भागवतांचा देशी राष्ट्रवाद (सदानंद मोरे)

भागवतांचा देशी राष्ट्रवाद (सदानंद मोरे)
Updated on

राजारामशास्त्री भागवत ज्याला ‘आमचा राष्ट्रीय धर्म’ म्हणतात, त्याचंच दुसरं नाव ‘महाराष्ट्रधर्म’ होय. कारण, आमच्या राष्ट्राचं नावच महाराष्ट्र आहे. ‘हाच महाराष्ट्रधर्म शिवछत्रपतींच्या स्वराज्यसाधनेसाठी पोषक ठरला,’ असा सिद्धान्त न्या. महादेव गोविंद रानडे यांनी मांडला. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी रानडे-भागवतांचा महाराष्ट्रधर्म डोक्‍यावर उभा करून त्याअनुरोधानं महाराष्ट्राच्या इतिहासाचीही तशीच मांडणी केली...

भाषा व धर्म, समाजकारण आणि राजकारण या घटकांमधला महाराष्ट्रातल्या लोकांचा अन्योन्यसंबंध, त्यातून प्रकट होणारा आश्‍चर्यकारक एकजिनसीपणा या गोष्टींवर प्रकाश टाकणारा पहिला लेखक म्हणजे राजारामशास्त्री भागवत होय. ही गोष्ट साधताना त्यांनी योग्य त्या ठिकाणी पाश्‍चात्य; विशेषतः ब्रिटिश अभ्यासकांच्या मतांचा हवाला द्यायची खबरदारी घेतली आहे. अन्यथा त्यांचं लेखन ‘अस्मितेचा भाबडा उद्रेक’ या सदराखाली दडपता आलं असतं.

-मुंबई विद्यापीठाचे तेव्हाचे कुलगुरू सर अलेक्‍झांडर ग्रॅंट यांनी ‘तुकाराम म्हणजे महाराष्ट्राचे राष्ट्रीय कवी’ असं प्रतिपादन केलं होतं. त्यापूर्वी ख्रिस्ती मिशनरी मरे मिचेल यांनी ही गोष्ट आडवळणानं सूचित केली होती. तुकोबांना ‘The poet of Maharashtra’ असं म्हणून त्यांनी त्यांची तुलना ‘As emphatically as Burns has often been denominated the poet of Scotland’ अशी स्कॉटलॅंडच्या बर्न या कवीशी केली होती.

‘महाराष्ट्राचा कवी’ आणि ‘महाराष्ट्राचा राष्ट्रीय कवी’ या शब्दप्रयोगांमध्ये सूक्ष्म भेद आहे. ‘राष्ट्रीय कवी’ असं म्हणताना संबंधित लोकांमधली राष्ट्रीय भावना गृहीत धरली जाते. ती ग्रॅंट यांनी धरली आहे. तशीच ती प्रसिद्ध ब्रिटिश प्रशासक डब्ल्यू. डब्ल्यू. हंटर यांनीही गृहीत धरली होती. मराठ्यांचे पोवाडे संग्रहित करणाऱ्या ऑक्वर्थसाहेबांनी तर तिचा स्पष्ट उल्लेख केला आहे. त्यांनाही भागवत उद्‌धृत करतात. भागवत यांनी उद्‌धृत केलेलं ऑक्वर्थ यांचं अवतरण असं ः ‘But the fact is that the Marathas, differring herein from the peoples of India, has strong national feelings. Others in this country are knit together by other causes : they are castes, religious sects, tribes, but the Marathas are a nation, and from the Brahman to the Kunabi they glory in the fact. The songs of the Rajput glority has exploits of his individual ancestors in the internecine feuds, the Moslem heroic poetry has a wider range, but it is inspired by religious fanaticism than by feeling that can be called patriotism; but the ballads of the Marathas are ballads of the men of Maharashtra (The `great nation’) as such and they burn through and through with patriotic fervour’

भागवत यांचा यापुढचा मुद्दा तर अधिकच लक्षणीय आहे. ते लिहितात, ‘जसे आमचे राष्ट्र तसाच आमचा राष्ट्रीय धर्म म्हणून पदार्थ निःसंशय आहे. हे वरील तिन्ही नामांकित आंग्लांच्या लेखांवरून सिद्ध होत नाही काय? जातिभेदाकडे मुळीत लक्ष न पोचता, एकट्या देवाकडे लक्ष पोचावे व प्रत्येकाने अहंकार सर्वतोमुखी सोडून त्याच्यावरच भार टाकण्यास शिकावे इतके घडवून आणणे आमच्या राष्ट्रीय धर्मास अशक्‍य आहे काय?’

यासंदर्भात ‘राष्ट्रीय’ असल्याचा संबंध भागवत यांनी, महाराष्ट्रातल्या लोकांनी जातिव्यवस्थेला काय प्रतिसाद दिला, याच्याशी लावला आहे. भागवत म्हणतात, ‘आमच्या संतमंडळींमध्ये व ऐतिहासिक दर्बारी मंडळींमध्ये जसा उक्तीने तसा कृतीनेही राष्ट्रीयपणा ओतप्रोत भरलेला आढळतो. संतमंडळींमध्ये व राजप्रकरणी मंडळींमध्येही आमच्या मंडळात जसे ब्राह्मणेतरांस वंद्य ब्राह्मण होऊन गेले, तसे ब्राह्मणांसही वंद्य अतिशूद्रात अनेक ब्राह्मणेतर होऊन गेले. ज्ञानेश्‍वर, एकनाथ, रामचंद्र नीळकंठ, प्रल्हाद निराजी असली मंडळी जर ब्राह्मण असली तर नामदेव जातीचे शिंपी असून, राजप्रकरणी वंद्य झालेल्या शिवाजीमहाराजांप्रमाणे धर्मप्रकरणी वंद्य झालेले तुकाराम व चोखामेळा अनुक्रमे क्षत्रीय व महार होते. जर एकाच जातीचे वर्चस्व राखण्यासाठी ज्ञानेश्‍वरादिकांचा उपदेश असता किंवा शिवाजीमहाराजांसारख्यांची कृती असती, तर तदुदित्‌ धर्मास ‘राष्ट्रीय’ नाव निःसंशय न साजते व त्याने एकवटलेल्या लोकांसही ‘राष्ट्र’ नाव न शोभते. जर ब्राह्मणभोजनेच घालून ब्राह्मणेतरांस मिटक्‍या मारणाऱ्या ब्राह्मणांची तोंडे पाहण्यास लाविले असते, तर एकनाथ हा ‘राष्ट्रीय’ पुरुष निःसंशय न समजला जाता व त्याची उक्तीही आमच्या ‘राष्ट्रीय धर्माच्या देशी आगमात गोविली न जाती’. या राष्ट्रीय धर्माच्या अध्यापनाने काय विचार पोक्त होणे नाहीत? एकनाथ, रामदास व तुकाराम यांच्यासारख्या किंवा त्यांच्याच पावलांवर पावले देऊन चालणाऱ्या शिवाजीमहाराजांसारख्या व रामचंद्रपंतांसारख्या केवळ परार्थ जन्मलेल्या पुरुषांच्या ग्रंथाच्या व चारित्र्याच्याही अध्ययनाने हाती धरलेल्या सत्कार्याच्या सिद्धीप्रीत्यर्थ जातीची किंवा लोकांची बिलकुल पर्वा न बाळगता किंवा सरकाराकडेस कालत्रयीही तोंड न पसरता देवावर सर्वस्वी भरवसा ठेवून आपल्याच मनगटाच्याच जोरावर प्रत्येक सत्कार्यास आरंभ करणे, हे आध्यात्मिक उन्नतीचे मुख्य काम अंगी बाणणार नाही?’

ज्ञानेश्‍वरकाल व शिवकाल या आपल्या राष्ट्रीय उन्नतीच्या कालखंडांकडं लक्ष वेधताना भागवत लिहितात, ‘रामदेवरावाचे काळी ज्ञानेश्‍वर नामदेवांचे पायी उघड पडत, इतका मनाचा थोरपणा अंगी वसत असून, कर्मठांच्या कोत्या जातिभेदास वाव नव्हता, म्हणूनच देशी लोकांचे पाऊल सर्व प्रकारे पुढे पडत होते. शिवाजीमहाराजांच्या काळीही कर्मठांच्या जातिभेदास त्या महापुरुषाने आपल्या मुलुखात ‘मत आव’ केले, म्हणून अनेक संस्मरणीय घडामोडींनी भरलेला तो काळ महाराष्ट्रमात्रास वंद्य झाला. हाच कित्ता राजारामाच्या कारकीर्दीत वळविला गेल्यामुळे, जशी संताजीची, रामचंद्रपंत व प्रल्हादपंत यांची व खंडो बल्लाळाचीही जन्मभूमीप्रीत्यर्थ पाण्याप्रमाणे स्वतःचे रक्त ओतण्याविषयी सदासर्वदा तयारी राहून मंडळाचे केवळ कल्याणच होत गेले, जातिभेदास गौणत्व येऊन कोते समज दूर झाले व राष्ट्रीयपणाचा बावटा मंडळभर डोलू लागला.’

भागवत यांच्या लेखनाचा तत्कालीन संदर्भ मराठी भाषेला मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात स्थान मिळण्याचा होता. तो धागा पकडून ते म्हणतात, ‘आमच्या देशाचा जसा धर्मसंबंधी इतिहास आहे, तसाच सामाजिक व राजकीय इतिहास आहे. आमच्या देशाचा धर्मसंबंधी इतिहास जसा संतमंडळींच्या वेदतुल्य सूक्तांमध्ये ओतप्रोत भरला आहे, तसाच राजकीय इतिहास बखरांमध्ये थबथबलेला आहे. आमच्या सामाजिक इतिहासाचा भार जसा संतमंडळींच्या वचनमौक्तिकांवर पडतो, तसा साध्या पण भरीव भाषेने लिहिलेल्या बखरांवरही पडतो.’

आपल्या भाषेचा आणि धर्माचा संबंध अधोरेखित करताना भागवत लिहितात, ‘आमचा राष्ट्रीय धर्म हा आमच्याच देशी भाषेत आहे. इतर भाषेत त्याचे मूळ मिळणे नाही.’
महाराष्ट्रातल्या लोकांच्या ज्या धर्मास भागवत ‘राष्ट्रीय धर्म’ म्हणतात, त्याचं वैशिष्ट्य म्हणजे, ‘ज्ञान आणि भक्ती यांची सांगड’ असं भागवत मानतात. त्याचं श्रेय ते ज्ञानेश्‍वरांना देतात. भागवत म्हणतात, ‘आमचा राष्ट्रीय धर्म ज्ञानेश्‍वरांच्या प्रभावाने ज्ञान व भक्ती या दोहोंची सांगड पडून झाला आहे, म्हणूनच आमच्या राष्ट्रीय धर्मात एकट्या देवास प्राधान्य मिळून कोत्या जातिभेदास वाव मुळीच मिळत नाही, तर मग जातिभेदास काडीमात्रही वाव न देणाऱ्या आमच्या राष्ट्रीय धर्माचे रहस्य कर्मठांचेच पोवाडे गाणाऱ्या काव्य-नाटकादिकांनी भरलेल्या संस्कृत भाषेत कोठून मिळणार? तेव्हा ‘राष्ट्रीय धर्म’ हा आमच्या देशी भाषेचाच स्वलक्षण गुण होय.’
भागवत पुढं असंही सांगतात, ‘आमच्या देशी भाषेने आमच्या संतमंडळीनेच दाखविलेली दिशा बळकट करून ठेविली आहे. ही दिशा जातिभेदाच्या बाहेरची असल्यामुळे मंडळांतील कर्मठांच्या कोत्या जातिभेदास गौणत्व आले म्हणजे दृष्टी विशाल व थोर होऊन राष्ट्रीयपणाकडेसच वळलीच वळली.’

भागवत यांच्या या एकूण मांडणीला ‘देशी राष्ट्रवाद’ असं म्हणता येईल आणि मग त्याची ‘चिपळूणकरी’ थाटाच्या ‘मार्गी राष्ट्रवादा’शी तुलना करता येईल. मार्गी देशीवाद वर्चस्ववादी, तर देशी राष्ट्रवाद समतावादी होय. अगोदर मार्गी देशीवादाची मुळे ज्या संस्कृत भाषेत शोधली जातात, तिच्या संदर्भात भागवत काय म्हणतात, ते पाहिलं पाहिजे.

भागवत म्हणतात, ‘संस्कृत’ हे नावच पहिल्याने कोणत्याही राष्ट्राचे किंवा मुलुखाचे नव्हे.
‘संस्कृत’ नावाचे लोक नव्हते व ‘संस्कृत’ नावाचा मुलुखही नव्हता. दरोबस्त ब्राह्मण ‘संस्कृत’ बोलत, असेही समजण्यास पुरावा नाही. तेव्हा ‘संस्कृत’ नाव पडलेली भाषाही राष्ट्रीय भाषा समजण्यास अनेक अडचणी दिसतात. ‘संस्कृत’ भाषेत ऐतिहासिक ग्रंथ नाहीत यावरून ती राष्ट्रीय भाषा नव्हती असे निर्विवाद सिद्ध होत नाही काय? ‘लातिन’ व ‘ग्रीक’ या तर पूर्वी धडधडीत जागत्या भाषा होत्या. ‘लातिन’ हे पूर्वी जसे लोकांचे तसेच मुलुखाचे नाव होते. ‘लातिन’ हे नाव लोकांचे होते, त्यापक्षी त्या लोकांचा इतिहास त्या भाषेत लिहिला गेला आहे, यात नवल नाही. सारांश, ‘लातिन’ ही राष्ट्रीय भाषा होती. हाच न्याय ‘ग्रीक’ भाषेस लागू होतो. तर ‘संस्कृत’ ही राष्ट्रीय भाषा नव्हती व तीत ऐतिहासिक ग्रंथ नाहीत, तर राष्ट्रीयपणास ‘संस्कृता’च्या अध्ययनाने स्फुरण येण्याचा थोडा तरी संभव आहे काय? जर इतिहास नाही तर उदाहरणे नाहीत व जर उदाहरणे नाहीत तर आध्यात्मिक उन्नतीचे पाऊल हृदयात पडणार कसे? व ते तसे न पडले तर राष्ट्रीयपणास स्फुरण येणार कसे?’

यासंदर्भात संस्कृत भाषेच्या समर्थकांना खडे बोल सुनावण्यास भागवत कचरत नाहीत. भागवत म्हणतात, ‘आमच्या देशी भाषेत जीव नसून, तिच्यातील दरोबस्त तत्त्व संस्कृतातून आले आहे, असे कित्येक संस्कृताचे कैवारी म्हणतात. ‘देशी भाषेत जे राष्ट्रीय धर्मरूप नुकतेच निर्विष्ट केलेले तत्त्व वाहत्या पाण्याप्रमाणे जिवंत वाहत आहे, ते तर संस्कृतात कोठे सापडल्याचा संभव नाही. बरे, जे बखरांसारखे ऐतिहासिक तत्त्व आमच्या देशी भाषेत आहे, ते तरी संस्कृतात कोठे व कसे आढळणार?’
या विवेचनाचा संदर्भ ‘मुंबई विद्यापीठामधल्या भाषेचा अभ्यासक्रम’ हा असल्यामुळं आणि या अभ्यासक्रमात इंग्लिश व संस्कृतला प्राधान्य मिळून मराठी म्हणजेच देशी भाषेची हकालपट्टी करण्यात आल्यामुळं भागवतांचा सात्त्विक संताप अनावर झालेला दिसून येतो; पण त्यामुळं त्यांचं विवेचन कुठंही असैद्धान्तिक होत नाही. भागवत म्हणतात, ‘संस्कृतमधली काव्य-नाटके, तर्क व अलंकार ही निःसंशय भक्तीची किंवा आध्यात्मिक उन्नतीची सामुग्री नव्हे. असल्या वाङ्‌मयात केवळ कर्मठांचे माहात्म्य भरलेले असते. कर्मठ हेच काय ते भूदेव; तेव्हा जसे देवापुढे तसे त्यांच्यापुढे इतर वर्णांनी मोठ्या अदबीने वागावे हे रघुवंशादिक काव्यांचे व शाकुंतलादिक नाटकांचे सार व सर्वस्व होय. शंबूक नावाचा शूद्र तप करितो व म्हणून एका कर्मठाचा मुलगा अकाली मरतो व दुर्वास आला तिकडे शकुंतलेचे लक्ष गेले नाही म्हणून तीस शाप मिळतो!! असल्या गोष्टींचा ग्रह मनावर तीव्र होऊन, भक्तीचे किंवा देवाचे नावही न समजल्यामुळे केवळ आपली जात मात्र ब्राह्मण म्हणविणारे आजचे परशुरामक्षेत्री दरोबस्त कर्मठ ध्यानात ठेवू पहातात व सगळा आपलेपणा एकट्या जातीत किंवा अमृतबाजारपत्रिकेप्रमाणे भक्तीसारख्या भागवती धर्मास झुगारून देऊन शुष्क जातिभेदाच्या संस्थेत संपवितात.’

‘जर कर्मठांची स्थिती अशी आहे तर त्या ‘संस्कृत’ नाव पावलेल्या भाषेत तरी धर्माच्या संबंधाने कर्मठपणा ओतप्रोत भरलेला असल्यास नवल कोणते?’’ असे म्हणणारे भागवत काहीएक अपवाद करायला तयार आहेत. तो म्हणजे, ‘संस्कृतात एक अमोलिक ग्रंथ भक्तीच्या व देवाच्या संबंधाने ‘भगवद्‌गीता’ हा होय. ‘श्रीमद्‌भागवत’ पुष्कळ स्थळी अतिशय रसभरीत व तिखटही आहे; पण अवांतर प्रवाह मध्ये वहात असल्यामुळे महाप्रवाहाकडेस एकसारखी दृष्टी पोचती ठेवण्यास साधारण समजाच्या पुरुषास बरेच आयास पडतात. जर कर्मठपणाआत माजलेली भाषा व कर्मठपणापासून उत्पन्न झालेल्या जातिभेदास पुष्पांजली देऊ पहाणारे तीतील ग्रंथ विद्यापीठाच्या अभ्यासात घातलेले आहेत तर जातीकडेस आरंभापासून दृष्टी वळते ती राष्ट्रास किंवा मंडळास झुगारून देऊन जातीतच अखेरीस विश्रांती घेते व देवास किंवा धर्मास मुळीच ओळखत नाही, त्याच नवल कोणते?’

विद्यापीठात मराठी भाषा दाखल करण्यामागचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे ‘राष्ट्रीय धर्माकडेस आमच्या भाषेच्या अध्ययनाने चित्ताचा ओघ सहज वळेल. ज्या भक्तिरूप धर्माचे ज्ञानेश्‍वरादिकांनी सुरस निरुपण केले तो आमचा राष्ट्रीय धर्म होय. या धर्मास ‘राष्ट्रीय’ किंवा ‘देशी’ हेच नाव साजेल. दुसरे नाव साजणे नाही. या राष्ट्रीय धर्माचा अमक्‍या एका विशिष्ट जातीबरोबर संबंध आहे असे नाही,’ असं भागवत बजावतात व विचारतात, ‘जातिभेदास बिलकुल न मानणे किंवा तिकडेस दृष्टी मुळीच न पोचविणे, इतके मोठे व अभिनंदनीय काम ज्या धर्माच्या हातून सहज होते, त्या धर्मावर व तत्प्रतिपादक ग्रंथावर झाकण घालू पहाणे हे परिणामी हितावह होईल काय? ...मन विशाल करून दृष्टी दूरवर पोचविणे, हे एक वरिष्ठ शिक्षणाचे मोठे फळ जर आमच्या राष्ट्रीय धर्मापासून हाती लागत आहे, तर त्याचे प्रतिपादन करणारा ग्रंथसमूह नादान व निरुपयोगी ठरविणे रास्त होईल काय?’

भागवत असेही सांगतात, ‘असले मोठे काम संस्कृतच्या परिशीलनाने होणे नाही, हे अजमितीस उघड दिसत आहे व निर्विवाद सिद्ध होत आहे. उलट सर्वत्र कोतेपणा माजून आज सर्व जातिमय होऊन राहिले आहे, हे ‘अभिनंदनीय वैगुण्य’ संस्कृताच्याच माथी सहज मारता येण्यासारखे नाही काय? भागवत यांची भाषा थोडी औपचारिक होते तेव्हा ते लिहितात, ‘राष्ट्रीयपणावर व एकीवर पाणी घालून आपापसातील फूट वाढविण्यास किंवा सरकारच्या पाठी अनेक सुदर्शने लावल्यास राष्ट्रीय धर्माचा अपलाप करणे व महासूत्रधाराची आठवण अजिबात घालवणे हेच श्रेयस्कर होय. आमचे राष्ट्र म्हणून पूर्वी कधी नव्हते, तेव्हा राष्ट्रीय धर्मही अर्थातच नव्हता, मग राष्ट्रीयपणा तरी कोठून असणार? हा पोकळ सिद्धान्त एखाद्या वाग्जालाची मदत घेऊन लिहून ठेविला म्हणजे मंडळाच्या अनेक कारणांनी उदाहरणीय झालेल्या धर्मसंबंधी, राजकीय व सामाजिक इतिहासावर झांकणे पडून कर्मठांचे आयते पिकले व जातिभेदाचे सहजच पुष्टीकरण होऊन आमच्या दयाळू व न्यायप्रिय सरकारचे क्‍लेशही वाढले.’ भागवत ज्याला ‘आमचा राष्ट्रीय धर्म’ म्हणतात, त्याचंच दुसरं नाव ‘महाराष्ट्रधर्म’ होय. कारण, आमच्या राष्ट्राचं नावच महाराष्ट्र आहे. ‘हाच महाराष्ट्रधर्म शिवछत्रपतींच्या स्वराज्यसाधनेसाठी पोषक ठरला,’ असा सिद्धान्त न्या. महादेव गोविंद रानडे यांनी मांडला. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी रानडे-भागवतांचा महाराष्ट्रधर्म डोक्‍यावर उभा करून त्याअनुरोधानं महाराष्ट्राच्या इतिहासाचीही तशीच मांडणी केली; पण तो वेगळा मुद्दा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.