मासेपियन्स!

यंदाच्या वर्षी भारतात मासे खाण्याच्या प्रमाणात दुपटीने वाढ झाली.
Fish Food
Fish FoodSakal
Updated on

यंदाच्या वर्षी भारतात मासे खाण्याच्या प्रमाणात दुपटीने वाढ झाली. मासे खाण्याच्या जागतिक निकषाच्या दृष्टीने आपण खूपच मागे असलो तरी ज्या वेगाने आपली मत्स्यभक्षणाची क्षमता वाढत आहे त्यानुसार २०३१ पर्यंत आपण तिथपर्यंत पोहोचू, असा अंदाज आहे. काहाही असो, मासे खाणं ही एक मैफल असते. तिचा आनंद ज्याचा त्याने आपापल्या परीने घ्यावा.

नुकत्याच राष्ट्रीय आर्थिक संशोधन संस्थेने भारत सरकारच्या मत्स्य व्यवसाय विभागासाठी केलेल्या अभ्यासात असं दिसून आलं आहे, की २०२२-२३ मध्ये भारतीय कुटुंबात मासे खाण्याच्या प्रमाणात जवळजवळ दुपटीने वाढ झाली आहे. २०११-१२ मध्ये प्रतिमाह-प्रतिकुटुंब २.६६ किलो असलेले मासे खाण्याचं प्रमाण २०२२-२३ मध्ये ४.९९ किलो झालं आहे.

अस्सल मत्स्य खवय्यांच्या दृष्टीने महिन्याला घरटी पाच किलो मासे असं प्रमाण अगदीच बोंबिल-मांदेलीइतकं मामुली असलं तरी ही राष्ट्रीय सरासरी (ज्यात मासे न खाणारी कुटुंबंही धरली जातात) असल्याने मत्स्यसेवनातील ही वाढ दखलपात्र आहे. चिकन, मटन अशा इतर मांसाहारी पदार्थांचे तडाखेबंद सेवन होत असलेल्या या देशात माशांनी तरी का मागे राहावं, असा विचार करून मत्स्याहारींनी मारलेली ही मुसंडी कौतुकास पात्र आहे.

मांसाहारी अन्नाचा विचार करता, आपल्या देशात चिकन आणि मटनाच्या तुलनेत मासे खाण्याचं प्रमाण पूर्वापार बरंच कमी आहे. इतर अन्नपदार्थांच्या मानाने आपण या जलचरांना जरा पानीकम मानत आलो आहोत, असं माझं निरीक्षण आहे.

मासे खाण्याच्या जागतिक निकषाच्या दृष्टीने आपण भारतीय आज खूपच मागे असलो तरी ज्या वेगाने आपली मत्स्यभक्षणाची क्षमता वाढत आहे त्यानुसार २०३१ पर्यंत आपण दरसाल, दरतोंडी किंवा दरपोटी २१.४ किलो या जागतिक मानकापर्यंत पोहोचू, असा अंदाज आहे. पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेकडे वेगाने घोडदौड करीत असलेला आपला देश मासे खाण्याच्या बाबतीत विश्वगुरू न होता मागे राहिला तर जनतेवर आणि न खाल्ल्यामुळे जिवंत राहिलेल्या माशांवर ओंजळभर पाण्यात बुडून जीव द्यायची वेळ येईल.

राष्ट्रीय आर्थिक संशोधन संस्थेच्या मते, मासे परवडत नसणं, माशांचे आरोग्यविषयक उपयोग ठाऊक नसणं, मासळी मार्केटमधील अस्वच्छतेमुळे तिथे जावंसच न वाटणं आणि रेडी-टू-कूक किंवा रेडी-टू-इट प्रकारची मत्स्योपादनं उपलब्ध नसणं ही मत्स्याहाराला भारतात फारसा लोकाश्रय नसण्याची मुख्य कारणं आहेत.

हे जरी खरं असलं तरी लहानपणापासून आपण ऐकत असलेल्या, ‘मछली जल की रानी है, जीवन उसका पानी है, हाथ लगाओगे तो डर जाएगी और बहार निकालोगे तो मर जाएगी’ अशा प्रकारच्या गाण्यांमुळे, कमनीय बांध्याच्या तरुणींना दिल्या जाणाऱ्या मासोळीच्या उपमेमुळे आणि सुंदर डोळे असलेल्या ललनेला दिल्या जाणाऱ्या मीनाक्षीसारख्या नावांमुळे माशांच्या बाबतीत आपलं समाजमन नको तितकं हळवं करून ठेवलं आहे. मासळी खाण्याच्या बाबतीत आपल्याला हा हळव्या मनाचा काटा आडवा येतो, असंही माझं निरीक्षण आहे.

म्यानमार, व्हिएतनाम आणि जपानची जनता आपणा भारतीयांपेक्षा जास्त मासे रिचवून ढेकर देत असते. आपल्याला चायनीज चिकनचा नाद लावून, व्हेज चायनीज, जैन चायनीज अशा व्हरायटीत गुंतवून ठेवून सर्वाधिक मासे खाण्याच्या बाबतीत गेली कित्येक दशकं चीनने आपला पहिला क्रमांक अबाधित ठेवला आहे. या कारणासाठीही त्यांना एकदा ‘लाल आँखे’ दाखवणं गरजेचं आहे.

आपल्याकडे तशी मासे खाण्याची फार जुनी परंपरा नाहीये. आपल्या प्राचीन ग्रंथात देवादिकांनी माशाचा अवतार घेतल्याचं, शापग्रस्त राजकन्या जलपरी झाल्याचं, माशाने मौल्यवान हिरा गिळल्याचं, माशाने जलप्रलयात भक्तांना वाचविल्याचं असे माशांचे खूप उल्लेख आहेत. पण कुणी राजा मोहिमेवरून परतला तेव्हा त्याच्या राणीने त्याच्यासाठी बांगड्याचं कालवण केल्याचा किंवा सुरमई खरपूस तळून ठेवल्याचा उल्लेख सापडत नाही.

अमुक एखाद्या राजाचा पराभव करीत नाही तोवर मी रावस मासा खाणार नाही, असा कुणा राजाने किंवा सरदाराने संकल्प केल्याचा संदर्भ सापडत नाही. एखादा दरिद्री इसम बालपणीच्या आपल्या श्रीमंत मित्राला भेटायला जाताना सुके बोंबिल आणि सुकट घेऊन गेला अन् त्या श्रीमंत इसमाने आपल्या मित्रप्रेमाखातर लगेच त्याच्यासोबत ते बोंबिल आणि सुकट भाजून खाल्ली, असा मित्रप्रेमाचा दाखलाही इतिहासात कुठे आढळून येत नाही.

‘पाण्यात राहून माशाशी वैर करू नये’ आणि ‘मोठा मासा छोट्या माशाला खातो’ अशा माशांची भीती दाखविणाऱ्या म्हणीव्यतिरिक्त आपल्या भाषेनेदेखील माशांना फारसे जवळ केलेलं नाहीये.

असं म्हणतात, की रामायण, महाभारत काळात एखादी तरुणी लग्नाच्या वयाची झाली की तिचं स्वयंवर केलं जात असे. कुठल्याही क्षणी एखादा राजकुमार किंवा सरदारपुत्र येऊन त्या उपवर कन्येचं स्वयंवर जिंकण्यासाठी धनुष्यबाणाने आपला डोळा फोडेल या भीतीने, राजवाड्याच्या जलाशयातील मासळीवर्गात एक प्रकारचं दहशतीचं वातावरण पसरत असे.

त्यात समजा, स्वयंवर जिंकण्यासाठी येणारा उमेदवार नेमबाजीत कमजोर असेल तर डोळ्याऐवजी माशाचा जीव जाण्याचाही धोका होताच. स्वयंवर जिंकण्यासाठी राजपुत्र ज्या माशाचा डोळा फोडत असे त्याची पुढे सागुती केली जाई की त्याच्या डोळ्याची मलमपट्टी करून, काळा गॉगल घालून त्याला पुन्हा पाण्यात सोडलं जाई... याविषयी कुणी काही लिहिल्याचं माझ्या तरी वाचनात नाहीये.

शाकाहारी लोकांनी मांसाहारींना आपल्या सोसायटीत राहायला जागा नाकारण्याचे आणि मांसाहारी लोकांनी शाकाहारींना ‘हाय कम्बख्त तुने वशाट खाया ही नही!’ टाईप टोमणे मारण्याचा काळ असताना मला स्वतःवर ‘व्हेजिटेरियन’ किंवा ‘नॉन-व्हेजिटेरियन’ असा शिक्का मारून घेणं जरा धोक्याचंच वाटतं. मी जिथे जे चांगलं (आणि शक्यतो फुकट) मिळेल ते खाणारा ‘मौकाटेरियन’ माणूस आहे.

सर्व प्रकारच्या भाज्या, फळे आणि झाडे यांना जीव असतो हे विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे. मांसाहारी लोक जे काही खातात ते मासे, कोंबड्या, बकरे यांच्याकडे निदान पळून जाण्याची संधी तरी असते. जे आपला जीव वाचविण्यासाठी पळूही शकत नाही अशा भाज्या, फळे आणि झाडे यांना मारून खाणे अधिक क्रूरपणाचं आहे, असं माझं मत झालेलं आहे.

लहानपणी उन्हाळ्याच्या दिवसांत थोडंसंच पाणी उरलेल्या विहिरीत किंवा छोट्या तलावात आम्ही मासळी पकडायला जायचो. पायाने चिखल उधळत, पाणी गढूळ करीत, जोरजोराने हाकारे देत ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सवाले यावेत, तसे आम्ही तीन दिशेने चालून यायचो आणि बिथरलेले बिचारे मासे चौथ्या दिशेला मांडलेल्या खोक्याच्या सापळ्यात अलगद सापडायचे.

मग त्या पकडलेल्या मासळीचे वाटे करून आपला वाटा घरी घेऊन जाताना लढाईवरून येणाऱ्या सिकंदरासारखी भावना मनात उचंबळून येत असे. स्वतः पकडलेली मासळी खाण्यात जी मजा, चव आणि समाधान आहे ती हॉटेलात आयत्या मिळणाऱ्या माशांत नाही, हे माझ्यासारखा कोकणातील गावात वाढलेला कुणीही इसम सांगू शकेल.

मुंबई-पुण्यात चिमूटभर जवळ्याची चटणी खाऊन ‘आम्ही आज मासे खाल्ले’ म्हणणारे लोकही आहेत. जवळ्याची चटणी ही साईड डिश म्हणून माझ्याही आवडीची आहे. हे जरी खरं असलं तरी, जवळ्याला मासा म्हणणं म्हणजे जॅकी भगनानीला बलराज साहनी म्हणण्यासारखं आहे.

स्वतःची काही चवढव नसणाऱ्या आणि चौकोनी तुकड्यांच्या स्वरूपात मसाल्यामध्ये घोळवून वाढल्या जाणाऱ्या बासा नावाच्या मांसाच्या तुकड्याला मासळी का म्हणावं, असा प्रश्न मला पडतो. मोठमोठ्या तारांकित हॉटेलांत ‘फिश’च्या नावाखाली जलचरांच्या मांसाचे तुकडे दिले जातात आणि तिथले सो-कॉल्ड उच्च्भ्रू लोक काट्याने किंवा टूथ-पिकने तो तुकडा उचलून खात ‘वॉव, आय सिम्पली लव्ह फिश!’ म्हणतात.

माझ्या मनात येतं की, आपल्या शरीराच्या तुकड्याला इतक्या अपमानजनक पद्धतीने टूथ-पिकने उचलून खाल्लं जाणार आहे, असं त्या समुद्रातील माशाला आगाऊ कळलं असतं तर त्याने समुद्राबाहेर उडी मारून आत्महत्या केली असती.

जगभरात वेगवेगळ्या आकारांचे अन् वेगवेगळ्या चवींचे अक्षरशः हजारो प्रकारचे मासे खाल्ले जात असताना, मुंबईसारख्या शहरात स्वतःला सी फूड स्पेशालिस्ट म्हणवणाऱ्या हॉटेलांतदेखील रावस, पापलेट, सुरमई, बांगडा, कोळंबी आणि बोंबिल या काही ठराविक माशांव्यतिरिक्त इतर मासे आढळून येत नाहीत.

हे सगळेच मासे मी सारख्याच प्रेमाने आणि चवीने खात असलो तरी तळलेलं पापलेट आणि सुरमई यात तुला अधिक प्रिय काय? असं कुणी मला विचारलं तर मला त्यात उजवं-डावं ठरविता येत नाही. ‘साहेब, पापलेट आणू की सुरमई?’ असं जेव्हा मालवणी हॉटेलातील वेटर विचारतो तेव्हा, श्वेता तिवारी आणि पलक तिवारी एकाच वेळी समोरून येताना दिसल्यावर चाळीशीतल्या तरुणांची जी संभ्रमावस्था होईल, तशी माझी होते.

मला माशांची खूप दया येते. त्यांना काही फार दीर्घ आयुष्य लाभत नाही. जे काही तुटपुंजं आयुष्य त्यांना मिळतं तेही एकमेकांना पाण्यात पाहण्यात जातं. निसर्ग नावाच्या मोटिव्हेशनल स्पीकरने त्यांना प्रवाहाविरुद्ध पोहायचे धडे दिलेले असतात त्याबरहुकूम ते पोहत राहतात.

रहदारीच्या घोळक्यातून ट्रॅफिक हवालदाराने विना-लायसन्स दुचाकीस्वाराला पकडावं तसा एखादा गळ किंवा जाळे त्यांना उचलतो आणि मग त्यांच्या शेवटाचा प्रवास सुरू होतो. चविष्ट होऊन माणसांच्या स्वयंपाकघरात मृत्युदंडाला सामोरं जायचं की सुंदर होऊन त्यांच्या दिवाणखान्यातील काचेच्या पेटीत आजन्म कारावास भोगायचा हे दोनच पर्याय माशांसमोर असतात.

मासे खाणं ही एक मैफल असते. चांगला गायक, एखाद्या सामान्य गाण्याचंही सोनं करू शकतो आणि योग्य जागी, योग्य ती दाद देणारा कानसेनही मैफिलीची रंगत वाढवून ती सूरमयी करू शकतो. एखाद्या साध्या, स्वस्तातल्या माशाचं सुगरणीने बनविलेलं, प्रेमाच्या व्यक्तीसोबत घेतलेलं जेवण आयुष्यभराची आठवण बनू शकते. कधी कधी याउलटही होऊ शकतं. चांगली चीज चुकीच्या हाती पडून रंगाचा बेरंगही होऊ शकतो.

‘रुके क्यू बेटा... गाओ सदाशिव गाओ, और गाओ’ असं म्हणणारे खाँसाहेब असतील तर ‘कट्यार काळजात घुसली’मधील सदाशिव मन लावून अधिक झकास गातो. मासळीच्या जेवणाचंदेखील असंच आहे. ‘रुके क्यू बेटा; खाओ और खाओ’ असा आग्रह करणारे कुणी ‘खा’साहेब असतील तर पापलेट, रावस किंवा सुरमईची आणखी एक तुकडी तोंडात सरकवायला मजा तर येतेच, सोबत शासनाच्या मत्स्योत्पादन विभागाचे लक्ष्य गाठण्यास मदत केल्याने राष्ट्रभक्त म्हणून मिरवताही येते.

(लेखक सामाजिक, सांस्कृतिक जीवन-जाणिवांवर भाष्य करणारे साहित्यिक असून, त्यांची तिरकस-चौकस आणि टपालकी ही महत्त्वाची पुस्तके प्रकाशित आहेत.)

sabypereira@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.