कृतिशील शिक्षणाचे पुरस्कर्ते : आचार्य विनोबा भावे

Vinoba Bhave
Vinoba Bhaveesakal
Updated on

जर तुम्हाला तुमची जमीन कोणी दान करायला सांगितली तर कराल का? मग तो किंवा ती कितीही मोठी प्रतिष्ठित व्यक्ती असो... तुम्ही एकतर देणार नाही किंवा त्यात तुमचा फायदा शोधाल किंवा ज्याला दान देणार त्याच्या संस्थेला निदान तुमचं दान द्यायला सांगाल, पण जगात एक अशी व्यक्ती होऊन गेली, की जिने चाळीस लाख एकरपेक्षा अधिक जमीन श्रीमंतांकडून घेऊन गरीब आणि गरजूंना, शेतकऱ्यांना मोफत वाटली. या चळवळीला नाव होतं ‘भूदान चळवळ’.

जगात एवढ्या प्रमाणात दान मागून वाटलेल्या जमिनीचा विक्रम एका व्यक्तीच्या नावावर आहे आणि ती व्यक्ती म्हणजे भारतीय आध्यात्मिक विचारवंत, तत्त्वज्ञानी आचार्य विनोबा भावे. जमीनदारांना आचार्य म्हणायचे, की तुम्ही तीन भाऊ असाल, तर चौथा भाऊ मला समजा आणि माझ्या वाटणीचा जमिनीचा हिस्सा मला द्या. त्या वेळेस दान देणारी व्यक्ती विनोबांच्या नावे जमीन करून देत असे आणि विनोबा गरजू शेतकऱ्यांना जमीन त्यांच्या नावे करून द्यायचे. हे फक्त व्हायचं विनोबांच्या भावनिक बुद्धिमत्तेच्या जोरावर. त्यांचा भारतीय संस्कृती आणि वेद, भगवद्‍गीता यांचा सखोल अभ्यास होता.


त्यांना आपल्या सर्वांसाठी भारतीय विचारसरणीची शिक्षणपद्धती आणायची होती. जिच्यात भावनिक बुद्धिमत्तेला प्रथम स्थान असलं पाहिजे, असं त्यांना वाटायचं. त्यांची इच्छा होती, की १५ ऑगस्ट १९४७ ला जसा झेंडा बदलला त्याचवेळी शिक्षणसुद्धा बदललं पाहिजे. त्या वेळी तसं घडलं नाही आणि त्याचे परिणाम आपण आजपर्यंत भोगतोय. इंग्रजांची ‘घोका आणि ओका’ शिक्षणपद्धती अजूनही आपण कमी-अधिक प्रमाणात अवलंबतो आहोत. डब्ल्यू. ई.एफ. म्हणते, की आय.क्यू.बरोबर शिक्षणात ई.क्यु.ला महत्त्व देण्याची गरज आहे; हेच विनोबा सांगत.

आचार्य विनोबा म्हणायचे, की शिक्षण हे दानकार्य आहे. ज्यामध्ये अहंकाराला अजिबात स्थान नको. विद्यार्थ्यांना शिकवणारा शिक्षक नम्र हवा आणि विद्यार्थीसुद्धा नम्र हवा. जेव्हा दोघंही नम्र असतात तेव्हा शिकण्या-शिकवण्याची प्रक्रिया चालू होते. शिक्षण-विद्यार्थ्यांनी एकाच वेळी देवाला प्रार्थना करायची ‘तेजस्वी नावधीतमस्तु’, याचा अर्थ आमच्या दोघांचं शिक्षण तेजस्वी बनो. ते पुढे म्हणतात, या प्रार्थनेत शिक्षक हे ‘मी तुला शिकवतोय’ असं म्हणत नाहीत. ‘आपण दोघंही शिकत आहोत’, असं म्हणतात. आजचा ज्ञानरचनावाद हेच सांगतो, की टीचर्स हे फॅसिलेटर्स आहेत. शिक्षकाने शिकवायचं नाही, विद्यार्थ्यांबरोबर एक्स्प्लोर करायचं. तेजस्वी नावधीतमस्तुसारखे.

Vinoba Bhave
दुनियादारी : एक देव असा पण...

विनोबांचा आग्रह होता, की शिक्षणामध्ये परिश्रमाला विशेष महत्त्व असलं पाहिजे. परिश्रमाच्या अवतीभवती शिक्षण असलं पाहिजे. खासकरून लहान विद्यार्थ्यांच्या बाबतीत ते खूप आग्रही होते. हा मुद्दा आजच्या शिक्षणपद्धतीत असणं आवश्यक आहे. आजकालच्या मुलांना शारीरिक श्रमच घ्यावे लागत नाहीत. चाइल्ड ओबेसिटीचं प्रमाण वाढलं आहे. विनोबा म्हणायचे, मुलांना शारीरिक कामं करायला द्यावीत. इथे शारीरिक कामं आणि मैदानी खेळ यांत फरक आहे. आजचं विज्ञान सांगतं, की पहिल्या सहा ते आठ वर्षांत मुलं जेवढे पाच इंद्रियांचे अनुभव घेतील तेवढी मेंदूची उत्तम जडणघडण होईल. हेच सगळं विनोबा भारतीय अध्यात्माच्या आधारे समजावून सांगायचे.

विनोबांनी ‘शिक्षा के मूलभूत तत्त्व’ या नावाने पुस्तक लिहिलं. त्यामध्ये ते लिहितात, की शिक्षण त्रिसूत्रीयुक्त असलं पाहिजे. शिक्षणामध्ये तीन गोष्टी हव्या. एक योग, दुसरा उद्योग आणि तिसरा सहयोग.

ते म्हणतात, योगाचा अर्थ केवळ आसन करणं, व्यायाम करणं असा नसून, आपल्या मनावर नियंत्रण करायला शिकणं हा आहे. सध्या
बऱ्याच शाळांमध्ये योग शिकवले जातात; पण मनावर नियंत्रण करायला विद्यार्थ्यांना शिकवत नाहीत. ‘अतिरिक्त स्क्रीन टाइम’च्या या युगात मनावर नियंत्रण आणायला शिकवणं ही काळाची गरज आहे. त्यासाठी मेडिटेशन-ध्यान हा उत्तम उपाय असल्याचं विनोबांनी कधीच सांगून ठेवलं आहे.

esakal

शिक्षणामध्ये दुसरा महत्त्वाचा विषय ते सुचवतात उद्योग. विद्यार्थ्यांमधल्या गुणांचा विकास करायचा असेल, तर अभ्यासाबरोबर काही उद्योग विद्यार्थ्यांना करायला देणं गरजेचं आहे. प्रॅक्टिकल ट्रेनिंग्जवर भर द्यायचे. अनुभवातून शिक्षणाला ते खरं शिक्षण समजायचे. उद्योग म्हणजे फक्त चरखा चालवायला देणं नाही, असा त्यांचा विचार होता. त्यांच्या मते आधुनिक यंत्र, वर्कशॉप हे प्रत्यक्ष चालवणायचा अनुभव विद्यार्थ्यांना देणं. ते म्हणायचे, ‘श्याम’ हा हिंदुस्थानचा वर्ण आहे. आपण सगळे ‘श्यामवर्ण’ आहोत. भगवान कृष्णाचा वर्ण ‘श्याम’ होता. म्हणून ‘श्यामसुंदर’ वर्ण भारतात प्रचलित आहे. ‘कृष्ण’ या शब्दाचा अर्थ होतो ‘शेती करणारा... शेतकरी’. जो शेती करतो त्याच्या शरीराचा रंग जो आहे, तो वर्ण कृष्णाचा आहे. म्हणून आपली शिक्षणव्यवस्था अशी हवी, की विद्यार्थ्यांचा शाळेपासून शेतीशीही संबंध हवा. शाळेला लागून दोन-तीन एकर शेती हवी, इथे विद्यार्थी एकत्रित शेती करतील. हे समजावताना ते पंडित नेहरूंचं वाक्य सांगतात. नेहरू इंग्रजीमध्ये म्हणतात ‘नेशन्स डिके व्हेन दे लूज कॉन्टॅक्ट विथ नेचर’ राष्ट्र जेव्हा निसर्गाशी असलेल्या नात्यापासून, त्याच्या स्पर्शापासून दूर जातं तेव्हा ते क्षीण बनतं. म्हणून विनोबा म्हणतात, शेती ही शाळेपासून शिकवली तर विद्यार्थी नेहमी निसर्गाशी संपर्कात राहतील.

पाहा, किती मोठी गोष्ट विनोबा समजावतात. आज शेतकऱ्यांची परिस्थिती आपण सर्वच जाणतो. निसर्गाशी नाळ तुटत आली आहे. विनोबांचं हे तत्त्व आपण धरून ठेवलं असतं; त्याचा ऱ्हास होऊ दिला नसता, तर आज शेतीची अवस्था एवढी वाईट झाली नसती. दुसरा महत्त्वाचा मुद्दा. जेव्हा लहान मुलं मातीला स्पर्श करतात, शारीरिक कष्ट करतात तेव्हा मेंदूमानसशास्त्र सांगतं, की त्यांच्या मेंदूच्या पेशींची घट्ट जुळणी होत असते. विनोबांचा आग्रह आहे, की उद्योग शिकवताना प्रत्येक व्यक्तीचा संबंध शेतीशी यायलाच हवा. तो आपण आज प्रत्यक्ष शिक्षणात आणू या. शाळेत जागा नसेल तर गच्चीवर छोटी बाग बनवा. पण विद्यार्थ्यांना निसर्गाशी संपर्कात आणा.

Vinoba Bhave
माणुसकीची श्रीमंती

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा रिपोर्ट प्रसिद्ध झाला, त्यामध्ये शाळेत विद्यार्थ्यांना कोलॅबरेशन शिकवा, असं सांगितलं आहे. खास प्रेस कॉन्फरन्स घेऊन सर्व जगातील शाळेच्या प्रिन्सिपल्सना आव्हान केलं आहे, की जगात शांती हवी असेल तर शाळेत कोलॅबरेशन म्हणजेच सहकार्य शिकवा. विनोबा भावे याचा आग्रह १९४७ पासून धरतायत. ते म्हणतात, शिक्षणामध्ये तिसरी महत्त्वाची गोष्ट आणा, ती म्हणजे सहयोग-सहकार्य. आपल्या सर्वांना एकत्र जगायचं आहे. एकत्र आनंदी जगण्यासाठी एकमेकांना सहकार्य करायला शिकवा. मी महाराष्ट्रीय, मी तमीळ, मी पंजाबी असं न शिकवता ‘मी भारतीय’, असं शिकवा. ‘मी भारतीय आहे’ हे सर्वांत छोटी मागणी आहे. सर्वांत मोठी मागणी म्हणजे विद्यार्थ्यांना ‘विश्वमानुष:’ मी विश्वमानव आहे, हे शिकवा. आपण आज भारताचं, त्याच्या प्रांतांचं गीत म्हणतो; पण वेदांमध्ये पृथ्वीसुक्त आहे, भारतसुक्त नाही. नाना धर्माणां पृथिवीं विवाचसमू- ही पृथ्वी आपल्या सर्वांची मातृभूमी आहे. यामध्ये अनेक धर्म आणि अनेक भाषा आहेत. या वास्तविकतेला समोर ठेवून विद्यार्थ्यांनी ‘विश्वमानुष:’ बनलं पाहिजे. हे सांगताना विनोबा एक जयजयकार द्यायला सांगतात. ‘जय जगत्।’ आणि पुढे म्हणतात, ‘जय जगत्’ ही माझी सर्वांत मोठी मागणी आहे; पण किमान तुम्ही ‘मी भारतीय आहे’ एवढं तरी म्हणा.
याचाच अर्थ विनोबांची इच्छा होती, की ‘भारतीय’ शब्दाहून वेगळा विचार नको. भारतीयांच्या खाली उतरू नका, जसे मी मराठी, मी हिंदू, मी मुसलमान...

अतिशय महत्त्वाचा आणि एकविसाव्या शतकाला लागू होणारा मुद्दा ते शिक्षणात आणायला सांगतात. नुसताच सांगत नाहीत, तर ‘सहयोग’ गुण कसा आणायचा यासाठी ते सर्वांना सुचवतात, की विद्यार्थ्यांना आधीपासून दुसऱ्यांमधले फक्त गुण शोधायला शिकवा. मनुष्य म्हणजे गुण-दोषांनी भरलेला आहे. समोरच्यातले फक्त गुणच दिसतील, असं शिक्षण विद्यार्थ्यांना द्या. भावनिक बुद्धिमत्तेचा महत्त्वाचा मुद्दा विनोबा शिक्षणात आणायला सांगतात. अजूनही वेळ गेलेली नाही. विनोबांचे शिक्षण विचार आजही एकविसाव्या शतकात लागू होतात.
विनोबांचा म्हणजे विनायक नरहरी भावे यांचा जन्म ११ सप्टेंबर १८९५ मध्ये कोकणातल्या पेणजवळील गोगादे गावात झाला. ते भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि ‘भूदान चळवळी’चे प्रणेते होते. त्यांना महात्मा गांधींचे उत्तराधिकारी म्हणूनही ओळखलं जातं. १९४० मध्ये गांधींनी वैयक्तिक सत्याग्रह पुकारला होता. त्या वेळी ‘पहिले सत्याग्रही’ म्हणून महात्मा गांधी यांनी आचार्य विनोबा भावे यांची निवड केली होती. आचार्यांचं गीताप्रवचन प्रसिद्ध आहे. ते जिथे भाषण करायचे तिथे लगेच त्याचं लिखित स्वरूपात रूपांतर व्हायचं.
त्यांचे शिक्षणविषयक विचार हे खरंच व्यावहारिक आणि आजच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला लागू होणारे आहेत. शिक्षणाच्या माध्यमासाठी त्यांचा मातृभाषेचा आग्रह होता. त्यामागे एक व्यावहारिक दृष्टिकोनही होता. ते म्हणायचे, विद्यार्थ्यांना बारावीपर्यंत मातृभाषेतून शिकवा. फक्त विज्ञानातल्या ज्या संकल्पना आहेत त्यासाठी इंग्रजीतले शब्द तात्पुरते वापरा. हळूहळू त्या शब्दांना मातृभाषेतले शब्द येतील. हे समजावताना ते म्हणतात, आपली भाषा ही विस्कळित भाषा आहे आणि पुढे अजून विकसित होईल. ज्ञानेश्वरांनी बाराव्या शतकात ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ लिहिला आणि इंग्लडच्या ‘कँटरबरी टेल्स’शी तुलना केली, तर ‘ज्ञानेश्वरी’मध्ये जेवढे शब्द आहेत त्याच्या एकचतुर्थांश म्हणजे चौथा हिस्सा पण ‘कँटरबरी टेल्स’मध्ये नाही. आत्ताच अर्थसंकल्प जाहीर झाला ज्यामध्ये e-content मातृभाषेतून बनवण्यासाठी आर्थिक तरतूद केली आहे. हाच मुद्दा विनोबा त्याकाळी सांगत होते.
१९४७ मध्ये जे महात्मा गांधी म्हणाले, विनोबांनी ज्याचा आग्रह धरला तो मातृभाषेतून शिक्षण हा विचार जर आपल्याकडे राबवला गेला असता, तर आज भारत विज्ञानात, इनोव्हेशनमध्ये पुढे गेला असता.

Vinoba Bhave
धार्मिक रुढींचे लक्ष्य महिलाच का?

विनोबा हे गांधीवादी होते. महात्मा गांधींच्या ‘नयी तालीम’ या शिक्षणप्रणालीचे पुरस्कर्ते होते. फक्त त्यांचा जोर भारतीय अध्यात्मावर अधिक होता. आचार्य म्हणायचे, शिक्षक हा सर्वोत्तम सल्ला देणारा असावा. वैयक्तिक आयुष्यात जेव्हा समस्या येतात तेव्हा आपण आई-वडील, भाऊ-बहीण, पती-पत्नी, इतरांकडे सल्ला मागतो. पण आपल्या शिक्षकांकडे सल्ला मागायला जात नाही. भारतीय समाज उत्तम सल्ला देणारी शिक्षक ही व्यक्ती हरवून बसत आहे. ते म्हणतात, शिक्षणामध्ये तीन गुण असावेत. प्रेम, ज्ञान आणि तटस्थता.
आचार्य विनोबा भावे हे स्वतः असे राष्ट्रीय शिक्षक होते. त्यांचे शिक्षण विचार प्रत्येक पालक, शिक्षक आणि शिक्षणप्रेमी यांनी वाचून अमलात आणायला हवेत.

(लेखक ज्येष्ठ शिक्षण अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.