पंढरपूर-चिपळूण मार्गावर खानापूरजवळ बेणापूर नावाचं एक गाव आहे. या गावाला कुस्तीची मोठी परंपरा. तेथील श्रीरंग शिंदे अखिल भारतीय पातळीवर गाजलेले पैलवान होते. याच गावातील रावसाहेब अण्णा शिंदे नावाचा निष्ठावंत कार्यकर्ता आणि पैलवान.
पंढरपूर-चिपळूण मार्गावर खानापूरजवळ बेणापूर नावाचं एक गाव आहे. या गावाला कुस्तीची मोठी परंपरा. तेथील श्रीरंग शिंदे अखिल भारतीय पातळीवर गाजलेले पैलवान होते. याच गावातील रावसाहेब अण्णा शिंदे नावाचा निष्ठावंत कार्यकर्ता आणि पैलवान. त्यांच्या आयुष्यातही आमिषांचे अनेक हंगाम शिळ घालत गेले; पण पक्ष बदलण्याचा विचार त्यांच्या स्वप्नातही कधी आला नाही...
रावसाहेब शिंदे यांच्या गावात एकदा कुस्त्याचं मैदान भरलं होतं. या मैदानावर कोल्हापूर जिल्ह्यातील एक मोठा पैलवान आला होता. शेवटच्या कुस्तीला हा पैलवान फिरत असताना त्याला गावातील मैदानात जोड मिळणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. रावसाहेब अण्णा तेव्हा खेळत होते; पण जखम झाल्याने त्यांनी वर्षभर सराव केला नव्हता. गावातून जोड न मिळता पैलवान जाणार, ही गोष्ट अण्णांच्या वडिलांना पटली नाही. त्यांनी मुलाला त्या मोठ्या पैलवानाच्या सोबत लढत देण्याचा हुकूम केला आणि तो मोडायचा नाही म्हणून रावसाहेबांनी किस्ताक घातलं.
दोन पैलवानात तुफानी कुस्ती झाली. जखमी असलेल्या अण्णांनी त्या पैलवानाला चितपट केले. तेव्हा गावातील लोकांनी त्यांची जंगी मिरवणूक काढली. अशा रावसाहेब अण्णांचा मूळ पिंड कार्यकर्त्याचा. ते शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या विचारांचा प्रभाव पडलेल्या रावसाहेब अण्णांनी त्यांच्याच मार्गाने वाटचाल करायची ठरवली. कुस्तीतून कमावलेली ताकद ही गरीब माणसाचे रक्षण करण्यासाठी वापरायची, असा निर्धार करत हा पैलवान काम करू लागला.
मी बारावीत शिकत होतो तेव्हाची गोष्ट. त्यावर्षी आमच्या खानापूर तालुक्यात दुष्काळ पडला होता. राने उजाड झालेली. शिवार भकास होतं. जनावरांना चारा नाही म्हणून काही लोक जनावरांना सोडून देण्याच्या मनस्थितीत होते. सरकारी यंत्रणा सुस्त होत्या. गावोगावची माणसं दुष्काळानं हैराण झालेली. अशा परिस्थितीत लोकांना आधार देण्यासाठी आणि सरकारला जागे करण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष मोर्चे घेऊन यायचा. आम्ही शाळकरी पोरं हा मोर्चा बघायला जायचो. तालुक्यातील शेतकरी बैलगाड्या घेऊन यायचे. बैलगाड्यांनी रस्ता अडवला जात असे. हा चित्तवेधक मोर्चा पाहून सरकारी यंत्रणा हडबडून जाग्या होत. या मोर्चात जसे कार्यकर्ते असत तसेच बघेही असत. या मोर्चातलं रावसाहेब अण्णाचं भाषण आजही आठवतं. त्या भाषणातला अंगार मी पाहिलाय. अण्णांचं भाषण म्हणजे एकदम रांगडं असायचं. रोजच्या जीवनातील प्रसंग अण्णा खुलवून सांगायचे. बोलता बोलता कधी त्यांची विनोदबुद्धी जागी व्हायची. सरकारी अधिकाऱ्यांची खिल्ली उडवताना ते विनोदी उदाहरणे द्यायचे. इशारा देताना आक्रमक व्हायचे. माझ्यासह वर्गातील पोरं निर्भीड बनली त्याच काळात. अण्णांची त्या काळातली भाषणं इतकी अभ्यासपूर्ण होती. खरंतर टेप करायला हवी होती. वक्तृत्वाची एक वेगळी शैली त्यांनी निर्माण केली होती. आजची विरोधकांच्या खाजगी आयुष्यात डोकावणारी भाषणं ऐकल्यावर वाटतं बेणापूरसारख्या खेड्यात राहून अण्णा भाषणातील संयम कसे शिकले होते. त्यांनी विरोधकांना गुदगुल्या करत टीका करण्याची भाषा अण्णा कुठे शिकले असतील? ते असे बोलायचे की ज्याच्यावर टीका केली तो विरोधकही खळखळून हसायचा. अण्णांनी आज टीका केली तरी विरोधक दुसऱ्या दिवशी त्यांच्यापुढं नतमस्तक व्हायचा. कारण त्याला माहीत होतं आपल्यावर टीका करण्याचा अधिकार फक्त अण्णांनाच आहे. अण्णाचं भाषण म्हणजे चुकणाऱ्या मुलाला समजावल्यासारखं असायचं. त्यात राग आणि द्वेष नसायचा.
तालुक्याचं राजकारण बदललं. अण्णा ज्या पक्षाचे नेते होते तो पक्ष कमजोर बनला. गावोगावची माणसं-कार्यकर्ते सत्तेच्या दिशेनं गेली. अण्णा मात्र लाल बावटा आणि त्याचा अभिमान जपत राहिले. वयोवृद्ध अवस्थेत जेवढं जमेल तेवढं काम करत राहिले. अण्णा अलीकडच्या दहा वर्षांत सार्वजनिक स्टेजवर यायचे बंद झाले. त्यामुळे त्यांचं रांगड्या भाषेतलं भाषणही ऐकायला यायचं बंद झालं.
आजकाल वारं बदललं म्हणून अनेकांनी दिशा बदलल्या, काहीजण लाटेवर स्वार झाले म्हणून अण्णांची घालमेल झाली. पण ते अविचल राहिले. ठाम राहिले. आमिषांचे अनेक हंगाम त्यांच्या घरावरून शिळ घालत गेले; पण पक्ष बदलण्याचा विचार त्यांच्या स्वप्नातही कधी आला नाही. अखेरपर्यंत शेतकरी कामगार पक्षाशीच एकनिष्ठ राहिले. या पक्षाची कधीही सत्ता येणार नाही याचं डोळस भान त्यांना होतं, तरीही ते त्याच पक्षासोबत राहिले.
महाविद्यालय शिक्षण संपलं. नोकरीच्या निमित्ताने पुण्याला गेलो. मग विटा आणि परिसराशी संपर्क तुटला. जुने दिवस आठवत राहायचे; पण व्यापामुळे अनेकांच्या गाठीभेटी बंद झाल्या. एक दिवस खानापूर भागात गेलो होतो. रस्त्यात बेणापूर आलं. अण्णांचं गाव. त्यांची आठवण झाली. एका माणसाजवळ त्यांच्या घराची चौकशी केली. त्यांच्या घराच्या दिशेनं निघालो. चौकात एका झाडाखाली अण्णा बसले होते. एकटेच होते. मी अण्णांच्या जवळ गेलो. त्यांना नमस्कार केला. जवळ बसलो. त्यांना ओळख सांगितली; पण त्यांनी मला ओळखलं नाही. मग मोर्चाच्या आठवणी सांगितल्या, त्याही त्यांना आठवल्या नाहीत. आम्ही बोलत असताना एक तरुण आला. त्यानं सांगितलं, ‘‘अण्णांना आता काही आठवत नाही.’’ ते ऐकल्यावर मला खूप दुःख झालं. अण्णाकडं पाहिलं तर ते माझ्याकडे पाहत होते. असे शांत बसलेले अण्णा मी कधीही पाहिले नव्हते. मी पाहिलेले अण्णा लोकांच्यासाठी लढणारे, मोर्चात भाषण करणारे, तालुक्यात फिरून लोकांना आधार देणारे अण्णा!
काही वर्षांपूर्वी विट्याच्या एसटी स्टँडवर खेडेगावातून आलेल्या मळकट कपड्यातील माणसाला विचारलं, ‘‘कुठं जायचं हाय?’’
तर उत्तर मिळायचं, ‘‘कुठं जायचं न्हाय. हिकडंच आलूया. वाट बघतुया अण्णांची’’
‘‘कोण अण्णा?’’
‘‘बेणापूरचं रावसाब अण्णा..’’
अशी माणसं त्या काळात स्टँडवर दिसायची. त्या माणसाच्या कामासाठी अण्णा घरची कामं सोडून तालुक्याला यायचे. जी वेळ द्यायचे ती पाळायचे. भिवघाट एसटी आली की, गाडीचा दरवाजा उघडला जायचा. गाडीतून उजव्या हातात छत्री घेतलेले अण्णा दिसायचे. खाली वाट बघत असलेल्या माणसाला खूप आधार वाटायचा.
नंतर ते दिवस गेले. रोजच्यारोज भिवघाट गाडी यायची; पण त्या गाडीतून आता अण्णा उतरत नसायचे. आणि अण्णा आता विट्याला येत नाहीत, हे माहिती झालेला कार्यकर्तासुद्धा त्यांची वाट बघायचा बंद झाला. तोही दिसायचा बंद झाला. अण्णा जसे थकले आहेत, तसा अण्णांचा कार्यकर्ताही थकला.
गेल्या वर्षी एका सकाळी व्हाट्सॲपवर अण्णांचा फोटो आला. सोबत अण्णा गेल्याची बातमी. क्षणभर काहीच सुचेना. गहिवरून गेलो. जुनं सगळं आठवत राहिलं. अण्णांचा रांगडा आवाज, त्यांची भाषणे. भाषणादरम्यानच्या टाळ्या आणि शिट्या. एक रांगडा वक्ता नेता आमच्या पिढीने पाहिलेला. आयुष्यभर एकाच पक्षात राहिलेला हा पुढारी. ज्यांच्या नावाने गाव ओळखलं जायचं. गावाची ओळख सर्वदूर गेलेली. अण्णा गेले, तो सगळा दिवस अण्णांची भाषणं आठवण्यात आणि त्यांचं चरित्र आठवण्यात गेला. आताही जेव्हा जेव्हा पक्षनिष्ठेचा विषय कुठेही चर्चेत येतो तेव्हा मी एका खेड्यातील अण्णांची गोष्ट लोकांना सांगतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.