सरत्या उन्हाळ्यात मुंबईतील उकाडा अनुभवल्यावर, पृथ्वी खरोखर सूर्याभोवती फिरते की सूर्य फक्त मुंबईभोवती फिरतो अशी शंका येऊन गेली. याचा सर्वाधिक त्रास मुंबईकरांना लोकलच्या गर्दीमध्ये उभे असताना झाला. अशा गर्दीत आणि गर्मीतही आपल्या मोबाईलवर जोरजोरात झिंगाट गाणी वाजवीत मजेने लोकल प्रवास करणाऱ्या तरुणावर संतापून परवा एक काका म्हणाले, ‘पोट्टेहो, तुम्ही याड लावलं ऐवजी झाड लावलं असतं तर आज पाऊस झिंग झिंग झिंगाट पडला असता!’ कधी वेळेवर तर कधी थोडी वाट पाहायला लावून एकदाचा मान्सूनचा पाऊस अंदमान, केरळमार्गे मुंबईत आल्याचा फक्त भास झाला आहे. त्यानिमित्त...
लहानपणी उन्हाळ्यात आपण आख्खा गाव पायी फिरायचो; पण जेव्हापासून डिग्री आणि सेल्सियस कळायला लागले तेव्हापासून आपल्याला उन्हाचा प्रचंड त्रास होऊ लागला आहे. मुंबईच्या उन्हाळ्यात तर दमट हवामानामुळे घामाने अक्षरशः अंघोळ घडत असते. ‘आपण तोंडाने स्स-स्स-स्स असा आवाज केला की आपल्या परिसराचं तापमान सुमारे सव्वादोन ते अडीच अंशाने कमी होते’ या शास्त्रीय शोधाचं पेटंट भारताकडे असल्याने आपण तोही प्रयोग करून पाहतो.
पण सभोवतालची गर्मी आणि अंगाची तलखी काही केल्या सुसह्य होत नाही. माझा काही खगोलशास्त्राचा अभ्यास नाही, पण मुंबईचा उकाडा अनुभवल्यावर, पृथ्वी खरोखर सूर्याभोवती फिरते की सूर्य फक्त मुंबईभोवती फिरतो अशी मला शंका येते. माझ्या मते, उन्हाळ्याच्या दिवसांबद्दल एकमेव चांगली गोष्ट आहे ती म्हणजे या दिवसांत पाय पसरताना आपले अंथरूण किंवा पांघरूण किती मोठे आहे, याची चिंता करावी लागत नाही.
या उन्हाळ्याचा सगळ्यात जास्त त्रास मुंबईकरांना कधी होत असेल तर तो लोकल ट्रेनच्या गर्दीमध्ये उभे असताना... आपल्या घामाचे ओघळ शरीरावरील नको त्या ठिकाणी उतरतात तेव्हा, आपल्याला खेटून उभ्या असलेल्या सहप्रवाशाच्या घामेजल्या शरीराचा स्पर्श आपल्याला होतो तेव्हा आणि इतरांच्या काखा-बगलेचा उग्र गंध सहन करीत प्रवास करावा लागतो तेव्हा! अशा वेळी उपनगरांपासून मुंबईपर्यंतचा लोकलमधील प्रवास हा हिंदीतली ‘सफर’ न राहता इंग्रजीतील Suffering होऊन जाते. अशा गर्दीत आणि गर्मीतही आपल्या मोबाईलवर जोरजोरात झिंगाट गाणी वाजवीत मजेने लोकल प्रवास करणाऱ्या तरुणावर संतापून परवा एक काका म्हणाले, ‘पोट्टेहो, तुम्ही याड लावलं ऐवजी झाड लावलं असतं तर आज पाऊस झिंग झिंग झिंगाट पडला असता!’
लहानपणी आपण, ‘सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल का?’ हे गाणं सामूहिकरीत्या गात भोलानाथकडे इन्क्वायरी करायचो. परवा मी स्वप्नात भोलानाथला हाच सवाल केला, तर तो आपल्यावरील जबाबदारी झटकत बेफिकीरीने म्हणाला, ‘मी तो जॉब सोडला आहे. माझ्या जागी त्या अलेक्सा आणि सिरी आलेल्या आहेत, त्यांनाच विचारा.’ भोलानाथसारख्या संस्कारी इसमाकडून, राऊतांनी भुवया उडवाव्या तशा उडवाउडवीच्या उत्तराची अपेक्षा निदान मला तरी नव्हती. असो.
आपली वेधशाळा, हवामान खाते आणि त्यांनी वर्तविलेले अंदाज हा नेहमीच जनतेच्या थट्टेचा विषय झाला आहे. स्कायमेट या खाजगी पोर्टलनेही अजून तरी काही विश्वासहार्य कामगिरी केल्याचे ऐकिवात नाही. मागील वर्षी सतत चार दिवस मुंबईत मुसळधार पाऊस पडत होता. शेवटी चौथ्या दिवशी संध्याकाळी हवामान खात्याने, पुढील पाच दिवस अतिवृष्टी होईल, असा इशारा दिला तेव्हा कुठे, लगेच दुसऱ्या दिवशी कडकडीत ऊन पडलं.
आमचे आबा तर संतापाने म्हणतात, ‘सीएम सायबांना सांगून वेधशाळेतील अधिकाऱ्यांचा पगार, त्यांनी वर्तविलेल्या हवामान अंदाजाशी लिंक करायला हवा. विरोधी पक्षांनी केलेलं सरकार पडण्याचं भाकीत आणि वेधशाळेने केलेलं पाऊस पडण्याचं भाकीत यावर माझा अजिबात विश्वास नाही.’’ मुंबई बाहेर काढलेल्या माझ्या चाळीस वर्षांच्या अनुभवावरून तुम्हाला सांगतो, पावसाच्या आगमनाबाबतीत ज्यावर डोळे झाकून विश्वास ठेवता येईल, अशी एकमेव शासकीय संस्था म्हणजे एमएसईबी... मान्सून सुरू इलेक्ट्रीसिटी बंद!
मागील रविवारची गोष्ट, सकाळपासूनच बाहेर वातावरण कुंद होतं. कुठल्याही क्षणी पाऊस सुरू होण्याची शक्यता दिसत होती. खबरदारीचा उपाय म्हणून मी टेरेसवरील वाळवणं घरात आणली, पावसाची झड येईल अशा खिडक्या-दारे बंद केली आणि पावसाळी कवितांच्या भीतीने सोशल मीडियावरील सर्व कविलोकांना ब्लॉक करून टाकले! म्हटलं, अजिबात रिस्क नको! थेंबभर पाऊस पडला की कुत्र्याच्या छत्र्या उगवाव्यात तशा या कविलोकांना लगेच कविता कशा सुचतात याचं (मी स्वतः एक बारका बारका कवी असूनदेखील) मला आश्चर्य वाटतं. मला अशा पावसा-बिवसावर कविता करता येत नाहीत. मी नव्वदोत्तरी कवी आहे. नव्वद मिलीलिटर सोनेरी द्रव्य पोटात गेल्याशिवाय मला कविता सुचत नाही.
कधी वेळेवर तर कधी थोडी वाट पाहायला लावून एकदाचा मान्सूनचा पाऊस अंदमान, केरळमार्गे मुंबईत येतो. सगळीकडे सुखद गारवा पसरतो. गर्मी आणि गुर्मी वातावरणाची असो, पैशांची असो की सत्तेची, ती फार काळ टिकत नाही हे पाऊस पुन्हा एकदा अधोरेखित करतो. उन्हाळ्याने कोमेजलेली मुंबई अंगावरील धूर, धूळ, घाम झटकून ताजीतवानी दिसू लागते. कुस्तीचा फड लागल्यावर पहिलवानाला आणि तमाशाचा फड लागल्यावर ‘बाईल’वानाला जो आनंद होईल, त्याच दर्जाचा आनंद मुंबईकरांच्या मनाला होतो.
पावसाळा हा माझ्या मनाला प्रफुल्लित करणारा आणि मला आवडणारा ऋतू असला तरी या आवडीला माझं शरीर हवी तशी साथ देत नाही. हवामानात थोडासा जरी बदल झाला तरी मला लगेच सर्दी-खोकला होतो. हवामानाच्या बाबतीत मी टाटा-स्कायपेक्षा अधिक संवेदनशील माणूस आहे! आकाशात दोन-चार काळे ढग एकत्र आलेले दिसले की टाटा-स्कायप्रमाणेच माझ्या प्रकृतीचे सिग्नलही वीक होतात. माझ्या माहितीत काही लोक असे आहेत की ज्यांना पावसाळा आवडत नाही. मला जसं पावसाळा आवडण्याचं ठोस कारण सांगता येत नाही, तसंच त्यांनाही पावसाळा न आवडण्याचं ठोस कारण सांगता येत नाही. मला असं वाटतं की, एखाद्या संगीत मैफलीत किंवा गझल मुशायऱ्यात, समोर कोण गातंय यापेक्षा आपण ते गाणं कुणाबरोबर ऐकतो आहोत, यालाच अधिक महत्त्व असतं. तसंच पाऊस कसा पडतो यापेक्षा तो आपण कोणासोबत अनुभवतो यावर आपल्याला पावसाच्या आवडण्याचे प्रमाण अवलंबून असते.
आजकाल लोक आपापल्या मोबाईलवर दिवसभर कसले ना कसले फोटो, सेल्फ्या काढत असतात, रील बनवत असतात, फेसबुक लाईव्ह करीत असतात... शोक असो वा षौक सगळं आपल्या कॅमेऱ्यात टिपलंच पाहिजे असा जणू या जनरेशनचा दंडकच आहे. हे सगळं मला आवडत नाही की जमत नाही हे मला अजून ठरवता आलेलं नाहीये. खूपदा वाटतं की आपणही इतरांसारखं पडत्या पावसात नाचावं आणि आपल्या डान्सचं रील बनवावं, पण ‘नाचता येईना मोबाईल चायनीज’ असं झाल्यामुळे तेही राहून जातं. मागील वर्षी तुंगारेश्वरच्या धबधब्यासमोर उभं राहून, वीस-पंचवीस वेगवेगळ्या कोनातून सेल्फी घेतल्यानंतर मी मनोमन ठरवलं की ‘मनाचं सौंदर्य हेच खरं सौंदर्य!’
पाऊस पडला की नाक्या-नाक्यावर चहा आणि कांदाभजीच्या गाड्या उगवतात. जुहू, गिरगाव, मरिन लाईन्सचे समुद्र किनारे पुन्हा गजबजू लागतात. नद्या-नाले-झरे वाहू लागतात. धबधबे कोसळू लागतात. पिकनिकचे बेत ठरू लागतात. ओल्या पार्ट्या रंगू लागतात. झाडांना हिरवीगार पालवी येते. रोपं उगवतात. बियांना कोंब येतात. पावसाळा दूर असतो तोवर मला तो हवाहवासा वाटतो. पण पाऊस पडला की सगळ्यात आधी माझ्या आत खोलवर एकटेपण उगवतं! डोळ्यातला पाऊस देहात विरघळतो. स्वप्नांचा चिखल होतो. त्यात काही रुजत नाही, त्यातून काहीही उगवत नाही... एकटेपणा व्यतिरिक्त!
आज सकाळची गोष्ट. छटाकभर पावसाने मुंबईची तुंबई झाली असल्याने मोबाईलमधला गुगलमॅप माझ्या घरापासून ऑफिसपर्यंतचं अंतर नॉटीकल मैलमध्ये दाखवित होता. बायकोही म्हणाली, ‘‘वातावरण छान आहे. आज ऑफिसला जाऊ नका.’’ सुट्टी मागण्याआधी वातावरण निर्मिती करण्यासाठी मी गुगलमॅपचा तो स्क्रिनशॉट माझ्या बॉसला पाठवला. माझी अतोनात काळजी करणाऱ्या बॉसने मला लागलीच उत्तर दिलं, ‘‘खूप पाऊस आहे, काळजी घे. जर नोकरीची गरज असेल तरच कामावर ये.’’ शेवटी, माझ्या रोमँटिकपणावर कर्जाच्या ईएमआयने मात केली आणि मी ऑफिसला गेलो.
पावसाळ्याचा विषय निघाला की छत्रीचा विषय साहजिकच येतो. हल्ली सगळा चायनीजचा जमाना आलाय. एकतर आता पूर्वीसारख्या चांगल्या क्वालिटीच्या छत्र्या मिळत नाहीत आणि त्यात भर म्हणजे आताच्या पोरांना कुठलीही वस्तू जपून वापरता येत नाही. आमच्या वेळी असं नव्हतं. इयत्ता पाचवी ते दहावी ही सलग पाच वर्षे मी एकाच छत्रीने काढली. (माझं गणित उत्तम आहे, बहुधा तुमचं माझ्याबद्दलंच जनरल नॉलेज कच्चं असावं !) दोनदा बदलावा लागलेला छत्रीचा कपडा, एकदा बदललेला दांडा आणि अधून-मधून बदलाव्या लागलेल्या तारा एवढं सोडलं तर पाचव्या वर्षाअखेरही छत्री अगदी नव्यासारखी होती!
एकेक पावसाळ्यात तीनतीनदा छत्री मोडत किंवा हरवत असल्याने बायकोचा ओरडा खाण्यापेक्षा सध्या मी छत्री वापरणे सोडूनच दिलंय. तसंही मुंबईच्या धुवांधार वाऱ्या-पावसात छत्री असण्या-नसण्याने फारसा फरक पडत नाही. मुंबईच्या मुसळधार पावसात आपल्याला छत्रीचा उपयोग, उर्फी जावेदला तिच्या कपड्याचा उपयोग लज्जा रक्षणासाठी जितका होत असेल तितकाच होतो.
पाऊस सगळीकडे सारखाच पडतो, पण जमिनीवर येता येता तो जिथे पडतो त्या त्या जागेचा स्वभाव उचलतो. मुंबईतल्या मुंबईतही, पडणाऱ्या पावसाच्या वेगवेगळ्या तऱ्हा आहेत. कुलाबा-नरिमन पॉईंटचा पाऊस, गॅलरीतील कुंडीतील रोपांना हळुवार पाणी घालणाऱ्या बड्या सरकारी अधिकाऱ्याच्या बायकोसारखा आपले स्वच्छ पांढरे ब्रँडेड कपडे जपत हळुवार बरसतो. गिरगावचा पाऊस जुन्या आठवणींचे कढ काढत मुळूमुळू पडत राहतो.
लालबाग-परळचा पाऊस वाऱ्या-वादळासकट येऊन झाडं-झुडपं गदागदा हलवत पालापाचोळ्याचा सडा घालतो. शिवाजी पार्कला ज्या प्रमाणात ढगांचा गडगडाट होतो, विजा चमकतात त्या प्रमाणात पाऊस पडत नाही. वांद्र्यापासून जुहूपर्यंत पडणारा पाऊस, कुणीतरी सेलेब्रिटी ललना येईल आणि शिफॉनची पारदर्शक साडी नेसून ‘टिप टिप बरसा पानी’ किंवा ‘काटे नही कटते’सारख्या गाण्यावर नाच करेल, या अपेक्षेने समरसून पडतो. पार्ल्याचा पाऊस ‘आता पूर्वीसारखे काही राहिले नाही’ म्हणत सतत रिपरिपत असतो.
अंधेरीच्या विघ्नसंतोषी पावसाला, पार्ल्याच्या मिलन सबवेत पाणी तुंबविल्याशिवाय चैन पडत नाही. सांताक्रूझला पाऊस अलगद लँड होतो अन् लगेच टेकऑफ घेतो. घाटकोपर-मुलुंड आणि मालाड-कांदिवलीच्या पावसात ‘मी आहे म्हणून तुम्ही आहात’ हे दर्शविणारा एक प्रकारचा माज आणि अरेरावीचा भाव असतो. ठाण्याचा पाऊस स्वतःला इतरत्रच्या पावसापेक्षा उच्च सांस्कृतिक अभिरुचीचा समजतो. नवी मुंबईचा पाऊस आपण नक्की मुंबईचे की अलिबाग-रायगडचे या भ्रमात वाऱ्यासोबत इकडून तिकडे आणि तिकडून इकडे भिरभिरत असतो. मिरा रोडचा पाऊस जुहू-लोखंडवालाची नक्कल करून शान मारू पाहतो.
पण त्याच्या पायातल्या ‘पर-डे’च्या बेड्या त्याला तसं करू देत नाहीत. नाक्यावर रेंगाळणारी पोरं, कुणाच्याही वरातीत बेफान होऊन नाचावीत तसा बेभान पाऊस वसई-विरार, कल्याण-डोंबिवलीला पडतो. मुंबईच्या पावसात असा विभागवार थोडाफार फरक असला तरी सर्वसाधारणपणे, मुंबईचा पाऊस हा ‘धडकन’ सिनेमातील सुनील शेट्टीसारखा असतो. एकदा का पावसाळा सुरू झाला की तो रोज नित्यनेमाने हजेरी लावून आपल्याला बजावून जातो की ‘मैं तुम्हे भूल जाऊं ये हो नहीं सकता और तुम मुझे भूल जाओ ये मैं हौने नहीं दूगां।’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.