ऑर्केस्ट्रा, कलापथक व्हाया संगीतमेळे...

कोल्हापूर हे कलापूर. साहजिकच विविध कलांचा जिंदादिली आविष्कार ही या शहराची प्रमुख ओळख. स्वातंत्र्यपूर्व काळात शहरातील विविध पेठांमध्ये संगीत मेळ्यांची परंपरा सुरू झाली.
Orchestra
OrchestraSakal
Updated on
Summary

कोल्हापूर हे कलापूर. साहजिकच विविध कलांचा जिंदादिली आविष्कार ही या शहराची प्रमुख ओळख. स्वातंत्र्यपूर्व काळात शहरातील विविध पेठांमध्ये संगीत मेळ्यांची परंपरा सुरू झाली.

कोल्हापूर हे कलापूर. साहजिकच विविध कलांचा जिंदादिली आविष्कार ही या शहराची प्रमुख ओळख. स्वातंत्र्यपूर्व काळात शहरातील विविध पेठांमध्ये संगीत मेळ्यांची परंपरा सुरू झाली. याच मेळ्यांनी पुढं नाट्य, चित्रपटसृष्टीला अनेक कलाकार दिले. केवळ मनोरंजनच नव्हे, तर प्रबोधनाची मोठी परंपरा या मेळ्यांनी जपली. मेळ्यांची परंपरा खंडित होत असताना ती कलापथक, ऑर्केस्ट्रामध्ये विलीन झाली आणि गेल्या पाच-सहा दशकांपासून ही कलापथकं देशाच्या विविध भागांत जाऊन कला सादर करू लागली. गणेशोत्सवापासूनच कलापथकांना मागणी वाढते. पण, खऱ्या अर्थाने यात्रांचा काळ हा कलापथकांचा मुख्य हंगाम. कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांचा विचार केला तर तब्बल बावीसशे यात्रा-जत्रा प्रत्येक वर्षी होतात आणि या यात्रा-जत्रांसाठी कोल्हापुरातील या बावीस कलापथकांनाच मोठी मागणी असते. पापाची तिकटी परिसरात या सर्व पथकांची कार्यालयं आहेत.

कोल्हापुरातील कलापथकं, ऑर्केस्ट्रांना संगीत मेळ्यांची पार्श्वभूमी आहे. उन्हाळ्याच्या सुटीतच मेळ्यांच्या कलाकारांची बैठक व्हायची. गणेशोत्सवासाठीच्या मेळ्यातील पटकथा आणि गाणी मेळ्याचे प्रमुख वाचून दाखवायचे. सर्वांनी संमती दिल्यानंतर पटकथा आणि गाणी रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाकडून प्रमाणित करून घेतली जायची आणि तालमी सुरू व्हायच्या. चार-पाच महिन्यांच्या परिश्रमानंतर कला सादर करण्यासाठी आसुसलेली मनं गणेशोत्सवकाळात मेळा गाजवायची.

शहरात दहा ते बारा संगीत मेळे प्रसिद्ध. सिद्धार्थनगरातील (कै.) हरी आबा सरनाईकांचा ‘अलंकार’, वसंतराव लिगाडेंचा ‘रत्नदीप’, (कै.) गुलाब मानेंचा ‘तुषार’, बिंदू चौकातील चौधरी-कपडेकरांचा ‘किरण’, शिवाजीराव भोसलेंचा ‘विश्वभारती’, शाहूपुरीतील मुजावर मामांचा ‘ताज’, पापाची तिकटी परिसरातील जाधव बंधूंचा ‘विकास’ आणि शुक्रवार पेठेतील ‘सम्राट’, ‘बालवीर’ या मेळ्यांनी त्या काळात मनोरंजनाबरोबरच लोकजागृतीही केली.

वर्तमानातील विविध विषयांवर परखडपणे भाष्य करताना लोकांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालण्यातही या मेळ्यांचं योगदान मोठं राहिलं. या मेळ्यांमधूनच प्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर, सिनेतारका उमा, माया जाधव, पुष्पा भोसले आदींच्या कारकीर्दीला सुरुवात झाली. विशेष म्हणजे, मेळ्यातील कथानक आणि गाण्यांवर शासनाच्या रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचं पूर्णपणे नियंत्रण असायचं. या मंडळाकडूनच मेळ्यांतील गाणी आणि कथानकांची हस्तलिखितं प्रमाणित करून घ्यावी लागत. मेळ्यात सादर होणाऱ्या नाटकांची कथानकं प्रामुख्याने विनोदातून समाजजागृती करणारी असायची. ‘अगाड्याचं बगाडं’, ‘सुटं गिराण’ ,‘दे दान’, ‘ठासून झालं पाहिजे’, ‘बोलायचं नाही’, ‘बघा जमलं तर’, ‘अफाट नगरीचं सपाट राज्य’, ‘बापाच्या गळ्यात घंटा’, ‘देवता’, ‘दशावतार’ अशा शीर्षकांची नाटकं पोटभर हसवायची; परंतु त्याचबरोबर एखादा विधायक संदेशही देऊन जायची. मेळ्यात सादर होणारी गाणीही याच पार्श्वभूमीवर लिहिली जायची.

‘शत्रूला मूठमाती देण्या करा तुम्ही निर्धार’ यांसारखी समरगीतं, फॅशनच्या वाढत्या संस्कृतीवर ‘साडीचोळी गेली - पाठ मोकळी, वय वीस स्कर्ट आणि झगा, घालूनी हिंडती सूट-पॅंट रस्तोरस्ती, तमाशा दाविती का उगा’, जातीयवादावर ‘जातीयवादी - धर्मवेड्या मर्कटांनी घातलाय धिंगाणा, वेळीच आवरा अशा बेट्यांना लावूनिया सापळा’, अशा गाण्यांपासून ते ‘चार आण्यांचा जोड लाव रे - येईल भलती मजा,’ अशी स्वलिखित गाणीही मेळ्यात सादर व्हायची.

चित्रपटातील गीतांना पूर्णपणे मनाई होती. मेळे सुरू असताना कधीही शासकीय अधिकाऱ्याने तपासणी केली, तर नियमभंग झाल्याचे लक्षात आल्यास कारवाईची तरतूद होती. देवासकर महाराजांनी न्यू पॅलेस विकास सोसायटीच्या माध्यमातून १९५८ मध्ये संगीत मेळ्यांची पहिली स्पर्धा घेतली. संगीत मेळ्यांच्या इतिहासात ही एकमेव स्पर्धाच मानाची ठरली. त्यामध्ये सिद्धार्थनगरातील ‘अलंकार’ संगीत मेळ्याने पहिलं पारितोषिक मिळवलं. द्वितीय व तृतीय पारितोषिक अनुक्रमे ‘ताज’ (शाहूपुरी) आणि ‘विकास’ (पापाची तिकटी) यांनी मिळविलं होतं, असं या क्षेत्रातील जुनी मंडळी आवर्जून सांगतात. प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक (कै.) प्रकाश हिलगे यांच्या समई नृत्याच्या स्मृतींना आजही अनेक जण उजाळा देतात.

कलापथकांचा श्रीगणेशा

सत्तरच्या दशकापर्यंत संगीत मेळ्यांनी शहराचं मनोरंजन केलं आणि त्याचबरोबर प्रबोधनाची परंपराही जपली. पण, त्यानंतर त्याची जागा कलापथकांनी घेतली. ‘नवरंग म्युझिकल नाइट’, ‘अजंठा’, ‘कोहिनूर’, ‘मयूर’, ‘संगम’, ‘विजय’ ही कलापथकं सुरुवातीच्या काळात, तर त्यानंतर ‘वैभव’, ‘झंकार’, ‘आकाश’, ‘ललकार’ आदी कलापथकांनी ही परंपरा पुढे नेली. ही यादी तशी मोठी आहे. मध्यंतरीच्या काळात पस्तीसहून अधिक कलापथकं होती. पण, सध्या बावीस कलापथकं असून कोरोनोत्तर काळात आता त्यांना पुन्हा मागणी वाढली आहे. सुरुवातीच्या काळात दोन तासांची नाटकं कलापथकात सादर व्हायची. त्यामध्ये विशेषतः कौटुंबिक हिंसाचार, स्त्री-भ्रूणहत्या, वाढता चंगळवाद अशा विविध विषयांवर भाष्य व्हायचं. तत्पूर्वी तासभर ‘व्हरायटी’ म्हणजेच विविध चित्रपट गीतांवर आधारित नृत्याविष्कार सादर व्हायचा.

केवळ एक हार्मोनियम, ढोलकी आणि ट्रिपल एवढाच वाद्यवृंद आणि एका माइकवर हा सारा कलाविष्कार सजायचा. कोल्हापूर शहराबरोबरच शिरोळ तालुक्यातील उदगाव परिसरातही राष्‍ट्र सेवा दलाच्या प्रभावाखाली तीन ते चार कलापथकांची निर्मिती झाली. पण, ग्रामीण भागातील प्रेक्षकांची अभिरुची बदलत गेली आणि त्यानुसार कलापथकंही बदलत गेली. अत्याधुनिक ध्वनी व प्रकाशयोजना कलापथकात आल्या आणि कलापथकांचं स्वरूपच बदललं. गाण्यांची व्हरायटी अधिक आणि दोन तासांचं नाटक तासाचं झालं. पण, तरीही प्रबोधनाची परंपरा आम्ही खंडित होऊ दिलेली नाही, असं कोल्हापूर जिल्हा कलापथक संघटनेचे अध्यक्ष मुकुंद सुतार, वैभव ऑर्केस्ट्राचे अनिल हिलगे ही मंडळी आवर्जून सांगतात.

नवी पिढी बदलांवर स्वार...

एकूणच मनोरंजन क्षेत्रातील नवं तंत्रज्ञान, बदलांवर स्वार होत आता नवी पिढी या व्यवसायात इमाने-इतबारे कार्यरत झाली आहे. गाण्याबरोबरच वादन आणि अभिनयासह सर्वच तांत्रिक बाजूंचं अधिकृत प्रशिक्षण या मंडळींनी घेतलं आहे. सोशल मीडियाचा प्रभावी वापरही आता सुरू झाला आहे. केवळ ऑर्केस्ट्राच नव्हे, तर त्याच्याही पुढे जाऊन रॉक बॅंड, अनप्लग्ड़ या संकल्पनाही नव्या पिढीने यशस्वी केल्या आहेत. साहजिकच केवळ यात्रा-जत्राच नव्हे, तर गणेशोत्सवापासून रास-दांडिया आणि लग्न समारंभ, विविध इव्हेंट्समध्येही या पथकांना आता मागणी वाढू लागली आहे. विविध ठिकाणी कार्यक्रमांचे दौरे करताना काही अपघातांनाही पथकातील कलाकारांना सामोरं जावं लागलं, त्यामुळे प्रत्येक कलाकाराला विमा बंधनकारकच आहे. एकूणच ‘ऑर्केस्ट्रा, कलापथक व्हाया संगीत मेळे’ हा प्रवास एक समृद्ध परंपरा आहे आणि बदलत्या काळातही मनोरंजनाबरोबरच प्रबोधनाचा वसा या परंपरेने कायम ठेवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.