सेमी-प्रामाणिक मुंबई

प्रामाणिकपणाच्या जागतिक स्पर्धेत उपविजेते होऊन मुंबईकरांनी आपण शंभर टक्के प्रामाणिक नसलो, तरी सेमी-प्रामाणिक आहोत, हे जगाला दाखवून दिले आहे.
Mumbai
Mumbaisakal
Updated on

प्रामाणिकपणाच्या जागतिक स्पर्धेत उपविजेते होऊन मुंबईकरांनी आपण शंभर टक्के प्रामाणिक नसलो, तरी सेमी-प्रामाणिक आहोत, हे जगाला दाखवून दिले आहे. आपलं मूल पास झाल्याच्या आनंदापेक्षा शेजाऱ्याचं मूल नापास झाल्याचा आनंद मोठा असतो म्हणून मी या यादीत पाकिस्तानातील एखाद्या शहराचं नाव आहे का, याचा शोध घेतला. ते न आढळल्याने माझा आनंद शतगुणित झाला. बाकी कशात होवो न होवो, पण प्रामाणिकपणाच्या बाबतीत आपण मुंबईकर आत्मनिर्भर झालो आहोत.

नातेवाईक किंवा मित्रपरिवारापैकी कुणी फॉरेन टूरला जाऊन आले की बरेच जण त्यांच्याकडून ‘ड्युटी फ्री’च्या उंची स्कॉचची अपेक्षा करतात. मी मात्र त्यांना, ‘‘थोडासा सिव्हिक सेन्स आणि प्रामाणिकपणा शिकून आलात का?’’ एवढीच विचारणा करायचो; पण यापुढे आपल्याला, विशेषतः मुंबईकरांना, हा प्रामाणिकपणा इतरांकडून शिकण्याची गरज नाहीये. बाकी कशात होवो न होवो, पण प्रामाणिकपणाच्या बाबतीत आपण मुंबईकर आत्मनिर्भर झालो आहोत.

झालं काय की, जगातील विविध शहरांमधील नागरिकांच्या प्रामाणिकपणाची पडताळणी करण्यासाठी, अमेरिकेतील प्रसिद्ध इंग्रजी मासिक ‘रिडर्स डायजेस्ट’ने सोळा मोठ्या शहरांमधील रस्त्यांवर पैशांनी भरलेली पाकिटे सोडून एक अनोखे सर्वेक्षण केले. यामध्ये फिनलॅण्डची राजधानी असलेल्या हेलसिंकीने जगातील पहिल्या क्रमांकाचे प्रामाणिक शहर असल्याचा बहुमान पटकावला, तर भारताची आर्थिक राजधानी असलेली आपली मुंबई जगातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रामाणिक शहर ठरले. या सर्वेक्षणामध्ये प्रत्येक शहरामध्ये वर्दळीच्या रस्त्यांवर ठिकठिकाणी पैशांनी भरलेली बारा पाकिटे ठेवण्यात आली होती.

या पाकिटामध्ये एका व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, कुटुंबाचे छायाचित्र, कूपन, व्यावसायिक कार्ड, स्थानिक चलनानुसार पन्नास डॉलर म्हणजेच ३,६०० रुपये ठेवण्यात आले होते. यानंतर कोणत्या शहरामधून किती पाकिटे परत आणून दिली जातात, याची वाट पाहण्यात आली. हेलसिंकीमधील नागरिकांनी पैसे असलेली बारापैकी अकरा पाकिटे आणि मुंबईमधील नागरिकांनी बारापैकी नऊ पाकिटे परत आणून दिली. प्रामाणिकपणाच्या जागतिक स्पर्धेत उपविजेते होऊन मुंबईकरांनी आपण शंभर टक्के प्रामाणिक नसलो, तरी सेमी-प्रामाणिक आहोत, हे जगाला दाखवून दिले आहे. याचा एक मुंबईकर म्हणून मला अभिमान आहे.

‘मरणाऱ्याने प्रामाणिकपणाची आणि नीतिमत्तेची काळजी करायची नसते. कारण तो लवकरच मरणार असतो आणि जगणाऱ्याने ती करू नये, कारण नाहीतर त्याला जगणे अशक्य होऊन जाते,’ अशी शिकवण आजूबाजूला घडणाऱ्या घटना आपल्याला देत असताना, मुंबईच्या जनसागराला प्रामाणिकपणाची भरती यावी, ही नवलाचीच बाब आहे.

केवळ कुठल्या तरी आंतरराष्ट्रीय संस्थने सांगितले म्हणून आपण त्यावर विश्वास ठेवावा, हे मला पटत नाहीये; पण माझा स्वतःचाही असा अनुभव आहे, की मुंबईत उकाड्याच्या समप्रमाणात प्रामाणिकपणाही वाढत आहे.

दोनेक महिन्यापूर्वी ऐन परीक्षेच्या हंगामात आमच्या शेजारच्या अथर्वला मी विचारले, ‘‘बाळा आजपासून तुझी परीक्षा सुरू होणार होती ना? तू परीक्षेला का नाही गेलास?’

‘काका, पेपर खूपच कठीण होता?’

‘अरे पण परीक्षेला न जाताच तुला कसे कळले की पेपर जड आहे म्हणून?’

‘काका, कालच पेपर फुटलाय. तो पाहूनच मला समजलं की, हे आपल्याला झेपणार नाही म्हणून!’

प्रामाणिकपणा निर्विवादपणे वाढू लागल्याचं दुसरं उदाहरण म्हणजे, ‘पाणीपुरी आणि शेवपुरीची चव पूर्वीसारखी लागत नाही’ अशी मी आमच्या नेहमीच्या पाणीपुरीवाल्याकडे तक्रार केली, तर तो म्हणाला, की ‘कोरोना आल्यापासून आम्ही हात धुवायला सुरुवात केली आहे!’

मुंबईकरांचा हा प्रामाणिकपणा आजूबाजूच्या शहरातही झिरपू लागला असावा, असा माझा कयास आहे. मागील रविवारी एक पुणेकर मित्र म्हणाला, ‘‘अलार्म लावून साडेतीन वाजता उठलो आणि मॅच पाहिली. धमाल आली.’’

मी उद्‌गारलो, ‘बापरे, इतक्या रात्री? कसली मॅच?’

तो म्हणाला ‘‘रात्री नाही रे, दुपारी... आयपीएल!’

नाशिकच्या आमच्या एका मिसळाभिमानी मित्राने, कुठल्याही दबावाखाली नसताना आणि पूर्ण शुद्धीत असतानादेखील ‘आमच्या नाशिकची मिसळ जगात भारी वगैरे अशी काही नाहीये. आमची टेस्ट तशी डेव्हलप झाली आहे म्हणून आम्हाला आवडते इतकंच!’ असं नुकतंच जाहीररीत्या कबूल केलंय. एकंदरीतच प्रामाणिकपणाच्या काळ्या मसाल्याने आयुष्याची मिसळ अधिक झणझणीत होऊ लागली आहे.

थोडा अधिक विचार करता, हा प्रामाणिकपणा केवळ आपल्या मुंबईतच नव्हे, तर एकंदर विश्वातच आणि चराचरात वाढू लागला आहे, असा मला दाट संशय आहे. तुम्हाला सांगतो, परवा रात्री आकाशातून तुटून पडणाऱ्या ताऱ्याकडे पाहून मी, ‘‘बाजारात आलेल्या आंब्यांपैकी ऑरगॅनिकरीत्या पिकविलेला देवगड हापूस नक्की कोणता हे ओळखण्याची मला शक्ती दे!’ असं म्हणालो तर तो तारा पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसला.

‘ज्या मुंबईत मंत्रालय आणि सगळी मोठी सरकारी कार्यालये आहेत ते शहर प्रामाणिक कसं असू शकतं?’ असा प्रश्न एखाद्या छिद्रान्वेषी व्यक्तीला पडू शकतो. या प्रश्नावर काही उत्तर देण्याऐवजी मी माझा अनुभव तुम्हाला सांगतो. एकदा मला सरकारी कामासाठी एका अधिकाऱ्याला मध्यस्थाकरवी मोठ्या रकमेची लाच द्यावी लागली होती. मी खात्री करण्यासाठी त्या मध्यस्थाला विचारले की, ‘बाबा रे, हे साहेब माझं काम नक्की करतील ना?’ यावर तो मध्यस्थ म्हणाला की, ‘प्रामाणिकपणाबद्दल या साहेबांचं संपूर्ण डिपार्टमेंटमध्ये नाव आहे. त्यांनी एकदा पैसे घेतले की ते काम कितीही बेकायदेशीर असलं तरी करणार म्हणजे करणारच!’

दुसरं उदाहरण एका मोठ्या सरकारी अधिकाऱ्याचं आहे. मध्यंतरी इन्कम टॅक्सवाल्यांनी त्याच्या घरी, गावी, ऑफिसात, रिसॉर्टवर छापा मारून त्याची जवळजवळ पाचशे कोटींची संपत्ती जप्त केली. तेव्हा तो सात्विक संतापाने म्हणाला, ‘‘मी अप्रामाणिकपणे वागून हजारो कोटीची संपत्ती जमवू शकलो असतो, पण मी केवळ पाचशे कोटींचीच संपत्ती जमविली. माझ्या या पन्नास टक्के प्रामाणिकपणाचं कुणाला काही कौतुकच नाही!’’ मी म्हणतो, अशा व्यक्तीला तुम्हाला प्रामाणिक म्हणायचं नसेल तर नका म्हणू, निदान सेमी-प्रामाणिक तरी म्हणायला काय हरकत आहे?

आमच्या शेजारी पूर्वी एक आयएएस ऑफिसर राहायचे. ते खूप प्रामाणिक आहेत, असं त्यांचं स्वतःचं म्हणणं होतं; पण त्यांच्या प्रामाणिक असण्याची बाब फारशी कुणाला ठाऊक नव्हती आणि ज्यांना त्यांनी सांगितली त्यांचाही त्यावर विश्वास बसत नव्हता. माझ्याव्यतिरिक्त इतर कुणी त्यांचा प्रामाणिकपणा मानून घ्यायलाही तयार नव्हते. शेवटी ‘आपण प्रामाणिक आहोत’ हे लोकांना पटवून देण्यासाठी त्यांनी एक प्रामाणिक एजंट नेमला; पण काही दिवसांतच त्या दोघांचं बिनसलं. ऑफिसरचं म्हणणं होतं की, ‘एजंट बेईमान आहे तो आकडे फुगवून सांगतो’ आणि एजंटचं म्हणणं असं की ‘ऑफिसर अप्रामाणिक आहे. तो ठरल्याप्रमाणे प्रतिव्यक्ती चाळीस पैसे देत नाहीये.’ सांगायचा मुद्दा हा की, इथे एखादी व्यक्ती दुसऱ्याच्या नजरेतून अप्रामाणिक असेलही; पण प्रत्येक जण सेल्फ-सर्टिफाईड प्रामाणिक आहे.

सर्वसाधारणपणे गरिबांकडे जपण्यासारखं आणखी काही नसतं म्हणून ते प्रामाणिकपणा जपतात. लोकदेखील श्रीमंतांपेक्षा गरिबांकडून प्रामाणिकपणाची जास्त अपेक्षा ठेवतात. आम्ही शाळेत असताना, शिक्षकाचे पैसे चोरताना एका गरीब मुलाला शिक्षकांनी रंगेहात पकडले होते. शिक्षक त्याला म्हणाले, ‘अरे तुझा बाप इतका प्रामाणिक असून तू असा चोर कसा निपजलास?’ यावर त्या पोराने बाणेदारपणे दिलेलं उत्तर माझ्या आजही लक्षात आहे. तो पोरगा म्हणाला होता, ‘आपल्या बापाकडून वारसा म्हणून काहीच घ्यायचं नाही, हाच आमच्या घराण्याचा वारसा आहे!’

मुंबईकरांनी पैशाची बारापैकी नऊच पाकिटे परत केली यावरून मुंबईच्या प्रामाणिकपणाची टक्केवारी ७५ टक्के भरते. ही टक्केवारी वाढविण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणे गरजेचे आहे.

मला प्रश्न पडतो... प्रामाणिक लाकूडतोड्याची गोष्ट आपण लहानपणी ऐकलेली असते. प्रामाणिकपणाचे फायदे आपल्याला ठाऊक असतात; तरीही आपण अप्रामाणिकपणे का वागतो? ‘‘स्वस्त्रीशी आपण चांगले वागलो, तर देव प्रसन्न होऊन आपल्याला कदाचित परस्त्रीही बहाल करेल, असा सकारात्मक विचार आपण का करीत नाही?

मुंबईला प्रामाणिकपणाचे बक्षीस मिळाल्यामुळे मुंबईकरांचा आनंद वेस्टर्न, सेंट्रल, हार्बर भरून वाहत असताना आमच्या शेजारचे पोंक्षेकाका मात्र नाराज दिसले. ते म्हणाले, ‘‘अरे शिंच्यांनो, प्रामाणिकपणाच्या नंबरात आलात म्हणून डीजे लावून नाचायची गरज नाही! प्रामाणिकपणा किंवा इमानदारी हा अतिशय गंभीर रोग आहे.

प्रामाणिकपणाचा प्रादुर्भाव झालेल्या लोकांमुळे देशाचा जीडीपी खालावण्याचा धोका निर्माण झाला असून, एखाद दुसऱ्या प्रामाणिक माणसामुळे एखाद्या सरकारी कार्यालयाच्या एकंदरीत कार्यक्षमतेवर प्रचंड विपरीत परिणाम होत असल्याचेही नासाने केलेल्या सर्वेक्षणात सिद्ध झालेले आहे. या रोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिओ, गोवर, कोरोनासारखी एखादी लस टोचण्याची गरज आहे. दुसरं असं की, इमानदार लोक अल्पसंख्य आहेत आणि सगळे राजकीय पक्ष या अल्पसंख्याकांचे लांगुनचालन करण्यात धन्यता मानतात. बहुसंख्य अप्रामाणिक जनतेच्या दृष्टीने ही अधिक गंभीर बाब आहे.

खरं सांगतो, प्रामाणिकपणाकडे एक रोग या दृष्टीने मी आजवर कधी पाहिलंच नव्हतं. मी जसजसा विचार करू लागलो तसतशी मला या रोगाची अधिकाधिक ओळख पटू लागली. माझ्या लक्षात आलं की, लहानपणी आपल्याला ज्या गोष्टी सांगितल्या जायच्या त्या गोष्टीतले मास्तर, आई आणि ब्राह्मण या जमातींना प्रामाणिकपणाच्या रोगाची लागण जन्मापासून, अनुवंशिकतेनेच झालेली असायची आणि त्यामुळे ते कायमस्वरूपी गरीब असायचे.

आजूबाजूच्या प्रामाणिकपणाच्या रोग्यांकडे सजगपणे पाहिल्यावर माझ्या लक्षात आले की, या रोगाच्या प्राथमिक अवस्थेत तो रोगी केवळ चारचौघात प्रामाणिकपणाबद्दल बोलत सुटतो. रोग जरासा बळावला की, तो रोगी प्रामाणिकपणाने वागून स्वतःचं आणि इतरांचंही भौतिक नुकसान करू लागतो. रोगाच्या तिसऱ्या अवस्थेत मात्र हा रोगी सुपर-स्प्रेडर बनतो आणि आपल्यासारखेच संपूर्ण जगाने प्रामाणिक बनावे म्हणून भाषणं, जनजागरण आणि चळवळी करू लागतो. अशा व्यक्तीला प्रभात फेरीवेळी एकटे गाठून, या अप्रामाणिक जगातून मुक्ती देणारे पुण्यात्मे आपल्या समाजात अजून शिल्लक आहेत ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे.

मी पोंक्षेकाकांना म्हटलं की, ‘प्रामाणिकपणाचा हा रोग माणसाच्या डीएनएमध्ये असतो. तो संसर्गजन्य नाही. हजारातील एखाद्यालाच हा रोग संसर्गाने होऊ शकतो. त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही.’ यावर ते म्हणाले, ‘सातत्याने एखाद्या प्रामाणिक माणसाच्या संगतीत राहून आपल्यालाही तो रोग होण्याची एक हजारांश शक्यता तरी आहे ना. मग उगीच रिस्क का घ्या?’

सामान्यपणे आपल्याला झालेला रोग दडविण्याकडे लोकांचा कल असतो; मात्र प्रामाणिकपणाच्या रोगाच्या बाबतीत हे अगदी उलट आहे. ग्रामपंचायत सदस्यापासून ते देशाच्या सर्वोच्च नेत्यापर्यंत व्हाया सरकारी अधिकारी सर्वच जण आपल्याला हा रोग झाला असल्याची बतावणी करीत असतात. मध्यंतरी तर काही पोलिस अधिकाऱ्यांनी पुस्तके-बिस्तके लिहून आपल्याला हा रोग झाल्याची कबुली दिली होती. त्यामुळे प्रामाणिकपणाची बाधा झालेले खरे रोगी कोणते आणि खोटे रोगी कोणते हे ओळखणे जिकिरीचे झाले आहे. एकदा का ही ओळख पटली की मग त्यांवर इलाज करणे तसे सोपे आहे. तूर्तास देशभरातील प्रामाणिकपणाचे खरे आणि खोटे रोगी ओळखण्यासाठी एक एजन्सी नेमायचा माझा विचार आहे. तुमच्या माहितीत अशी एखादी, मला हवा तसा निष्कर्ष काढून देणारी, प्रामाणिक एजन्सी असेल तर मला कळवा.

मुंबईला प्रामाणिकपणाचा पुरस्कार मिळाल्याची बातमी आली त्या दिवशी मी ऑफिसातून घरी जाताना पेढे घेऊन गेलो. माझ्याकडील पेढा न घेता आमचे दादा म्हणाले, ‘‘ज्या दिवशी डोनेशनशिवाय शाळा प्रवेश देऊ लागतील, ट्रॅफिक पोलिस चिरीमिरीऐवजी पावती फाडतील, सरकारी बाबूंच्या टेबलावरील फाईल पुढे सरकावण्यासाठी पेपरवेट ठेवावा लागणार नाही, खासगी नोकरदार इन्कम टॅक्स वाचविण्यासाठी खोटी बिलं दाखवणार नाहीत, व्यापारी लोक इमानदारीत आयकर भरतील, प्रकाशक लोक लेखकांना पुस्तकाच्या खपाचा खरा आकडा सांगून योग्य ते मानधन देतील, सामान्य लोक पुस्तकांच्या अन्‌ सिनेमाच्या पायरेटेड कॉपी फॉरवर्ड करणार नाहीत, विना-अनुदानित शाळांतील शिक्षकांना कागदोपत्री दाखवतात तितका पगार मिळेल, सोशल मीडियावर बायका फिल्टर न लावता फोटो टाकतील, देवदर्शनासाठी वशिले लावावे लागणार नाहीत अन्‌ देवाची कृपा व्हावी म्हणून त्याला नैवेद्य दाखवावा लागणार नाही, त्या दिवशी घेऊन ये माझ्यासाठी मिठाई. तोपर्यंत तुझा सेमी-प्रामाणिक पुरस्कार तुलाच मुबारक!'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.