आधुनिकतेची कास धरलेलं स्थित्यंतराचं पर्व (१९८१ ते १९९०)

देश आधुनिक तंत्रज्ञानाच्या पातळीवर झेपावत असताना या दशकाच्या पूर्वार्धात मुंबईतील गिरणी कामगारांचा प्रदीर्घ संप अयशस्वी ठरला. या संपाने कामगारविश्वावर नकारात्मक परिणाम झाला.
Rajiv gandhi
Rajiv gandhiSakal
Updated on
Summary

देश आधुनिक तंत्रज्ञानाच्या पातळीवर झेपावत असताना या दशकाच्या पूर्वार्धात मुंबईतील गिरणी कामगारांचा प्रदीर्घ संप अयशस्वी ठरला. या संपाने कामगारविश्वावर नकारात्मक परिणाम झाला.

इसवी सन १९८१ ते १९९०चे दशक अनेक अर्थांनी स्थित्यंतराचे दशक ठरले. ‘ऑपरेशन ब्लू स्टार मोहीम’, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या... अशा खळबळजनक घटनांबरोबरच संगणक आणि दूरसंचार क्रांतीची सुरुवात करणारे दशक म्हणूनही त्याची ओळख आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील अनेक वळणे असलेल्या या दशकाचा आढावा.

लॉर्ड्‌सच्या मैदानावर कपिल देवच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने इतिहासात पहिल्यांदाच ‘वर्ल्ड कप’ जिंकला. इसवीसन १९८३ च्या या विजयाने भारतीयांच्या मानसिकतेवर खोलवर परिणाम केला. जात-धर्म- पंथ-भाषा असे भेदाभेद विसरून भारतीय म्हणून एकत्र येण्याची भावना या विजयाने निर्माण केली. भारतीयांना एकत्र ठेवणाऱ्या या क्रिकेट धर्माचा आजही प्रभाव कायम आहे. त्या आधी दिल्लीत आशियाई क्रीडा स्पर्धांचे भव्य व यशस्वी आयोजन झाले. क्रीडा विश्वातील या घडामोडींसोबत सन १९८१ ते १९९० च्या दशकात राजकीय पटलावर अनेक घटना घडल्या. जनता पक्षाचा प्रयोग १९७९ मध्ये फसल्यानंतर देशात पुन्हा एकदा काँग्रेसने पकड घेतली. ‘मारुती’ मोटारीच्या आगमनाने देशात वाहन उद्योग क्षेत्रात नवी क्रांती आणली. रंगीत टीव्हीच्या पदार्पणाने दृक्‌श्राव्य मनोरंजनाचा नवा टप्पा सुरू झाला. सोव्हिएत रशियाच्या यानातून अंतराळात भरारी घेऊन राकेश शर्मा या अंतराळवीराने देशाची मान उंचावली.

देश आधुनिक तंत्रज्ञानाच्या पातळीवर झेपावत असताना या दशकाच्या पूर्वार्धात मुंबईतील गिरणी कामगारांचा प्रदीर्घ संप अयशस्वी ठरला. या संपाने कामगारविश्वावर नकारात्मक परिणाम झाला. तिकडे पंजाबात ‘खलिस्तान चळवळ’ तीव्र झाली. त्यावर लगाम घालण्यासाठी केलेल्या ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार‘नंतर इंदिरा गांधी यांची हत्या झाली व पाठोपाठ शीखांचे भीषण हत्याकांड झाले. या घटनांमुळे देश थबकून गेला. नंतर राजीव गांधी यांनी त्वरेने सूत्रे ताब्यात घेतली आणि परिस्थिती काबूत आणली. पंजाब, आसाम, गुरखालँड, मिझोराम अशा अशांत टापूमध्ये शांतता यावी यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले. श्रीलंकेतील तमीळ प्रश्नातही त्यांनी पावलं उचलली. परंतु एकीकडे, मुस्लिम महिलांच्या पोटगी प्रश्नी सनातनी मुस्लिमांच्या मतांचा अनुनय करणं आणि दुसरीकडे, अयोध्येतील वादग्रस्त जागेला लावलेलं कुलूप उघडून कट्टर हिंदुत्ववाद्यांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न यातून विविध आक्रमक घटकांचा जोर वाढला. ज्याचे परिणाम पुढे अनेक वर्षे भोगावे लागले.

संगणक, दळणवळण क्रांती

याच काळात राजीव गांधी यांनी आणलेली संगणकक्रांती आणि दळणवळण क्रांती देशाला वेगळी दिशा देऊन गेली. एका बाजूला देश तंत्रज्ञानात प्रगती करीत असताना राजीव गांधी यांच्यावर बोफोर्स तोफांच्या व्यवहारात कथित दलालीचा आरोप झाला. भोपाळमधील गॅसगळती, नर्मदेवरील सरदार सरोवरामुळे होणारे विस्थापन, रूपकुंवर सती प्रकरण, मुंबईतील गिरणी कामगारांचा संप या घटनांनी देशात खळबळ माजवली. राजीव गांधी यांच्यानंतर विश्वनाथप्रताप सिंह पंतप्रधान झाल्यानंतर या खळबळीत आणखी भरच पडली. मंडल आयोगाच्या शिफारशीच्या अंमलबजावणींचा निर्णय त्यांनी घेतला आणि त्यातून मंडलवाद सुरू झाला. त्यातून भारतीय राजकारणाला वेगळी कलाटणी मिळाली. हिंसाचाराच्या घटनांनी वेगळे स्वरूप धारण केले असले, तरी त्याच वेळी तंत्रज्ञानाची चाहूल लागल्याने हे दशक स्थित्यंतर आणणारे ठरले.

मीनाक्षीपुरममधील दलितांचे धर्मांतर

तमिळनाडूतील मीनाक्षीपुरममधील दलितांचा धर्मातराचा निर्णय खळबळ उडविणारा ठरला. तमिळनाडूतील तिरुनेलवेली जिल्ह्यातील मीनाक्षीपुरम या गावात १९ फेब्रुवारी, १९८१ रोजी सुमारे एक हजार दलितांनी मुस्लिम धर्मात प्रवेश केल्याच्या घटनेने देशात एकच खळबळ उडाली. ईशाद-उल-इस्लाम सभा या संघटनेमार्फत या गावातील सुमारे १८० दलित कुटुंबांनी मुस्लीम धर्मात प्रवेश केल्यामुळे तमिळनाडूसह संपूर्ण देशात सामूहिक धर्मांतराच्याबाबत पुन्हा एकदा चर्चा घडली.

२९ सप्टेंबर १९८१ रोजी इंडियन एअरलाइन्स चे श्रीनगरहून दिल्लीला निघालेले विमान खलिस्तानवादी अतिरेक्यांनी अपहृत करून लाहोरला नेले. पाकिस्तानी कमांडोजनी या विमानातील सर्व प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका करून त्यांना मायदेशी परत पाठवले.

नक्षलवादी चळवळी झाल्या सक्रिय

सन १९७७ मध्ये आणीबाणी संपुष्टात आल्यावर भारतीय कम्युनिस्ट पक्षा(मार्क्सवादी लेनिनवादी)च्या प्रभावाखालील, आंध्र प्रदेशातील लहान लहान नक्षलवादी गट एकत्र येऊन १९८० मध्ये भा.क.प. (मा.ले.)- पीपल्स वॉर पक्षाची स्थापना केली, तर बिहारमध्ये पार्टी युनिटी, माओईस्ट कम्युनिस्ट सेंटर आदी गट गठित झाले. असे अनेक गट १९८९-९०च्या दशकात सक्रिय होऊन त्यांनी वेगवेगळ्या भागात आपली प्रभावक्षेत्रे निर्माण केली. सन १९६७-७२च्या काळातील चारू मुजुमदार यांच्यापेक्षा काहीशी वेगळी व्यूहनीती अवलंबून या गटांनी ‘मास लाईन’चा स्वीकार केला व जनआंदोलने उभारण्यावर भर दिला. केंद्र सरकारने १९८५ ते ९५ या दरम्यान मोठ्या प्रमाणावर कोंबिंग ऑपरेशन्स हाती घेऊन या चळवळींचा खात्मा करण्याचा प्रयत्न केला; पण त्यांचा प्रभाव अनेक राज्यांवर दीर्घकाळ राहिला.

दूरसंचार उपग्रह ‘अॅपल’ प्रक्षेपित

पूर्णत: भारतात बनवलेला ‘अॅपल’ हा भारताचा पहिला दूरसंचार उपग्रह १९ जून, १९८१ रोजी फ्रेंच गियाना येथून यशस्वीरीत्या प्रक्षेपित करण्यात आला. फ्रेंच गियाना येथील कुरू अवकाशतळावरून सोडलेला हा उपग्रह एरियन या उपग्रहवाहकाच्या तिसऱ्या उड्डाणाद्वारे अंतरिक्षातील भूस्थिर अर्थात जिओस्टेशनरी कक्षेत सोडण्यात भारतीय शास्त्रज्ञांना यश आले. अॅपलमुळे अनेक महत्त्वाच्या गोष्टी साध्य झाल्या. भारताने शैक्षणिक कारणासाठी ‘साईट’ हा प्रकल्प हाती घेतला होता.

गिरणी कामगारांचा ऐतिहासिक संप

कामगार चळवळीवर प्रदीर्घ परिणाम करणारा मुंबईच्या गिरणी कामगारांचा ऐतिहासिक संप १८ जानेवारी १९८२ रोजी सुरू झाला. कामगारनेते दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली संघटित झालेल्या मुंबईच्या अडीच लाख गिरणी कामगारांनी काम बंद केले आणि मुंबईतील सुमारे ६५ कापड गिरण्यांचे काम थांबले. आंदोलनात राजकीय व आर्थिक हितसंबंध महत्त्वाचे ठरले. गिरणीमालक व शासनाने या संपाविषयी दीर्घकाळ औदासीन्य दर्शवण्याचे व दखल न घेण्याचे धोरण अवलंबले, विविध डावपेच आखले. परिणामी, कामगारांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत रेटलेला हा संप वर्षभरानंतर बारगळत गेला आणि तेव्हापासून मुंबईच्या गिरणगावातील भोंग्याचा पर्यायाने कामगार चळवळीचा आवाज क्षीण झाला. भांडवलदार आणि त्यांच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या सरकारांनी हा आवाज पुन्हा कधीही मोठा होऊ दिला नाही.

दूरदर्शनचे नवीन युग

१५ ऑगस्ट १९८२ पासून देशात प्रथमच रंगीत स्वरूपात दूरदर्शनवरून कार्यक्रम प्रसारित होण्यास सुरुवात झाली. पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे स्वातंत्र्य दिनाचे भाषण हा रंगीत प्रसारणातील पहिला कार्यक्रम ठरला. त्यानंतर रामानंद सागर निर्मित ‘रामायण’ (१९८७) आणि बी. आर. चोप्रा निर्मित ‘महाभारत’ (१९८८) या मालिकांनी लोकप्रियतेचा कळस गाठला. महात्मा गांधी यांच्या कारकिर्दीचा वेध घेणारा रिचर्ड अॅटनबरो दिग्दर्शित ‘गांधी’ हा चित्रपट ३० नोव्हेंबर १९८२ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने जगभरात लोकप्रियता मिळवली.

राजधानी नवी दिल्लीत १९ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर १९८२ या दरम्यान आशियाई स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. सन १९५१ नंतर तब्बल ३१ वर्षांनी भारताला या स्पर्धेचे आयोजन करण्याचा बहुमान मिळाला. या स्पर्धेनंतर भारतीय क्रीडा क्षेत्रात नवीन क्रीडा पर्व सुरू झाले. या स्पर्धेत भारताला १३ सुवर्ण, १९ रौप्य व २५ कांस्य अशी ५७ पदके मिळाली.

‘इन्सॅट’ उपग्रह मालिकेचा प्रारंभ

ऐंशीच्या दशकात तांत्रिकदृष्ट्या दीर्घकाल परिणाम करणारी ऐतिहासिक घटना घडली ती म्हणजे ऑगस्ट १९८३ या महिन्यात भारताच्या दूरसंचार, दूरदर्शन प्रसार, आकाशवाणी प्रसार आणि हवामानाचे अंदाज वर्तवणे या क्षेत्रात क्रांती घडवून आणणाऱ्या ‘इंडियन नॅशनल सॅटेलाइट’ अर्थात ‘इन्सॅट’ मालिकेतील ‘इन्सॅट वन बी’ या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण झाले. या प्रक्षेपणाने टेली कम्युनिकेशन, डीटीएच सेवा, रेडिओ नेटवर्किंग, हवामानाचा पूर्वअंदाज या क्षेत्रांत क्रांती घडवून आणली.

‘मारुती’ने उद्योग विश्व बदलले

एखादा सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग किती यशस्वीपणे चालू शकतो याचे उत्तम उदाहरण मारुती मोटार उद्योगाने भारतात घालून दिले. मध्यमवर्गीयांना परवडेल अशा छोटेखानी मोटारीची निर्मिती भारतात व्हावी या दृष्टीने मारुती उद्योग लिमिटेड कंपनीचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. पण या कंपनीला चालना मिळाली ती १९८३ मध्ये. मारुती उद्योग लिमिटेड व जपानच्या सुझुकी कॉर्पोरेशन यांच्या सहकार्याने ‘मारुती ८००’ या छोटेखानी मोटारीचे उत्पादन सुरू करण्यात आले. ता. १४ डिसेंबर १९८३ रोजी ही मोटर भारतीय बाजारात उपलब्ध करण्यात आली आणि या मोटारीने वाहन उद्योग क्षेत्रात क्रांती घडवून आणली.

ऑपरेशन ब्लू स्टार

पंजाबसह संपूर्ण देशावर दीर्घ परिणाम करणारी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात राबवण्यात आलेली ‘ऑपरेशन ब्लू स्टार मोहीम’ या दशकातील महत्त्वाची घटना आहे. जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांच्या नेतृत्वाखाली पंजाबमधील स्वतंत्र खलिस्तानसाठीच्या चळवळीने उग्र रूप धारण केले होते. पंजाबमधील वाढत्या हिंसाचारामुळे देशभरात जनतेचे वातावरण निर्माण झाले होते. अमृतसरमधील शिखांचे पवित्र स्थान असलेल्या सुवर्ण मंदिरात भिंद्रनवाले आणि अन्य खलिस्तानवादी दहशतवाद्यांनी आश्रय घेतल्याने त्यांना हुसकावून लावून दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी इंदिरा गांधींच्या केंद्र सरकारने लष्करी कारवाईचा धाडसी निर्णय घेतला व ५ जून १९८४ रोजी ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही मोहीम राबवली. या कारवाईत भिंद्रनवाले यांच्यासह ४९२ दहशतवादी मारले गेले. मात्र, या मोहिमेचे पडसाद पुढे उमटत राहिले. या मोहिमेच्या निषेधार्थ खलिस्तानवादी अतिरेक्यांनी सहा जुलै १९८४ रोजी श्रीनगरकडून दिल्लीला जाणाऱ्या इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे अपहरण केले.

इंदिरा गांधी यांची हत्या

‘ऑपरेशन ब्लू स्टार मोहिमे’चा सूड म्हणून खलिस्तानवादी अतिरेक्यांनी कट केला. ३१ ऑक्टोबर, १९८४ रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या दिल्लीतील राहत्या घराच्या प्रांगणात त्यांच्या सुरक्षारक्षकांकरवीच हत्या करण्यात आली. या रक्तरंजित घटनेने संपूर्ण देश हादरला. इंदिरा गांधी यांना जणू त्यांच्या मृत्यूची चाहूल लागली होती. ३० ऑक्टोबरला भुवनेश्वर येथे त्यांनी केलेल्या भाषणात ‘‘मी जिवंत राहीन की नाही याची मला पर्वा नाही. माझ्या मृत्यूनंतरही माझ्या रक्ताचा प्रत्येक थेंब भारताला संजीवनी देईल, सामर्थ्य देईल,’’ असे म्हटले होते.

भोपाळ वायुगळती

मध्य प्रदेशमधील भोपाळ शहरात युनियन कार्बाईड या बहुराष्ट्रीय कंपनीच्या रासायनिक कारखान्यात ३ डिसेंबर १९८४ रोजी विषारी वायू गळती होऊन वीस हजार जणांचा जीव गेला, तर लाखोंना कायमचे पूर्ण व अंशतः अपंगत्व आले. या दशकातील जगामधील ही एक भीषण घटना ठरली. या घटनेनंतरही पीडितांचे दुःख कमी झाले नाही. त्यांना न्याय मिळण्यासाठी पुढे सुमारे वीस वर्षे वाट पाहावी लागली. काही तासांत हजारो निरपराध नागरिकांचे बळी घेऊन किमान तीन पिढ्यांचे आयुष्य उध्वस्त करणारी ही घटना आजही अनेक प्रश्न उभे करते. खटल्याचे काम १९८७ मध्ये सुरू झाले. त्यानंतर २३ वर्षांनी म्हणजे सात जून २०१० रोजी या खटल्याचा निकाल लागला.

पहिली मेट्रो रेल्वे सुरू

केंद्र सरकारने कोलकाता शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी १९७२ मध्ये मेट्रो रेल्वेची योजना हाती घेतली होती. या योजनेचा पहिला टप्पा १९८४ मध्ये पूर्ण झाला आणि २४ ऑक्टोबर १९८४ पासून देशातील पहिली भूमिगत मेट्रो कोलकात्यातील एस्प्लॅनेड- भवानीपूर या स्थानकांदरम्यान धावली. १९९५ मध्ये ही योजना पूर्ण होऊन संपूर्ण १६.४५ किलोमीटरचा भूमिगत मार्ग वाहतुकीला खुला झाला. सध्या देशातील विविध शहरांमध्ये मेट्रो प्रकल्प सुरू असून त्याच्या कामाचा व्याप मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे.

बंगाली स्थलांतरितांच्या मुद्द्यांवरून पेटलेल्या आसाममध्ये आसाम कराराद्वारे शांती प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुढाकाराने केंद्र सरकार व ऑल आसाम स्टुडंट्स युनियन व आसाम गण संग्राम परिषद या आंदोलक संघटना यांच्यामध्ये १५ ऑगस्ट १९८५ रोजी ‘आसाम करार’ झाला व समस्येचे निराकरण करण्याची प्रक्रिया सुरू झाली.

पक्षांतरबंदी कायदा

सध्या गाजत असणारा पक्षांतर बंदी कायदा संसदेने १५ फेब्रुवारी १९८५ रोजी संमत केला. त्यानुसार राज्यघटनेत दहाव्या अनुसूचीचा अंतर्भाव करून व इतर आवश्यक बदल करून हा कायदा ९ मार्च १९८५ पासून संसद व राज्यातील विधानसभांसाठी लागू केला. राजकीय पक्षांमध्ये फूट पडून संसदीय सदस्यांनी वैयक्तिक लाभाकरता व पदाकरता एकगठ्ठा पक्षबदल करण्याचे प्रकार वारंवार घडत होते. देशभरात अशा संसदीय राजकारणाची ‘आयाराम गायारामचे राजकारण’ म्हणून संभावना होत होती. या पार्श्वभूमीवर ५२ व्या घटनादुरुस्तीसाठी कायदा संमत केला. पक्षांतराच्या कारणावरून संसद सदस्य म्हणून अपात्र ठरविण्यासंबंधीच्या तरतुदी नमूद करणाऱ्या दहाव्या अनुसूचीचा घटनेत अंतर्भाव केला गेला.

त्याचप्रमाणे घटनेच्या कलम १०२ मध्ये उपकलम दोन चा अंतर्भाव करून एखादी व्यक्ती संसदेच्या दोन्ही सभागृहांची सदस्य म्हणून राहण्याची राहण्यास दहाव्या अनुसूचीद्वारे अपात्र असेल तर ती अशा सदस्यत्वासाठी अपात्र होईल, अशी तरतूद केली गेली. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सत्ता संघर्षानंतर सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या खंडपीठाच्या निर्णयानंतर या कायद्यात अधिक स्पष्टता येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात झालेल्या ‘ब्लू स्टार ऑपरेशन’चा सूड घेण्यासाठी १० ऑगस्ट १९८६ रोजी पुण्यात जनरल अरुणकुमार वैद्य यांची गोळ्या घालून अतिरेक्यांनी हत्या केली. त्यांची हत्या करणाऱ्या जिंदा आणि सुखा या दोन अतिरेक्यांना नंतर फाशीची शिक्षा देण्यात आली.

दीर्घकाळच्या असंतोषानंतर १९८६ मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी मिझो नॅशनल फ्रंटच्या नेत्यांसोबत शांतता करार केला. त्यानुसार शस्त्र समर्पण केल्यानंतर २० फेब्रुवारी १९८७ रोजी केंद्रशासित मिझोरामला स्वतंत्र घटक राज्याचा दर्जा दिला गेला. अरुणाचल प्रदेशला स्वतंत्र घटक राज्य म्हणून घोषित करण्यात आले. ३० मे १९८७ रोजी गोव्याला घटक राज्याचा दर्जा दिला गेला आणि त्यांच्यासोबत संयुक्त केंद्रशासित प्रदेश म्हणून गणला जाणारा दीव- दमणचा भाग स्वतंत्रपणे केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केला गेला.

श्रीलंकेचे सैन्यदल आणि लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम (एलटीटीई) यांच्यामधील संघर्ष तीव्र झाल्यावर श्रीलंकेचे राष्ट्रपती जे. आर. जयवर्धने यांच्या विनंतीवरून भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी श्रीलंकेत शांतता प्रस्थापित करण्यासाठी शांती सेना पाठवण्याचा निर्णय घेतला. जुलै १९८७ मध्ये श्रीलंकेत भारतीय शांती सेना पोचली. मात्र, या निर्णयाचे परिणाम नंतर अनेककाळ भारताला भोगावे लागले. पुढे राजीव गांधी यांची हत्या याच निर्णयातून झाली.

पृथ्वी आणि अग्नी क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी

‘डीआरडीओ’ने १९८३ मध्ये पृथ्वी या क्षेपणास्त्राच्या निर्मितीला सुरवात केली होती. त्यानंतर पाच वर्षांनी म्हणजे २५ फेब्रुवारी १९८८ रोजी पृथ्वी क्षेपणास्त्राची पहिली चाचणी आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथे करण्यात आली. त्यापाठोपाठ म्हणजे १९८९ मध्ये अग्नी या क्षेपणास्त्राची चाचणी ओरिसातील चंडीपूर येथे करण्यात आली. या दोन्ही चाचण्या यशस्वी ठरल्या. या दोन्ही चाचण्या भारताच्या आण्विक क्षेपणास्त्र विकासाच्या क्षेत्रातील प्रगतीचा महत्त्वाचा टप्पा ठरल्या.

परम महासंगणकाची निर्मिती साध्य करणाऱ्या ‘सीडॅक‘ ची स्थापना मार्च १९८८ मध्ये केंद्र सरकारच्या दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने केली. सीडॅकने प्रकट संगणकीय तंत्रज्ञानाच्या शिक्षणासाठी पुणे, दिल्ली, हैदराबाद, बेंगळुरू येथे प्रशिक्षण केंद्रे स्थापन केली. त्याद्वारे कुशल संगणकतज्ज्ञ उपलब्ध होऊ लागले.

विश्वनाथ प्रताप सिंह पंतप्रधान

बोफोर्स तोफांच्या गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर संपूर्ण देशात काँग्रेस विरोधात वातावरण तयार झाल्यानंतर नोव्हेंबर १९८९ च्या नवव्या लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकीत विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय आघाडीला यश मिळाले. ता. २ डिसेंबर १९८९ रोजी राष्ट्रीय आघाडीचे सरकार केंद्रात सत्तेवर आले आणि विश्वनाथप्रताप सिंह देशाचे पंतप्रधान बनले. सिंह यांचे सरकार सत्तेवर आल्यानंतर ९ डिसेंबर १९८९ रोजी गृहमंत्री मुक्ती मोहम्मद सईद यांच्या कन्या रुबिना सईद यांचे अपहरण करण्यात आले. त्यांच्या मुक्तीसाठी पाच दहशतवाद्यांची सुटका करण्याची नामुष्की तत्कालीन केंद्र सरकारवर ओढवली.

‘नर्मदा बचाव’ आंदोलन

नर्मदा नदीवरील सरदार सरोवर या मोठ्या धरण प्रकल्पामुळे गुजरात, मध्य प्रदेश व महाराष्ट्र या राज्यांमध्ये विस्थापितांचा प्रश्न गंभीर बनला. सन १९८५ पासून सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी पुनर्वसन व पर्यायी विकासनीती हे मुद्दे हातात घेऊन ‘नर्मदा बचाव आंदोलन’ सुरू केले होते. २८ सप्टेंबर १९८९ रोजी मध्य प्रदेशमधील हरसूद येथे घेतलेल्या विस्थापितांच्या राष्ट्रव्यापी मिळवल्यानंतर व्यापक प्रतिसाद मिळाला व आंदोलन अधिक तीव्र झाले. पुढील दोन दशके हा लढा चालू राहिला.

मंडल आयोगाच्या शिफारशी लागू

इतर मागासवर्गीय यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये सत्तावीस टक्के आरक्षण देण्याची शिफारस करणाऱ्या मंडल आयोगाच्या अहवालावरील कार्यवाही तत्कालीन केंद्र सरकारने प्रलंबित ठेवली होती. १९८९ पासून सत्तेवर आलेल्या व्ही. पी. सिंह यांनी ७ ऑगस्ट १९९९ रोजी मंडल आयोगातील शिफारसी लागू करण्याची ऐतिहासिक घोषणा केली आणि या आरक्षण विषयक धोरणाबद्दल देशभर देशभर वादळ निर्माण झाले. उत्तर भारतात त्यावर उग्र व हिंसक प्रतिक्रिया उमटल्या. भारतातील राजकारणावर दूरगामी परिणाम करणारा हा निर्णय ठरला. व्ही. पी. सिंह यांच्या जनता दलाचे सरकार ११ महिन्यांतच संसदेतील बहुमताअभावी पडले. त्यानंतर जनता दलाचे चंद्रशेखर यांच्या गटाला काँग्रेसचा पाठिंबा मिळाला आणि पाच नोव्हेंबर १९९० रोजी चंद्रशेखर पंतप्रधान झाले. देवीलाल उपपंतप्रधान बनले. मात्र, हे सरकारही अल्पजीवी ठरले. राजीव गांधी यांनी चार महिन्यांतच चंद्रशेखर सरकारचा पाठिंबा काढून घेतला.

राजीव गांधी यांच्याकडे देशाची सूत्रे

ता. ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी सकाळी इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यावर अचानक एक मोठी पोकळी तयार झाली. मात्र, त्याच दिवशी संध्याकाळी काँग्रेस संसदीय पक्षाने त्यांचे चिरंजीव राजीव गांधी यांची नेतेपदी निवड केली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे १ नोव्हेंबर १९८४ रोजी राजीव गांधी यांना हंगामी पंतप्रधान म्हणून शपथ देण्यात आली. त्यानंतर आठव्या लोकसभेसाठी निवडणुका झाल्या. इंदिरा गांधी यांच्या निधनामुळे या निवडणुकीत काँग्रेसला सहानुभूतीच्या लाटेचा फायदा झाला. संपूर्ण देशभरातून काँग्रेसला पाठिंबा मिळाला आणि ३१ डिसेंबर १९८४ रोजी राजीव गांधी यांनी पुन्हा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. राजीव गांधी यांनी शपथ घेतल्यावर त्यांच्यासमोर अनेक आव्हाने होती. तेव्हा त्यांचे वय फक्त चाळीस वर्षे होते. ते देशाचे सर्वांत तरुण पंतप्रधान होते. राजीव गांधी यांनी पक्षात आणि पक्षाबाहेर मोठे बदल घडवून आणले, महत्त्वाचे निर्णय घेतले आणि इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या अस्थिरतेवर बऱ्याच अंशी मात केली. देशाचे आधुनिकीकरण करून संपूर्ण देशाला वेगळी दिशा देण्याचे काम केले. सॅम पित्रोदा यांच्या नेतृत्वाखाली भारतातील संगणक युगाला त्यांनी चालना दिली. दूरसंचार क्षेत्रात अनेक नवे बदल घडवले. उपग्रह तंत्रज्ञान विकसित केले. यासोबतच पंचायत राज कायद्यात सुधारणा करून सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यासही चालना दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के जागा राखून ठेवण्यात आल्या. राजीव गांधी यांनीच पक्षांतराला आळा घालण्यासाठी पक्षांतरबंदी कायदा केला.

घटनाक्रम...

  • ९ फेब्रुवारी १९८१ : दिल्लीत इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली अलिप्त राष्ट्रांची परिषद.

  • १४ ऑक्टोबर १९८१ : खनिज तेलाच्या शोधकार्याला चालना देण्यासाठी ऑइल इंडियाचे सार्वजनिकीकरण.

  • १ जानेवारी १९८२ : भारतीय निर्यात-आयात बँकेची मुंबई येथे स्थापना.

  • १८ जानेवारी १९८२ : मुंबईत गिरणी कामगार संपाला सुरुवात.

  • १५ नोव्हेंबर १९८३ : अॅटॉमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्डाची स्थापना.

  • १२ जुलै १९८२ : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेची (नाबार्ड) स्थापना.

  • १५ ऑगस्ट १९८२ : रंगीत स्वरूपात दूरदर्शन कार्यक्रमांचे प्रसारण सुरू.

  • २७ जून १९८२ : इंग्लंड दौऱ्यात फलंदाज संदीप पाटील याने बॉब विलीस या विख्यात गोलंदाजाच्या एका षटकात सहा चौकार ठोकून विश्वविक्रम केला.

  • १३ फेब्रुवारी १९८३ : आसाममधील नेली गावात भीषण हत्याकांड.

  • ९ जानेवारी १९८४ : भारतीय वैज्ञानिकांचे पथक संशोधनासाठी अंटार्क्टिका येथे पोहोचले.

  • १३ एप्रिल १९८४ : सियाचीन क्षेत्रात भारताने ‘ऑपरेशन मेघदूत’ ही मोहीम राबवली.

  • ५ जून १९८४ : अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ मोहीम

  • ७ जुलै १९८४ : ‘हम लोग’ ही अत्यंत गाजलेली हिंदी मालिका दूरदर्शन वरून प्रसारित करण्यात आली

  • ३१ ऑक्टोबर १९८४ : पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या. राजीव गांधी नवे पंतप्रधान.

  • ३० जानेवारी १९८५ : पक्षांतरबंदी विधेयक संसदेत मंजूर.

  • २३ एप्रिल १९८५ : मुस्लिम महिलांच्या पोटगीबाबतचा वादग्रस्त शहाबानो खटल्याचा निकाल.

  • २४ जुलै १९८५ : पंजाबमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी राजीव- लोगोंवाल करार.

  • ८ ऑगस्ट १९८५ : ध्रुव अणुभट्टी कार्यान्वित.

  • २० सप्टेंबर १९८५ : देशातील सर्वांत मोठे अशी ओळख असणाऱ्या इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाची स्थापना.

  • ७ डिसेंबर १९८५ : दक्षिण आशियाई देशांमधील परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी ‘सार्क’ ची स्थापना.

  • १६ मार्च १९८६ : आंतरराष्ट्रीय गुन्हेगार चार्ल्स शोभराज तिहार तुरुंगातून पळाला.

  • १ एप्रिल १९८६ : मोठ्या शहरांमधील दूरसंचार सेवेसाठी एमटीएनएलची स्थापना

  • ६ ऑगस्ट १९८६ : भारतातील पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचा मुंबईतील केईएम रुग्णालयात जन्म.

  • १२ ऑक्टोबर १९८६ : इंडियन एअरलाइन्सच्या विमानाला मुंबईजवळ अपघात. ८९ प्रवासी ठार.

  • ३० मे १९८७ : गोव्याला घटक राज्याचा दर्जा.

  • ७ मार्च १९८७ : कसोटी क्रिकेट इतिहासात प्रथम महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी दहा हजार धावांचा पल्ला पार केला.

  • ४ सप्टेंबर १९८७ : वादग्रस्त रुपकुंवर सती प्रकरण.

  • १ जानेवारी १९८८: धूम्रपानविरोधी मोहीम राबवणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य.

  • २५ फेब्रुवारी १९८८ : पृथ्वी क्षेपणास्त्राची श्रीहरीकोटा येथे झालेली पहिली चाचणी यशस्वी.

  • १२ एप्रिल १९८८ : वित्तीय बाजारांवर नियंत्रणासाठी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाची (सेबी) स्थापना.

  • २१ ऑगस्ट १९८८ : बिहारमध्ये ६.५ रिश्टर स्केलचा भूकंप. १००४ जणांचा मृत्यू.

  • २९ ऑगस्ट १९८८ : भारताच्या आरती प्रधान हिचा जिब्राल्टर सामुद्रधुनी पोहून जाण्याचा जागतिक विक्रम.

  • ६ जानेवारी १९८९ : पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हत्येप्रकरणी सतवंतसिंग व कलेरसिंग यांना तिहार तुरुंगात फाशी.

  • १२ मार्च १९८९ : उत्तर प्रदेशात अनुशक्तीच्या वापराद्वारे वीजनिर्मितीसाठी नरोरा अॅटोमिक पॉवर स्टेशन स्थापन.

  • २५ मार्च १९८९ : भारताचा पहिला सुपर कॉम्प्युटर एक्स एम. पी. १४ देशास समर्पित.

  • ७ ऑगस्ट १९९० : मंडल आयोगाच्या शिफारशी लागू.

  • ५ नोव्हेंबर १९९० : चंद्रशेखर यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.