Ringan : व्रतस्थ लेखकाचा सन्मान

‘आभाळाला शिडी लावावी आणि आभाळच वरवर सरकत जावं असं झालं’ असं ‘रिंगाण’ या कादंबरीत एक वाक्य आहे.
sahitya akademi award 2023 declared krushnat khot ringan get prize for marathi language
sahitya akademi award 2023 declared krushnat khot ringan get prize for marathi languagesakal
Updated on

- विजय चोरमारे

‘आभाळाला शिडी लावावी आणि आभाळच वरवर सरकत जावं असं झालं’ असं ‘रिंगाण’ या कादंबरीत एक वाक्य आहे. साहित्य अकादमीच्या पुरस्कारांचं अलीकडं काहीसं असंच होतं. काही महत्त्वाच्या पुस्तकांची चर्चा होत राहते आणि प्रत्यक्षात वेगळ्याच पुस्तकाला पुरस्कार जाहीर होतो.

साहित्य अकादमीच्या पुरस्कारांचं म्हणून एक राजकारण असतं. त्याहीपेक्षा या पुरस्कारासाठी अनेक गोष्टी जुळून याव्या लागतात. त्या काळात स्पर्धेतली पुस्तकं कोणती आहेत, नेमलेले परीक्षक कोण आहेत, त्यांची मानसिकता, त्यांच्या आवडी-निवडी, त्यांचे हितसंबंध काय आहेत याही गोष्टी महत्त्वाच्या ठरतात.

एखाद्या लेखकाच्या आधीच्या चांगल्या कलाकृतीला डावललं गेलं असेल तर नंतरच्या एखाद्या पुस्तकाला पुरस्कार देऊन परिमार्जन केलं जातं. भालचंद्र नेमाडे यांच्या ‘टीकास्वयंवर’ला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला तेव्हा ज्येष्ठ समीक्षक म. द. हातकणंगलेकर यांनी ‘सकाळ’मध्येच लिहिलेल्या लेखात, ‘ ‘कोसला’च्या वेळी झालेली चूक साहित्य अकादमीनं दुरुस्त केली’, असं लिहिलं होतं.

ग्रेस, ना. धों. महानोर हे मोठेच कवी होते; पण ग्रेस यांना अकादमीचा पुरस्कार दिला गेला तो ललित लेखनासाठी. महानोरांच्या ज्या ‘पानझड’ संग्रहाला अकादमीचा पुरस्कार मिळाला तो तेवढ्या दर्जाचा नव्हता; पण कारकीर्दीचा गौरव म्हणून त्याकडे पाहिलं गेलं.

एका वर्षी ज्या पुस्तकाला अकादमीचा पुरस्कार मिळाला त्या वर्षीच्या तीनपैकी दोन परीक्षकांनी ते पुस्तक वाचलंही नव्हतं! पण एका मोठ्या लेखकाला विरोध करण्यासाठी म्हणून त्यांनी त्या पुस्तकाच्या पारड्यात वजन टाकलं.

विश्वास पाटील यांची ‘पानिपत’पासून चर्चा सुरू होती; परंतु त्यांना पुरस्कार मिळाला ‘झाडाझडती’ साठी. रंगनाथ पठारे यांना ‘ताम्रपट’साठी पुरस्कार मिळाला; परंतु तो त्याआधी ‘चक्रव्यूह’ साठीच मिळायला हवा होता. व्यंकटेश माडगूळकरांच्या ‘सत्तांतर’च्या वेळचं महाभारत हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे.

कृष्णात खोत यांच्या ‘रिंगाण’ या कादंबरीला मिळालेल्या साहित्य अकादमीच्या पुरस्काराचा अशा सगळ्या पार्श्वभूमीवर विचार करावा लागतो. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर संबंधित लेखकाचं महिमागान सुरू होतं. एरवी त्या लेखकाला न हिंगलणारी मित्रमंडळी, चाहते, ज्ञातिबांधव, व्यवसायबंधू असे सगळे पुढे येतात.

‘रिंगाण’ला पुरस्कार जाहीर झाल्यानंतर जाणवणारा फरक म्हणजे, या कादंबरीचे चाहते पुढं आले आहेत. ‘रिंगाण’ला पुरस्कार मिळाल्याबद्दल सामान्य वाचकांपासून ते नामवंत समीक्षक-साहित्यिकांपर्यंत सगळ्या घटकांनी आनंद व्यक्त केला आहे. लेखकापेक्षा कलाकृती महत्त्वाची ठरली आहे. वर्तमान वाङ्मयीन पर्यावरणातली ही मोलाची गोष्ट आहे.

खोत यांची लेखक म्हणून कारकीर्द वीसेक वर्षांची आहे. या काळात मोजकं; परंतु कसदार लेखन करून त्यांनी मराठी साहित्यात आपली ओळख ठळकपणे निर्माण केली आहे. ‘गावठाण’ ही त्यांची पहिली कादंबरी २००५ मध्ये प्रसिद्ध झाली आणि खोत यांचं नाव मराठी साहित्यविश्वाला परिचित झालं.

‘रौंदाळा’, ‘झडझिंबड’, ‘धूळमाती’, ‘रिंगाण’ या त्यांच्या नंतरच्या कादंबऱ्या. ‘नांगरल्याविन भुई’ (२०१७) हा व्यक्तिचित्रणांचा संग्रह. याशिवाय, त्यांनी कथालेखनही केलं आहे. त्यांच्या कादंबऱ्यांमधून आलेलं गावगाड्याचं, शेतीसंस्कृतीचं आणि तिथल्या पशू-पक्ष्यांचं, तसंच प्राणिजीवनाचं चित्रण वैशिष्ट्यपूर्ण आहे.

खोत यांच्या कादंबरीलेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यात आलेला भूप्रदेश. कोल्हापूरच्या पश्चिमेकडच्या पन्हाळ्याचा पायथा आणि त्याच्या आसपासचा प्रदेश तिथल्या रंग-गंध-बोलीसह त्यांच्या साहित्यात आला आहे.

‘गावठाण’ या त्यांच्या पहिल्या कादंबरीचं ते एक प्रमुख बलस्थान होतं. ‘धग’, ‘पाचोळा’ या मराठीतल्या कसदार कादंबऱ्यांच्या पंगतीत बसणारी ‘गावठाण’ ही कादंबरी आहे. आनंदी या मुलीचा काळजाला भिडणारा जीवनसंघर्ष तीत आहे.

खेड्यातलं बदलतं वास्तव आणि जमीनविक्रीचा व्यवहार यांचं अस्वस्थ करणारं चित्रण ‘धूळमाती’मध्ये आलं आहे. गावगाड्यातल्या राजकारणाचं चित्रण करणारी ‘रौंदाळा’ आणि पावसाचं भीषणभयानक रौद्ररूप चितारणारी ‘झडझिंबड’ याही खोत यांच्या कादंबऱ्या स्वतंत्रपणे लक्षात राहणाऱ्या आहेत.

व्रतस्थपणे लेखन करणाऱ्या लेखकाच्या कसदार कादंबऱ्या म्हणून त्यांचं मोल आहेच; परंतु त्याही पलीकडे लेखकानं जी उंची गाठायला हवी असते ती गाठता आली नव्हती; ती त्यांनी ‘रिंगाण’ मध्ये गाठली.

चांदोलीच्या अभयारण्यातून विस्थापित झालेल्या लोकांची ही कहाणी आहे. त्याअर्थानं त्यांच्या नेहमीच्या भूप्रदेशापेक्षा हा वेगळा प्रदेश आहे. मराठीतली अलीकडच्या काळातली अद्भुत म्हणता येईल अशी ‘रिंगाण’ ही कादंबरी आहे.

प्रकल्पासाठी घरादारावर पाणी सोडावं लागलेल्या, उठवल्या गेलेल्या माणसांची परवड हा ‘रिंगाण’चा एक धागा आहे. तो धागा पुढं नेत ही कादंबरी माणसांचं जग ओलांडून मुक्या जनावरांच्या भावविश्वात घेऊन जाते.

गाव सोडताना वांझ म्हणून मागं सोडून दिलेल्या म्हशींचं काय होतं? माणसांच्या सहवासात वाढलेल्या जनावरांवर एकाएकी जंगलात राहण्याची वेळ येते तेव्हा आलेल्या प्रसंगाशी त्या कशा जुळवून घेतात?

जनावरांशी नातं तोडून नव्या गावाची वाट धरणाऱ्या देवाप्पाला पुन्हा त्यांच्याशी जुळवून घेण्यासाठी कशी झुंज द्यावी लागते...ती देता देता आतून तुटून तो कसा उद्ध्वस्त होत जातो...हे सगळं वाचकाला आतून-बाहेरून पार उदसून टाकणारं आहे.

खोत यांनी कादंबरीत माणसांच्या केवळ मनातलंच काहूर पकडलेलं नाही, तर दृश्यस्वरूपात त्यांच्या जगण्यात काय काय बदल घडू लागले आणि छोट्या छोट्या गोष्टींनीही या माणसांना किती संभ्रमित केलं याचं चित्रण बारकाईनं केलं आहे.

कादंबरीतली भाषा रानातल्या झऱ्यासारखी प्रवाही आहे. तिला एक प्रकारचा ताल आहे आणि बोलता बोलताच ती काव्यात्म बनते. ‘तहानलेला जीव, पाण्याची ठिकाणं गाठायचो. ठिकाण बघून नटून पाणी व्हायचो’, ‘देवाप्पाच्या मनात सावली खाली करून आभाळभर ऊन पसरत निगालं’, ‘त्याच्या मनात चमकून गेलं, देवा, ह्ये जंगलच उचलून नेता आलं तर! त्याच्या आत सगळं जंगल उगवत निघालं. तो स्वत:लाच शोधत निगाला’, अशी कितीतरी उदाहरणं सांगता येतील.

पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर पाच वर्षं साहित्य अकादमीच्या स्पर्धेत राहतं. त्यादृष्टीनं ‘रिंगाण’चं यंदाचं शेवटचं वर्ष होतं. यंदा हुकलं असतं तर ही कादंबरी साहित्य अकादमीच्या पुरस्कारापासून वंचित राहिली असती.

त्यामुळे कादंबरीचं किंवा लेखकाचं काही नुकसान झालं नसतं; परंतु साहित्य अकादमीला ते लांच्छनास्पद ठरलं असतं. पुरस्कारासाठी अनेक लेखक आभाळाला शिडी लावतात आणि आभाळ वर वर जात राहतं. ‘रिंगाण’सारख्या कादंबरीला शिडी लावायची गरज नसते, आभाळच खाली येत असतं! म्हणूनच या पुरस्काराचा आनंद लेखकापेक्षाही वाचकांना अधिक झालेला दिसतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()