साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे

मी दहावीत असताना ‘स्मशानातील सोने’ हा मराठी पुस्तकातला धडा शिकताना सुरुवातीला जो लेखकाचा परिचय असतो, त्यात मला अण्णा भाऊ साठे पहिल्यांदा लेखक म्हणून अनुभवायला मिळाले.
Anna Bhau Sathe
Anna Bhau SatheSakal
Updated on

- प्रा. विशाल गरड, vishalgarad.18@gmail.com

मी दहावीत असताना ‘स्मशानातील सोने’ हा मराठी पुस्तकातला धडा शिकताना सुरुवातीला जो लेखकाचा परिचय असतो, त्यात मला अण्णा भाऊ साठे पहिल्यांदा लेखक म्हणून अनुभवायला मिळाले. कोवळ्या वयातही त्या धड्यात शिकलेला भीमा आणि स्मशानात त्या मढ्याच्या तोंडात अडकलेली त्याची बोटं डोळ्यासमोरून जात नाहीत. एकदा वाचलेला तो धडा हयातभर विसरू शकणार नाही. हीच खरी ताकद होती अण्णा भाऊंच्या लेखणीची.

अण्णा भाऊंचं पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असं असलं, तरी ते सगळ्या जगात त्यांचं नाव प्रचलित झालं ते अण्णा भाऊ म्हणूनच. अण्णा भाऊ म्हणजे शंभर नंबरी सोनं होतं ते, ज्या सोन्याची योग्य किंमत आणि सन्मान भूतकाळाला ठेवणं जमलं नाही. म्हणून या महापुरुषाचा विचार वाचून किमान वर्तमानानं तरी त्यांचा सन्मान ठेवावा, जेणेकरून भविष्यकाळातील पिढीला साहित्यातून इतिहास घडविण्याचे सामर्थ्य मिळेल.

‘पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती कष्टकरी व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे,’’ हा श्रेष्ठ विचार देणाऱ्या साहित्यरत्न अण्णा भाऊ साठेंची एक ऑगस्टला जयंती असते तर याच महिन्यात १८ तारखेला पुण्यातिथी. दीड दिवस शाळेत गेलेल्या अण्णांनी ४८ वर्षांच्या अल्प आयुष्यात तब्बल ३५ कादंबऱ्यांसह १९ कथासंग्रह, १४ लोकनाट्य, १५ पोवाडे, एक प्रवासवर्णन आणि कित्येक लावण्या आणि अनेक गाणी लिहिली.

त्यांच्या अनेक कादंबऱ्यांवर चित्रपट झाले. शिकलेल्या माणसाला सुद्धा जितके साहित्य प्रकार माहीत नसतील, तितक्या साहित्य प्रकारांवर अण्णांनी मोहर उमटवली. त्यांची लेखणी वंचित आणि शोषितांच्या प्रश्नांवर विशेष तळपली. जो कोणी अण्णांचे साहित्य वाचतो, त्याचे शब्द आपसूकच सर्वसामान्यांच्या न्याय हक्कांसाठी तळपतात. डोळ्याला दिसणाऱ्या गोष्टींपेक्षा जो लेखक भोगलेल्या गोष्टी लिहितो ते साहित्य जास्त जिवंत असते म्हणूनच अण्णांचं लिखाण अजरामर झालंय.

साहित्यातील ज्ञानपीठ पुरस्कार सुद्धा अण्णांच्या ग्रंथसंपदेसमोर नतमस्तक होईल, इतक्या उंचीचं लिखाण ते आपल्यासाठी ठेवून गेले आहेत. पण आजही त्यांचे लिखाण वाचनालयातील पुस्तकांच्या कपाटातून तळागाळापर्यंत म्हणावं तितक्या ताकदीनं पोहोचलं नाही याची खंत वाटते.

आज आपल्याला फक्त भाषांची नावं सांगायची म्हणलं तरी दहा-बारा भाषांनंतर आठवत बसावं लागतं पण अण्णांचं लिखाण जगभरातील तब्बल २७ भाषांत भाषांतरित झालंय हे समजल्यावर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची उंची कळते. दुःख, दारिद्र्य, अन्याय, अस्पृश्यता, गुलामगिरी, चळवळ, हे शब्द म्हणजे जणू अण्णा भाऊंच्या लेखणीतली शाई बनले म्हणूनच भूतकाळात, वर्तमानकाळात आणि भविष्यकाळात ज्या ज्या वेळी वरील शब्द उच्चारले जातील, तेव्हा तेव्हा प्रतिध्वनी म्हणून अण्णांचे साहित्य ऐकू येईल.

अण्णांच्या आयुष्यातला रशिया वारीचा प्रसंग प्रत्येक शिवभक्ताला अभिमान वाटणारा आहे. १९६१ मध्ये मॉस्को शहरातील लेनिन चौकात झालेल्या एका मोठ्या कार्यक्रमात अण्णा भाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांवरचा पोवाडा गायला. तो पोवाडा ऐकून खुद्द रशियाच्या अध्यक्षांनी स्टेजवर जाऊन अण्णांचं कौतुक केलं.

पुढं जेव्हा आपल्या देशाचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू रशिया दौऱ्यावर गेले, तेव्हा तिथल्या नेतेमंडळींच्या बोलण्यात होत असलेला शिवरायांचा उल्लेख ऐकून ते आश्चर्यचकित झाले. त्यांनी तेथील रशियन लोकांना विचारले, तेव्हा त्यांना अण्णा भाऊंबद्दल समजले.

आज घडीला आपल्याकडून अशी कामगिरी होऊ शकते का? ज्यात आपण परदेशात कला सादर करावी आणि त्याची प्रतिक्रिया आपल्या पंतप्रधानांना मिळावी. यासाठी अण्णा भाऊ द ग्रेट ठरतात. आजघडीला रशियाच्या राजधानीत साहित्यरत्न अण्णा भाऊंचा पुतळा आहे, ही गोष्ट प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाची आहे.

'जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मज भीमराव' असं सांगून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार अण्णांनी तहहयात जोपासला. कथा, कादंबऱ्या, काव्य, लावणी, पोवाडे या शस्त्रांच्या माध्यमातून त्यांनी व्यवस्थेवर शब्दांचे घाव घालून ती बदलण्याचा प्रयत्न केला म्हणूनच इथल्या मातीतल्या हरएक वंचित-शोषित दलिताच्या कानात तो आवाज पिढ्यानपिढ्या घुमतो आहे. आजही जेव्हा आपल्यावर अन्याय होतो, तेव्हा दगड बनून मठ्ठ बसण्यापेक्षा हातोडा होऊन घाव घातले पाहिजे, ही शिकवण अण्णा भाऊंच्या चरित्रातून मिळते.

छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज या सर्व महापुरुषांचा विचार फक्त मिरवण्यापुरता न ठेवता तो वाड्या, वस्त्या आणि झोपडपट्ट्यांत राहणाऱ्या सर्वसामान्यांच्या मनात मुरवण्याचे काम अण्णा भाऊंनी केलं म्हणूनच ते खरे खुरे शिवभक्त, भीम अनुयायी आणि समाजसुधारक ठरतात.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीत “माझी मैना गावावर राहिली तिच्या जीवाची होतीया काहिली” ही मराठी साहित्यातल्या लावणी प्रकारातली पहिली छक्कड लिहिणारे अण्णा पहिलेच लेखक होते. याच छक्कडमधे अण्णांनी सत्तर वर्षांपूर्वी लिहून ठेवलंय, “ही मुम्बई यंत्राची, तंत्राची, जागनाराची, मरनारांची, शेंदिची, दाढ़ीची हडसनच्या गाडीची, नायलोनच्या, जोर्जेटच्या, तलम साडीची. बुटांच्या जोडीची पुस्तकांच्या थडीची, माडीवर माडी हिरव्या माडीची, पैदास इथे भलतीच चोरांची.

एतखाऊची, शिर्जोरांची, हरामखोरांची, भांडवलदाराची, पोटासाठी पाठ धरली होती मी कामाची पर्वा केली नाही उन्हाची, थंडीची, पावसाची.” हे वाचून जणू आजच्या मुंबईचेच हे वर्णन केलंय असं वाटावं इतका काळाचा वेध घेणारी अण्णांची लेखणी होती. म्हणूनच त्यांच्या छक्कडवर तयार केलेले गाणे आजही जनमानसाच्या मनावर अधिराज्य करीत आहे.

घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने पोटापाण्याची सोय करण्यासाठी अण्णा भाऊंनी त्यांच्या सांगली जिल्ह्यातल्या वाटेगावपासून ते मुंबई असा पायी प्रवास केला. रस्त्याने चालता चालता दुकानाच्या पाट्या वाचून वाचनाची भूक भागवली, पुढे मुंबईत आल्यावर त्यांनी हेल्पर म्हणून, कधी सिनेमा थिएटरमध्ये द्वारपाल म्हणून तर वेळप्रसंगी बूटपॉलिशवाला बनून पोटाची खळगी भागवली.

अशी मिळेल ती कामे करत करत अखेर ते नायगाव मिल, कोहिनूर मिल या ठिकाणी कामगार म्हणून लागले आणि याच ठिकाणी त्यांचा संबंध कामगार चळवळीशी आला. स्वतःचे दुःख आणि वेदना त्यांनी लेखणीतून कागदावर उतरवल्या आणि आपल्या शाहिरी बाण्यातून त्या जगासमोर मांडल्या.

अस्सल मातीतून निपजलेलं हे साहित्य केवळ जागतिक कीर्ती मिळवून थांबलं नाही तर त्यानं सर्वसामान्यांच्या मनामनांत क्रांती रुजवली, संघर्ष रुजवला आणि अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची ऊर्मी दिली म्हणूनच अण्णांच्या नावाआधी साहित्यरत्न आणि लोकशाहीर ही बिरुदं लागली.

अशा या लोकशाहिराचे आणि साहित्यसम्राटाचे शब्दसाम्राज्य तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवायचे असेल, तर फक्त वर्षकाठी एकदा त्यांना मिरवणुकीतून मिरवण्यासोबतच जर प्रबोधनातून आणि लोकव्याख्यानातून त्यांच्या विचारांचा जागर गावोगावी झाला, तर कष्टकरी हातांना आयुष्य जगण्याचे, हक्क मिळवण्याचे आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ मिळेल.

(लेखक हे प्रसिद्ध व्याख्याते आणि इतिहास व विविध सामाजिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.