लहानपणापासून गळ्यात तुळशीची माळ. घरातूनच सेवेचे संस्कार. सेवा हाच त्यांचा ध्यास झाला. गावाची कामे करता करता स्वतः अनेक गोष्टी करायच्या ते विसरले. न संपणारे गावचे प्रश्न, गावातील लोकांची कामे करत असताना गावाच्या गावठाणाला आणि शिवाराला ते सोडून गेले नाहीत. आपण सतत गावात असले पाहिजे, गाव आपले आहे, आपण आपल्या गावकऱ्यांच्यात सतत राहिले पाहिजे, ही ज्यांची भूमिका होती असे गणेशबुवा पानस्कर...
पंढरपूरच्या दिशेने जाणारा वारकरी पाहिला, की मला गणेशबुवा आठवतो. तशीच अवस्था त्यांच्या गावातील लोकांची होते. गणेश पानस्कर हे काही कोणी प्रसिद्ध माणूस नव्हते. सातारा जिल्ह्यातल्या डोंगरी पाटण तालुक्यातील बहुले मारुल त्यांचे गाव. गावाच्या आसपास सह्याद्रीच्या डोंगररांगा. याच गावाच्या शिवारात ते वाढले. बुवा या नावाने ते गावात प्रसिद्ध. गणेश यांचा दिवस भल्या पहाटे सुरू व्हायचा. सकाळी उठून हरिपाठ म्हणणे हे त्यांचे नित्याचे काम होते.
आवराआवरी सुरू असतानाच त्यांना फोन सुरू व्हायचे. त्यांचा वेल्डिंगचा व्यवसाय. ते व्यवसाय करत असतानाच त्यांना गावातील लोकांनी सांगेल ती कामे करायची सवय लागली. कारण त्यांची आत्या सखुबाई या गावातील वारकरी लोकांच्या मार्गदर्शक. गावातील मंदिरात त्यांची प्रवचने असत. गावातील पारायण सोहळ्यात त्यांचा सहभाग असे. मंदिरात रोजचा हरिपाठ असायचा, त्यातही त्या असत.
त्यांच्यासोबत लहानपणापासून गणेश जाऊ लागले आणि तिथेच त्यांना गावाकऱ्याबद्दल प्रेम निर्माण झाले. लोक त्यांना आपले वाटू लागले. पुढे मोठे झाल्यावर त्यांना गावच्या लोकांना मदत करण्याची सवय लागली. वेल्डिंग व्यवसायापेक्षा त्यांना गावातील लोकांची खूप काम आवडत. जिथे कमी तिथे आम्ही म्हणत गणेश उभे राहत होते. गावातील कोणी काही काम सांगितले, तरी नाही म्हणायचे नाही, ही त्यांची खासियत.
गावातील लोकांना काहीही काम निघाले की लोकांना गणूबुवांची आठवण यायची. बुवांच्या शब्दकोशात नाही हा शब्द नव्हता. कोणाला मल्हारपेठवरून घेऊन यायचे आहे ते कोणाला नेऊन सोडायचे इथपासून ते अगदी गावातील देऊळ झाडून काढण्यापर्यंत गणेश यांच्याकडे जबाबदाऱ्या असायच्या. कोणतीही कामे ते आपल्या घरचं समजून करायचे.
गावातील मंदिरात दररोज सुरू असलेल्या हरिपाठामध्ये पखवाज वाजवणे, हे त्याचे मुख्य काम. हरिपाठ ऐकायला खूप लोक येत, त्यात वयस्करही असत. आलेली प्रत्येक म्हातारी घरी जाईपर्यंत गणेश यांना काळजी असायची. मुलगा सुनेच्या संसारात स्वतःचा अधिकार न चालणारी एखादी नाराज आजी त्यांना घरातील गोष्टी सांगे, तेव्हा तिला धीर देण्याचे काम गणेश करायचे. ‘मी हाय’ असे म्हणायचे. तसे ते काहीही करू शकणार नसायचे; पण मी सोबत आहे, हा त्यांचा शब्द अनेकांना ताकद देणारा होता.
गणेश, गण्या, गणू, बुवा या नावांनी त्यांची ओळख. गावातील चार तरुण मंडळे. या सर्व मंडळात ते प्रिय. सगळ्यांचे लाडके. सर्वांवर प्रेम करणारे. लहानपणापासून लोकांची कामे ऐकणारे गणेश अशी प्रतिमा निर्माण झालेले गणेश बुवा. दिवसभर आपला वेल्डिंग व्यवसाय सांभाळून लोकांची कामे करत राहिले. ये हाडाचे कार्यकर्ते होते; पण ते कार्यकर्ता होते, हे त्यांना कळलेच नाही.
त्या दिवशी गण्या गेल्याचे कळले. पंधरा दिवस त्यांनी मरणाशी झुंज दिली. त्यांची अंत्ययात्रा. पंचवीस वर्षांच्या तरुण पोराची अंत्ययात्रा. एवढा मोठा आक्रोश मी आजवर कधीही पाहिला नव्हता. गावाचा सामूहिक आक्रोश होता तो. एक म्हातारी म्हणत होती. ‘गण्या कुठं गेलास रं. आता मी कशी जगू? ही म्हातारी त्याच्या पाहुण्यातील नव्हती. तिचा आक्रोश पाहून गलबलून आलं. एक तरुण पोरगा डोक्यावर मारून घेत रडत होता. तोही बुवांच्या कुटुंबाला अनोळखी.
नंतर समजले ते शेजारच्या गावातील होते. अनोळखी असलेली कितीतरी माणसं गणेशबुवांसाठी धाय मोकलून रडत होती. बहुले गाव आणि पंचक्रोशीतील लोक आलेले. अशी एकमेव अंत्ययात्रा की जिथे रडणारी लोकच जास्त. बघे कमी. वयाच्या पंचवीस वर्षात बुवाने कमावलेली ही मोठी संपत्ती, जी त्याला आयुष्यभर पुरणारी होती; पण गेला तो.
लहानपणापासून गळ्यात तुळशीची माळ आली. घरातून सेवेचे संस्कार मिळाले. ते एवढे भिनले की सेवा हाच त्यांचा ध्यास झाला. गावाची कामे करता करता स्वतः अनेक गोष्टी करायच्या ते विसरले. न संपणारे गावचे प्रश्न, गावातील लोकांची कामे करत असताना गावाच्या गावठाणाला आणि शिवाराला ते सोडून गेले नाहीत. आपण सतत गावात असले पाहिजे, गाव आपले आहे, आपण आपल्या गावकऱ्यांच्यात सतत राहिले पाहिजे, ही त्यांची भूमिका.
थोडी चक्कर आली म्हणून उपचारासाठी मुंबईला गेले. तेव्हाही मी येतोय, असे फोन गावातील लोकांना करत होते. मेंदूचे दुखणे निघाले. मोठे ऑपरेशन झाले. थोडा फरक पडला; पण गावातील गावकऱ्यांना दिलेला शब्द त्यांनी पाळला नाही. ते गावातून गेले ते शेवटचेच दर्शन ठरले. परत आले ते निर्जीव गणेश. एरव्ही एका हाकेला धावून जाणारे गणेश त्या दिवशी मात्र शेकडो लोक हाक मारत होते तरी उठले नाहीत..
शिवारात औत मोडला तर लोक पळत गणेश यांच्याकडे जायचे. औत दुरुस्त करून घ्यायचे. एक जण म्हणाला, ‘औत दुरुस्त करून देणारा दुसरा येईल; पण ते गणेशबुवा नसतील. आमचा बुवा आता कधीही परत येणार नाही.’
गावातील मुलींच्या मोबाईलवर स्टेटस, ‘गण्यादादा परत ये.’ म्हातारे लोक, तरुण पोरं, शाळेतील मुली या सगळ्यांसाठी हवा असलेला, ज्याने गावाला रडवले तो गण्या गेला. तो गेला आणि त्यांच्या गळ्यातील तुळशीची माळ गेली, त्यांचा भाबडेपणा गेला, त्याचे निरागस हसू गेले. मी गावात पाहिजे म्हणून कधीही गावठाण न सोडणाऱ्या गण्याने ती काळजी तरी करायला हवी होती. आयुष्यभर नुसते लोकांच्यासाठी जगले असले तरी चालले असते; पण ते जगले नाहीत.
त्यांच्या अस्थी पंढरपूरला चंद्रभागेत सोडायचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला.. गाड्या निघाल्या. गावातील माणसे रडत रडत गाडीत बसली; पण दहावीत शिकणाऱ्या पोरी तिथं येऊन थांबल्या होत्या.’ आम्हीही येतो गण्यादादासोबत.. ‘पोरी रडायला लागल्या. टेम्पोत येऊन बसल्या. गाड्या निघाल्या... गाड्या सुटताना वातावरणही उदास होतं. गावकरी टेम्पोतून निघाले. त्याच्या आई-वडिलांनी हात जोडले.. माणसे गहिवरून गेली.. भाऊ सोबत बसला.. तोही आतून हुंदके देत होता, पोरांनी सावरलं त्याला..
ज्या रोडने गणूबुवा जायचे त्याच रोडने त्यांच्या अस्थी निघाल्या..
आज रोजी त्यांच्या गावची दिंडी निघालीय. कराड पंढरपूर रस्त्याने. ज्या गावात दिंडी थांबते, त्या गावात रोज रात्री कीर्तन होते. कीर्तन सुरू करताना गणेशबुवांचे नाव घेऊनच कीर्तन होते. दिंडी चालताना त्यांचे तरुण मित्र आठवणी काढतात; पण म्हातारे लोकसुद्धा त्यांच्या आठवणीने गहिवरून जातात, कारण दिवसभर चालून थकल्यावर पायाला तेल लावणारा बुवा त्यांना आठवतो...
काही महिन्यांनी ती बुवांच्या अंत्ययात्रेत रडणारी म्हातारी दिसली कराडला... वेळ झालेली. गावाकडे जायच्या गाडीत बसलेली. आता तिला निसरे फाट्यावर उशीर झाला तर मागून गण्याबुवा येणार नव्हता.. ‘ये म्हातारे बस..’ म्हणणारा.. वाटलं गण्याबुवांचे नाव सांगून म्हातारीची ओळख काढावी; पण गेलो नाही.. म्हातारी गण्याबुवांच्या आठवणीने लय रडली असती...
(लेखक ‘मुलुखमाती’ या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक असून, ग्रामसंस्कृतीवर भाष्य करणारे भाष्यकार आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.