राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजीमहाराजांविषयी केलेल्या विधानावर महाराष्ट्रात गेला आठवडाभर गदारोळ सुरू आहे.
उदाहरण १ : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजीमहाराजांविषयी केलेल्या विधानावर महाराष्ट्रात गेला आठवडाभर गदारोळ सुरू आहे. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा’च्या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत राज्यपालांनी छत्रपतींना ‘जुन्या काळातील आदर्श’ म्हटलं. ता. १९ नोव्हेंबरच्या या विधानाचे पडसाद राजभवनावर थडकायला लागले, ते राज्यपालांच्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पसरू लागल्यावर.
उदाहरण २ : रिचा चढ्ढा नावाच्या अभिनेत्रीनं, भारतीय लष्करी अधिकाऱ्यानं पाकिस्तानला दिलेल्या इशाऱ्याच्या ट्विटचा संदर्भ घेत, गलवानची आठवण करून देणारी पोस्ट सोशल मीडियावर केली. अवघ्या तीन शब्दांच्या पोस्टवरून उठलेलं वादळ काही तासांत पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं. रिचा चढ्ढांनी ट्विट हटवलं आणि, आपल्या घराण्याला लष्करी पार्श्वभूमी असल्याची पोस्ट लिहीत सारवासारव केली. तथापि, रिचा चढ्ढांच्या विरोधात उभं राहिलेलं सोशल मीडियाचं आक्रमण थांबलं नाही. त्यात अगदी कालपर्यंत भर पडत राहिली.
उदाहरण ३ : जगाचं लक्ष केंद्रित असलेल्या रशिया-युक्रेन युद्धाचे व्हिडिओ वरचे वर सोशल मीडियावर येतात. विशेषतः युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दोमीर झेलेन्स्की यांच्यापासून ते तिथल्या तरुण-तरुणीपर्यंत सगळे सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून जगाचं लक्ष वेधून घेतात. याच युद्धात रशिया ‘विजयी’ वाटचाल करत आहे, असा व्हिडिओ या आठवड्यात सोशल मीडियावर आला. या व्हिडिओत रशियन वायुसेना खंदकात लपलेल्या युक्रेनी सैनिकांवर ड्रोनच्या साह्यानं अचून बॉम्बफेक करत असल्याचं चित्रण आहे.
वरील तिन्ही उदाहरणं अगदी काल-परवाची म्हणून घेतलीयत. प्रत्येक संघर्षासाठी, वादासाठी, आपली गोष्ट (नॅरेटिव्ह) ठासून सांगण्यासाठी सोशल मीडियाचा प्रत्येक क्षणी वाढत चाललेला वापर या उदाहरणांमधून अधिक ठळकपणानं समोर येतोय. सोशल मीडियात ‘अचानक’ असं काही घडत नसतं. हा मीडिया पूर्णतः तंत्रज्ञानाधिष्ठित आहे. तो कसा चालावा, याचे ॲल्गरिदम हेतुतः लिहिलेले आहेत. ते ॲल्गरिदम सोशल मीडिया कंपन्यांच्या नफ्यासाठी असले तरी, हा नफा अधिकाधिक वापरकर्ते आले, तरच शक्य आहे. अधिकाधिक चर्चा झाली, जोराचा वाद झाला तरच गर्दी जमणार आहे. त्यामुळं, आपल्यासमोर ‘अचानक’ आलेला एखादा व्हिडिओ, एखादं ट्विट, फेसबुक-पोस्ट हा प्रत्यक्षात अपघात नसतो, तर आपल्या आजअखेरच्या सोशल मीडिया-वापराचा, सहभागी असलेल्या आभासी गटांमधील चर्चेचा, आपल्या एकूण डिजिटल-व्यवहारांतून तयार झालेल्या आपल्या आभासी व्यक्तिमत्त्वाचा तो भाग असतो. डिजिटल-माध्यमात तयार झालेला आशय (कन्टेन्ट) सहसा नष्ट करता येत नाही. त्याच्या खुणा (ट्रेसेस) राहतातच.
परिणामी, राज्यपाल असोत, रिचा चढ्ढा असोत किंवा रशियन वायुसेना असो, त्यांचा अथवा त्यांच्याभोवती तयार झालेला आशय इथून पुढच्या काळातल्या सोशल मीडियातही वापरला जाणार असतो. संघर्ष, वाद, द्वेष, वादग्रस्तता याभोवती तयार होत असलेला आजचा आशय पाहता उद्याचा सोशल मीडिया अधिकाधिक ध्रुवीकरणाकडे वाटचाल करेल, अशा साऱ्या शक्यता दिसू लागलेल्या आहेत.
म्हणजे, राज्यपालांनी आपल्या विधानाबद्दल माफी मागितली तरी त्यांच्या डिजिटल खुणा पुसता येणार नाहीत. रिचा चढ्ढा उद्या स्वतः सीमेवर लढायला गेल्या तरी ‘गलवान’ त्यांचा पिच्छा सोडणार नाही आणि युक्रेननं अजून दहा वर्षं युद्ध चालवलं तरी त्यांच्या सैनिकांना हवेतून टिपणाऱ्या ड्रोन बॉम्बहल्ल्यांचा व्हिडिओ नष्ट करता येणार नाही.
सोशल मीडियाची वाढती ताकद आणि प्रत्येक क्षणाचा इतिहास नोंदवण्याची विस्तारणारी क्षमता विस्मयकारक ठरते आहे. अशा काळात इलॉन मस्क यांच्यासारख्या उद्योगपतीनं ट्विटर-माध्यमावर कब्जा केल्यानंतरची परिस्थिती अमेरिकी सरकारचीही डोकेदुखी बनते आहे. मस्क यांनी ट्विटर ताब्यात घेतल्यानंतर ‘आपण सत्याचे कैवारी आहोत,’ अशी प्रतिमा रंगवायला सुरुवात केली. ही प्रतिमा रंगवण्यासाठी त्यांनी उच्चारस्वातंत्र्याकडं (फ्रीडम ऑफ स्पीच) वारंवार इशारा केला. अवघ्या महिनाभरात ‘मी सांगतो तेच खरं’ या भूमिकेपर्यंत मस्क येऊन पोहोचले. बहुवर्णवादी अमेरिकेत गोरे-काळे संघर्ष पेटवणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची त्यांच्या तब्बल १.३० कोटी फॉलोअर्ससह ट्विटरवर पुन्हा स्थापना करण्याची मस्क यांची वाटचाल दिसू लागली आहे. व्यक्तिस्वातंत्र्यवादी अमेरिकेला येत्या काळात त्यांच्याच देशात स्थापन झालेल्या सोशल मीडिया कंपन्या आवरताना कठीण जाणार असल्याची चिन्हं मस्क यांनी दाखवली आहेत.
ट्विटर हा प्रभावशाली लोकांच्या रोजच्या वापरातला सोशल मीडिया. उदारमतवादी आणि पुराणमतवादी अमेरिकी नागरिकांचा ट्विटरवरील संघर्ष तसा जुनाच. मस्क यांनी ट्विटर घेण्यापूर्वी पुराणमतवाद्यांवर बंदीची तलवार चालवली जायची, असा प्रचार गेले दोन आठवडे सुरू आहे. हा प्रचार उदारमतवादी अमेरिकी नागरिकांना अप्रत्यक्षपणे इशारा आहे, की तुमचे ट्विटरवरचे दिवस भरले आहेत...मस्क यांनीही या प्रचाराला खतपाणी घातलं आहे.
जितकी चर्चा अधिक, जितका वाद टोकाचा तितका वापरकर्ता (युजर) आपल्या सोशल मीडियावर खिळून राहणार आणि परिणामी तितका नफा वाढणार, हा मस्क यांचा हिशेब असू शकतो. अशा हिशेबी कंपन्यांच्या सोशल मीडियावर सामाजिक लढे उभे राहू पाहतात तेव्हा त्या लढ्यांचं भविष्यही स्वाभाविकपणे या कंपन्यांच्या हाती गेलेलं असतं.
फेसबुकनं प्रोफाईल, पेज बंद करणं, ट्विटरनं बंदी घालणं या प्रकारच्या तक्रारी गेल्या तीन महिन्यांत सर्रास समोर येत आहेत. एकीकडे कंपनीचा कारभार सॉफ्टवेअरद्वारे, ॲल्गरिदमद्वारे चालवायचा आणि त्यामध्ये सोईनं मानवी हस्तक्षेप करून गर्दी आपल्याला हव्या त्या दिशेनं न्यायची, अशी सोशल मीडियाच्या वाटचालीची दिशा आहे. अन्यथा, रशियाचे क्रूर हल्ले विस्तारानं दाखवणारे व्हिडिओ लाखो लोकांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता नव्हती. या हल्ल्यांनी युक्रेनबद्दलची सहानुभूती वाढण्यापेक्षा रशियाच्या ताकदीची दहशत वाढते आहे हे न समजण्याइतक्या सोशल मीडिया कंपन्या मूर्ख नाहीत.
कतारमध्ये सुरू असलेल्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेमुळं त्या देशाची जगातली प्रतिमा उजळते आहे. अशा वेळी स्टेडियमच्या एका कोपऱ्यात इस्रायली-पॅलेस्टिनी चाहते परस्परांच्या विरोधात घोषणाबाजी करतात, हा व्हिडिओ तयार होतो...लाखभर क्षमतेच्या स्टेडियममध्ये पन्नास लोकांनी केलेली घोषणाबाजी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली जाते...यातून कतारच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातंच; शिवाय पॅलेस्टिनी नागरिकांबद्दलची नकारात्मक
प्रतिमाही व्यवस्थितपणे तयार केली जाते...
एखादी गोष्ट समजावून सांगायची असेल तर ‘दहादा सांगा, मग समजेल’ असं आपण सहज म्हणून जातो. एखादी गोष्ट लाखो वेळा व्हिडिओ, टेक्स्ट, फोटो अशा माध्यमांतून सांगितली जात असेल तर तिचा परिणाम काय होईल, याची कल्पना केलेली बरी. सामाजिक ध्रुवीकरणाबद्दल भारतात वारंवार काळजी व्यक्त होतेय; तथापि या ध्रुवीकरणाला इंधन पुरवणाऱ्या, ते पद्धतशीरपणे चालू देणाऱ्या सोशल मीडियाबद्दल अजाणती भावना असणं, हे धोक्याचं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.