विनोबांनी दवडलेली संधी (सदानंद मोरे)

विनोबांनी दवडलेली संधी (सदानंद मोरे)
Updated on

विनोबांच्या वैश्विकतेची जातकुळीच वेगळी होती; पण त्यांनी ते सगळं स्पष्ट न करता ‘चळवळीला माझा पाठिंबा नाही,’ असं म्हणून गप्प बसायचं ठरवलं असावं. खरंतर ते म्हणू शकले असते, की ‘महाराष्ट्र हा ‘एसएसझेड’ म्हणजे ‘स्पेशल स्पिरिच्युअल झोन’ आहे, म्हणून त्याला स्वतंत्र अस्तित्व हवं आहे! गांधीजींनीच म्हटल्यानुसार तो त्याग, क्‍लेश आणि ज्ञान यांचा आदर्श आहे, म्हणून त्याचं वेगळं राज्य पाहिजे.’

म्हाइंभट सराळेकर यांनी चक्रधरांचं ‘लीळाचरित्र’ गद्यात लिहिल्यानंतर ज्ञानेश्‍वरांचं ‘ज्ञानेश्‍वरी’ हे गीतेवरचं भाष्यकाव्य मराठीत अवतरलं. याचा अर्थ असा होतो, की तेराव्या शतकाच्या अखेरपर्यंत मराठी भाषा गद्य आणि पद्य या दोन्ही अंगांनी समृद्ध झाली होती. ‘लीळाचरित्र’ हा आधुनि-क भारतीय भाषांमधला पहिला गद्य चरित्रग्रंथ आहे, त्याचप्रमाणे ‘ज्ञानेश्‍वरी’ हे आधुनिक भारतीय भाषांमधलं पहिलं गीताभाष्य होय.
आधुनिक युरोपीय भाषांमधल्या पहिल्या महाकाव्याचा मान महाकवी दांते याच्या इटालियन भाषेतल्या ‘डिव्हाईन कामेदिया’ या महाकाव्याला द्यावा लागेल; पण हे लक्षात ठेवलं पाहिजे, की हे महाकाव्य ज्ञानेश्‍वरीनंतर लिहिलं गेलं आहे. युरोपात तेव्हा ख्रिस्ती धर्माची चलती होती. ख्रिस्ती धर्माचा प्रमाणग्रंथ म्हणजे अर्थातच बायबल. ख्रिश्‍चन धर्माचा पाळणा मध्य पूर्वेतल्या (पश्‍चिम आशिया) ज्या प्रदेशात हलला, तो प्रदेश आशिया खंडात मोडतो आणि तिथल्या ज्या भाषेत बायबल लिहिलं गेलं, ती हिब्रू भाषा सेमिरिक वर्गातली असून, युरोपातल्या सर्व आधुनिक भाषा आर्यभाषाकुलातल्या ग्रीक आणि लॅटिन या भाषांशी नातं सांगणाऱ्या आहेत. ख्रिस्ती धर्म जरी मध्य पूर्वेतल्या आजच्या इस्राईल देशात उदयाला आला असला, तरी तिथं सत्ता गाजवणाऱ्या रोमन सम्राटानं त्याचा स्वीकार केल्यानंतर तो युरोपात पसरला. तो रोमन साम्राज्याचा धर्म बनला आणि रोमन साम्राज्याच्या विघटनानंतर त्याच्या अवशेषांवर उभ्या राहिलेल्या युरोपीय राष्ट्रांचाही तो अधिकृत धर्म बनला. रोमन साम्राज्याची भाषा लॅटिन ही असल्यामुळं तीच तिथल्या ख्रिस्ती धर्माचीही भाषा बनली व लॅटिनमध्येच बायबलचा नवा अवतार सिद्ध झाला; पण लॅटिन ही युरोप खंडातल्या ग्रीकसारखीच अभिजात भाषा नव्हे. तिथं जर्मन, फ्रेंच, इंग्लिश अशा आधुनिक भाषांचा जन्म झाल्यानंतरही बराच काळ ख्रिस्ती धर्माचा व्यवहार लॅटिन या अभिजात पंडित भाषेमध्येच होई. या परंपरेला आव्हान देत जर्मनीतल्या मार्टिन ल्यूथरनं त्याच्या मायबोलीत म्हणजेच जर्मन भाषेत बायबलचा अनुवाद केला. यथावकाश युरोपातल्या इतर भाषांमध्येही ल्यूथरचा कित्ता गिरवण्यात आला; पण हा सगळा प्रकार ज्ञानेश्वरीनंतर काही शतकानंतरचा आहे, हे लक्षात घेतलं म्हणजे ज्ञानेश्वरीचं महत्त्व कळेल. ल्यूथरनं जर्मन या देशी भाषेत बायबल लिहिलं. हा बंडखोर अशा प्रोटेस्टंट पंथाच्या चळवळीचा महत्त्वाचा भाग मानला जातो. तत्पूर्वी, युरोपातल्या ख्रिस्ती धर्मावर रोममध्ये वास्तव्य करून असलेल्या पोपचा अधिकार चाले. वेगवेगळ्या देशांमधले स्थानिक सत्ताधारीसुद्धा त्याला दबून व नमून असत. रोमन साम्राज्याचं विघटन झालं तरी पोपचं महत्त्व अबाधितच राहिलं होतं. नंतरच्या काळात स्पेन, पोर्तुगाल आदी देशांनी आपापल्या वसाहती जगभर पसरवत तिथं ख्रिस्ती धर्माची राज्यं निर्माण केली व साम्राज्यवादाचा पाया रचला. ‘देवाचं राज्य तुमच्या अंतरात आहे,’ असं सांगणाऱ्या येशूच्या धर्माला खरोखरीच्या बाह्य साम्राज्यांची जोड मिळाली. पोपनं ज्ञातच नव्हे तर अज्ञात जगही या राष्ट्रांना सत्ता गाजवण्यासाठी वाटून दिलं.

या चढाओढीत इस्लाम मागं नव्हताच. इस्लामनं ख्रिस्ती राष्ट्रांच्या अस्तित्वाला आव्हान दिलं. या दोन धर्मांच्या राष्ट्रांमध्ये कित्येक दिवस धर्मयुद्धं झाली. जसा ख्रिस्ती धर्माचा पोप, तसा इस्लामचा खलिफा. पोपच्या हातात धार्मिक सत्ता प्रत्यक्षपणे व राजकीय सत्ता अप्रत्यक्षपणे होती. याउलट खलिफाच्या हाती राजकीय आणि धार्मिक अशा दोन्ही सत्ता एकवटल्या होत्या. खलिफा हे पद मुळात अरबस्तानात निर्माण झालं असलं तरी नंतर ते तुर्कस्तानमध्ये स्थानांतरित झालं. तुर्कस्तानचा सुलतान हाच खलिफा. तुर्कस्तानचं स्वतःचं साम्राज्य तर निर्माण झालंच; पण खलिफाच्या आशीर्वादानं व प्रोत्साहनानं अनेक इस्लामी धर्मवीरांनी तलवार हातात घेऊन राज्यविस्तार व धर्मविस्तार केला. या दोन धर्मांची विस्तारासाठी जणू चढाओढच लागली.

यापूर्वी आपल्या धर्माला विश्वधर्म करण्याचा प्रयत्न बौद्ध धर्मानं केला होता. त्यासाठी उदाहरणार्थ, अशोक किंवा हर्षवर्धन यांनी राज्ययंत्रणाही राबवली; परंतु त्यासाठी त्यांनी लढाया केल्या नाहीत. विश्वधर्म करण्यासाठीचा त्यांचा मार्ग शांततेचा होता.
ख्रिस्ती सत्ताधाऱ्यांच्या सक्तीच्या मार्गाला पुढं मिशनऱ्यांच्या सेवाभावी वृत्तीची जोड मिळाली, हे नाकारायचं काही कारण नाही. इस्लाममध्ये मात्र अशा प्रकारच्या ‘मिशनरी’ वृत्तीला स्थान दिसत नाही. अर्थात सेवाकार्याला असं संस्थात्मक रूप द्यायची प्रवृत्ती पारंपरिक हिंदू धर्मातही दिसत नाही, म्हणून तर स्वामी विवेकानंदांना आपल्या सेवासंस्थेचं नामकरण करताना (रामकृष्ण) ‘मिशन’ हाच शब्द वापरावा लागला.

अशा प्रकारे वैश्विक होण्याची प्रवृत्ती धर्मांमध्ये दिसून येते, तशीच ती सत्तेच्या माध्यमातून राष्ट्रांमध्ये व राष्ट्रप्रमुखांमध्येही दिसून येते. अलेक्‍झांडर, नेपोलियन, हिटलर ही नावं यासंदर्भात सहजपणे नजरेसमोर येतात. जिथं धर्मप्रसारकांना बलप्रयोगाचं वावडं नाही, तिथं राजकारण्यांसाठी तर हा बलप्रयोग स्वाभाविकच मानायला हवा आणि जिथं धर्म आणि राजसत्ता एकमेकांना पूरक असतात, तिथं तर ती सर्वमान्य रीतच असते.

नेपोलियन आणि हिटलर यांच्या अगोदरच्या ज्या काळाचा आपण विचार केला, त्याला ‘मध्ययुग’ असं म्हणण्याची प्रथा आहे (अलेक्‍झांडरचा काळ म्हणजे प्राचीन युग होय). प्रबोधनकाळानंतर विशेषतः विज्ञानाच्या प्रगतीमुळं काळाचं एक नवं पर्व सुरू झालं, त्याला आपण भांडवलशाही म्हणतो. धर्माप्रमाणेच भांडवलशाहीमध्येही अंगभूत विस्तारक्षमता असते; पण तिचा विस्तार हा बाजारपेठेचा विस्तार असतो. त्यातून एका वेगळ्या प्रकारच्या साम्राज्यवादाचा उदय होतो. या काळात धर्माचं महत्त्व तसं कमी झालेलं दिसतं. तुर्कस्तानचा खलिफा केमाल अतातुर्क यानं स्वतः होऊन खिलाफतीचा त्याग केला; नव्हे ती रद्दबातल ठरवली व पूर्णपणे आधुनिकतेची कास धरली. कार्ल मार्क्‍सला अभिप्रेत असलेल्या भांडवलशाहीच्या प्रतिसिद्धान्तामध्ये म्हणजे साम्यवादामध्ये तर धर्माला स्थानच नाही; पण तोसुद्धा भांडवलशाहीप्रमाणे विस्तारक्षमच आहे. भांडवलशाहीच्या विस्ताराची प्रेरणा वैयक्तिक नफा ही असते, तर साम्यवाद समपटीची भाषा करतो; पण शेवटी विस्तारत विस्तारत सगळं जग पादाक्रांत करणं हे त्याचंही उद्दिष्ट आहेच.

खिलाफतीच्या विसर्जनामुळं जसा इस्लामच्या विस्तारवादाला आपसूकच शह बसला, तसाच सोव्हिएत रशियाच्या पतनामुळं साम्यवादाच्या विस्तारवादाला बसला. मात्र, त्यामुळं भांडवशाहीला मोकळं रान मिळालं. अर्थात दरम्यानच्या काळात तिचं स्वरूप खूपच बदललं आहे; किंबहुना साम्यवादाच्या दबावामुळं तिला ते बदलावंच लागलं. हा बदल घडवून आणताना तिनं विज्ञान व तंत्रज्ञान यांची पुरेपूर मदत घेतली, हा भाग वेगळा.

सोव्हिएत युनियन व त्यापाठोपाठ इतर साम्यवादी राष्ट्रांच्या पतनानंतर (चीन हे काही खरं साम्यवादी राष्ट्र नव्हे) भांडवलशाही एकदम निरंकुश व अकुतोभय झाली, असं वाटत असतानाच तिला इस्लामी दहशतवादाकडून जोरदार आव्हान मिळालं. दहशतवादाचा अगदी अलीकडचा कार्यक्रम म्हणजे खिलाफतीच्या राजवटीच्या पुनरुज्जीवनाचा प्रयत्न. या प्रक्रियेची कल्पना असल्यामुळंच की काय, सॅम्युएल हन्टिग्टन या विचारवंतानं या इतिहासाची मांडणी सांस्कृतिक संघर्षाच्या चौकटीत करायला सुरवात केली.

हे सगळं घडत असताना आधुनिक काळातले भारतीय विचारवंत व राजकारणी काय करत होते, याकडंही लक्ष द्यायला हवं. महात्मा गांधीजींनी अहिंसात्मक संघर्षाची म्हणजेच सत्याग्रहाची मांडणी केली. भांडवलशाही आणि साम्यवाद यांच्यातला समन्वय साकार व्हावा म्हणून त्यांनी विश्वस्तवादाचा पुरस्कार केला, ज्यानुसार भांडवलदार हे त्यांनी कमावलेल्या संपत्तीचे मालक नसून विश्‍वस्त आहेत. धर्माच्या क्षेत्रात गांधीजींनी सर्वधर्मसमभावाचा पुरस्कार केला.

गांधीजींच्या विचारांचा विस्तार एका बाजूला आचार्य शं. द. जावडेकर यांनी सत्याग्रही समाजवादात, तर विनोबांनी सर्वोदय-अंत्योदयात केला. विनोबांची भूदानाची चळवळ ही या विस्ताराचंच प्रत्यक्ष व्यावहारिक रूप होतं. जावडेकरांना कुणी समर्थ राजकीय अनुयायी न मिळाल्यामुळं त्यांचे विचार पुस्तकात चर्चेपुरते मर्यादित राहिले.
इकडं भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी गांधीविचारांची अंमलबजावणी आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या पातळीवर करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा ‘अलिप्ततावाद’, ‘पंचशील’ हा त्याचाच एक भाग होय. मात्र, नेहरू यांच्या मृत्यूनंतर राजकारणाची सगळी परिमाणंच  बदलून गेली. इकडं जयप्रकाश नारायण यांच्या काँग्रेसविरोधी चळवळीमुळं विनोबांच्या सर्वोदयी कार्यकर्त्यांमध्येच फूट पडली आणि खुद्द जयप्रकाश यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अनुयायांची जी राजकीय पळापळ झाली ती आपण पाहिली व पाहत आहोत.

इथं विनोबांचा उल्लेख एका वेगळ्या संदर्भात करण्याची आवश्‍यकता आहे. वेदोपनिषदांपासून ते ज्ञानोबा-तुकोबांपर्यंतची संपूर्ण भारतीय परंपरा विनोबा कोळून प्यायले होते. शिवाय, इतर सगळ्या धर्मांच्या ग्रंथांचा त्यांनी मुळात म्हणजे त्यांच्या त्यांच्या भाषांमधून अभ्यास केला होता. विनोबांची दृष्टी वैश्विक झालेली होती. ‘जय जगत्‌’ ही घोषणा म्हणजे याच दृष्टीचा परिपाक होय. या दृष्टीमुळंच त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला पाठिंबा दिला नाही व आचार्य अत्रे यांच्यासह संपूर्ण महाराष्ट्राचा रोष ओढवून घेतला.

विनोबांचा संतवाङ्‌मयाचा व्यासंग जबरदस्त होता. ‘संतांचा प्रसाद’ हे त्यांचं तुकोबांच्या अभंगांचं सार्थ संकलन एकटंच त्यांच्या या व्यासंगाची साक्ष पटवण्यास पुरेसं आहे. शिवाय, त्यांनी वेगवेगळ्या संतांच्या भजनांची म्हणजे अभंगांचीही संपादनं केली. ‘ज्ञानेश्वरी’ हा तर त्यांच्या आवडीचा विषय; पण तरीही ज्ञानेश्वरांच्या पसायदानाची जेवढी दखल त्यांनी घ्यायला हवी होती, तेवढी घेतलेली दिसत नाही. पसायदानातून त्यांच्या विश्वकुटुंबवादाला हवं तितकं पाठबळ मिळालं असतं. विसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकात महाराष्ट्रधर्माचं त्रिविक्रमस्वरूप स्पष्ट करणारे विनोबा सहाव्या दशकातल्या पहिल्या पावलाला म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला सामोरे जाताना गडबडले. वास्तविक, विनोबा या चळवळीला अधिक व्यापक स्वरूप देऊ शकले असते.

अर्थात तेव्हाच्या चळवळीच्या अग्रभागी असणाऱ्या साम्यवादी नेत्यांचीही (कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे इत्यादी) दृष्टी वैश्विक होती. मार्क्‍सचा कम्युनिझम वैश्विकतेचाच विचार सांगणारा पंथ नाही का? आणि हे लोक ज्यांच्या विरोधात उभे ठाकले होते, त्या मोरारजी देसाई, स. का. पाटील आदी मंडळींचा भांडवलवादी विचार वैश्‍विक नव्हता, असं तरी कोण म्हणू शकेल? अर्थात दोघांच्या वैश्विकतांमध्ये फरक आहेच. कम्युनिस्टांची वैश्विकता समाजवादी, तर भांडवलशाहीची वैश्विकता व्यक्तिवादी आहे.

विनोबांच्या वैश्विकतेची जातकुळीच वेगळी होती; पण त्यांनी ते सगळं स्पष्ट न करता ‘चळवळीला माझा पाठिंबा नाही,’ असं म्हणून गप्प बसायचं ठरवलं असावं. खरंतर ते म्हणू शकले असते, की ‘महाराष्ट्र हा ‘एसएसझेड’ म्हणजे ‘स्पेशल स्पिरिच्युअल झोन’ आहे, म्हणून त्याला स्वतंत्र अस्तित्व हवं आहे! गांधीजींनीच म्हटल्यानुसार तो त्याग, क्‍लेश आणि ज्ञान यांचा आदर्श आहे, म्हणून त्याचं वेगळं राज्य पाहिजे.’ या राज्याच्या माध्यमातून तो देशापुढंच नव्हे, तर जगापुढंच एक वेगळा आदर्श ठेवू शकेल.’

विनोबांच्या या प्रतिपादनावर कम्युनिस्टांनी ‘हे प्रतिपादन ‘युटोपियन’ व म्हणून अवैज्ञानिक आहे,’ अशी टीका केली असती; पण त्यामुळं फारसं बिघडलं असतं, असं म्हणायचं कारण नाही. थोडक्‍यात, विनोबांनी एक चांगली संधी वाया घालवली असंच म्हणावंसं वाटतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.