शोधयात्रा : पोलिसांनी दिला आश्रय...

चीन या आपल्या शेजारी देशाचं नाव घेतलं की, भारतीयांच्या मनात खूप प्रश्न निर्माण होतात.
Black Tiger
Black TigerSakal
Updated on

‘जंगल बुक’मध्ये वर्णन केलेला ‘बघिरा’ म्हणजेच काळा बिबट्या (Black Leopard ) तसा दुर्मीळ. कर्नाटक राज्यातील काबिनी अभयारण्यात काही वर्षांपूर्वी एका काळ्या रंगाच्या बिबट्यांची नर-मादी जोडी सर्वांत पहिल्यांदा आढळून आली. साया (नर) आणि क्लिओ (मादी) ही जोडी त्या वेळी प्रसिद्धीच्या झोतात आली होती. मध्य प्रदेशातील पेंच, तसंच महाराष्ट्रात ताडोबा, नवेगाव व कोकणातदेखील एकट्याने फिरणारे काळे बिबटे आढळले आहेत. प्रकाश रामकृष्णन यांनी टिपलेल्या या छायाचित्रात मादी काळी आहे, मात्र नर काळा नाही. (संकलन : अनुज खरे)

चीन या आपल्या शेजारी देशाचं नाव घेतलं की, भारतीयांच्या मनात खूप प्रश्न निर्माण होतात. या देशाबद्दल भारतीय जनमानसात खूप उत्सुकता दिसते. सीमेलगत असलेल्या या देशाबद्दल आपल्याला खूप कमी माहिती आहे, त्याचं कारण समजून घेणं खूप गरजेचं आहे. या देशातील माझा एक महिन्याचा प्रवास मला समृद्ध करणारा, तसंच प्रचंड आशावाद जागृत करणारा होता. गेल्या तीस वर्षांत चीन या देशाने आपल्या ऐंशी करोडपेक्षा जास्त लोकांना गरिबीतून बाहेर काढलं आहे. याविषयी बोलताना जागतिक बँकेचे माजी अध्यक्ष जिम योंग किम म्हणतात की, ‘मानवी इतिहासातील एक महान कथा.’ प्रवासात माझं नेहमी आत्मचिंतन चालत असे, गरिबी याविषयी मी चिंतन-मनन करत असे. महात्मा गांधी सांगायचे की, ‘गरिबी हा हिंसाचाराचा सर्वांत वाईट प्रकार आहे.’ माझ्या प्रवासात मी चीनच्या ग्रामीण भागातून फिरत असताना प्रत्येकाची घरं २-३ मजली होती, यावरून त्यांची समृद्धी लक्षात यायची. भारताबद्दल त्यांची उत्सुकता मला जाणवली, त्यांनी अनेक प्रश्न मला विचारले. बाहेरील जगाशी त्यांचा फार कमी संबंध दिसत होता.

येथे गुगल मॅप बंद असल्यामुळे आपल्या आजूबाजूला काय काय आहे, हे समजत नसे. येथील ग्रामीण भागात बुद्ध मंदिरं जास्त नव्हती. मला राहण्यासाठीचं हक्काचं ठिकाण म्हणजे बुद्ध मंदिर; परंतु इथं माझी अडचण होऊ लागली. मग इथं माझा नवीन प्रयोग सुरू झाला. मी दिवसभर सायकल चालवून सायंकाळी लोकांच्या घरी जायचो व विनंती करायचो की, ‘मला आज रात्री तुमच्या घरासमोर माझ्या तंबूमध्ये झोपू द्याल का?’ जर कोणी नकार दिला, तर मी दुसऱ्या घरी जायचो. असं करत-करत कधी कधी ५-६ घरी मी प्रयत्न करायचो. कोणी नकार दिला तरी कधी वाईट वाटत नसे. लोक या विनंतीमुळे गडबडून जात आणि मला आकलन करण्याचा प्रयत्न करीत. महिला असेल तर ती तिच्या पतीकडे जाई आणि तो पती माझी विचारपूस करून मला राहण्याची परवानगी देई.

पुरुष कधीतरी आपल्या बायकोची परवानगी घेई. संपूर्ण जगभरात मी पुरुषसत्ताक पद्धती पहिली आहे. मी जेव्हा कोस्टा रिकामध्ये होतो, तेव्हा एका महिलेला मी विनंती केली. तिच्या घरासमोर राहण्यासाठी तिने तिच्या पतीची परवानगी न घेता लगेच होकार दिला. हा माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण होता. चीनमधील यात्रा हा वेगळा अनुभव होता. रोज नवीन लोक आणि नवीन ठिकाण. जेव्हा कोणी मला राहण्याची परवानगी देई, तेव्हा ते मला जेवणही देत. त्या वेळेस मी मांसाहारी होतो. लोक जे देतील ते खावं, हा बुद्ध मंदिरांचा नियम मी पळत असे. लोक त्यांच्याकडं जे असेल, ते मला खूप प्रेमाने वाढत. ते मला खायला वाढतात, हे समजण्याचा प्रयत्न मी केला; पण भाषेची अडचण आणि ‘गुगल भाषांतर’ बंद असल्याने ते काय सांगतात, हे समजणं अवघड होत असे.

खूप वेळ दिल्यानंतर थोडा अर्थ लागत असे. नंतर-नंतर तर मी कधीही त्यांना विचारलं नाही, की ते काय खाऊ घालत आहेत. डुकराचं मांस इथं जास्त खाल्लं जातं. भारतात मिळणारे चिनी खाद्यपदार्थ यांची चव ही फक्त भारतात मिळते. चीनमध्ये दिवसाच्या तीनही वेळी मांसाहार केला जातो. बुद्ध मंदिरात मात्र शाकाहारी जेवण असतं. बीजिंगमधील शाकाहारी हॉटेलवर मी महात्मा गांधी आणि अल्बर्ट आइन्स्टाईन यांचे फोटो पहिले. या दोन जगप्रसिद्ध व्यक्ती पाहून लोक शाकाहारी बनतील, अशी अपेक्षा त्या हॉटेलचालकाची असावी; आणि गांधीजी हे चीनमध्ये ज्ञात आहेत, याची ती पावती होती. इथं भाताचे खूप सारे प्रकार होते. चिकट भात, मऊ भात, सूप भात, भाताचे नूडल, फ्राइड भात, भात पापड, बिर्याणी भात आणि गोड भात असे अनेक भात. भात भात आणि नुसता भात. हे खाऊन खाऊन मला कंटाळा आलेला. इकडं चपाती मिळण्याची शक्यता दिसत नव्हती. त्यात घरचे फोन करून चपाती मिळते का चीनमध्ये, हे विचारून चपातीची अजूनच आठवण करून देत.

एके दिवशी मी एका लहान गावात पोहोचलो. तिथं मी घरोघरी गेलो; परंतु लोकांनी मला राहण्यासाठी नकार दिला. मी राहण्यासाठी जागा शोधत होतो, अंधार पडायला लागला होता. माझी ही घालमेल एका १२-१३ वर्षांच्या मुलीच्या लक्षात आली. तिने मला खूप निरागसतेने पोलिस स्टेशनमध्ये राहण्याचा सल्ला दिला. नुसता सल्ला न देता, ती मला जवळ असलेल्या पोलिस स्टेशनला सोबत घेऊन गेली. मला त्या मुलीचं खूप कौतुक वाटलं. याचसोबत येथील पोलिस यंत्रणेबद्दल आदर वाढला. परंतु, इथं असताना मी त्या लहान मुलीसारखं धाडस करून पोलिसांकडं मदत मागण्याचं धाडस याआधी कधी केलेलं नव्हतं. कारण पोलिसाचं नाव ऐकलं की मला भीती वाटत असे व ते प्रत्यक्ष दिसले तरी मी दूर पळून जात असे. आपल्याइकडं लहान मुलांना पोलिसांबद्दल खूप भीती घातली जाते. कोविडकाळामध्ये त्याची झलक आपण पहिली आहे. मी जेव्हा या काळात जॉर्जियामध्ये होतो, त्यावेळेस मला तेथील पोलिसांनी महाराष्ट्रातील लाठीमाराचे व्हिडीओ दाखवले.

त्या पोलिस अधिकाऱ्याने मला त्याच्या प्रेयसीने बनवलेले पेढे दिले व सोबत नूडलही खाऊ घातले. त्यांना भेटल्यावर मला समजलं की, ते इथं लोकांना समाजसेवकासारखी मदत करतात. कारण इथं गुन्हेगारीचा दर खूप कमी आहे. त्या रात्री मी पोलिस स्टेशनमध्ये तंबू लावून झोपी गेलो. तो दिवस आणि घडलेला प्रसंग अविस्मरणीय होता. एके दिवशी माझ्या मानेवर नागीणचा संसर्ग झाला, मला थोडा तापही जाणवला. एका लहान हॉटेलमध्ये मी जेवण केलं व नंतर त्यांना मी तो संसर्ग दाखवला. त्यांनी मला त्यासाठी औषध घेण्यासाठी मदत केली. मी थोडी विश्रांती घेतली. अंधार पडला होता. मी त्या हॉटेलचालकास तिथं राहण्यासाठी विनंती केली; परंतु त्यांनी नकार दिला आणि मला पहिल्यांदा खूप वाईट वाटलं, रडूही आलं. कारण एक तर मी आजारी होतो आणि त्यांनी मला खूप मदत केली होती. अनपेक्षित असा त्यांनी हा नकार दिला. या आजारपणामुळे मी खूप घाबरलो होतो. जेव्हा आपल्या प्रिय व्यक्तीकडून आशाभंग होतो, तेव्हा आपण तुटतो. यानंतर मी अलिप्ततेवर काम सुरू केलं, जो की गौतम बुद्ध यांचा महत्त्वाचा संदेश आहे. रात्री काळोखात सायकल चालवणं हे धोकादायक होतं.

कधी लोक मला पाहून घाबरत. शेतं होती; पण ती नांगरलेली होती आणि अंधारामुळे मला काही दिसेनासं झालेलं. मी सायकल चालवत राहिलो. वाटेत मला एका घरासमोर एक व्यक्ती दिसली व त्यांनी मला घरी राहण्याची परवानगी दिली. मी गरम पाण्याने अंघोळ केली आणि त्या यजमानांसोबत चहा घेतला. त्यांनी ओल्या लाकडापासून प्लायवूड बनवण्याच्या कारखान्याबद्दल सांगितलं. अशा सुंदर मनाच्या माणसाला भेटून मला खूप प्रेरणा मिळाली आणि मी दुसऱ्या दिवशीचा प्रवास सुरू कला. वाटेत मला कोरफड दिसली आणि त्याचा रस मी नागीण संसर्गावर लावला. त्याच दिवशी मला फरक जाणवला आणि मी दोन दिवसांत ठीक झालो. कोरफड ही माझ्या पुढील प्रवासात खूप उपयोगी वनस्पती बनली.

एक दिवस माझा सायकल प्रवास चालू असताना, मला रस्त्यालगत पडीक जमिनीवर काही लोक जमा झालेले दिसले, ते तिथं फटाकेही फोडत होते. मला वाटलं ते आनंदाचा क्षण साजरा करत आहेत; पण जरा बारीक निरीक्षण केल्यावर माझ्या लक्षात आलं की, ते तर एका समाधीवर हे फटाके फोडत आहेत. थोडी माहिती घेतल्यावर लक्षात आलं की, त्यांच्या प्रथेनुसार मृत आत्मा खडबडून जागा व्हावा यासाठी ते फटाके फोडत होते. त्याचबरोबर त्याठिकाणी त्यांनी काही नकली पैशांच्या नोटा, बिअरची बाटली, फुलं आणि काही खाद्यपदार्थ ठेवले होते. मृत्यूनंतर करण्यात येणाऱ्या विधींमध्ये आपल्याकडेही अशा काही प्रथा आहेत आणि खूप साऱ्या अंधश्रद्धा पाहायला मिळतात. चीनमध्ये बहुदेववादी कल्पना आहे, जशी भारतात आहे.

चिनी धर्म हा प्राचीन व स्थानिक धर्म आहे. या धर्मात निसर्ग, विश्व, ग्रह, पर्वतीय देवतेची पूजा, गावातील स्थानिक देवतेची पूजा, पितरांची पूजा, भुतांची पूजा यांपासून विश्वाच्या अधिपती देवतेच्या पूजेपर्यंत सर्व प्रकारच्या पूजाविधी चालतात. एका आकडेवारीनुसार येथील ७३.५ टक्के लोक याचे पालन करतात. सोबत बुद्ध धर्म जो की साधारण १६ टक्के आहे, याचंही पालन केलं जातं. बीजिंगजवळील एका बुद्ध मंदिरात मी राहिलो तेव्हा समजलं की, चीन सरकार खूप विरोध करतं या मंदिरांस; पण हे बुद्ध लोक संघटित होऊन टिकून आहेत आणि नवनवीन प्रयोग करत आहेत. इथं तीन प्रकारची शिकवण पाहायला मिळते, ती म्हणजे ताओवाद वा दाओवाद, कन्फ्यूशियनवाद आणि बौद्ध धर्म हे तिन्ही एकमेकांना पूरक आहेत. जसं - कन्फ्यूशियझम सामाजिक नियम आणि नैतिक मूल्यांवर लक्ष केंद्रित करतो, तर ताओवाद साधेपणा आणि निसर्गाशी सुसंगत राहून आनंदाने जगण्याचा पुरस्कार करतो. दुसरीकडं, बौद्ध धर्म दुःख, भौतिक वस्तूंची अनिश्चितता आणि पुनर्जन्म या कल्पनांचा पुनरुच्चार करतो आणि मोक्षप्राप्तीच्या पलीकडं पोहोचण्याच्या कल्पनेवर जोर देतो.

मी साधारण १५ दिवस सायकलने प्रवास करत गुईलीन या सुंदर शहरात प्रवेश केला आणि तिथं मला एक भारतीय हॉटेल मिळालं आणि त्यांनी माझी काळजी घेतली व सोबत भारतीय जेवणही मिळालं. पाकिस्तानी विद्यार्थी जे इथं वैद्यकीय शाखेचं शिक्षण घेत आहेत, ते या भारतीय हॉटेलमध्ये जेवण करायला आले होते आणि त्यांनी मला जेवणाचं आमंत्रण दिलं. आता १५ दिवस झाले होते आणि साधारण सातशे कि.मी. सायकल प्रवास झाला होता. पुढील देशाचा व्हिसा घेण्यासाठी मला राजधानी बीजिंग इथं रेल्वेने जावं लागलं. मला पूर्ण चीन सायकलने प्रवास करायचा होता; पण चीनने मला फक्त एक महिन्याचा व्हिसा दिला होता. जर मी जास्त राहिलो, तर दंड आणि खूप साऱ्या समस्यांना मला सामोरं जावं लागलं असतं. मी रेल्वेने निघालो तर खरा; पण कुठं राहणार, हे माहीत नव्हतं. पण हे तर रोजचंच झालं होतं. मी एकटा त्या डब्यात विदेशी असल्यामुळे सर्व लोक मला पाहत आणि त्यातील एका प्रवाशाने माझी प्रेमाने काळजी घेतली. एक बुद्ध महिला होती, तिने माझ्या राहण्याची व्यवस्था, तिच्या एका परिचित अँथनी नावाच्या मित्राकडे केली. त्यामुळे आता मला पोलिस स्थानकात जाऊन राहायला लागलं नाही.

अँथनी मला घेण्यासाठी रेल्वे स्थानकात आला. तो साधारण माझ्या वयाचा होता. चिनी हवाई कंपनीमध्ये तो हवाई वाहतूक नियंत्रक म्हणून काम करत होता. त्याने माझी राहण्याची सोय त्याच्या हवाई हॉस्टेलमध्ये केली. येथील रूम सुंदर होती. नंतर त्याने मला बीजिंग शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी फिरवलं व सोबत काही लोकांची ओळख करून दिली. माझी जी सायकल आहे, ती मला झिलोन्ग वांग या माझ्या मित्राने अहमदाबाद येथील साबरमती आश्रमात भेट म्हणून दिली होती. तो सायकलवर चीनमधून भारतात आला होता आणि मी त्याच्या उलट दिशेने भारतातून चीनमध्ये आलो होतो. इथं माझी पुन्हा झिलोन्गशी भेट बीजिंगमध्ये झाली. मी त्याच्याजवळ कृतज्ञता व्यक्त केली. असे सुंदर मनाचे लोक माझ्या आयुष्यात येणं, हे मी माझं भाग्य समजतो.

-नितीन सोनवणे

(सदराचे लेखक जगभर फिरणारे असून, महात्मा गांधी यांच्या विचाराचे प्रसारक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.