मराठीच्या नगरीच्या विस्ताराचा एक वेगळाच मार्ग ज्ञानेश्वरांनी सांगितलेला आहे. तो देश-धर्मांच्या सीमा ओलांडून विश्वाला गवसणी घालणारा आहे. हा मार्ग ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या समारोपाच्या भागातल्या पसायदानात आढळून येतो. एका स्थानिक संप्रदायासाठी स्थानिकांच्या बोलीत असे विचार व्यक्त व्हावेत, हे एक आश्चर्य आहे. अर्थात त्यात त्या बोलीच्या सामर्थ्याचाही वाटा आहेच. पूर्वीच्या काळी धार्मिक ग्रंथाच्या अखेरीस त्या ग्रंथाच्या वाचनानं श्रोत्यांना काय मिळेल, याचा उल्लेख असे. त्याला त्या ग्रंथाची ‘फलश्रुती’ असं म्हणत. ज्ञानेश्वरीच्या अखेरीस अशी ‘फलश्रुती’ सांगण्याऐवजी ज्ञानेश्वरांनी ‘पसायदान’ मागणं पसंत केलं.
‘मराठीचिये नगरी’ हा ज्ञानेश्वरीमधला शब्दप्रयोग रूपकात्मक असून, ‘मराठी भाषा हीच एक नगरी आहे,’ असं रूपक ज्ञानेश्वरांनी करून त्या नगरीतला व्यवहार म्हणजेच भाषिक व्यवहार कसा असावा, यासंबंधी श्रीगुरूला प्रार्थना केली आहे.
ज्ञानोबामाउलींची ही ‘रूपकाची कुसरी’ पुढं नेत तिची भौगोलिक, सामाजिक व प्रसंगी राजकीय व्याप्ती पाहिली तर ‘मराठीच्या नगरी’चा अर्थ ‘मराठी भाषा बोलणाऱ्यांचा देश’ असा होतो. हा देश म्हणजे अर्थातच ‘महाराष्ट्र या नावानं ओळखला जाणारा देश’ हे वेगळं सांगायला नको. याच देशात राहावं, असा उपदेश ज्ञानेश्वरांचे भाषिक-पूर्वसुरी चक्रधरस्वामी यांनी आपल्या अनुयायांना केल्याचं आपण जाणतो. चक्रधरांच्या मते महाराष्ट्र ही धर्मभूमी आहे. या भूमीत केलेल्या धर्मकृत्यांचं फळ लवकर मिळतं. ती सात्त्विक भूमी आहे. तिथली माणसंच काय; परंतु झाडं-झुडपं आणि पाषाणसुद्धा सात्त्विक आहेत.
चक्रधरांच्याही पूर्वी आठव्या- नवव्या शतकांच्या संधिकाळावर होऊन गेलेल्या कोऊहल या कवीनं ‘लीलावई’ हे खंडकाव्य ‘महरठ्ठदेसी भासा’मध्ये म्हणजेच महाराष्ट्री प्राकृतात लिहितो. या काव्यात सातवाहन राजा हाल आणि सिंहलद्वीपाची राजकन्या लीलावती यांच्या प्रणयाची आणि विवाहाची कथा सांगितली आहे. महाराष्ट्रभूमीचं वर्णन करताना कोऊहल म्हणतो ः ‘पृथ्वीला भूषणभूत असलेल्या या प्रदेशात धन-धान्यसमृद्धीमुळं शेतकरी संतुष्ट असतात. या महाराष्ट्रात नित्य कृतयुग असतं. ही भूमी म्हणजे धर्माचा आधार आहे. इथली सृष्टी म्हणजे ब्रह्मदेवाची शाळाच आहे, ही सृष्टी पाहूनच तो आपली सृष्टिरचना करतो. हा देश सुखसमूहांचं जन्मस्थान होय. सद्गुणांचं सुक्षेत्र होय. इथलं कोवळं गवत खाऊन गोधन पुष्ट झालेलं असतं व त्याच्या हंबरण्यामुळं दिशा निनादून गेलेल्या असतात. इथं सर्वत्र जलविहार करण्याजोगी तळी आहेत. या भूमीत कळिकाळ येतच नाही. इथं पाप कुणी पाहिलेलं नाही. शत्रूचा पराक्रम इथं कुणाला दिसतच नाही.’
कोऊहलाच्या या वर्णनाचं जणू सारच असलेल्या ‘महंत राष्ट्र म्हणौनि महाराष्ट्र, महाराष्ट्र निर्दोष आन् सगुण, धर्म सिद्धी जाये ते महाराष्ट्र’ या महानुभावीय वचनाशी हे वर्णन ताडून पाहिलं तर माझा मुद्दा सहज पटावा.
कोऊहलानं आपल्या काव्यात पैठणचं वर्णन केलं आहे. (राजशेखर तर पैठणला ‘महाराष्ट्रदेशावतंस’ म्हणतो); पण महाराष्ट्रभूमीच्या भौगोलिक व्याप्तीची माहिती हवी असेल तर महानुभावांकडंच जावं लागतं.
महाराष्ट्राला तेव्हा ‘महाराष्ट्रमंडळ’ असंही म्हणत असल्याची कल्पना ज्ञानेश्वरीमधून येते; पण या मंडळाचेही खंड अथवा भाग असल्याचं ‘आचारबंद’ या ग्रंथावरून समजतं. ‘देश म्हणजे खंडमंडळ। जैसे फलेठाणापासौनि दक्षिणसि मऱ्हाटी भाषा जितुला ठायी वर्ते ते एक मंडळ। तयासी उत्तरे बालाघाटाचा सेवट असे ऐसे एक खंडमंडळ। मग उभय गंगातीर (= गोदातीर) तेही एक खंडमंडळ। आन् तयापासोनि मेघंकर घाट ते एक खंडमंडळ। तयापासोनि वराड ते एक खंडमंडळ। परी अवघे मिळौनि महाराष्ट्र बोलिजे। किंचित भाषेचा पालट भणौनि खंडमंडळे जाणावी।’’
हा स्पष्टपणे महाराष्ट्राचा भाषिक भूगोल आहे. एकच मराठी भाषा बोलणाऱ्या महाराष्ट्रमंडळाचे वेगवेगळे भाग कसे करायचे, तर मराठी भाषेतल्या अंतर्गत भेदांवरून; पण हे भाग व भेद गौण आहेत. त्यांच्यामुळं मराठी भाषेच्या एकजिनसीपणाला काही बाध येत नाही.
एकीकडं महाराष्ट्रातल्या वास्तव्यावर व मराठी भाषेच्या वापरावर भर देणाऱ्या चक्रधरांवर उत्तरायुष्यात आळ-किटाळांना सामोरं जावं लागून ‘उत्तरापंथे गमन’ करण्याची वेळ आली. आपला हा निश्चय अनुयायांना सांगताना त्यांनी आपल्या पुढच्या आयुष्यक्रमाची रूपरेषाही स्पष्ट केली; त्यानुसार ते म्लेंच्छांमध्ये वावरणार होते. म्लेंच्छांच्या बाजा-सुपत्यांवर निजणार होते. आणखी स्पष्टपणे सांगायची गरज नव्हती; पण त्याचा अर्थ असा होतो, की ते म्लेंच्छांना उपदेश करणार होते.
स्वामींच्या विरहाच्या कल्पनेनं त्यांचे अनुयायी व्याकुळ आणि अस्वस्थ होणं स्वाभाविकच होतं. आपली नाराजी ते लपवू शकले नाहीत. त्यावर स्वामींनी ‘त्यांना (म्लेंच्छांना) तारणारा देव वेगळा आहे का,’ अशा अर्थाचा सवाल करून - त्यांना कोण तारणार - असं विचारत आपल्या प्रस्थानाचा उद्देश स्पष्ट केला. याचा अर्थ असाही घेता येईल, की यादवांच्या राजवटीत होणाऱ्या छळाचं निमित्त करून स्वामींनी उत्तरेकडं प्रस्थान ठेवलं. उत्तरेत तेव्हा मुस्लिम शासकांचं राज्य होतं, म्हणजेच म्लेंच्छांचा शिरकाव झाला होता. चक्रधरांना व्यापक मानवतावादी दृष्टिकोनातून त्यांचाही उद्धार करायचा होता. काही वर्षांनी संत नामदेवही उत्तरेकडच्या लोकांना धर्म सांगून त्यांचा उद्धार करायला असंच प्रस्थान ठेवणार होते.
दुर्दैवानं चक्रधरांच्या उत्तरेकडच्या वास्तव्याचे, म्लेंच्छांमध्ये वावरण्याचं व त्यांना उपदेश करून त्यांचा उद्धार करण्याच्या कार्याचे तपशील उपलब्ध नाहीत. या क्षेत्रात संशोधन करण्यास वाव आहे.
मात्र, प्रश्न असा उपस्थित होतो, की स्वामी म्लेंच्छांमध्ये वावरत त्यांचा उद्धार करण्यासाठी कोणत्या भाषेचा अवलंब करणार होते? ती भाषा मराठी असणं तर शक्यच नव्हतं. अर्थात मुळात गुजरातीभाषक असलेल्या ज्या स्वामींनी मराठी भाषा जशी सहजगत्या आत्मसात केली, तशी दुसरी कोणतीही भाषा आत्मसात करून तिच्यावर प्रभुत्व संपादन करणं त्यांना मुळीच अवघड नव्हतं.
ते काहीही असो...चक्रधरांनी आपला धर्म व आपलं तत्त्वज्ञान मुळात मराठी भाषेतूनच सांगितलं असल्यामुळं त्यांनी त्यानंतर सांगितलेले विचार हे मराठीच्या नगरीचाच विस्तार ठरणार होते; मग ते त्यांनी कोणत्याही भाषेत सांगितलेले असोत.
ज्ञानेश्वरांचा वारकरी संप्रदाय हा ऐतिहासिकदृष्ट्या चक्रधर, चांगदेव राऊळ, गोविंद प्रभू यांच्या महानुभव पंथाच्या अगोदरपासून अस्तित्वात होता. विठ्ठल हे दैवत आणि वारी ही उपासनापद्धती या रूपात त्याचं अस्तित्व होतं. शिवाय, ‘विठ्ठल हे द्वारकेहून पंढरीत झालेलं श्रीकृष्णाचं अवतरण’ हे समीकरणही सर्वत्र रूढ होतं; त्यामुळं कृष्णानं सांगितलेली गीता हा त्याचा प्रमाणग्रंथही ठरत होताच. तथापि, तो संस्कृत भाषेत असल्यामुळं स्त्री-शूद्रांना अगम्य होता. ज्ञानेश्वरांनी गीतेचा अर्थ मराठीत सांगितला, तोच ‘ज्ञानेश्वरी.’ मराठमोळ्या विठ्ठल या दैवताशी सुसंगत असा मराठी भाषेतला हा ग्रंथ मराठीच्या नगरीतल्या म्हणजेच महाराष्ट्रातल्या लोकांनी शिरोधार्य मानला यात काहीच आश्चर्य नाही. वारकरी संप्रदायासाठी तर तो प्रमाणभूत ग्रंथ ठरला. त्यामुळं या संप्रदायाला परिपूर्ण धर्माची प्रतिष्ठा प्राप्त होऊन त्याचा ऐतिहासिक काळ सुरू झाला. यापूर्वीचा त्याचा इतिहास म्हणजे त्याची Prehistory होय.
महानुभाव आणि वारकरी या दोन पंथांमध्ये आचार आणि विचार यांच्या स्तरावर काही भेद जरूर आहेत. तथापि, दोन्ही संप्रदाय भक्तिसंप्रदायच आहेत. श्रीकृष्ण हे दैवत दोघांनाही मान्य आहे आणि मुख्य म्हणजे मराठी भाषेचा अभिमानपूर्वक वापर करण्याविषयीही त्यांचं मतैक्य आहे. भेदांची चर्चा करायचं हे स्थळ नाही.
चक्रधरांप्रमाणेच काही वर्षांनी वारकरी पंथाचे अध्वर्यू नामदेव यांनीही उत्तरापंथ पत्करून म्लेंच्छांच्या देशात म्हणजे पंजाबात वास्तव्य केल्याचा उल्लेख याआधीच केला आहे. अर्थात तोपर्यंत म्लेंच्छांचं राज्यच महाराष्ट्रापर्यंत पोचलं होतं, तरीही त्याचं केंद्र दिल्लीची सुलतानशाही म्हणजे उत्तरच होतं. महाराष्ट्रात बहामनींची स्वतंत्र सत्ता स्थापन होईपर्यंत हीच परिस्थिती कायम राहिली.
याचा सामाजिक अर्थ असाही घेता येईल, की नव्या सामाजिक-सांस्कृतिक परिस्थितीला समर्थपणे सामोरं जाता यावं, यासाठी या दोन्ही महापुरुषांनी आपापल्या उत्तरायुष्यात उत्तर हिंदुस्थानात वास्तव्य केलं. या वास्तव्यकाळात नामदेवांनी काय केलं, याचा पुरावा शीखधर्मीयांच्या ‘गुरुग्रंथसाहेब’ या प्रमाणग्रंथातून, तसंच उत्तरेत नामदेवांविषयी रूढ असलेल्या आख्यायिकांमधून उपलब्ध होऊ शकतो. एकाच वाक्यात सांगायचं झाल्यास, संत नामदेव हे उत्तरेतल्या संतपरंपरेचे प्रवर्तक होत.
अगोदरच स्पष्ट केल्यानुसार, चक्रधरांच्या याच प्रकारच्या कार्याविषयी इतिहास मौन बाळगून आहे. त्यादृष्टीनं कुणी विचार केला नाही व त्या दिशेनं कुणी संशोधनही केलं नाही; पण तरीही हा सर्व प्रकार मराठीच्या नगरीचा धार्मिक-सांस्कृतिक विस्तार होता, असं आपण निःसंशयपणे म्हणू शकतो.
इथं आणखीही एका मुद्द्याचा उल्लेख करायला हवा. चक्रधरांनी ‘उत्तरापंथे गमन’ केल्यानंतर त्यांचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न न करता स्वस्थ बसणं हे त्यांच्या पंथीयांसाठी शक्यच नव्हतं. स्वामींचा शोध घेत काही साहसी महानुभाव उत्तरेकडं गेले. माग काढत काढत ते थेट काबूलपर्यंत पोचले. तिकडं त्यांनी मठ स्थापून धर्मप्रसार केला आणि महत्त्वाची बाब म्हणजे, त्यासाठी त्यांनी मराठी भाषेचा वापर केला. अठराव्या शतकात मराठा सैन्यानं आपले झेंडे अटकेपार नेण्याच्या काही शतकं अगोदर महानुभावांचा धर्मध्वज अटकेपार पोचला होता! हा तर मराठीचा शब्दशः विस्तार होय.
इकडं महाराष्ट्रात काय घडत होतं, याचाही विचार करायला हवा. काही कारणांमुळं महानुभावांनी मराठी भाषेतलं आपलं ग्रंथभांडार सांकेतिक लिप्यांच्या कड्याकुलपांत बंदिस्त करून ठेवल्यानं पंथाबाहेरच्या बहुसंख्य लोकांसाठी ते अज्ञातच राहिलं; त्यामुळं मराठी भाषेच्या स्वाभाविक विकासाच्या काही वाटा आपोआप बंद झाल्या. वारकऱ्यांनी आपलं साहित्य सार्वत्रिक केल्यामुळं मराठी टिकली, तिचा विकासही होत राहिला. या साहित्यातल्या सामाजिक मूल्यांच्या प्रभावातून मराठीच्या नगरीच्या लुप्त झालेल्या राजकीय सत्तेच्या अंगाची पुनःस्थापना छत्रपती शिवरायांना करता आली. या सत्तेचा विस्तार शिवरायांच्या काळात दक्षिणेत होऊ लागला. अठराव्या शतकात तो उत्तरेकडं व पूर्वेकडंही झाली. या विस्तारामुळंच अफगाणी सत्तेची शक्यता कायमची संपुष्टात आली आणि ब्रिटिशांची सत्ता शे-पाऊणशे वर्षं लांबणीवर पडली. या नव्या सत्तेच्या म्हणजेच पारतंत्र्याच्या काळातही मराठीच्या नगरीतली माणसं स्वस्थ बसली नव्हती. महात्मा जोतीराव फुले यांनी सामाजिक विद्रोहाची आणि लोकमान्य टिळक यांनी राजकीय असंतोषाची भाषा घडवली.
मराठी भाषा ही अशा प्रकारे प्रसरणक्षम भाषा आहे. ती बोलणारे लोकसुद्धा तसेच असण्याचा निर्वाळा राजारामशास्त्री भागवत यांनी दिला होता व त्यांच्याकडून तशी अपेक्षा बंगाली इतिहासकार सर जदुनाथ सरकार यांनी व्यक्त केली होती; पण प्रसरणशीलतेचा अर्थ आक्रमण किंवा राजकीय सत्ता असा घ्यायचं कारण नाही. ‘जो पंजाब जिंकणं ॲलेक्झांडरला शक्य झालं नव्हतं, तो नामदेवांनी प्रेमानं जिंकला’ असं विनोबा म्हणतात, त्याची इथं आठवण होते. ‘अठराव्या शतकात मराठ्यांनी हिंदुस्थान जिंकून घेतला होता, तसं आजच्या काळात करणं शक्य होणार नाही; पण हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्यात अग्रेसर राहून त्यासाठी हवे तितके क्लेश सहन करावेत,’ असं टिळक यांनी म्हटलं होतं. हासुद्धा जिंकण्याचाच एक प्रकार मानता येईल.
मराठीच्या नगरीच्या विस्ताराचा एक वेगळाच मार्ग ज्ञानेश्वरांनी सांगितलेला आहे. तो देश-धर्मांच्या सीमा ओलांडून विश्वाला गवसणी घालणारा आहे. हा मार्ग ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या समारोपाच्या भागातल्या पसायदानात आढळून येतो. एका स्थानिक संप्रदायासाठी स्थानिकांच्या बोलीत असे विचार व्यक्त व्हावेत, हे एक आश्चर्य आहे. अर्थात त्यात त्या बोलीच्या सामर्थ्याचाही वाटा आहेच.
पूर्वीच्या काळी धार्मिक ग्रंथाच्या अखेरीस त्या ग्रंथाच्या वाचनानं श्रोत्यांना काय मिळेल, याचा उल्लेख असे. त्याला त्या ग्रंथाची ‘फलश्रुती’ असं म्हणत. ज्ञानेश्वरीच्या अखेरीस अशी ‘फलश्रुती’ सांगण्याऐवजी ज्ञानेश्वरांनी ‘पसायदान’ मागणं पसंत केलं.
पसायदानाची काही चर्चा यापूर्वीच येऊन गेलेली असल्यामुळं तिची पुनरावृत्ती करायची गरज नाही. पसायदान ही एक प्रार्थना आहे; पण याचा अर्थ तिचा उच्चार हे एक प्रकारचं कर्मकांड बनावं, असा होता कामा नये. पसायदानाच्या माध्यमातून ज्ञानेश्वरांनी एका आदर्श समाजाचं स्वप्नचित्र पाहिलं आहे. अशा स्वप्नचित्राला इंग्लिश भाषेत Utopia असं म्हणतात.
असं स्वप्नचित्र वास्तवात यावं यासाठी ईश्वरी सत्तेचं पाठबळ हवं म्हणून प्रार्थना करायला हरकत नाही. तथापि, हे सगळं ईश्वरावर सोपवून आपण स्वस्थ बसणंही उचित नाही. तो जबाबदारी टाळण्याचा प्रकार ठरेल. विशेषतः ज्या मराठी भाषेत हे स्वप्नचित्र रेखाटलं गेलं आहे, ती भाषा बोलणाऱ्यांची ही जबाबदारी आहे आणि त्यातही ज्ञानेश्वरांच्या संप्रदायाचं अनुयायित्व सांगणाऱ्यांची तर ती अधिकच आहे.
अशा प्रकारच्या परिवर्तनासाठी राजकीय सत्तेची जितकी आवश्यकता असते, तितकी सत्ता संपादून तसा प्रयत्न करण्यात काही विसंगती नाही. ‘‘महाराष्ट्रात स्वाभिमानी स्वत्वावर आधारित समाज चालता-बोलता झाला पाहिजे,’’ असं यशवंतराव चव्हाण म्हणाले होते. तेव्हा त्यांच्यासमोर ज्ञानेश्वरांच्या पसायदानात सापडलेली नीलप्रत असणार हे उघड आहे. ‘स्वत्वाकडून सर्वत्वाकडं’ असा हा प्रवास आहे. महाराष्ट्र हा त्यातला एक टप्पा होय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.