सह्याद्रीचा माथा : सुषमा अंधारे जोमात अन् सत्ताधारी कोमात

Sushma Andhare
Sushma Andhareesakal
Updated on

शिवसेनेच्या नवनियुक्त उपनेत्या सुषमा अंधारे चार दिवस जळगाव जिल्हा दौऱ्यावर होत्या. अंधारे यांच्या सभांना जळगाव जिल्ह्यात प्रचंड गर्दी झाली होती. विशेष म्हणजे सर्वपक्षीय कार्यकर्ते या सभांना दिसून येत होते. दौरा संपल्यानंतर अंधारे यांच्या भाषणांच्या क्लीप मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊन त्यांनाही प्रचंड प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे ठाकरे गट जोमात, तर शिंदे गट कोमात असल्याचं चित्र जळगाव जिल्ह्यात निर्माण झालंय.

जळगाव जिल्ह्यातील पाच आमदार शिंदे गटात दाखल झाल्याने ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये कमालीची मरगळ आली होती. अंधारे यांच्या दौऱ्यानं या कार्यकर्त्यांना मोठं टॉनिक मिळालं आहे. निर्भिड आणि फर्डा वक्ता लोकांना किती हवाहवासा वाटतो, हे अंधारे यांच्या भाषणांना मिळालेल्या प्रतिसादातून स्पष्ट होतं. (Sahyadricha matha saptarang latest marathi article by dr rahul ranalkar on Sushma Andhare nashik news)

Sushma Andhare
तू टिकली लाव...

शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील, चिमणराव पाटील, किशोर पाटील, लता सोनवणे आणि चंद्रकांत पाटील हे शिंदे गटात दाखल झाले. शिवसेनेतील नेते गेल्याने ठाकरे गटात कार्यकर्तेच तेवढे उरले आहेत. विद्यमान आमदार गेल्याने अनेक पदाधिकारी, कार्यकर्तेही शिंदे गटात गेले. त्यामुळे शिंदे गटाचं वर्चस्व जळगाव ग्रामीण, पारोळा, पाचोरा, चोपडा, मुक्ताईनगर येथं प्रामुख्यानं दिसत होतं. ठाकरे गटातील कार्यकर्ते त्यामुळे अस्वस्थ होते. या अस्वस्थतेला सुषमा अंधारेंच्या दौऱ्यानं नवसंजीवनी मिळाली.

पाचही मतदार संघांमध्ये सभा घेण्यासाठी त्या आल्या होत्या. पैकी मुक्ताईनगर वगळता सर्व मतदारसंघांमध्ये अंधारे यांच्या सभेला उत्तुंग प्रतिसाद मिळाला. तीन-चार महिन्यांपूर्वीच शिवसेनेत दाखल झालेल्या अंधारेंची भीती त्या जळगाव दाखल होण्यापूर्वी या पाचही मतदारसंघांमधील आमदारांमध्ये नव्हती. तीन-चार महिन्यांचं बाळ, असंही त्यांना संबोधण्यात आलं. पण असं म्हणणाऱ्यांना अंधारे यांनी चांगलीच चपराक दिली.

लहान बाळ जसं कोणाचेही केस विस्कटू शकतं, त्यांना बोचकारे ओढू शकतं, तसंच आपण शिवसेना सोडून गेलेल्यांना करतोय, असा टोमणा मारायला त्या विसरल्या नाहीत. सोलापूरहून आलेल्या शरद कोळी नावाच्या एका कार्यकर्त्यानेही मोठा गौप्यस्फोट या सभांवेळी केला. शरद कोळी म्हणतो, की पूर्वीच्या शिवसेनेच्या आमदारानं शिवसेनेच्याच महिला आमदाराचं जात प्रमाणपत्र अवैध ठरण्यासाठी केलेली कागदपत्रांची जमवाजमव जनता कशी विसरू शकेल? अंधारेंनी उठवलेली टीकेची झोड शिंदे गटात दाखल झालेले आमदार लवकर विसरू शकणार नाहीत. ३० वर्षांत सगळं देऊनही गद्दारी करणाऱ्यांची निष्ठा एकाएकी गायब कशी होते, असा सवालही अंधारे यांनी उपस्थित केला.

Sushma Andhare
अजूनही नाटक जिवंत आहे!

सहसा गुलाबराव पाटील यांच्या विरोधात भूमिका न घेणाऱ्या गुलाबराव देवकर यांनीही चांगलीच बॅटिंग केली. पूर्वाश्रमीचे ठाकरे गटाचे आमदार शिवसेना सोडून गेलेल्यांवर टीका करताना शेरोशायरी करायचे. तोच शेर देवकर यांनी म्हणून दाखविला.

कतलिया कई साप बदल लेते है,
पुण्य की आड मे अपने पाप बदल लेते है,
और मतलब के लिए कई लोग अपने बाप बदल लेते है...

गुलाबराव देवकर यांच्या या आक्रमक पवित्र्याने जळगाव शहरातून निवडणुकीची तयारी करण्याचा त्यांचा इरादा बदलून ते आपल्या मूळच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघात परतण्याची शक्यता या भूमिकेमुळे निर्माण झाली आहे. पालकमंत्री असलेल्या गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे शिवसेनेला डब्यात घालतील, असं वक्तव्य केलं. तथापि, शिवसेना (ठाकरे गट) डब्यात जाण्याची काळजी गुलाबरावांना कशी? हा प्रश्न आता ठाकरे गटाचे कार्यकर्ते उपस्थित करत आहेत.

वास्तविक पालकमंत्र्यांना असं वक्तव्य करण्याची गरज नव्हती. अंधारे पारोळ्यात गेल्या अन् ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये प्रकाश निर्माण करून आल्या. आबांना उद्देशून त्यांनी अनेक टीकात्मक वक्तव्ये केली. परिपक्व आबांनी अंधारे यांना उत्तर मात्र दिलं नाही. पाचोऱ्यातही टीकेचे आसूड अंधारे यांनी ओढले.

शेवटच्या क्षणी मुक्ताईनगरला सभेची परवानगी नाकारणं ठाकरे गटाच्या आणि खासकरून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पथ्यावर पडणारं आहे. सुषमा अंधारे यांच्या सभांना सामोरे जाण्याची हिंमत विद्यमान आमदारांना झाली नाही, असा संदेश परिसरात गेला आहे. सुषमा अंधारे ज्या रेस्ट हाउसमध्ये थांबल्या होत्या, त्यास शे-पाचशे पोलिसांनी अचानक गराडा घातला. त्यानंतर चोपड्यात देखील जोरदार बॅटिंग करत अंधारे यांनी जळगाव जिल्ह्याच्या सीमारेषा ओलांडल्या. आगामी काळात शिवसेना ठाकरे गटाचे ‘सुषमास्त्र’ शिंदे गटासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Sushma Andhare
गोष्ट माझ्या बायपासची

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.