एकीकडे अल्पभूधारक शेतकरी, रोजंदारीवर काम करणारे मजूर बिचारे दोन वेळच्या जेवणाला मोताद आहेत. त्यांच्या पोराबाळांना चांगलं शिक्षण, औषधोपचार मिळत नाहीत. दुसरीकडे फूड कॉर्पोरेशनच्या गोदामातील २५ टक्के धान्य उंदीर खात आहेत.
त्यांच्याकडे कुणी पिवळ्या रंगाचं रेशन कार्ड वा आधार कार्डाचा पुरावा मागत नाही! सरकार एकीकडे उंदीर पकडण्याचा सापळा दाखवून संरक्षणाची ग्वाही देते, दुसरीकडे उंदरांना सापळ्याबाहेर पडण्याचा रस्ताही दाखवते. अशा बिनकामी पिंजऱ्यांच्या खर्चाने बजेटचा मोठा भाग गिळंकृत केलेला आहे.
‘उंदरांनी सरकारी गोदामातून अमुक टन धान्याचा पाडला फन्ना’, ‘उंदरांमुळे रेल्वेला झाला तमुक कोटींचा तोटा’, ‘वर्षभरात पालिकेने मारले तमुक हजार उंदीर’, ‘महत्त्वाच्या सरकारी फायली उंदरांनी कुरतडल्या’, ‘उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी शासनाने नेमली उच्चस्तरीय समिती’... दरवर्षी ठराविक काळाने अशा बातम्या प्रसिद्ध होत असतात.
मागील पंधरवड्यातही, भारतीय रेल्वेने उंदीर मारण्यासाठी प्रतिउंदीर दोन हजार ८६७ रुपये खर्च केल्याची, मुंबईतील वांद्र्याच्या एका धाब्यावर जेवणात उंदीर सापडल्याची तसेच मुंबई महापालिकेने पालिकेच्या रुग्णालयांतील उंदरांचा नायनाट करण्यासाठी एक विशेष समिती स्थापन केल्याची, अशा उंदराशी संबंधित बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.
ही समिती उंदरांच्या प्रतिबंधावर काम करील, उंदीर रुग्णालयांमध्ये घुसू शकतात असे मार्ग बंद करील, रुग्णालयातील अडगळीची ठिकाणे, खाण्या-पिण्याच्या वस्तूंची सफाई, कचऱ्याचे व्यवस्थापन आणि एसी डक्टच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देईल आणि प्रत्येक महिन्याला रुग्णालयांत एक सरप्राईज व्हिजिट देईल, असेही बातमीत म्हटले आहे.
मध्यंतरी बिहार पोलिसांनी जप्त केलेली अवैध दारू, उंदरांनी पिऊन फस्त केल्याची बातमी आली होती. जिथे ही जप्त केलेली दारू ठेवली होती त्या गोदामाच्या सीसीटीव्ही रेकॉर्डिंगमध्ये मात्र उंदीर दिसले नाहीत. माणसांच्या सान्निध्यात राहून उंदीरदेखील तंत्रज्ञान-स्नेही झाले असावेत आणि हे दुरूनच दारू लांबविण्याचं काम वायरलेस माऊसने केले असल्याची कनिष्ठ अधिकाऱ्यांनी मारलेली थाप तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पटली होती म्हणे.
छोट्या-छोट्या उंदरांनी मोठमोठ्या पेपरात जितकी जागा आणि न्यूज चॅनेल्सचा जितका एअर-टाईम व्यापलेला आहे त्यावरून उंदीर हा केवळ माळ्यावरून दर्शन देणारा अन् बिळात अंतर्धान पावणारा मामुली प्राणी नाहीये, हे आपण लक्षात घ्यायला हवे.
उंदीर हा बहुप्रसवा प्राणी आहे, हे जरी खरं असलं तरी त्यात त्या बिचाऱ्याचा काहीही दोष नाहीये. व्हाट्सॲप युनिव्हर्सिटीच्या एका समाज-शास्त्रज्ञाने म्हटलंय की, सामान्य माणूस आपल्या रोजच्या कटकटींमुळे त्रासलेला असतो. आपलं हे फ्रस्ट्रेशन काढण्यासाठी तो आपल्या बायकोवर ओरडतो. पुरुषप्रधान संस्कृतीत कमावत्या पतीला उलट बोलायची सोय नसल्याने ती बाई आपला राग आपल्या मुलांना धोपटून त्यांच्यावर काढते.
मुलं बिचारी काय करणार म्हणून ती घरातील कुत्र्याच्या पेकाटात लाथ घालतात. कुत्रा आपला गुस्सा काढण्यासाठी मांजरीच्या मागे लागतो. मांजर मग उंदराच्या पाठी लागते. उंदीर बिचारे संरक्षणासाठी बिळात जाऊन लपतात आणि दुसरं काहीच करण्यासारखं नसल्याने आपली प्रजा वाढवत राहतात.
लहानपणी आमच्या गावच्या कौलारू घरात उंदरांचा मुक्त वावर होता. घरात जे काही उरलंसुरलं किंवा न झाकलेलं अन्न असायचं त्यावर उंदरांचा जन्मसिद्ध अधिकार होता. एखाद्या रात्री घरात काहीच खायला नाही मिळालं, तर उंदीर येऊन गाढ झोपेत असलेल्या आमच्या पायाच्या टाचा कुरतडायचे.
लहानपणी एकदा रात्री मी झोपेत असताना उंदराने माझ्या पायाची टाच कुरतडली होती आणि पायाचं नखदेखील खाल्लं होतं. (नंतर तिथं नवीन नख आलं खरं. पण नव्या नखाला जुन्या नखाची सर नाही!) उंदीर कधीकधी आमच्या डोक्याकडे येऊन ची-ची असा आवाज करीत अन्न न ठेवल्याबद्दल तक्रार नोंदवायचे.
आता जेव्हा मी हे आठवतो तेव्हा मला वाटते की, एखादवेळी आपल्या हक्काचं आपल्याला खायला मिळालं नाही, तर घरमालकाच्या डोक्यावर बसून, त्याची झोपमोड करून आपला हक्क मागणारा उंदीर हा सामान्य भारतीय नागरिकांपेक्षा आपल्या हक्काबाबतीत अधिक सजग प्राणी आहे. एक नागरिक या दृष्टीने आपण उंदरांपेक्षा अगदीच कंडम आहोत.
सामान्य माणसांपेक्षा उंदीर, पाली, झुरळं, वाळवी हे अधिक चांगलं जीवन जगत आहेत. एकीकडे अल्पभूधारक शेतकरी, रोजंदारीवर काम करणारे मजूर बिचारे दोन वेळच्या जेवणाला मोताद आहेत, त्यांच्या पोराबाळांना चांगलं शिक्षण, औषधोपचार मिळत नाहीत. दुसरीकडे फूड कॉर्पोरेशनच्या गोदामातील २५ टक्के धान्य उंदीर खात आहेत.
ग्रामपंचायतीपासून मंत्रालयापर्यंत सगळी व्यवस्था वाळवीने पोखरली आहे. ना कुणी उंदरांकडे पिवळ्या रंगाचं रेशन कार्ड मागत की ना कुणी वाळवीकडे आधार कार्डाचा पुरावा मागत! तुम्हाला सांगतो, आमच्या माळ्यावर खेळणाऱ्या उंदरांच्या सुखाचा हेवा करत मी माझ्या भाड्याच्या घरात रात्री झोपी जातो तेव्हा पुलं माझ्या स्वप्नात येऊन मला खिजवत म्हणतात, ‘बेंबट्या उंदीर हो... बिळांस तोटा नाही!’
मी पाहिलंय की, शक्यतो उंदीर आपलं घर सोडून जात नाहीत. समजा, त्या घरात राहणारे लोकच घर सोडून गेले, त्या घरात खाण्यासारखं काहीच उरलं नाही तर खाण्यापिण्यापुरते शेजारी जाऊन राहायला मात्र उंदीर आपल्या मूळ घरातच येतात. आपण बघतो, मोठमोठ्या कंपन्या गुजरातला, गावे कर्नाटकला आणि नेते गुवाहाटीला जाताना दिसतात; पण उंदीर मात्र असे कुठेच जात नाहीत. उंदरांच्या या गुणाचं कौतुक करावं की राग, हेच मला ठरविता येत नाहीये.
उंदरांचे कान तीक्ष्ण असतात; तसेच वर्षानुवर्षे माणसांसोबत राहिल्याने उंदरांना माणसाची भाषा समजते. उंदरांच्या बंदोबस्तासाठी काही व्यवस्था करणार असे आपण घरात उघडपणे बोललो, तर उंदरासाठी ठेवलेल्या विष-मिश्रित आमिषाला उंदीर बळी पडत नाहीत.
म्हणून घरात उंदरांविषयी काही बोलताना माणसाने जपून बोलावे. एखाद्याला कमी लेखताना ‘तुझ्यासारख्या उंदराच्या पिल्लाला मी भीत नाही’ असं लोक म्हणतात खरं, पण तिकडे बिळात उंदरीणीची समजूत काढणे उंदराला किती जड जात असेल, याचा ते विचार करत नाहीत!
आपल्यासारख्या नोकरदार माणसासाठी, घड्याळाच्या काट्यात अडकून फाटत जाणाऱ्या आयुष्याला रफू करण्याचा दिवस म्हणजे रविवार. बऱ्याचदा तो रविवारदेखील, घरात येण्याचे उंदरांचे रस्ते बुजवणे, उंदीर पकडण्यासाठी सापळ्यात आमिष लावून योग्य जागी सापळा ठेवणे किंवा ग्लू-पॅडची व्यवस्था करणे असल्या उंदीर-प्रतिबंधक कामात वाया जातो.
इतके करूनही, घरात उंदीर घुसल्याची चाहूल जरी लागली, तरी बायका आपल्या नवऱ्याला पुढे करतात. पुरुष मंडळी ही आपल्या आईच्या उदरातून येतानाच उंदीर मारण्याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन आल्याचा बायकांचा समज असतो की काय कुणास ठाऊक!
अरे, कुणीतरी त्यांना सांगा की, ‘डर उनको भी लगता है, गला उनका भी सुखता है!’ मनातून कितीही धास्तावलेला असला, तरी घरात घुसलेल्या उंदराला मारल्या किंवा पळविल्यावाचून नवऱ्याला पर्याय नसतो. उंदीर मारण्यासाठी लागणारी हिंमत, ही बायकोसमोर खरं बोलण्यासाठी लागणाऱ्या हिमतीपेक्षा निम्म्याने कमी असते.
यामुळे बिचाऱ्या उंदरांचा जीव जातो आणि नवरे मंडळीला मूषक-हत्येचं पातक लागतं. मला तर असं वाटतं की, गांडुळाला जसे शेतकऱ्याचा मित्र म्हणतात, तसेच उंदराला नवरे लोकांचा मित्र म्हणायला हवे. उंदीर, पाली आणि झुरळं हे प्राणी घरात आले नसते, तर जगातील समस्त बायकांनी नवऱ्यांच्या डोक्याची मंडई करून टाकली असती!
उंदरांच्या उपद्रवाला असंख्य वेळा बळी पडलेलो असूनही मला उंदरांबद्दल थोडासा सॉफ्ट कॉर्नर असण्याचं एक विशेष कारण आहे. माझ्या प्रेयसीने मला पाठविलेल्या चिठ्ठ्या मी माळ्यावर लपवून ठेवल्या होत्या. मागील वर्षी दिवाळीची साफसफाई करताना त्या चिठ्ठ्या बायकोच्या हाती पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती; पण माळ्यावरील उंदराने त्या सगळ्या चिठ्ठ्या वेळीच कुरतडल्या असल्याने माझी संसार-नौका बुडता बुडता वाचली. याबद्दल मी समस्त मूषक-जमातीचा आजन्म कृतज्ञ आहे.
उंदीर सगळीकडेच आहेत. मी कुठेतरी असंही वाचलं की, चंद्रावर उंदीर आणि झुरळं आहेत की नाहीत याचा शोध घेणे हे नुकतंच चंद्रावर गेलेल्या चांद्रयान-३ च्या अनेक उद्दिष्टांपैकी एक आहे. असं म्हणतात की सगळ्यात खतरनाक उंदीर हे आपल्या व्यवस्थेत आहेत. व्यवस्थेत जे मेलेले उंदीर आहेत, त्यामुळे संपूर्ण व्यवस्थेलाच एक असह्य दुर्गंधी सुटली आहे.
व्यवस्थेतील जिवंत उंदरांनी, व्हिटॅमिन मिळविण्यासाठी जमेल तितकी व्यवस्था खाल्लेली आहे आणि आपल्या कॅलरिज जाळण्यासाठी व्यवस्था चारी बाजूने कुरतडली आहे, खोलवर पोखरली आहे. गमतीची बाब अशी की, व्यवस्थेतील हे उंदीर सरकारच्याच मालकीचे असून उंदीर पकडण्यासाठीचे सापळेदेखील सरकारनेच प्रायोजित केलेले आहेत. इतकं करूनही उंदीर काही पकडले जात नाहीत.
कारण सापळ्यात घुसण्यासाठी ज्या आकाराचं भोक आहे त्यापेक्षा मोठं भोक ‘आपल्या विचारांच्या’ उंदरांना सापळ्याबाहेर काढण्यासाठी ठेवलेलं आहे. सरकार एकीकडे उंदीर पकडण्याचा सापळा दाखवून जनतेला उंदरांपासून संरक्षणाची ग्वाही देते आणि दुसरीकडे उंदरांना सापळ्याबाहेर पडण्याचा रस्ताही दाखवते. अशा बिनकामी पिंजऱ्यांच्या खर्चाने देशाचा बजेटचा मोठा भाग गिळंकृत केलेला आहे.
तुम्हाला सांगतो, मागील वर्षी आमच्या हाऊसिंग सोसायटीत उंदरांनी उच्छाद मांडला होता. तेव्हा सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आवेशपूर्ण भाषण करताना आमचे सेक्रेटरी म्हणाले की, आपल्याला या उंदरांचा बंदोबस्त केलाच पाहिजे.
उंदरांची संख्या अशीच वाढत राहिली तर एक दिवस आपल्या देशात त्यांची मेजॉरिटी होईल आणि त्यांना जर मतदानाचा अधिकार मिळाला तर निवडून येऊन हे उंदीरच आपल्यावर राज्य करतील. मग या देशाचा आणि या देशाच्या सार्वभौमत्वाचा उकिरडा व्हायला वेळ लागणार नाही. सर्वांनी या भाषणावर जोरात टाळ्या वाजविल्या. मात्र कोपऱ्यात भिंतीला टेकून उभा असलेला एक बेवडा म्हणाला, ‘मग सध्या वेगळं काय सुरू आहे?’
sabypereira@gmail.com
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.