गेल्या वर्षी निऑन नावाच्या गॅसच्या किमती थेट वीसपट वाढल्या. वर्षभर या गॅसनं उद्योगांना घायकुतीला आणलं. या वर्षी किमती स्थिरावल्या. इलेक्ट्रॉनिक्स उद्योगासाठी या गॅसचं महत्त्व आहे. आपल्या रोजच्या वापराच्या इलेक्ट्रॉनिक गॅजेटशी या गॅसचा थेट संबंध नाही; तथापि या उपकरणांचा सारा जीव ‘चीप’मध्ये असतो आणि या ‘चीप’ तयार करण्यासाठीचं लेझर यंत्र निऑन गॅसशिवाय चालत नाही!
उदाहरणार्थ : तुमच्या कारचा इलेक्ट्रॉनिक डॅशबोर्ड, कारमधल्या साऱ्या इलेक्ट्रॉनिक व्यवस्था ‘सेमीकंडक्टर’वर चालतात. या सेमीकंडक्टरच्या रचनेचा ‘चीप’ हा गाभा. या चीप तयार करायला विशिष्ट लेझर यंत्र लागतं. त्या यंत्रात निऑन गॅस आवश्यक असतो. आता बघा, निऑन गॅस मिळाला नाही तर लेझर यंत्रं चालणार नाहीत. मग चीप तयार करणं थंडावतं. त्याचा परिणाम सेमीकंडक्टरच्या उत्पादनावर होतो.
या सगळ्याचा फटका कारनिर्मितीला बसतो. तुम्हाला हवी ती कार बाजारात मिळत नाही! या एकूण व्यवस्थेला म्हणतात पुरवठासाखळी किंवा सप्लाय-चेन. जागतिकीकरणाचा हा पाया. बहुराष्ट्रीय कंपन्यांनी व्यापलेल्या आजच्या जगाला जोडून ठेवणारी ही साखळी.
घरापर्यंत धडका
निऑन गॅसच्या तुटवड्याचं कारण होतं रशिया-युक्रेन युद्ध. युक्रेन ही काही प्रगत अर्थव्यवस्था नाही. जगाच्या ढोबळ उत्पन्नात युक्रेनचा वाटा आहे ०.१४ टक्के. मात्र, चीप तयार करण्याच्या प्रक्रियेसाठी लागणाऱ्या लेझरमधला निऑन गॅस युक्रेन बनवतं.
युद्धामुळे युक्रेनची निर्मिती बंद पडली आणि साखळीतले एकापाठोपाठ एक घटक अडचणीत आले. ज्या कंपन्यांनी निऑन गॅसचा ढीगभर साठा करून ठेवला होता, त्या कंपन्यांची चांदी झाली आणि बाकीच्यांना उत्पादन बंद करण्याची वेळ आली.
एका बाजूला, जोडलेलं जग कित्येक प्रश्न एकत्रितरीत्या सोडवू शकतं आणि चांगल्या जगासाठी एकत्रित प्रयत्न करू शकतं असा विश्वास जागतिकीकरण देतं. त्याच वेळी, जगाच्या एका कोपऱ्यातला तणाव तुमच्या-आमच्या घराला धडकाही देऊ शकतो, तेही जागतिकीकरणामुळेच.
तुमचाही संबंध आहेच...
भारताचंच उदाहरण पाहिलं तर, आपल्या एकूण ढोबळ उत्पन्नात वाहन-उद्योगाचा वाटा आहे तब्बल ७.१ टक्के. भारताच्या एकूण उत्पादन-उद्योगाचा निम्मा वाटा वाहन-उद्योगाचा. इथल्या रोजगारांची संख्या तब्बल पावणेचार कोटींवर.
रशियाचं सैन्य युक्रेनवर बॉम्ब टाकून जल्लोष करत असताना भारतातल्या चाकण, वाळुंज अशा उद्योगनगरीतल्या एखाद्या वाहन-उद्योगाला दणका बसत असतो. युक्रेनमध्ये नागरिक युद्धामुळे उद्ध्वस्त होऊन रस्त्यावर येत असताना आपल्या गल्लीतल्या कुणाची तरी वाहन-उद्योगातली नोकरी उत्पादन थंडावल्यानं गेलेली असू शकते. साऱ्या पुरवठासाखळ्या तंत्रज्ञानानं जोडलेल्या आहेत आणि तंत्रज्ञानाची नाळ जागतिकीकरणाशी बांधलेली आहे...
परिणामी, अशा पुरवठ साखळ्या वॉशिंग्टन ते वडगाव परिणाम करत राहतात. त्यामुळे, त्या युद्धाशी माझा काय संबंध, हा प्रश्न जागतिकीकरणात निरर्थक असतो.
परस्परांशी घट्ट जोडलेलं जग
अवघ्या काही दशकांपूर्वी अशक्यप्राय भासणाऱ्या कित्येक गोष्टी तंत्रज्ञानानं आणि पुरवठासाखळ्यांनी शक्य करून दाखवल्या आहेत. या साखळ्या भौगोलिक तणाव, नैसर्गिक आपत्ती, अपघात अथवा तंत्रज्ञानातल्या बिघाडामुळे विस्कळित होतात, तेव्हाच त्यांची दैनंदिन गरज प्रभावीपणे समजते.
मालवाहतूक करणारी जहाजं दोन वर्षांपूर्वी सुवेझ कालव्यात अडकली, तेव्हा पेट्रोल-डिझेलच्या किमती झपाट्यानं वाढल्या. कारण, या कालव्यातून रोज पाच लाख बॅरल्स इतकं कच्चं तेल भारत आयात करतो. वाळूच्या वादळानं एका जहाजाची दिशा चुकली आणि आख्खा कालवा बंद पडला.
सारी जहाजं मार्गी लागेपर्यंत जगभरातल्या उद्योगांना तर तासाला चारशे दशलक्ष डॉलर्सचं नुकसान सोसावं लागलं. ते जहाज, वादळ याच्याशी काहीही संबंध नसलेल्या आणि कालव्याबद्दल कधीतरी पुस्तकात वाचलेल्या कोट्यवधी लोकांना पेट्रोल-डिझेलसाठी खिशातून जादा पैसे मोजून झळ सोसावी लागली.
पुन्हा असं घडू नये यासाठी साऱ्या जगानं कालव्यातून प्रवासाचं तंत्रज्ञान अद्ययावत करायला सुरुवात केली. त्यासाठी पुन्हा अब्जावधी रुपये पणाला लावले गेले. जग परस्परांशी किती घट्टपणानं जोडलेलं आहे याची ही उदाहरणं.
संकटकाळातही संधी
तंत्रज्ञानानं जोडलेल्या जगाला सातत्यानं सुव्यवस्थितपणाची गरज असते. युक्रेनमध्ये अस्थैर्य आहे, म्हणून तंत्रज्ञान-उद्योग स्वस्थ बसत नाही. अधिक स्थिर व्यवस्थेचा शोध सुरू होतो. युक्रेन, रशिया आणि बेलारूस या पूर्व युरोपातल्या पट्ट्यातली अस्थिरता भारत, अर्जेंटिनासारख्या देशांच्या पथ्यावर पडली.
या तीन देशांमध्ये काम करणाऱ्या तंत्रज्ञान-कंपन्यांचे सुमारे पन्नास हजार कर्मचारी होते. या कंपन्यांनी आपापली कामं भारत, अर्जेंटिनात हलवली.
भारतीय आयटी कंपन्यांसाठी पूर्व युरोप म्हणजे युरोपच्या सेवा-उद्योगाचं दार होतं. या कंपन्यांनीही आपापलं बस्तान भारतात हलवलं. काही भारतीय कंपन्यांनी पूर्व युरोपातल्या बँकिंग, सेवा-उद्योग आणि ऊर्जा-उद्योगांवर वर्चस्व प्रस्थापित करायला युद्धकाळातच सुरुवात केली.
युद्धाची धूळ जसजशी बसेल तसतशी भारतीय माहिती तंत्रज्ञान उद्योगानं पूर्व युरोपात केलेली आगेकूच समोर यायला सुरुवात होईल. जागतिकीकरणात आपण परस्परांशी जोडलेलो आहोत हा पहिला धडा; तर दुसरा धडा म्हणजे, संकटातही स्वतःसाठी जागतिक स्तरावरची, विशेषतः तंत्रज्ञानविस्ताराची, संधी शोधत राहणं.
कौशल्यांची उणीव
युद्धांमध्ये तंत्रज्ञानाचं अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे पुरावे प्राचीन काळापासूनचे. सध्याच्या युक्रेनयुद्धालाही ते लागू पडतात. रशियाच्या हल्ल्यानंतर पश्चिम युरोप, अमेरिकेनं युक्रेनला युद्धात मदत सुरू केली. तथापि, युक्रेनचं सैन्य विसाव्या शतकातल्या तंत्रज्ञानावर प्रशिक्षित झालेलं. गेल्या दोन दशकांत बदललेल्या संरक्षणतंत्रज्ञानाचं वारं युक्रेनमध्ये फिरकलेलं नव्हतं.
आजच्या जगात कोणत्याही देशाला सगळ्या प्रकारच्या तंत्रज्ञानासोबत का राहावं लागेल हे युक्रेनच्या युद्धानं शिकवलं आहे. वरवरचं तंत्रज्ञान ‘ओपन सोर्स’पद्धतीत सगळ्यांनाच उपलब्ध असेल; तथापि, आपल्या गरजांनुसार त्यामध्ये बदल करण्याचं कौशल्य ज्या त्या देशाला विकसित करावं लागेल. युद्धासारख्या परिस्थितीत या कौशल्यांची उणीव युक्रेनला भासली; तीच वेळ कदाचित कोणत्याही देशांवर येऊ शकते.
अपमाहितीनं नुकसान
माहितीचं प्रसारण जलद गतीनं करणारं तंत्रज्ञान जागतिकीकरणाचा मुख्य आधारस्तंभ बनलं आहे. अशा परिस्थितीत माहितीमध्ये भेसळ, सरमिसळ हेदेखील शस्त्र म्हणून वापरलं जातं. युक्रेनच नव्हे तर, आपल्या देशात दरदिवशी काश्मीरपासून मणिपूरपर्यंत अनेक ठिकाणी हा अनुभव येतो.
भेसळ, सरमिसळ ओळखण्याचं कौशल्य केवळ सरकारपुरतं मर्यादित ठेवून चालत नाही, तर ते नागरिकांपर्यंत पोहोचवावं लागतं. तंत्रज्ञान केवळ आणून भागत नाही; तर ते वापरात आणावं लागतं. युक्रेनमध्ये काम करणाऱ्या तंत्रज्ञान-कंपन्यांनी व्यवसायासाठी तंत्रज्ञान आणलं, ते नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्या देशातल्या सरकारचं असतं, शिक्षणव्यवस्थांचं असतं.
अपमाहितीची जाणीव होईपर्यंत युक्रेनचं झालेलं नुकसान भरून येण्यासाठी आख्खी पिढी खर्ची पडेल अशी स्थिती आहे.
तंत्रज्ञानाचा वाटा...
जागतिकीकरणाच्या लवचिक दोरानं बांधलेल्या व्यवस्थेत जो तो देश आपली जागा सुरक्षित ठेवून दुसऱ्याची व्यापण्याचा प्रयत्न जरूर करतो. या व्यवस्थेवर राज्य करण्यासाठी तंत्रज्ञान ही किल्ली आहे. ही किल्ली पुरवठासाखळ्या नियंत्रित ठेवते. माहिती, अपमाहिती आणि खोटारडेपणा या तीन्ही गोष्टी तंत्रज्ञानाच्याच बळावर व्यापक पातळीपर्यंत पोहोचवता येतात.
माहितीमुळे होणाऱ्या परिणामांचं पूर्वानुमान काढता येतं. एखादी घटना, घडामोड सुरू असते तेव्हा तिची कारणमीमांसा करताना तंत्रज्ञानाचा या घटनेतला, घडामोडीतला वाटा किती आहे हे तपासायची सवय लावून घ्यायला हवी. येणाऱ्या काळात ही सवय लाखमोलाची हे पक्कं ध्यानात असायला हवं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.