शृंगाराकडून शांत रसाकडे (सदानंद मोरे)

शृंगाराकडून शांत रसाकडे (सदानंद मोरे)
Updated on

संत ज्ञानेश्‍वरांनी नेमकं काय केलं, हे समजून घेण्यासाठी प्राचीन संस्कृत व माहाराष्ट्री प्राकृत या दोन काव्यपरंपरांच्या स्वरूपाची चर्चा करायला हवी. संस्कृत काव्यपरंपरेत शृंगार या रसाला सर्वश्रेष्ठ रस मानलं जातं, हे सर्वज्ञातच आहे. ज्ञानेश्‍वर मात्र शृंगाराला जिंकील असा शांत रस निष्पन्न करणारी साहित्यप्रकृती प्रतिज्ञापूर्वक सिद्ध करतात. ज्ञानेश्‍वरी म्हणजे शांत रसाचा वर्षाव. माहाराष्ट्री प्राकृताचा मराठीपर्यंतचा प्रवास हा अशा प्रकारे शृंगाराकडून शांताकडं आहे. हाल सातवाहनापासून ज्ञानेश्‍वरांपर्यंतच्या या भाषेच्या प्रवासात जैन साहित्य आणि महानुभाव साहित्य हे टप्पे अतिशय महत्त्वाचे आहेत.

संत ज्ञानेश्‍वरांनी नेमकं काय केलं, हे समजण्यासाठी प्राचीन संस्कृत व माहाराष्ट्री प्राकृत या दोन काव्यपरंपरांच्या स्वरूपाची चर्चा करायला हवी. संस्कृत काव्यपरंपरेत शृंगार रसाला सर्वश्रेष्ठ रस मानलं जातं, हे सर्वज्ञातच आहे. शृंगार हा अतिशय सुकुमार आहे, म्हणून त्याची हाताळणी करताना अत्यंत जपून व काळजीपूर्वक करायला हवी, असा इशारा शास्त्रकार वारंवार देतात.

संस्कृत साहित्यातलं शृंगाराचं हे आकर्षण ‘obsession’ म्हणावं एवढ्या थराला कसं गेलं होतं हे पाहायचं असेल, तर भोजराजाच्या ‘शृंगारप्रकाश’ ग्रंथाचं उदाहरण समर्पक ठरावं. त्याच्या मतानुसार, रस वस्तुतः एकच असून त्याचीच शृंगार, अभिमान, अहंकार, आनंद अशी वेगवेगळी नावं होत. हे शृंगाराचं मोठंच उन्नयन होय. कारण परत तो अष्टरसांमध्ये शृंगाररसाची गणना करतोच. म्हणजेच तो ‘शृंगार’ शब्दाच्या अर्थाला व्यापक करून त्याची प्रतिष्ठा वाढवतो. या कल्पक अर्थानं शृंगार म्हणजे कवीच्या ठायी असलेली प्रतिभाच ठरावी! आपल्या म्हणण्याच्या समर्थनासाठी भोज आनंदवर्धनाचा एक श्‍लोकही उद्धृत करतो.

शृंगारी चेत्कविः काव्ये जातं रसमयं जगत्‌।
स एव वीतरागश्‍चेन्नीरसं सर्वमेव तत्‌।।


भोजाचं हे सारं म्हणणं खरं तर अभिनवगुप्तांच्या मांडणीवरची प्रतिक्रिया वाटते. गुप्तांनी शांत रसाचा संबंध थेट आत्मरूपाशी जोडला. कोणी शम म्हणो किंवा कोणी निर्वेद आत्मा हाच शांतरसाचा स्थायीभाव असल्याचं म्हणणं अभिनवगुप्त पसंत करतात. ज्ञानेश्‍वरीची सुरवातच मुळी आत्मरूपाला केलेल्या नमनानं झाली आहे. यामागचं इंगित नेमकं हेच आहे. ‘ॐ नमो जी आद्या। वेद प्रतिपाद्या । जय जय स्वसंवेद्या। आत्मरूपा।।’ ही नमनाची पहिली ओवी आहे. आत्मरूप हे आद्य असल्यानं ते सर्वांचा आधार आहे. वेदानं त्याला प्रतिपादनाचा म्हणजे आकलनाचा, ज्ञानाचा विषय बनवला हे खरं. गीतेमध्येही ते प्रतिपाद्य आहे. या अर्थानं गीता हे शास्त्र आहेच; परंतु त्याचबरोबर ते स्वसंवेद्यही आहे. स्वसंवेद्यतेचा संबंध ज्ञानव्यवहाराशी नसून काव्यादी कलाव्यवहाराशी आहे. आत्मवस्तू ‘अतिंद्रिय’ असली, तरी मी ती इंद्रियांकरवी ‘भोगवीन’ इतकंच नव्हे, तर ती भोगायला मिळावी यासाठी इंद्रियांमध्येच स्पर्धा उत्पन्न होईल, असं ज्ञानेश्‍वर सांगतात. स्वसंवेद्यतेच्या या अर्थाबद्दल कोणाला शंका असल्यास धनंजय या पंडिताचा ‘दशरूपक’, त्यावरची धनिकाची ‘दशरूपावलोक’ ही टीका आणि तिच्यावरची भट्टनरसिंह याची ‘लघुटीका’ (१.६) पाहावी.

गीता हा कृष्ण आणि अर्जुन यांच्यामधला संवाद आहे. या गोष्टीवर ज्ञानेश्‍वरांनी सतत भर दिला आहे. ‘संवादाचेनि मिषे। जे अव्यवहार्य वस्तु असे। तेचि भोगिजे की जैसे। दर्पणी रूप।।’’ अशी या संवादाविषयी ज्ञानेश्‍वरांची भूमिका आहे. ते आकलन; तसंच आस्वादनही आहे.

भोजासारख्यांच्या मताला छेद देणारी अशी अभिनवगुप्तांची भूमिका होती. भरतमुनींच्या नाट्यशास्त्रात वीर, शृंगार आदी आठच रस आहेत. नववा रस नाही, असा एक मतप्रवाह आहे. नवव्या शांत रसाची भर टाकण्याचं श्रेय अभ्यासक उद्‌भट या पंडिताला देतात. ‘काव्यालंकारसंग्रह’ या ग्रंथात उद्‌भटानं ही भर टाकलेली दिसते. अर्थात अभिनवगुप्तासारख्या कलामीमांसकाची भूमिका भरताच्या मूळ नाट्यशास्त्रातच शांत रस असल्याची आहे, हे इथं नमूद करायला हवं. मात्र, भरतमुनींनी मुळात नाट्यापुरता (म्हणजेच दृश्‍य काव्यापुरता) मांडलेला रसविचार उद्‌भटानं त्याचा विस्तार करून काव्याला लावला, असंही म्हणता येतं; पण तो वेगळा मुद्दा.

शांत रस मुळात कोणी मानला, या प्रश्‍नाचं काहीही उत्तर आलं, तरी आपल्याच विवेचनावर काही परिणाम व्हायचं कारण नाही. नाट्याच्या प्रयोगात अभिनयाला प्राधान्य असल्यामुळं आणि अभिनयाच्या माध्यमातून शांत रसाची अभिव्यक्ती कशी करायची, हा प्रश्‍न असल्यामुळं कदाचित भरतमुनींनी तो मानला नसेलही; पण जिथं अभिनयाला स्थान नसतं आणि सर्व गोष्टी केवळ शब्दांच्याच माध्यमातून साधल्या जात असल्यानं त्या काव्यात शांत रसाची निष्पत्ती होण्यास कोणी हरकत घेतली नसावी. तरीही आत्मा हाच शांत रसाचा स्थायीभाव असल्यामुळं आणि कृतीसाठी अहंकार (कर्तृत्वबुद्धी) आणि हालचाल यांची आवश्‍यकता असल्यानं तो कृतीला प्रतिबंधक असल्याचा आक्षेप घेता येणं शक्‍य आहे.

इथं कलाविश्‍व आणि प्रत्यक्ष लौकिक व्यवहाराचं विश्‍व यांच्यातल्या संबंधाचा विचार सयुक्तिक ठरतो. अध्यात्माचं विश्‍व हे कलाविश्‍व असल्याचं कोणी मानणार नाही; पण तरीही तो व्यवहार आहे आणि त्याचा लौकिक व्यवहाराशी संबंध आहे. तो संबंध तुकोबांनी एका अभंगातून स्पष्ट केला आहे. तोच न्याय कलाविश्‍वाला लावता येणं शक्‍य आहे.
भोजन ते पाशांतीचे। उंचनीच उसाळी।
जैसी कारंजाची कळा। तो जिव्हाळा स्वहिता।।

आत्मस्वरूप हे सर्व स्थायींचं स्थायी असल्यामुळं शांत हा सर्व रसांचा रस. मूळ रस किंवा रसांची मूळ प्रकृती. कारंजातून पाण्याचे तुषार कमी-अधिक प्रमाणात उंच उडतात खरे; पण त्यांचा मूळ स्रोत असतोच- तसं हे आहे. ‘शृंगारप्रकाश’कर्ते शृंगाराला अभिमान, अहंकार म्हणतात खरे; परंतु शेवटी तुकोबाच म्हणतात त्याप्रमाणं - ‘अभिमानाची स्वामिनी शांती । महत्त्व घेती सकळा।।’’

मूळ मुद्‌द्‌यावर येऊन सांगायचं म्हणजे अभिजात संस्कृत साहित्यात शृंगाराला रसराज मानलं गेलं, तरी ज्ञानेश्‍वर मात्र शृंगाराला जिंकील असा शांत रस निष्पन्न करणारी साहित्यप्रकृती प्रतिज्ञापूर्वक सिद्ध करतात. ज्ञानेश्‍वरी म्हणजे शांत रसाचा वर्षाव! (‘वर्षला शांत रसे। ते हा ग्रंथु।।)
कलाकृतीला ‘मानवी जीवनाचं कलात्मक अमूर्तीकरण’ म्हणता येतं. अमूर्तीकरणामुळं तिच्यातलं स्थलकालव्यक्तीसापेक्षता नष्ट होऊन ती सार्वत्रिक होते; परंतु तिची सार्वत्मिकता गणितासारखी किंवा तर्कशास्त्रासारखी सर्वस्वी बुद्धिनिष्ठ आणि वास्तवनिरपेक्ष नसून कलात्मक व वास्तवानुबंध असते. संतांचं जीवन हेच उन्नत होऊन अशा प्रकारच्या कलाकृतीच्या पातळीवर पोचलेलं असतं. याच अर्थानं तुकोबा आपल्या जीवनाला ‘नाट्य’ म्हणतात.
‘‘नटनाट्य अवघे संपादिले सोंग। भेद दाऊं रंग न पालटे।।
मांडियेला खेळ कवतुक बहुरूप। आपुले स्वरुप जाणतसो।।

काश्‍मिरी शैव परंपरेत परमशिवालाच ‘नाट्यशैलुष’ असं म्हटलं आहे. त्यानंच रचलेलं नाटक म्हणजे विश्‍व. इथंही तुकोबांचा आधार घ्यावा लागतो. ते देवाला उद्देशून म्हणतात-
‘‘नटनाट्य तुम्ही केले याचसाठी। कवतुके दृष्टी निववावी।।
नाही तरी काय कळलेचि आहे। व्याघ्र आणि गाय लाकडाची।।
अभेदचि असे मांडियेला खेळा। केल्या दीपकला बहु एकी।।
तुका म्हणे रूप नाही दर्पणात। संतोषाची मात दुसरी ते।।

दुसऱ्या एका कलेचा आधार घेऊन ज्ञानेश्‍वर सांगतात, की हे जग म्हणजे वामांगीचे म्हणजे शक्तीचे ‘लास्य’ नावाचे नृत्य आहे, तर प्रलय म्हणजे शिवानं केलेलं (तांडव) नृत्य आहे. थोडक्‍यात काश्‍मीरमधील प्रत्यभिज्ञा दर्शनातून झिरपत आलेल्या तत्त्वज्ञानाचा ज्ञानेश्‍वरांपासून तुकोबांपर्यंतच्या संतांनी विस्तार केला आहे.

आपला दुसरा, खरे तर पहिला मुद्दा भाषेसंबंधीचा होता. तो रसाच्या बरोबरीनं ध्वनीची चर्चा करताना निष्पन्न झाला होता. नाट्यात म्हणजेच दृश्‍य काव्यात रसनिष्पत्ती होताना अभिनय नावाच्या वस्तूचा उपयोग होतो. काव्यात अभिनय नसतो. ते पूर्णतः शब्दाश्रयी असतं. तिथं रसनिष्पत्ती कशी होते याचं स्पष्टीकरण करताना आनंदवर्धनानं ध्वनीची संकल्पना मांडली. अभिधा, लक्षणा आणि व्यंजना या शब्दांमधल्या तीन अर्थोत्पादक शक्ती होत. सर्वसाधारण भाषाव्यवहारासाठी पहिल्या दोन शक्ती पुरेशा असतात- कारण त्यात सौंदर्यनिर्मितीची अपेक्षा नसते.

काव्यव्यवहारात मात्र व्यंजनेचा उपयोग केला जातो. अभिधा म्हणजे शब्दाचा सरळ, कोशात मिळणारा अर्थ (Literary meaning). अभिधेतून निघणाऱ्या अर्थाचा बोध करून निष्पन्न होणारा अर्थ म्हणजे लक्षणा आणि अशा अर्थाचा बोध न करता जो सूचितार्थ समजतो ती व्यंजना किंवा ध्वन्यर्थ. हा ध्वनी म्हणजेच श्रेष्ठ काव्याचा आत्मा, असं आनंदवर्धन सांगतात. विशेष म्हणजे या व्यंजित किंवा ध्वन्यर्थात कमालीचं सौंदर्य असतं.

थोडक्‍यात सांगायचं म्हणजे काव्यात जी रसनिर्मिती होते ती ध्वनीमुळं होते. या एकूणच प्रकाराला ‘रसध्वनी’ असं नामाभिधान प्राप्त झालं. अशा प्रकारे ध्वनीचा उपयोग करून काव्यनिर्मिती विपुल प्रमाणात झाली होती ती माहाराष्ट्री प्राकृतात. मात्र, माहाराष्ट्री प्राकृतातलं काव्य हे मुख्यत्वे शृंगाररसाची निष्पत्ती करणारं होते. त्यानं संपूर्ण देशाला मोहवलं, असं म्हणण्यात काही अतिशयोक्ती नाही. अशा अनेक शृंगारिक कविता किंवा गाथा सातवाहन राजा हाल यानं ‘गाथासप्तशती’मध्ये संग्रहित केल्या होत्या आणि त्या उत्कृष्ट ध्वनिकाव्याचा नमुना म्हणून संस्कृतसाहित्य मीमांसक नेहमी उद्धृत करत. याला आनंदवर्धन किंवा अभिनवगुप्तही अपवाद असायचं कारण नाही.

दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात सत्तांतर होऊन सातवाहनांची सत्ता संपुष्टात आली. त्यानंतर ज्या सत्ता आल्या त्यांनी म्हणजे वाकाटक, चालुक्‍य, राष्ट्रकूट यांनी संस्कृत भाषेला आश्रय दिल्यामुळं माहाराष्ट्री प्राकृत भाषा मागं पडली. तिच्यातल्या साहित्यनिर्मितीला ओहोटी लागल्यासारखं झालं.

अशा वेळी या भाषेला जैन धर्मीयांनी जवळ केलं. जैनांनी तिला आपली धर्मभाषा करून तिच्यात विपुल साहित्यनिर्मिती केली. हे साहित्य जैन धर्माच्या अनुयायांपुरतं मर्यादित असल्यामुळं ते इतरांपर्यंत पुरेसं पोचलं नाही हे खरं असलं, तरी एक तर त्यामुळं ही भाषा साहित्याची भाषा म्हणून जिवंत राहिली आणि दुसरं परंतु तितकंच महत्त्वाचं म्हणजे तिचं मूळचं शृंगारिक वळण कमी झालं. तिच्यात धार्मिक प्रमेयांची अभिव्यक्ती होऊ लागली. जैन कथांमध्ये विशेषतः वणिक्‍पुत्रांचे भोगविलासही आढळत असले, तरी या कथांची अंतिम परिणती कोणाच्या तरी वैराग्यात म्हणजेच निर्वेदात होत असल्याचं सर्वज्ञात आहे. त्यामुळं या साहित्यातला शृंगारसुद्धा धर्म आणि मोक्ष (जैन परिभाषेत निर्वाण) यांच्याशी नातं सांगणारा असतो.

उदाहरणच द्यायचं झालं, तर बाविसावे तीर्थंकर अरिष्टनेमी (नेमिनाथ) यांच्या चरित्राचं देता येईल. अरिष्टनेमी हे श्रीकृष्णाचे सख्खे चुलत बंधू. वासुदेव आणि अरिष्टनेमींचे वडील समुद्रविजय हे बंधू. जैन कथांनुसार, अरिष्टनेमी आणि कृष्ण यांची चुरस असे. अरिष्टनेमी वरचढ ठरून चक्रवर्ती होऊ शकतात याची कल्पना कृष्णाला असल्यानं तो नेहमी अरिष्टनेमींची लौकिक जगाविषयीची आसक्ती कमी होईल अशा क्‍लृप्त्या करत असे- जेणेकरून ते वैराग्य प्राप्त होऊन, मुनी बनून अरण्यवासात जातील आणि आपला चक्रवर्तीपदाचा मार्ग सुकर होईल. या योजनेचा एक भाग म्हणून कृष्णानं आरिष्टनेमींच्याच विवाहाचा घाट घातला. राजमती नामक सुंदर आणि सुशील मुलीशी त्यांचा विवाह ठरवला. वऱ्हाडी मंडळी विवाहासाठी राजमतीच्या गावी निघाली. कृष्णानं अशी व्यवस्था करवली, की ठिकठिकाणी वराचं म्हणजे अरिष्टनेमींचं जंगी स्वागत होईल आणि त्यांना मेजवानी दिली जाईल. ही मेजवानी हटकून पशूंच्या मांसाची असणार.

झालं! आपल्या भोजनासाठी पशूंची एवढी हत्या चालली आहे हे पाहून अरिष्टनेमींना संसारातल्या सुखोपभोगांविषयीची उपरती निर्माण झाली. त्यांनी तत्क्षणीच संसारत्याग केला आणि ते मुनी बनले. तपाचरणासाठी निघून गेले.

इकडं राजकन्या राजमती ऊर्फ राजूल हिची अवस्था कशी झाली असेल, याची कल्पना करावी; पण तिनं काही दुसऱ्या विवाहाचा विचार केला नाही. तीही वैराग्यवृत्ती धारण करून अविवाहित राहिली. मनोमन वरलेल्या; परंतु विवाह न झालेल्या अरिष्टनेमींचा वियोग झालेल्या राजूलच्या भावना व्यक्त करणारी गीतं जैन साहित्यात आहेत. त्यांची गणना विप्रलंभ शृंगारपर गीतांमध्ये करता येईल; पण त्यांचा अंतिम परिणाम विरक्ती हाच म्हणावा लागतो.

जैनांनी माहाराष्ट्रीचं वळण बदलल्यानंतर तिचं रूपांतर मराठी भाषेत झालं. या गोष्टीचा फायदा महानुभाव पंथाचे आचार्य चक्रधर स्वामी यांना झाला, त्यांनी मराठीमधून धर्म आणि तत्त्वज्ञान सांगायचा प्रघात पाडला. त्याचं चरित्र म्हणजे म्हाइंभटकृत ‘लीळाचरित्र’ आणि त्यांचं तत्त्वज्ञान म्हणजे ‘सूत्रपाठ.’

थोडक्‍यात मराठी भाषेतून तत्त्वज्ञानाचं निरूपण करून धर्म सांगायचा प्रघात ज्ञानेश्‍वरांपूर्वी चक्रधरांनी पाडल्यामुळं ज्ञानेश्‍वरांचं काम सोपं झालं! थोडक्‍यात सांगायचं, म्हणजे मराठी भाषेचा हाल सातवाहनापासून ज्ञानेश्‍वरांपर्यंतचा प्रवास हा शृंगाराकडून शांताकडं आहे आणि त्यात जैन साहित्य आणि महानुभाव साहित्य हे टप्पे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.