वहीगायन.. उपेक्षित लोककला

तमाशा, भारुड, शाहिरी, वाघ्या- मुरळी, गोंधळ आदी लोककलांना राज्यात त्या-त्या क्षेत्रात लोकप्रियता व पर्यायाने राजमान्यताही मिळाली.
folk art
folk artsakal
Updated on
Summary

तमाशा, भारुड, शाहिरी, वाघ्या- मुरळी, गोंधळ आदी लोककलांना राज्यात त्या-त्या क्षेत्रात लोकप्रियता व पर्यायाने राजमान्यताही मिळाली.

गावखेडी, शहरांमध्ये महाराष्ट्र वसलेला आहे. या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वेध घेणारं सदर.

खानदेशातील ग्रामीण भागात काही विशिष्ट गावांमध्ये गणेशोत्सव, नवरात्री अथवा काही ठिकाणी स्थानिक यात्रोत्सवात कधीकाळी हमखास दिसणारे आणि सध्या दुर्मीळ होत चाललेली कला म्हणजे वहीगायन. खानदेशातील लोककलेचा दुर्मीळ झालेला व नामशेष होत चाललेला प्रकार.

तमाशा, भारुड, शाहिरी, वाघ्या- मुरळी, गोंधळ आदी लोककलांना राज्यात त्या-त्या क्षेत्रात लोकप्रियता व पर्यायाने राजमान्यताही मिळाली. खरेतर खानदेशातील तमाशाच्या फडांना शेकडो वर्षांची परंपरा आहे. आनंद तमाशा मंडळासारखा राज्यात सर्वांत जुना मानला जाणारा फड खानदेशातील. या फडांनी राज्याला कलावंत दिले, तरी तमाशा खानदेशातच उपेक्षित राहिला. वहीगायन हा लोककला प्रकार तर अस्सल खानदेशी मातीतला, राज्यात अन्य कुठेही न दिसणारा. तरीही या कला प्रकाराला ना प्रतिष्ठा मिळाली ना राजमान्यता..

काय आहे वहीगायन?

खानदेशातील, प्रामुख्याने जळगाव जिल्ह्यात आढळून येणारी लोककला वहीगायन. ‘ओवी’ या शब्दाचा अपभ्रंश होत जाऊन ‘वही’ हा शब्द या लोककला प्रकारात रुढ झाला. पौराणिक काळातील कथा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सुरुवातीच्या काळात मौखिक आणि नंतर लिखित स्वरूपात वर्ग झाल्या. कागद-शाईच्या शोधानंतर या कथा वह्यांमध्ये अवतरल्या. वह्यांमधील या कथा पद्य स्वरुपात, त्यांना ताल-वाद्याची जोड देत, प्रसंगी लोकांच्या मनोरंजनासाठी अभिनय करत यात्रोत्सव अथवा मोठ्या सोहळ्यांमध्ये सादर करायची ही कला म्हणजे वहीगायन. खानदेशात जवळपा तीन- चारशे वर्षांपासून या कला प्रकाराचे अस्तित्व आढळून येते.

वहीगायन मंडळं, पथकं

जळगाव जिल्ह्यात काही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात वहीगायन सादर करणारे कलावंत आजही आहेत. महाभारत, रामायण, पांडवप्रताप, नवनाथांची महती, खानदेशातील प्रसिद्ध कान्हुबाई उत्सवाचे महत्त्व (कानबाई) अशा विविध कथा ओवी, पद्यरुपात वहीगायनातून सादर केल्या जातात. पद्यस्वरुप समजायला कठीण असल्याने पथकातील दुसरा कलावंत त्याचे निरुपण करुन सांगतो. वहीगायनादरम्यान आवश्‍यक त्या वेळी डफ, तुणतुण्याचा गजर. टाळ वाजविणारे झिलकरी आणि ‘कोरस’ देणारे सहकारीही सहकलावंत असतात.

देवतांना वंदन अन्‌ सादरीकरण

खानदेशाचे कुलदैवत म्हणजे कानबाई. कन्हेर- कान्होळा हे पार्वती- शंकराचं खानदेशी रुप. वहीगायनात प्रारंभी त्यांना वंदन केलं जातं. नंतर गण (अर्थात, गणपती), नंतर निसर्गदेवता, कलेची देवता म्हणून सरस्वती आणि शेवटी गुरुवंदन होतं. स्थानिक बोलीभाषा, प्रसंगी हिंदीचाही यात वापर केला जातो. मात्र, प्रामुख्याने अहिराणी, तावडी, लेवा गणबोली या भाषांचा वापर अधिक. कथांचे पद्य पद्धतीने सादरीकरण करताना त्यात रंजकता आणण्यासाठी काही किस्सेही सांगितले जातात. एकेका पथक, मंडळात सहा ते बारा कलावंत असतात. गरजेनुसार एखादा कलावंत महिलेच्या वेशभुषेतही दिसतो.

महाभारत, रामायण, पांडवप्रताप यासारख्या कथा अनेक वह्यांमधून लिखित असतात. वहीगायन सादर करणारे कलावंत कुठेही वही हाती घेऊन गायन सादर करीत नाहीत. तर या कथा त्यांच्या अगदी तोंडपाठ असतात. एकेका सादरीकरणात सहा, आठ, दहा अशा सम संख्येत कथेच्या कड्या असतात. काही कथांत तर अठरा कड्यांचा समावेश असतो. यात्रोत्सवात वहीगायनाची चार- सहा मंडळं बोलावून एकामागून एक असे सर्वांचे प्रयोग सादर होतात.

स्थानिक देवतांच्या उत्सवात..

वहीगायन खानदेशातील स्थानिक उत्सवांच्या दरम्यान सादर केले जाते. गणेशोत्सव, नवरात्रोत्सवातही वहीगायनाचे प्रयोग होतात. वाघोड (ता. रावेर), अट्रावल (ता. यावल) याठिकाणी माघ महिन्याच्या पौर्णिमेपर्यंत मुंजोबाचा यात्रोत्सव असतो, त्याठिकाणी रात्री वहीगायनाचे प्रयोग आवर्जून सादर केले जातात. सुरवातीच्या काळात वहीगायन करणाऱ्या मंडळाला रुमाल, टोपी, नारळ व वस्त्र देऊन गौरविण्यात यायचे. या कलेला प्रतिष्ठा न मिळाल्याने कलावंतांच्या अर्थार्जनाचा प्रश्‍न मंडळांसमोर कायम राहिला, आजही तो आहेच.

विषयांमध्ये होतांय बदल..

अलीकडे त्यात काही बदल होऊन व्यसनमुक्ती, कौटुंबिक वादाची समस्या यासारखे विषयही हाताळले जातात. काही यात्रांच्या ठिकाणी सध्या कोरोनाचा विषय घेऊन जनजागृती होत असल्याचे आढळून आले. परंपरने शे- दीडशे मंडळं आजही हा कला प्रकार सादर करत आहेत.

कलेचे जतन करणारी कुटुंबं

महाराष्ट्रात तमाशा, लावणी, शाहिरी, भारुड, वाघ्या- मुरळी, गोंधळ यासारख्या लोककला प्रकारांना त्या-त्या भागात लोकमान्यता आणि लोकांनी उचलून धरल्यामुळे राजमान्यताही मिळाली. दुर्दैवाने वहीगायन या खानदेशी लोककला प्रकाराला लोकमान्यता मिळालेली नाही. कुटुंबाचा वारसा म्हणून काही लोक या कलेचे जतन करत आहेत, तर काही तरुण आवड म्हणून सहभागी होत आहेत. जळगाव जिल्ह्यासह जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात जवळपास चार ते पाच हजार वहीगायन करणारे कलावंत असून या कलेच्या संवर्धनासाठी आता प्रयत्न सुरु झाले आहेत. (कै.) प्राचार्य डॉ. किसन पाटील यांनी वहीगायनासंदर्भात एक प्रबंध सादर केला. त्यापलीकडे या लोककलेबाबत कुणाचा अभ्यास नाही. खानदेश लोककलावंत विकास परिषदेच्या माध्यमातून परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला असून गेल्या दोन महिन्यांत वहीगायन कलावंतांचे तालुकानिहाय मेळावे त्यांनी घेतले. जानेवारीत जिल्ह्यात पाच हजार कलावंतांचे वहीगायन संमेलन घेण्याचे नियोजन आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.