जुन्या सांगली-सातारा रोडने सातारला जाताना लागणाऱ्या पारगावचे नाथा पवार. त्यांच्या काळात त्यांनी कुस्तीचं मैदान गाजवलं आणि नाथा पवारचे ते नाथा पारगावकर झाले. दुर्दैवाने त्यांच्यावर दोन कौटुंबिक आघात झाले आणि त्यांची कुस्ती सुटली. त्यानंतर नाथा पवार यांनी ज्या पारगावचे नाव मिरवले त्या गावाचा कायापालट केला. आजही सांगली, सातारा जिल्ह्यात पारगाव म्हटलं की कुठलं, नाथा पारगावकराचं काय, असा प्रश्न विचारला जातो. त्यांना जाऊन बरीच वर्षं झालीत, पण त्यांच्या अस्तित्वाच्या खाणाखुणा अद्याप आहेत आणि राहतील...
नाथा पारगावकर हे नाव घेतलं की आता ज्यांचं वय सत्तरीच्या घरात आहे, ते पारगावकरांबद्दल अनेक गोष्टी सांगतील. पुसेसावळी याच परिसरात पारगाव, गोरेगाव आणि रायगाव अशी तीन गावं आहेत. रायगाव सांगली जिल्ह्यात. गोरेगाव आणि पारगाव सातारा जिल्ह्यात. जुन्या सांगली-सातारा रोडने सातारला जाताना पहिली गावं. त्यातल्या पारगावचे नाथा पवार.
कुस्तीसाठी मेहनत करायला सांगलीला गेले आणि पारगावचं नाव त्यांनी अवघ्या महाराष्ट्रात नेलं. त्यांची कुस्ती जेव्हा बहरात होती तेव्हा त्यांनी पवार आडनावाऐवजी नाथा पारगावकर असं नाव लावायला सुरुवात केली. या गावात जिजाबा पारगावकर, महिपती पारगावकर हेही मल्ल त्याच ताकदीचे. गावावर असलेलं प्रेम असं त्यांनी व्यक्त केलेलं... नाथा यांचे भाऊ संभाजीसुद्धा ख्याती मिळवलेले मल्ल.
सांगलीची भोसले व्यायामशाळा म्हणजे त्या काळातील कुस्तीचं विद्यापीठच. भारतभीम जोतिराम दादा सावर्डेकर आणि बेलीफ ढाकवाले तिथले वस्ताद. त्यांच्या तालमीत नाथा पारगावकर रुजू झाले. सराव करू लागले. वस्तादांनीसुद्धा त्यांच्यातील गुणवत्ता हेरून विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली.
जेवढा सराव करून घेता येईल तेवढा ते करून घ्यायला लागले. नाथा सांगलीला गेल्यावर काही काळानंतर मुंबईला कुस्तीची राज्य पातळीवरची स्पर्धा आली. १९५५ सालचा तो काळ. महाराष्ट्र केसरी स्पर्धा अजून सुरू झाली नव्हती.
मुंबई राज्याच्या वतीने बॉम्बे स्टेट नॅशनल स्पोर्टस् ट्रस्ट फंडाच्या वतीने राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात यायचा. मुख्यमंत्री मोराराजी देसाई या महोत्सवाचे अध्यक्ष होते. संपूर्ण मुंबई राज्यातून मल्ल आले होते. या स्पर्धेसाठी सांगलीतून नाथा पवार गेले होते. त्यांचं वय होतं एकवीस वर्षं.
या स्पर्धेसाठी जुन्या मुंबई राज्यातून आलेल्या सर्व मल्लांवर मात करत नाथा पवार यांनी प्रथम क्रमांक मिळवला. मुख्यमंत्री मोराराजी देसाई यांनी राज्यात पहिला क्रमांक मिळवलेल्या या विजेत्या मल्लाचे कौतुक केले. या राज्य पातळीवरच्या यशानंतर मात्र नाथा पवार यांनी पुन्हा कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यांचा आलेख चढता राहिला.
पुढच्या काळात महाराष्ट्र केसरी दिनकर दह्यारी, हिंदकेसरी हजरत पटेल, इसाक शिरगुप्पी, बचन पंजाबी यांच्याशी त्यांनी लढती केल्या. या लढतीने त्यांचे नाव अगदी गावागावात गेले. नाथा पारगावकरांची कुस्ती बघायला कोल्हापूर, सांगलीला सायकलवर गेलेलो, असं सांगणारे लोक भेटतात. साधारण आठ-दहा वर्षांचा काळ त्यांनी गाजवला होता.
नाथा पारगावकर यांच्या कुस्तीचा वैभवी काळ सुरू होता. त्याचदरम्यान त्यांच्या वडिलांची तब्येत बिघडत चालल्याने मुलीचं लग्न करा अशी इच्छा व्यक्त केली. तेव्हा बहिणीच्या लग्नानिमित्त नाथा गावी आले. बहिणीचं लग्न जवळच्या कडेपूर गावात ठरलं होतं. गावात लग्नाची धावपळ सुरू होती.
वडिलांच्या गंभीर आजाराचे सावट या लग्नावर होते. लग्नाचा दिवस उजाडला. दारात पै पाहुणे इष्टमित्र यांनी गर्दी केली. वऱ्हाड आले. ठरलेल्या वेळेला लग्न लागले. जेवणाच्या पंगती बसल्या. त्या वेळी भावकीतला एक जण आजारी वडिलांकडे सहज बघायला गेला. त्याने हाक मारली, प्रतिसाद मिळाला नाही.
पुन्हा जोरात हाक मारली तरी प्रतिसाद मिळाला नाही म्हटल्यावर तो जवळ गेला. अंगाला हात लावला तर अंग गार झालेलं. श्वास बंद झाला होता. त्यांच्या लक्षात आलं; पण बाहेर मांडवात लोक जेवण करत होते. ते बाहेर आले आणि एकदोघांना झाल्या प्रकाराची माहिती दिली.
पंगती उठल्यावर, वऱ्हाडी निघून गेल्यावर नाथा यांना त्या लोकांनी वडिलांच्या खोलीकडे नेले आणि वडिलांच्या मृत्यूबाबत कल्पना दिली. हे पाहून ते हादरून गेले, आक्रोश करू लागले. बहिणीच्या लग्नात वडिलांचा मृत्यू झाल्याची जखम त्यांच्या काळजावर झाली. ते नंतर अबोल बनत गेले. उदासपणे बसून राहायचे. दिवस सरत गेले. त्यांनी कुस्ती मेहनत बंद केली. त्या दुःखातून सावरले नव्हते.
अशातच एक दिवस अजून एक संकट आले. नवीन लग्न झालेल्या त्यांच्या बहिणीचे पती विट्यावरून कडेपूरला येत होते. निम्म्या वाटेत आल्यावर त्यांच्या मोटरसायकलला अपघात झाला. यात ते जागीच ठार झाले. ही बातमी ऐकून पारगाव दुःखात बुडाले. गावावर शोककळा पसरली.
वडिलांच्या मृत्यूनंतर लगेच महिनाभरात बहिणीवर कोसळलेली वैधव्याची कुऱ्हाड यामुळे पैलवान नाथा पवार खचून गेले. ते आखाडा गाजवणारे मोठे पैलवान होते; पण मनाने संवेदनशील होते. संपूर्ण भारतात कुस्तीमैदान गाजवलेला आणि भल्याभल्यांच्या उरात धडकी भरवणारा हा मल्ल आकस्मिक संकटाने पूर्ण खचला.
त्यांच्यातील लढण्याची जिगर संपली की काय असं वाटू लागलं. त्यांनी कुस्ती सोडल्यात जमा होती. बहिणीवर एवढ्या लहानपणी आलेल्या संकटामुळे पैलवानांना अन्न गोड लागेना. यादरम्यान अनेक ठिकाणी कुस्ती मैदाने झाली; पण नाथा पारगावकर यांची कुठेही कुस्ती लागेना. नाथा पारगावकर कुठे आहेत लोक चर्चा करू लागले. नाथा त्यांच्यावर कोसळलेल्या आघातांनी घायाळ झाले होते. कुठेही जात नव्हते.
एक दिवस त्यांचे वस्ताद जोतिरामदादा सावर्डेकर आणि बेलीफ ढाकवाले ॲम्बेसिटर गाडी घेऊन पारगावला आले. अचानक वस्तादांना पाहून त्यांना आश्चर्य वाटले. जोतिराम दादांनी त्यांचे सांत्वन केले आणि त्यांना मारुती माने यांच्यासोबत एक महिन्याने कुस्ती ठरवली असल्याचे सांगितले.
ती बातमी ऐकून नाथा पवार म्हणाले, ‘‘माझ्यावर असे प्रसंग आलेत. मी खचून गेलोय. माझा सराव नाही. मला कुस्ती करता येणार नाही.’’ पण जोतिराम दादा म्हणाले, ‘‘तू कुस्ती करायची एवढं मला माहिती आहे.’’ नाथाची आपल्या वस्तादावर श्रद्धा होती. त्यांचा शब्द कसा मोडायचा म्हणून ते कुस्तीसाठी तयार झाले. सराव सुरू केला; पण घरावर झालेले आघात अजून ते विसरू शकत नव्हते. त्याच मनस्थितीत ते कुस्तीला सामोरे निघाले होते. गावोगावी जाहिराती पोहोचल्या. भिंतीवर पोस्टर लागली. नाथा पवार आणि मारुती माने यांची लढत होणार.
कुस्तीच्या दिवशी सांगलीच्या दिशेने जाणारे सगळे रस्ते माणसांनी फुलून गेलेले. लोकांत या कुस्तीची चर्चा होती. कधी एकदा कुस्ती सुरू होतेय असं लोकांना झालेलं. मैदान तुडुंब भरले. या मैदानाला वसंतराव दादा पाटील खास उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ही कुस्ती लावण्यात आली.
यापूर्वी कोल्हापूरला नाथा पारगावकर यांची कुस्ती दोन नंबरला दिनकर दह्यारी यांच्यासोबत होती, त्याच मैदानात मारुती माने यांची कुस्ती अण्णा पाटोळे यांच्यासोबत पाचव्या क्रमांकाला होती. या दोन्हीही कुस्त्या अजूनही लोकांच्या लक्षात होत्या. आज पारगावकर आणि माने समोरासमोर लढत होते. खडाखडी डाव प्रतिडाव सुरू होते. पब्लिकचं ध्यान आखाड्याकडे होतं. अर्धा तास ही कुस्ती सुरू होती.
शेवटी मारुती माने यांनी नाथा पारगावकर यांच्यावर मात केली; मात्र कुस्तीच्या इतिहासातील ज्या काही गाजलेल्या कुस्त्या आहेत, त्यात या कुस्तीची नोंद आहे. ती कुस्ती पाहिलेले अनेक लोक आज त्या कुस्तीचे वर्णन ज्या आवेशात करतात, ते पाहून कुस्तीची कल्पना येते.
कुस्ती सुटली आणि ज्या गावाचे नाव त्यांनी स्वतःच्या आडनावाऐवजी लावले होते त्या खटाव तालुक्यातील पारगावला गेले. गावाची सेवा करायची असा विचार करत राजकारणात उतरले. सलग पंचवीस वर्षे गावचे सरपंच झाले.
याचदरम्यान पंचवीस वर्षे सातारा जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून निवडून गेले. कधी काळी महाराष्ट्र केसरीच्या तोडीचा बॉम्बे स्टेट नॅशनल स्पोर्टस् फंडाचा प्रथम क्रमांक मिळवलेल्या या मल्लाने गावासाठी आणि स्वतःच्या परिसराच्या विकासासाठी स्वतःला वाहून घेतले. तालुका पंचायत समितीचे उपसभापती म्हणूनसुद्धा काम करण्याची संधी मिळाली.
ज्या पारगावचे नाव त्यांनी मिरवले त्या गावाचा कायापालट व्हावा म्हणून त्यांनी परिश्रम घेतलेच, पण गावात वैचारिक तरुणाई घडवली. आजही सांगली, सातारा जिल्ह्यांत पारगाव म्हटलं की कुठलं, नाथा पारगावकरांचं काय? असा प्रश्न विचारला जातो. त्यांना जाऊन बरीच वर्षं झालीत, पण त्यांच्या अस्तित्वाच्या खाणाखुणा अद्याप आहेत आणि राहतील...
(लेखक ‘मुलुखमाती’ या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक असून, ग्रामसंस्कृतीवर भाष्य करणारे भाष्यकार आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.