आयपीएलच्या लिलावानंतर अस्सल क्रीडारसिकांमध्ये एक सार्वत्रिक भावना दिसली की, कोटी कोटीचा मिळणारा मेहनताना हा अपात्री आहे का ? बरं दृश्य असं होतं की, माडगूळकरांचं गाणं आठवलं, ‘मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार! विठ्ठला, तू वेडा कुंभार...’ तो आकाशातला कुंभारही हे सारं पाहून वेडावला असेल.
त्याला कारणं आहेत. भारताचे तीन खेळाडू असे आहेत, जे आंतरराष्ट्रीय क्रिकेटसुद्धा खेळलेले नाहीत. उदा. राहुल त्रिपाठी - त्याला घसघशीत ८.५ कोटी मिळणार आहेत, अभिषेक शर्मा - त्याला ६.५ कोटी मिळणार आणि कार्तिक त्यागीला ४ कोटी. म्हणजे चक्क घरच्या लोण्याचा गोळा. तर, ईशान किशन आणि वानिन्दु हसरंगा या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रांगत असलेल्या क्रिकेटपटूंना तब्बल १५.२५ कोटी आणि १०.७५ कोटी मिळणार आहेत, हे तर थेट डच बटर आहे.
आपल्या देशातल्या कोट्यवधी लोकांची ही आयुष्याची कमाई नाही. ही यादी तशी खूप मोठी आहे. दोन-चार अधिक उदाहरणं देतो. टीम डेव्हिड, ज्याची मूलभूत किंमत २० लाख रुपये आहे, तो मुंबई इंडियन्सने ८.२५ कोटींत विकत घेतला. तीच गोष्ट रोमारियो शेफर्डची; मूळ किंमत ७५ लाख. हैदराबादच्या सनरायझर्सने त्याला ७.७५ कोटींना घेतलं. इतका प्रखर आणि भाग्यवान सूर्य त्याच्या आयुष्यात कधी उगवलाच नव्हता. आणि हो, आवेश खान राहिला. २० लाख मूळ किमतीवरून थेट १० कोटींवर उडी... थांबतो इथं, कारण for better prospects म्हणत नवीन जॉबमध्ये उडी घेताना पहिल्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर आल्यासारखं वाटायचं. इथं ही विशीतली मुलं लिफ्टने थेट ५०, ६० आणि १०० व्या मजल्यावर पोचतात; पण ती लिफ्ट पटकन खालीसुद्धा येते.
जगातला आजचा एक श्रेष्ठ फलंदाज स्टीव्ह स्मिथ विकलाच गेला नाही. गुप्टिलला खरेदी करायला मालक नव्हता. लॅब्युशेन आणि फिंच यांनाही कुणीही विचारलं नाही. हा असा शेअर बाजार आहे, जिथं ब्लू चीप शेअर्स एखाद् दोन खेळाडूच असतात. विराट, रोहित शर्मा, बुमराह वगैरे. उनाड कट नावाचा शेअर एकदा किती वधारला होता ! २०१८ मध्ये त्याला चक्क ११.५ कोटी मिळाले, २०१९ ला तो ८.५ कोटींवर आला, आता तो १.३० कोटीवर आहे. पण, तरी तो आनंदात असेल, कारण या ४ वर्षांत त्याने ३९ आयपीएल सामन्यांत फक्त २९ बळी घेतलेत आणि जे पैसे मिळाले, त्याप्रमाणे त्या एका बळीच्या पाठी त्याला जवळजवळ १.५ कोटी मिळाले. अशी मिळकत फक्त राजकारणात मिळते. पण तिथं ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स वगैरे मागे लागतात. तुम्ही टॅक्स भरला तर इथं तसं काही नाही.
हा अपात्री मेहनताना जो आहे ना, तो जास्त त्रास देतोय आमच्यासारख्या मंडळींना, जे कसोटी क्रिकेट आणि फारतर वन डेच्या फॉरमॅटवर आयुष्यभर पोसले गेले आहेत. आम्ही खेळाडूचं मोठेपण हे त्याच्या कसोटी क्रिकेटच्या परफॉर्मन्सवरून ठरवणारी मंडळी, वन डेच्या परफॉर्मन्सवरही नाही. सुनील गावसकर हा आजही आम्हाला सर्वश्रेष्ठ आघाडीचा फलंदाज वाटतो; सचिन, द्रविड मोठे वाटतात, कारण त्यांचा कसोटीतला भीमपराक्रम. मग वन डेमध्ये रोहित शर्माने कितीही मोठा पराक्रम केला असला, तरी सुनील, सचिन, द्रविडच्या स्तरावर त्याला आम्ही कधीच नेणार नाही. तीच गोष्ट कपिलची. ऑलराउंडर म्हटला की, आम्ही त्याची तुलना कपिलशी करायला जातो; आणि मग त्याच्यापुढे हे सर्व लिलिपुटीयन वाटतात.
त्यामुळं ज्यांनी हे महान क्रिकेटपटू पाहिले आहेत; त्यांची गुणवत्ता, त्यांची मेहनत पाहिली आहे; एक वेगळा दर्जा पाहिलाय, त्यांना हे पैसे अपात्री वाटतात. पण, याला एक दुसरी बाजू आहे, ती आपण समजून घेतली पाहिजे. तुम्हाला मिळणारा पैसा हा तुम्ही कुठल्या इंडस्ट्रीत आहात, त्यावर अवलंबून आहे. होय, आयपीएलला मी एक इंडस्ट्री मानतो. तिथं केवढा पैसा आहे, त्या इंडस्ट्रीला तुम्ही किती उपयुक्त आहात, त्याचं वाटप कसं आहे, यावर तुमची किंमत ठरते; ज्याला आपण सर्वसाधारणपणे दर्जा किंवा गुणवत्ता म्हणतो ना, त्यावर नाही.
प्रसिद्ध गायक मन्ना डेचं एक उदाहरण देतो. मन्ना डेची शास्त्रीय संगीताची तयारी खूप चांगली होती; पण ते शास्त्रीय संगीताकडे न वळता सिनेसंगीताकडं वळले आणि त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं की, ‘‘मला शास्त्रीय संगीतात मुशाफिरी करायला आवडली असती; पण तिथं कारकीर्दीच्या संध्याकाळी तुम्हाला काहीतरी शिकलोय असं वाटतं, थोडंफार नाव गवसतं; पण फार पैसे तिथं नाहीत. सिनेमा संगीतात नाव लवकर मिळतं आणि पैसाही खूप चांगला मिळतो.’’ त्यांनी खऱ्या अर्थानं सत्य सांगितलं. किशोरी आमोणकरसुद्धा गानसरस्वतीच; पण लताचं सांपत्तिक वैभव आणि लोकप्रियता तिच्या वाट्याला कधी आलीच नाही. शेवटी तुम्ही ज्या इंडस्ट्रीत असता, तिथल्या वैभवाप्रमाणे तुम्हाला पैसे मिळतात, त्यामुळे अगदी लता मंगेशकरलासुद्धा मराठीत मिळणारं पाकीट हे हिंदीपेक्षा कितीतरी हलकं असायचं. कारण, मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये हिंदी फिल्म इंडस्ट्रीइतका पैसा नाही.
आयपीएलमध्ये दर्जाप्रमाणे पैसे मिळत नाहीत; ज्या संघाची जी गरज आहे, त्या गरजेप्रमाणे मिळतात. ती गरज भागवण्याचं कौशल्य जर तुमच्याकडे असेल, तर त्या कौशल्याला पैसे मिळतात; आणि त्याचबरोबर तुमच्या कौशल्याचं आणि संघाकडे असलेल्या त्रुटी यांचं टायमिंग जुळायला लागतं. म्हणजे विराट, रोहित, बुमराह वगैरे खेळाडू सोडा; पण इतरांच्या बाबतीत त्यामुळे भरती आणि ओहोटी ही सुरूच राहते. तुमच्या हातावर पैशांची रेषा कशी उमटते ते सांगतो. एकच उदाहरण देतो, हसरंगाचं. त्याला लॉटरी कशी लागली असावी ? कारण तो योग्य वेळेला लिलावात आला. त्याची महत्त्वाची कारणं अशी आहेत की, त्याचा टी-ट्वेन्टीमध्ये विकेट घेण्याचा रेट हा १२.९ आहे आणि इकॉनॉमी रेट हा ६.३२ आहे.
हा खूपच चांगला इकॉनॉमी रेट मानला जातो. सातच्या खाली तो चांगला, ही चांगल्या इकॉनॉमीरेटची टी-ट्वेन्टीतली व्याख्या आहे. त्याला बेंगलोरच्या संघात घेतलं गेलं, कारण गेल्यावर्षी तिथं चहल होता. हा चहल दुसऱ्या संघात गेलाय, त्यामुळे संघाला एका लेगस्पिनर गुगली गोलंदाजाची गरज होती आणि आयपीएलमध्ये लेगस्पिनर गुगली गोलंदाज खूप उपयुक्त ठरतात, हे अलीकडच्या काळात जाणवलंय. पण, तेवढंच कौशल्य त्याला उपयोगी ठरलं नाही. तो खालच्या क्रमांकावर येऊन मोठे फटकेही मारू शकतो. संघाला अशा खेळाडूंची गरज असते. त्याचा स्ट्राइक रेट हा १३६ आहे आणि अशाप्रकारचे खेळाडू हे त्या वेळी लिलावात फारसे नव्हते. कारण पोलार्ड, स्टॉयनीस, आंद्रे रसेल, जडेजा हे त्यांच्या त्यांच्या संघांनी राखले होते, त्यामुळे हसरंगाचा भाव वधारला. पुरवठा कमी आणि उपयुक्तता जास्त असली की, त्या खेळाडूंना भाव मिळतो.
हेटमायरचं उदाहरण घ्या. पाचव्या क्रमांकावर येऊन तो तुफान निर्माण करू शकतो. १५० च्या स्ट्राइक रेटने तो बॅटिंग करतो आणि गेल्या २३ आयपीएल मॅचेसमध्ये त्याचा स्ट्राइक रेट १६० आहे. हेटमायर हा लारा नाही, लाराच्या गुडघ्याएवढापण नाहीये. पण, लाराला हेवा वाटावा असे त्याला पैसे मिळतात, कारण तो योग्य वेळी योग्य जागी आहे. आता यामुळे भविष्यात क्रिकेटवर काय परिणाम होईल? इंजिनिअर, डॉक्टर, सीए, मॅनेजमेंटपेक्षा आयपीएल टी-ट्वेन्टी क्रिकेटमध्ये करिअर बनवणं जास्त आकर्षक ठरेल. ही करिअर त्या खेळाडूची छोटी असेल; पण पाच चांगली वर्षं जर मिळाली ना, तर पुढचं आयुष्य त्याला आरामात, सुखा-समाधानात आणि श्रीमंतीत घालवता येईल. कसोटीपटू व्हायचं आकर्षण आता कमी होत जाईल, कारण टी-ट्वेन्टी हे सिनेमाच्या गाण्यासारखं, त्यामुळे कमी प्रयत्न, अधिक पैसा.
आज आयपीएल एखाद्या खेळाडूला खूप मोठी प्रसिद्धी देत नसेल आणि अजूनही कसोटी क्रिकेटपटू हे महान वाटत असले, तरी काळ बदलू शकतो. ज्या पद्धतीने जगभर टी-ट्वेन्टी क्रिकेटचे चषक खेळवले जातात, किंवा या टी-ट्वेन्टीच्या लिग्स खेळवल्या जातात, किंवा दोन देशांमधल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळवल्या जातात, त्याने वन डे क्रिकेट मागे पडलंय; आणि कसोटी मालिका आता ५ कसोटींची फार कमी वेळा असते, क्वचितच होतात. २ ते ३ कसोटीमध्येच मालिका आटोपली जाते. पुढच्या १०, १५ वर्षांत हे चित्र आणखी बदलू शकतं. क्रिकेटची अभिजात गुणवत्ता मागे पडू शकते आणि पॉवर हीटिंग आणि ४ षटकांची वैविध्यपूर्ण गोलंदाजी ही लोकप्रिय आणि श्रीमंत होऊ शकते. आज नवी पिढी रफी, मुकेश, किशोर, हेमंत, मन्ना डे यांना सोडून अर्जितसिंग किंवा तत्सम कोणात रमली किंवा श्रेया घोषालचे फॉलोअर्स लता नावाच्या सरस्वतीच्या अवतारापेक्षा जास्त झाले आणि त्यांनी श्रेया घोषालला स्वीकारलं. तसंच क्रिकेटचं होईल. वाईट वाटेल; पण आपल्याला हा बदल स्वीकारावा लागेल. जसं भारतीय पदार्थ सोडून आपण हॅम्बर्ग किंवा चायनीज पदार्थ स्वीकारले तसं. बदलत्या काळाची पावलं आपण ओळखायला हवीत.
( लेखक ज्येष्ठ क्रीडा पत्रकार व साहित्यिक आहेत.)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.