पैलवानावर खिळली नजर...

सकाळी आपल्या मुलाच्या गाडीवर बसून रानात जाणारा विजार टोपीवाला माणूस. या माणसाने मुंबई गाजवली होती. बापू मानेची कुस्ती बघायला लोक तिकीट काढून येत असत.
Yashwantrao Chavan and Vasantdada Patil
Yashwantrao Chavan and Vasantdada Patilsakal
Updated on
Summary

सकाळी आपल्या मुलाच्या गाडीवर बसून रानात जाणारा विजार टोपीवाला माणूस. या माणसाने मुंबई गाजवली होती. बापू मानेची कुस्ती बघायला लोक तिकीट काढून येत असत.

सकाळी आपल्या मुलाच्या गाडीवर बसून रानात जाणारा विजार टोपीवाला माणूस. या माणसाने मुंबई गाजवली होती. बापू मानेची कुस्ती बघायला लोक तिकीट काढून येत असत. हा वैभवशाली काळ ज्या मल्लाच्या आयुष्यात आला ते बापूसाहेब सातारा जिल्ह्यातील राजाचे कुर्ले गावचे मल्ल... त्यांनी गावाचे नाव देशभर गाजवले. आता याच गावातून तगडे मल्ल तयार झाले पाहिजेत, या ईर्षेने त्यांनी गावातील मुलांमध्ये कुस्तीचं वेड पेरलं आहे...

महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान बापूसाहेब माने सध्या गावाकडं असतात. शेतीत रमले आहेत. एका सकाळी भाकरी घेऊन ते रानात जातात. रात्री परततात. ते थेट तालमीत जातात. कुस्तीचे वेड असलेल्या पोरांना चार डाव शिकवतात. सातारा जिल्ह्यातील एका खेड्यात राहणाऱ्या बापूंचे आजचे आयुष्य खूप साधं आहे; पण हेच माने कधीकाळी उत्तर भारतातील नामांकित मल्लांना भारी ठरले होते. भल्याभल्यांना त्यांनी अस्मान दाखवलं होतं हे आज सांगूनही पटणार नाही.

खटाव तालुक्याच्या पश्चिम भागातील गाव. आजही दुष्काळी परिस्थिती आहे. तेव्हाही दुष्काळ पाचवीला पुजलेला. हातातोंडाची गाठ पडायची असेल, तर मुंबईला जाऊन मिळेल ते काम करणं हाच एक पर्याय समोर होता. वडिलांचे छत्र हरपलेले. घरची गरिबी. कुस्तीची आवड होती; पण आर्थिक परिस्थितीमुळे कुस्ती व शिक्षण अर्धवट सोडून बापूरावांनी मुंबईची वाट धरली. पोटासाठी हा तरुण यंत्रांच्या तंत्राच्या मुंबईला आला. ओळखीपाळखीने मुंबई नगरीत अनेक कामे करत शेवटी स्टोअर विभागात हेल्पर म्हणून महापालिकेत नोकरी धरली; पण नोकरी धरली असतानाच दत्ता जाधव या गावाकडच्या वस्तादांनी बापूला पुन्हा एकदा कुस्तीच्या आखाड्यात उतरवले आणि स्वतः त्याच्याशी लढत देत घडवू लागले. बापू मोठा पैलवान होऊ शकतो, हे त्या वस्तादांनी जाणलेलं. मग वस्ताद बापूंच्या मागेच लागले. नोकरी करत बापूंही कुस्तीमेहनत करू लागले. छोट्या-मोठ्या लढती देऊ लागले. सततचा सराव आणि वस्तादांचे मार्गदर्शन असल्याने अल्पावधीतच बापू मुंबईच्या कुस्तीक्षेत्रात चमकू लागले.

सत्तरीचे दशक. कुस्ती आणि पैलवान याला मानसन्मान मिळायचा तो काळ. याच काळात दुष्काळी भागातून आलेला पैलवान मुंबईत शड्डू ठोकत होता. आव्हान देत होता. लढत होता. मुंबईच नाही, तर अगदी सांगली, सातारा जिल्ह्यातील मैदाने हा मल्ल गाजवत निघालेला. त्यातच यवतमाळला राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा आली. मोठ्या तयारीने बापूसाहेब माने गेले आणि भल्या मोठ्यांना चितपट करत त्यांनी महाराष्ट्र चॅम्पियनपद मिळवले. आजवरच्या मेहनतीने मिळालेले सुवर्णपदक गळ्यात घालूनच हा सातारचा पठ्ठ्या आला आणि मग त्याने मागे वळून पाहिलेच नाही.

मुंबईत तेव्हा कुस्तीचे माहेरघर होते. स्टेडियमला तिकिटावर कुस्त्या होत. त्याकाळी उत्तर भारतातील अनेक मल्ल मुंबईला कुस्त्यांसाठी येत असत. काहींनी मुंबईत तालीम उभ्या केलेल्या. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ होऊन दहा-पंधरा वर्षांचा काळ लोटला असला, तरी मुंबईत राहणाऱ्या मराठी माणसात मराठी भाषा, मराठी माणूस या अस्मिता जाग्या होत्या. त्याचे पडसाद उमटलेले. कुस्तीतसुद्धा. मग लढती होताना महाराष्ट्रातील पैलवान विरुद्ध उत्तर भारतीय पैलवान अशा होत. अनेकदा कुस्तीचे आयोजक ईर्षा निर्माण व्हावी आणि लोक जमावेत म्हणूनही तशा कुस्त्या जोडत. तशा जाहिराती करत. या तुफानी लढती बघायला एकच गर्दी व्हायची. स्टेडियम हाऊसफुल्ल असायची. त्याच काळात राजाचे कुर्ले या गावातून आलेले बापू माने हे उत्तर भारताच्या अनेक मोठ्या मल्लांशी लढले आणि जिंकले. बनारस केसरी शाम यादव, लाला जमाल, ऑल इंडिया चॅम्पियन कृष्णकुमार यांसारख्या मोठ्या मल्लांना त्यांनी अस्मान दाखवले. या तुफानी कुस्त्यामुळे बापू महाराष्ट्रातील कुस्तीप्रेमींच्या गळ्यातील ताईत बनले.

‘मला कुस्तीने खूप पैसा मिळवून दिला. मी कष्ट करायचो, मेहनत करायचो. मला यश मिळत होते. कुस्ती खेळताना मला माझी गरिबी दिसायची. आपलं दारिद्र्य दूर करायचं असेल, तर लढलं पाहिजे. म्हणून मी लढायचो. अनेक नामांकित पैलवानांच्या सोबत लढलो; पण त्यांची कधीही भीती वाटली नाही. माझा वस्ताद खंबीर होता. मेहनत होती. बारा वर्षांत एकही कुस्ती मी हरलो नाही,’ असे ते सांगतात.

हजारो लोकांच्या उपस्थितीत कुस्ती खेळणारा हा मल्ल, ज्यांच्या कुस्त्या तिकीट घेऊन झालेल्या. त्याकाळी बापूसाहेब माने यांना बघितलं, तरी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या गाड्याचा ताफा जाग्यावर थांबत होता. खुद्द वसंतराव दादा पाटील हे या पैलवानावर खुश होते. भेटले की प्रेमाने पाठीवर हात ठेवून विचारपूस करत होते. सातारा जिल्ह्यातील एका पोरानं भल्या-भल्यांना अस्मान दाखवलं आहे, ही गोष्ट दिल्लीत यशवंतराव चव्हाण यांनाही समजलेली. तेही बापूना भेटायला उत्सुक होते. ती वेळ आलीच. दादरला सातारच्या काही लोकांनी एकत्र येऊन सातारच्या प्रतिसरकारचे संस्थापक क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नावाने तालीम उभा केली. त्याच्या उद्‌घाटनाला यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव दादा पाटील आलेले. सगळा पुढाकार पैलवान माने यांनी घेतलेला. या वेळी चव्हाण यांनी बापूंचे कौतुक केले. सातारच्या तरुण मल्लाबद्दल वाटणारे कौतुक त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते.

१९७२ ते १९८४ अशी बारा वर्षे बापूंनी मुंबईत तुफानी कुस्त्या केल्या. त्यांच्या जास्तीत जास्त कुस्त्या उत्तर भारतीय मल्लांच्या सोबत झाल्या. उत्तर भारतातील मल्लांचा कर्दनकाळ अशीच त्यांची जाहिरात कुस्तीचे आयोजक करत असत. बापूंची कुस्ती म्हटलं की गिरणी कामगार, हमाल, माथाडी, शिक्षक आवर्जून यायचे. प्रसिद्धीचे शिखर गाठले पण आपले मूळ कधी विसरले नाहीत, हीच त्यांची खासियत होती. एवढी प्रसिद्धी मिळूनही विनम्र स्वभाव हा त्यांना अलंकारासारखा शोभत असे.

एकेकाळी तुफानी मल्ल म्हणून ओळख असलेले बापू आता गावाकडे शेतीत रमलेत, कुस्तीतून जे पैसे मिळाले त्यातून बारा एकर जमीन खरेदी केलीय. जमीन खरेदी करताना माळाची होती; पण परिश्रम करून माळाचा मळा केला. शेतात ऊस डोलतोय. आनंदी जीवन सुरू आहे. आयुष्यभर केलेल्या कष्टाचं चीज झालं आहे. आपल्यामुळे गावाचे नाव देशभर गाजले, अजून याच गावातून तगडे मल्ल तयार पाहिजेत, या ईर्षेने त्यांनी गावातील मुलांच्यात कुस्तीचं वेड पेरलंय. याही वयात रोज संध्याकाळी ते कपडे काढून आखाड्यात उतरतात आणि पोरांच्या सोबत लढत करतात, हुकुमाचे डाव शिकवतात. आसपास जर कुस्ती मैदान असेल, तर पदरमोड करून पोरांना कुस्त्यांना घेऊन जातात.

कुस्ती मैदान माणसांनी फुल्ल भरलेलं असतं. तिथं धिप्पाड शरीराचे बापू जेव्हा जातात तेव्हा एकच निवेदकांच्याकडून पुकार होतो, ‘आले आले एकेकाळचे तुफानी मल्ल, महाराष्ट्र चॅम्पियन बापूसाहेब माने आले. ज्यांनी बनारस केसरीला अस्मान दाखवलं आणि ज्यांनी ऑल इंडिया चॅम्पियनला सातारच्या मातीची ताकद दाखवून दिली ते बापूसाहेब माने... टाळ्यांचा गजरात स्वागत करा...’’ हे ऐकताना बापूंच्या डोळ्यासमोर आयुष्याचा प्रवास उभा राहतो. बापू शरीराने गावाकडच्या कुस्ती मैदानात तर मनाने मुंबईतल्या स्टेडियमवर जातात. त्यांना त्यांच्या गाजलेल्या लढती आठवत राहतात. कुस्तीनिवेदक त्यांचं कौतुक करतो, कुस्तीशौकिनांची नजर त्यांच्यावर खिळते; पण बापू मात्र भूतकाळात रमलेले असतात...

(लेखक प्रसिद्ध ‘मुलुखमाती’ या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक असून, ग्रामसंस्कृतीवर ते महत्त्वाचे भाष्यकार आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.