sacred sins devadasis in contemporary india by arun ezhuthachan sahitya akademi award winning book
sacred sins devadasis in contemporary india by arun ezhuthachan sahitya akademi award winning bookSakal

देवदासींच्या जिण्याची व्यथा

सेक्रेड सिन्स - देवदासीज इन कंटेम्पररी इंडिया’ हा अरुण एळुतच्चन यांच्या साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त मल्याळी पुस्तकाचा मीरा गोपीनाथ यांनी केलेला इंग्रजी अनुवाद वाचत असताना, अगदी नकळत ‘अत्त दीप भव!’
Published on

- अ‍ॅड. निखिल संजय रेखा

प्रसिद्ध जर्मन तत्त्वज्ञ फ्रेडरिक नीत्शे यांच्या ‘दस स्पोक झरतुष्ट्र’ नावाच्या पुस्तकात झरतुष्ट्र नावाच्या ज्ञानी पुरुषानं काढलेले हे उद्‍गार आहेत. नैतिकता आणि सत्य यांचा पाया घालण्यात ईश्वर कसा असमर्थ ठरला आहे, याचं अत्यंत स्पष्ट विवरण त्यानं त्यात केलंय.

या अनुषंगानं, परवा ‘सेक्रेड सिन्स - देवदासीज इन कंटेम्पररी इंडिया’ हा अरुण एळुतच्चन यांच्या साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त मल्याळी पुस्तकाचा मीरा गोपीनाथ यांनी केलेला इंग्रजी अनुवाद वाचत असताना, अगदी नकळत ‘अत्त दीप भव!’

हा बुद्धाचा संदेश माझ्या मनात तरळला. आपल्या या संदेशात बुद्धानंही ‘‘ तू स्वयंप्रकाशित हो, स्वतःचा मार्ग स्वतःच शोध,’’ असाच उपदेश केला आहे. मला अगदी प्रामाणिकपणानं कबूल केलंच पाहिजे, की या पुस्तकानं मला प्रचंड बेचैन केलं.

ते वाचल्यानंतर भोवतालची सामाजिक नैतिकता माझ्या अधिकच अंगावर येऊ लागली. ईश्वरासंदर्भातील अतिशय कडवा दृष्टिकोन आणि त्याला अनुसरणारी व्यक्तिगत नैतिकता यांच्या जोरावर भारत नावाच्या संकल्पनेचं आमूलाग्र रूपांतरण केलं जात असल्याचा अनुभव आज आपण घेतच आहोत.

त्याला लिंग, वर्ग, जात आणि लिंगभाव याबाबतच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक अधिकथनाची जोड मिळाल्यामुळं हे सारं अक्राळविक्राळ होऊन गेलं आहे. देवदासी पद्धतीचा आधार, तिचा विस्तार,

अभिशोषण, गैरवापर आणि त्यातून संबंधित स्त्रियांना भोगावे लागणारे अनन्वित दुष्परिणाम लक्षात घेतले, तर ही अमानुष पद्धती मानवी अस्तित्वाचा मूलाधार असलेल्या मानवी प्रतिष्ठेच्या मूलभूत तत्त्वांचेच उल्लंघन करणारी ठरते.

लेखक मुळात एक पत्रकार आहेत. मंगळुरुमध्ये डान्स बारवर घातल्या गेलेल्या बंदीचं वार्तांकन करत त्यांनी आपली कारकीर्द सुरू केली. यातून शोध पत्रकारितेची एक साखळी जुळत गेली. लेखक आपल्या विषयाच्या मागावर एका गावातून दुसऱ्या गावात फिरत राहिला.

वेगवेगळ्या राज्यांत तो गेला. कर्नाटकातून सुरू झालेला हा प्रवास पुढे आंध्र, ओरिसा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश असे वळसे घेत पुन्हा कर्नाटकात येऊन थांबला. या विलक्षण शोध प्रवासात लेखक वाचकाला आपल्याबरोबर घेऊन जातो.

सामाजिक नैतिकतेला प्रश्न विचारत, कांटप्रणीत समुदायवादी लोकनिष्ठांच्या वर्चस्वाला सवाल करत वाचक या प्रवासात पुढे जातो. विवेक, व्यवहारीपणा आणि संविधानात्मक सामाजिक करार यांच्या मार्गदर्शक प्रकाशात आपली व्यक्तिगत नैतिकता पुनर्प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करू लागतो.

देवदासींना खूप मान दिला जातो, समाजात त्यांचं स्थान प्रतिष्ठेचं आहे अशी लेखकाची सुरुवातीची समजूत होती. हा एक प्रकारचा विसंगत सामाजिक बुद्धिभ्रम होता. परंतु त्याच्या सत्यशोधक प्रवासात प्रत्यक्ष देवदासींच्या तोंडून त्यांच्या व त्यांच्यासंबंधीच्या खऱ्या कहाण्या ऐकायला मिळताच या साऱ्या भ्रामक समजुतींचा फुगा फटकन फुटला.

विशेष करून १९८२ मध्ये कर्नाटकात घातल्या गेलेल्या देवदासी प्रथा बंदीच्या प्रत्यक्ष कार्यवाहीची लेखक खोलात जाऊन तपासणी करतो. या तपासणीत काही पारंपरिक रूढीबद्ध ‘नैतिकता’ उघड्या पडतात.

कायद्याला शिताफीनं बगल देत या रूढी कशा पाळल्या जातात आणि पुरुषसत्ताक व्यवस्थेचं वर्चस्व कसं अबाधित राखलं जातं हे त्यातून स्पष्टपणानं दिसून येतं. स्त्रियांना निष्क्रिय प्रजा बनवणं, निव्वळ भोगवस्तू बनवणं हा या प्रथेमागचा मुख्य विचार असतो.

त्यांच्या देहाच्या उपभोग्यतेचा आणि पुरुषांना आकर्षित करण्याच्या शक्तीचा अंत निश्चित असतो. बारकाईनं सारासार विचार त्यांना करताच येऊ नये, पितृसत्ताक व्यवस्थेच्या मुळांनाच हात घालणारे प्रश्न विचारण्याची बौद्धिक कुवत त्यांच्या अंगी येऊ नये म्हणून त्यांची बौद्धिक क्षमता सर्व बाजूंनी खच्ची करून टाकलेली असते.

राजकीय पक्षांच्या दुटप्पीपणावरही लेखक प्रकाशझोत टाकतो. जैसे थे परिस्थितीत खळबळ माजेल असं काहीही करण्याच्या खडतर मार्गावर एक पाऊलही उचलण्याची या पक्षांची तयारी नसते.

निवडणुकीतील आपल्या यशावर विपरीत परिणाम होईल या भयानं असं कोणतंही सुधारक कृत्य ते येन केन प्रकारेण टाळू पाहतात. पक्षीय परिघानजीकच्या उजव्या विचारसरणीच्या संघटना तर रूढी, लोकाचार या मूल्यांना उघडउघड पाठिंबा देतात.

रूढी हा ईश्वरानंच आखून दिलेला जीवनमार्ग आहे, अशी थेट दैवी सांगड ते घालतात. यात कोणताही बदल खपवून घ्यायची त्यांची तयारी नसते. डावे पक्ष आणि देवदासी मुक्तीसाठी लढणाऱ्या काही संघटना याला अपवाद ठराव्यात अशा कृती मधून मधून करतात. पण त्यांनाही मतपेटीचं राजकारण आणि नवउदारमतवाद ध्यानीं घेऊन देवदासींच्या बाबती ‘अभिजात उदार’ भूमिका घेणं भाग पडते.

सर्वव्यापी असूनही रचनाबद्ध असलेल्या या सामाजिक-आर्थिक विषमतांना लिंगाधारित असूनही श्रेणीबद्ध असलेल्या जातिव्यवस्थेची जोड मिळाली आहे. त्यामुळं या साऱ्या सुप्त वा उघड संकुचित समजुती आणि वृत्तींना मूर्त भौतिक वास्तवाचं रूप लाभतं. परंपरा आणि धर्मवेड यांचा आधार घेत उत्पादनाच्या साधनांवरील सत्ता या लिंगाधारित विषमतांचं पुनर्निर्माण करते.

यात एके ठिकाणी दुर्गा नावाच्या मुलीची कहाणी सांगितली आहे. देवदासी प्रथेमुळे या दुर्गावर समाजाचा मालकीहक्क प्रस्थापित झाला आहे. अंगात येणाऱ्याच्या मुखातून देव बोलतो अशी श्रद्धा सर्वत्र आहे.

त्याच्या या परंपरागत हुकमतीचा शिताफीनं वापर करून धर्म-जात-वर्ग या त्रिकुटानं दुर्गाचं देवदासीकरण संगनमतानं घडवून आणलं आहे. हा अंगात येणारा सांगतो की दुर्गानं देवदासी व्हावं ही ईश्वराची इच्छा आहे. तसं न केल्यास गावावर देवाचा कोप होईल. साहजिकच दुर्गाला देवदासी बनवलं जातं. परंतु लेखक यामागची खरी कहाणी आपल्याला सांगतो.

दुर्गाच्या सौंदर्यामुळं गावातील उच्च जातीच्या जमीनदारांची वासना चाळवलेली असते. त्यांना दुर्गाला आपल्या कह्यात आणायचं असतं. धर्माच्या नावाखाली तिला देवदासी बनवणं हा त्यांना तिच्या प्राप्तीचा सर्वांत सोपा मार्ग वाटतो.

म्हणून हे जमीनदार त्या अंगात येणाऱ्या व्यक्तीशी भ्रष्ट संगनमत करतात. “कम्युनिझम ऑफ प्रॉपर्टी” मध्ये अरिस्टॉटल म्हणतो त्याप्रमाणे मालकी सगळ्यांची असते, तिथं जबाबदारी कुणाचीच नसते. सगळेच मालक तिचा कुणी नाही पालक!

त्यामुळं पुरेसं शोषण आणि देहाचं मातेरं होऊन गेल्यावर अशा कितीतरी दुर्गा वाऱ्यावर सोडल्या जातात. एकतर त्या खंगून खंगून जग सोडून जातात किंवा मग देहविक्रयाच्या दरीत उडी घेतात. लेखकानं या पुस्तकात अशी अनेक उदाहरणे दिली आहेत. त्या साऱ्यांचं सार सारखंच असतं.

पश्चिम बंगालमधील वेश्यांच्या जीवनातील लेखकानं चित्रित केलेला विरोधाभास अत्यंत गुंतागुंतीचा आहे. त्यामधील लिंगभाव, लैंगिकता, भक्ती आंदोलन, सीमापार स्थलांतर, संख्येनं अतिरिक्त स्त्रियांच्या विल्हेवाटीचा प्रश्न आणि धर्मातील लैंगिक राजकारण अशा अनेक बाबींमधील द्वंद्वात्मकतेचे अनेक सूक्ष्म पदर लेखकानं चित्रित केले आहेत.

वृंदावनातील ‘राधा’ मुलींच्या वाट्याला आलेलं भयाण वास्तव पश्चिम बंगालशी निगडित आहे आणि ते अत्यंत धक्कादायक आहे. या मुलींचे देह, तग धरून राहिलेलं त्यांचं शरीरच केवळ त्यांच्या उदर निर्वाहाचं एकमेव साधन बनलं आहे.

धर्माच्या आणि प्रेमाच्या नावाखाली, कृष्णाच्या नावाखाली आणि केवळ अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजा पुऱ्या व्हाव्यात म्हणून या राधांचं भीषण शोषण केलं जातं. कल्याणकारी राज्यव्यवस्थेचं दारुण अपयश आणि धर्म, समाज व तथाकथित नागरी समाज संघटना यांची जुलमी जुळणीच या शोषणाला पूर्णत: जबाबदार असते.

वस्तुतः प्रेमाच्या अंगी माणसाला सर्व बंधनातून मुक्त करून उन्नत करण्याचं सामर्थ्य असतं. अशा उदात्त प्रेमभावनेला विचित्र वळण देऊन तिचा वापर देवाच्या नावाखाली लैंगिक शोषणासाठी केला जातो हे पाहून मन खरोखरच विषण्ण होऊन जाते.

दुसरी एक कहाणी अशीच हृदयविदारक आहे. एक रिक्षाचालक केवळ दोनशे रुपये मिळावेत म्हणून आपली स्वत:ची पत्नी दुसऱ्याला द्यायला तयार होतो. आपलं अवघं जगणंच असं नरकप्राय झालेलं असताना माणूस धर्माची एवढी चिंता का म्हणून वाहत असेल, असा प्रश्न यातून निर्माण होतो.

जिथून सुरुवात केली तिथंच लेखक आपल्या या प्रवासाची सांगता करतो. अखेरीस तो आपल्याला एका कवीची कहाणी सांगतो. हा कवी एका देवदासीचा मुलगा आहे. त्याच्या जातीपायी त्याला अनेक हल्ले सोसावे लागतात.

आपल्या जातीच्या मर्यादा उल्लंघून आपण काव्यरचनेचं धाडस कसं करू धजावलो हे हा कवी आपल्याला सांगतो. उज्जैन शहरातील मुजरा सादर करणाऱ्या कलाकारांची कथाही यात आहे. उज्जैनमधील नैतिक शुद्धीकरणाच्या रेट्यामुळं या साऱ्या कलाकारांची रवानगी मुंबईतील कामाठीपुऱ्याला कशी होते याची करुण कहाणी वाचताना हृदय विदीर्ण झाल्यावाचून राहत नाही.

हे सारं पुस्तक वाचताना मला असह्य यातना होत होत्या. आपल्या स्वत:बद्दलची आणि आपण ज्याचा घटक आहोत अशा या समाजाबद्दलची प्रचंड घृणा माझ्या मनात दाटून येत होती. या प्रजासत्ताकात आज मूलभूत मानवता आणि तिला अभिप्रेत सर्वसामान्य मूल्ये सुद्धा नाकारली जात असताना,

आपली अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरने वाढली किंवा धर्माचं शब्दावडंबर दुमदुमलं याला कितपत महत्त्व द्यायचं? डिजिटायझेशन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या या युगात लिंगाधारित वर्तनाला महत्त्व का दिलं जातं? जात (किंवा जाती) ही आजही एक पवित्र विभागणी का उरावी? दारिद्र्य निर्मूलन ही संकल्पना अद्याप एक स्वप्निल मिथक याच स्वरूपात का राहावी? प्रश्न...प्रश्न...

मीरा गोपीनाथ यांचं भाषांतर अप्रतिम वाटलं. मल्याळी साहित्याचा अ-मल्याळी वाचक म्हणून मी ही इंग्रजी संहिता अत्यंत संवेदनशीलतेनं वाचू शकलो आणि तिच्यामधील महत्त्वपूर्ण अशा सूक्ष्म अर्थच्छटा समजावून घेऊ शकलो.

पुस्तक मिटलं तेव्हा व्यथा, वेदना आणि देवाच्या नावानं माणसंच माणसाचं कसं शोषण करतात हा मस्तकात घुमत राहिलेला विचार यांच्या संयोगानं माझ्या डोळ्यात अश्रू दाटले होते. शेवटी एवढंच म्हणेन, की नीत्शे म्हणाला ते निखालस सत्य होतं. कारण आपल्या सत्तालालसेच्या परिपूर्तीसाठी एक साधन म्हणून धार्मिक तत्त्वज्ञानाचा वापर करणं हेच या साऱ्यामागचं एकमेव तत्त्व असतं.

‘‘ ईश्वर मरण पावला आहे.’’

- फ्रेडरिक नीत्शे

(अनुवाद : अनंत घोटगाळकर) anant.ghotgalkar@gmail.com

(लेखक हे आयआयटी -दिल्ली आणि सामाजिक न्याय मंत्रालय इथं वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. त्याचबरोबर एसआययू (यूएसए) येथे हेवी इमर्जिंग स्कॉलर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.