शिक्षकाचं गावाशी असं असावं नातं

शिक्षकाची बदली झाली म्हणून रडणारे विद्यार्थी असे चित्र अलीकडे सोशल मीडियावर दिसते, ते बघून आपणही हेलावून जातो.
Vasantrao Shirtode
Vasantrao Shirtodesakal
Updated on

शिक्षकाची बदली झाली म्हणून रडणारे विद्यार्थी असे चित्र अलीकडे सोशल मीडियावर दिसते, ते बघून आपणही हेलावून जातो. वसंतराव शिरतोडे जुन्या काळातील असेच एक गुरुजी. त्यांनी आपल्याच गावात राहावं म्हणून त्यांच्यासाठी विद्यार्थी-पालकांसह त्या गावचे जमीनदारही आग्रह करत होते. स्वतःची सहा एकर जमीन ते या शिक्षकाला द्यायला तयार होते. हा तरुण आणि प्रामाणिक शिक्षक आपल्या गावात राहिला, तर आपल्या गावातल्या मुलांना चांगले शिक्षण मिळेल, ही तळमळ त्यांच्याकडे होती...

वसंतराव शिरतोडे शिक्षक म्हणून आटपाडी तालुक्यातील बनपुरी या गावात रुजू झाले. हे गाव श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांचे. ते खानापूर आणि आटपाडी या दोन्ही तालुक्याचे सभापती होते. शिवाय त्या गावचे जमीनदार. गावात लोक त्यांना सरकार म्हणत. बनपुरी गावातील शाळेत ते अधूनमधून चक्कर टाकत. विद्यार्थी आणि शिक्षकांची चौकशी करत. त्यांना शिक्षणाबद्दल खूप आस्था होती.

वसंतराव शिरतोडे हे पैलवानकी करायचे. तब्बेत चांगली. कमावलेलं शरीर, घरची परिस्थिती हलाखीची असतानाही त्यांनी त्या परिस्थितीवर मात करत शिक्षण घेतलं. त्यांना पोलिस व्हायची खूप इच्छा होती. शरीर धिप्पाड असल्याने त्यांना वाटायचे आपण पोलिस व्हावे; मात्र त्यांच्या आईला पोलिसांची खूप भीती वाटत असे. त्या काळी पोलिस म्हटलं की लोकांना घाम फुटायचा.

वसंतराव शिरतोडे यांच्या आई कृष्णाबाई यांना तर पोलिस म्हटलं की कापरे भरायचे. त्यामुळे आईसाठी त्यांनी पोलिसांची नोकरी करण्याचा विचार सोडून दिला. ‘‘मी व्यायाम करत होतो. तब्येत चांगली होती. पोलिसात सहज भरती झालो असतो; तिकडं गेलो नाही. मॅट्रिक होऊन शिक्षक झालो.’ ते सांगतात.

‘सांगली जिल्ह्यातल्या बनपुरी गावात मी मास्तर म्हणून रुजू झालो. गाव एकदम माणदेशातील खेडेगाव. एका बाजूला शाळा होती. सुरुवातीला गावात भाड्याने खोली मिळवण्यासाठी प्रयत्न केला; पण मिळेना. तालुक्याचे गाव आटपाडी जवळ होतं. तिथं जाऊन खोली भाड्याने घेतली. सायकलवर बनपुरीला जाणे-येणे करत होतो. हेडमास्तर कडक होते. त्यांना एक मिनीटही उशीर झालेला चालायचा नाही. मी ज्या खानावळीत जेवायला जायचो, तिथं जेवण बनवायला उशीर झाला, तर चपात्या पिशवीत घ्यायचो आणि जायचो. कधी उशीर होऊ दिला नाही.’’ अशा अनेक आठवणी एकेकाळी गुरुजी असलेले वसंतराव शिरतोडे सांगतात.

शिरतोडे गुरुजी त्या शाळेत आणि गावात रुळले होते. त्यांच्या कामाची पद्धत आणि त्यांचा विद्यार्थ्यांशी असलेला जिव्हाळा लक्षात आल्याने गावाकऱ्यांनी त्यांना गावात राहायला सांगितले. मग ते आटपाडीहून बनपुरी गावात राहायला आले. गावातील अनेक गोष्टीत गुरुजींना बोलावणे येऊ लागले. गुरुजी गावातील एक घटक झाले.

माणदेशी मुलुख. या मुलखातल्या बनपुरी गावात अधुनमधून काही लोक गावगाड्याशी संबंधित व्यवसायाच्या निमित्ताने येत. काही दिवस राहत. एक दिवस माळशिरस भागातील एक कुटुंब आले. त्यांनी शाळेच्या जवळील एका झोपडीत आपला संसार मांडला. त्यांच्यासोबत एक लहान मुलगा होता. तो दिवसभर घरात बसून असायचा. मग शिरतोडे गुरुजींनी त्याच्या वडिलांना त्याला शाळेत पाठवण्याची विनंती केली. मुलाच्या दोन इयत्ता झाल्यानंतर त्याने शाळा सोडून दिली होती. पोरगं हुशार होतं. चुणचुणीत होतं. गुरुजींमुळे शाळेची त्याला पुन्हा गोडी लागली.

बराच काळ ते कुटुंब गावात राहिलं. तोवर त्या मुलाच्या मनात शिक्षणाबद्दल गोडी निर्माण करण्याचे काम गुरुजींनी केले. पुढे त्या मुलाचे आई-वडील ज्या ज्या गावात गेले, तिथल्या शाळेत जाऊन त्याने शिक्षण पूर्ण केलं. त्याला शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्याच्या मनात शिक्षणाबद्दल गोडी निर्माण केली होती शिरतोडे गुरुजी यांनी. पुढे काही वर्षांनी हा मुलगा पोलिस बनून गुरुजींना भेटला. तेव्हा गुरुजींच्या आणि त्या मुलाच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. जुने दिवस समोर आले. व्यंकटेश माडगूळकर यांच्या माणदेशी माणसांमधील झेल्याची आठवण करून देणारी ही गोष्ट...

बनपुरी या गावात काही वर्षं सेवा झाल्यावर गुरुजींनी बदली व्हावी, अशी विनंती बाबासाहेब देशमुख यांना केली; पण ते आणि गावचे गावकरी या विद्यार्थीप्रिय शिक्षकाला सोडेनात. तुम्ही याच शाळेत हवेत, असं म्हणू लागले; पण गुरुजींना आता आपलं गाव, आई-वडील, परिसरात जावं असं वाटू लागलेलं. मग बाबासाहेब देशमुख या शिक्षकाला म्हणाले, ‘गुरुजी तुम्ही आमच्याच गावात राहा.

आमच्या गावातील गोरगरीब उपेक्षित लोकांच्या मुलांसाठी तुम्ही खूप चांगलं काम करत आहात. असा माणूस आम्हाला पुन्हा मिळणार नाही. तुम्ही आमच्याच गावचे रहिवासी व्हा. तुम्हाला मी सहा एकर जमीन देतो आणि गावात घर बांधून देतो; पण तुम्ही इथं राहा,’ अशी विनंती देशमुख यांनी केली. त्यांची गावाबद्दल असलेली तळमळ पाहून गुरुजी भारावून गेले.

एक दिवस गुरुजींची बदली त्यांच्या मूळ भाळवणी गावाजवळ झाली. आसपासच्या गावातच पुन्हा त्यांनी नोकरी केली. आता गुरुजी सेवानिवृत्त झाले आहेत. जेव्हा भेटतात तेव्हा जुन्या आठवणी सांगतात. त्यातील सांगण्यासारख्या आठवणी आहेत त्या गुरुजी जेव्हा सांगतात तेव्हा सगळे चित्र डोळ्यासमोर उभा राहते...

दरम्यानच्या काळात बनपुरी या गावावरून आटपाडीला जायचा योग आला. या गावाहून जाताना शिरतोडे गुरुजी, त्यांची शाळा, त्यांचा तो पोलिस झालेला विद्यार्थी, गावच्या भल्यासाठी एक चांगला शिक्षक आपल्या गावात राहिला पाहिजे म्हणून त्यांना आमच्या गावातच राहा, अशी विनंती करणारे बाबासाहेब देशमुख या सगळ्या गोष्टी आठवत राहिल्या..

शिक्षकाची बदली झाली म्हणून रडणारे विद्यार्थी असे चित्र चांगल्या शिक्षकांच्या बाबतीत अलीकडे दिसून येते आहे. सोशल मीडियावर तसे व्हिडीओ आपल्याला दिसतात आणि ते बघून आपणही हेलावून जातो. वसंतराव शिरतोडे जुन्या काळातील असेच एक गुरुजी. त्यांनी आपल्याच गावात रहावं म्हणून त्यांच्यासाठी विद्यार्थी, पालकच आग्रह करत नव्हते, तर त्या गावचे जमीनदार आणि सभापती बाबासाहेब देशमुख स्वतः आग्रह करत होते.

स्वतःची सहा एकर जमीन ते या शिक्षकाला द्यायला तयार होते. हा तरुण आणि प्रामाणिक शिक्षक आपल्या गावात राहिला, तर आपल्या गावातल्या मुलांना चांगले शिक्षण मिळेल, ही तळमळ त्यांच्याकडे होती.... आज ही आठवण सांगताना गुरुजी गहिवरून जातात...

एकेकाळी आपल्या चांगुलपणाच्या बळावर बाबासाहेब देशमुख यांच्यासारख्या लोकाभिमुख नेत्यांची शाबासकी मिळवलेले वसंतराव गुरुजी सध्या सांगली जिल्ह्यातल्या भाळवणी गावात असतात. ते सुखासमाधानात आयुष्य जगत आहेत. आमच्यासारखा कोणी भेटायला गेला तर खूप आपुलकी दाखवतात. खूप गप्पा मारतात, जुन्या गोष्टी सांगतात. त्यांची शैली गोष्टीवेल्हाळ आहे. त्यांनी बोलावं आणि आम्ही ऐकावं असं वाटत राहातं..

(लेखक ‘मुलुखमाती’ या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक असून, ग्रामसंस्कृतीवर भाष्य करणारे भाष्यकार आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.