनांचं एक महानाट्य उभं करतात.

ही कादंबरी म्हणजे धर्माच्या नावे फोफावणारी रूढीबद्धता आणि शिक्षणातून येणारी आधुनिकता यांच्यातील संघर्षाचं उत्कट चर्चात्मक चित्रण होय. वाचकाला आपल्याबरोबर नेत पात्रांच्या जीवन प्रवासात आपणही सहभागी आहोत, अशी भावना भैरप्पा त्याच्या मनात निर्माण करतात. हीच त्यांची साहित्यिक महत्ता होय.

यातील सगळी भौगोलिक वर्णनं आणि परिसराचं खडा न खडा सूक्ष्म चित्रण अत्यंत लोभस आहे. चामुंडा हिल्स, कपिला नदी यांचा रूपकात्मक वापर अप्रतिम आहे. ही कादंबरी वाचताना वाडियार घराण्यानं पुढाकार घेतलेल्या प्रागतिक उपक्रमांचीही एक झलक आपल्याला पाहावयास मिळते.

परंपरा निष्ठा आणि आधुनिकता यांचा नाजूक समतोल साधण्याचं व्यावहारिक शहाणपण त्यांनी कसं अंगी मुरवलं होतं हे त्यातून दिसून येतं. श्रीनिवास श्रोत्री, भागीरथअम्मा, लक्ष्मी, सदाशिव राव, त्यांचे ऑक्सफर्डशिक्षित बंधू राजा,

नागलक्ष्मी, करुणा आणि चिन्नी ही या कादंबरीतील प्रमुख माणसं आहेत. प्रत्येक पात्राची आपली म्हणून एक कहाणी आहे. त्या प्रत्येकाचा जीवनप्रवास वाचकाला खिळवून ठेवतो. प्रत्येक पात्रात आणि त्याच्या मार्गक्रमणात वाचकाला रस वाटू लागतो. हे पुस्तक वाचत असताना त्यातील पात्रांकडं, घटितांकडं मी भैरप्पांच्याच दृष्टिकोनातून पाहायचं ठरवलं.

या सर्व पात्रांमध्ये सुरुवातीलाच कात्यायनी आणि राजा या दोघांनी मला अधिक आकर्षित केलं. इतकं की कन्नड साहित्याचा अतिशय प्रगल्भ वाचक असलेल्या माझ्या एका मित्राला मेसेज करून मी कळवलं सुद्धा की कात्यायनी मला उंबरठा चित्रपटात स्मिता पाटीलनं रंगवलेल्या सावित्रीसारखी वाटते.

परंपरा, रूढीबद्धता आणि आपल्या साहित्यिक, दुराग्रही पुस्तकी भूमिकेतून बाहेर न येऊ शकणारे पुरुष यांच्या वर्चस्वाखालील सामाजिक वास्तवात स्वत:चा मार्ग आखणारी उंबरठातील सावित्री. करुणा ही बुद्धिमान सिंहली स्त्रीही तशीच आहे. ती म्हैसूर सोडून अन्यत्र निघून जाते. राजा सुद्धा एखाद्या खऱ्या साथी सारखा वाटतो.

सनातन रूढींच्या प्रवाहाविरुद्ध पोहण्याचे धाडस दाखवत तो पदरात एक मूल असलेल्या कात्यायनीसारख्या विधवा स्त्रीशी विवाह करतो. कात्यायनीला सुद्धा, विधवेच्याच खडतर भूमिकेत बंदिस्त करणारे, आखून दिलेल्या अनिवार्य पुराणमतवादी जीवनपद्धतीत जखडून टाकणारे साचेबद्ध पूर्वग्रह झुगारून द्यायचा आग्रह तो करतो. स्वत:ची स्वतंत्र, सार्वभौम विचारप्रक्रिया कवटाळायला प्रवृत्त करतो.

पण कादंबरी पुढं जाऊ लागते, तसतसं काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटू लागतं. आरंभी स्वतंत्र बाणा दाखवत असलेल्या स्त्रिया पुढंपुढं आपलं अस्तित्वभान विसरतात. त्या जणू त्यांच्या भोवतालच्या पुरुष पात्रांच्या केवळ सावल्या बनतात.

जणू त्यांचं अवघे जीवन बाप किंवा नवरा किंवा भाऊ असलेल्या या पुरुषांवरच अवलंबून आहे. स्त्रियांना क्रियाशून्य बनवून यातील द्वंद्व सोडवलं जातं. त्यांच्या पुरुषांना हाती नौकेचे सुकाणू सोपवले जातं. आपली ही अटळ निसर्गदत्त नियती स्वीकारायला नकार देणाऱ्या स्त्रियांचे विनाश हेच प्राक्तन ठरतं. नंतरच्या साऱ्या भागांत हे अधिकाधिक स्पष्ट होत जातं.

धाडसी, निर्भय, सुशिक्षित कात्यायनीसुद्धा आपली नणंद विधवा होते तेव्हा वैधव्याच्या जुनाट रूढींच्या पाठीशी उभी राहिलेली पाहून माझ्या मनाला तीव्र वेदना झाल्या. ती तिच्या केशवपनाला मान्यता देते. वैधव्याशी निगडित इतर साऱ्या जुनाट रूढी आणि रीतिरिवाजांपुढं मान तुकवते. साऱ्यांचे अंत शोकात्म आहेत.

वाचकाच्या विचारप्रक्रियेचा कल कोणताही असो शेवटी त्याच्या मनात धर्म आणि नैतिकता, लिंगाधारित आधुनिकता आणि तिच्यातील भेगा, आदर्श स्त्री म्हणजे काय असे अनेक प्रश्न निर्माण होतात. भैरप्पा यांच्या लेखनाचे हेच खरं सौंदर्य आहे. आपण त्यांच्याशी सहमत होऊ किंवा न होऊ पण त्यांच्या पात्रांचा प्रभाव आपल्या जीवनावर पडल्यावाचून राहत नाही.

ही अभिजात कलाकृती वाचून झाल्यावर मी कादंबरीत आलेल्या अनेक ठिकाणांची भटकंती केली. विशेषत: कात्यायनी जिथं जिथं गेली तिथं तिथं मीही गेलो. त्याच चामुंडी हिल्सवर, त्याच रस्त्यावर, म्हैसूरच्या रेल्वे स्टेशनवर, कॉलेजात - सर्वत्र.

याच ठिकाणी तिनं आपल्या विद्रोही मनाला, आपल्या सार्वभौम विचारप्रक्रियेला धार लावून घेतली होती. धर्मशास्त्रांच्या निर्बंधावर आणि विचार पद्धतीवर प्रश्नांचे आसूड उगारले होते. ही सारी स्थळं पाहताना एकच प्रश्न माझ्या मनाला सतत सतावत राहिला. यातल्या कुठल्या बरं ठिकाणी पूर्वीच्या त्या तेजस्वी कात्यायनीचा कायापालट झाला असेल? ती इतकी कशी आणि कुठं बदलली असेल की मला अगदीच अनोळखी व्हावी?

(अनुवाद : अनंत घोटगाळकर)

(लेखक हे आयआयटी दिल्ली इथं मानद व्याख्याते असून सामाजिक न्याय मंत्रालयामध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.