स्वच्छता, जलसाक्षरता आणि गांधीविचार

स्वच्छता, जलसाक्षरता आणि गांधीविचार
Updated on

स्वच्छतेला जीवनात प्राधान्य असले पाहिजे, हे आपल्या आचार-विचार नि कृतींमधून अनेकदा गांधीजींनी दाखवून दिलेले आहे. दक्षिण आफ्रिकेत असताना त्यांनी स्वच्छता व आरोग्य विषयावर लिखाण केले. मैला स्वतः वाहून नेऊ लागले, साफसफाई करू लागले. डर्बनमध्ये असताना सहकाऱ्याचा शौचकूप साफ करण्यास कस्तुरबांच्या नकार देण्यावरून गांधीजींनी त्यांच्याबरोबर अबोला धरला होता. राजकोटमध्ये जलजन्य रोगांनी थैमान घातले होते, तेव्हा त्यांनी घरोघरी जाऊन सांडपाणी निस्सारण आणि आरोग्यासाठी प्रबोधन केले. १९०१ मध्ये काँग्रेसच्या कोलकत्ता अधिवेशनामध्ये सहभागी झालेले असताना त्यांना जाणवले, की परंपरेने अस्पृश्‍य जातीच्या लोकांकडूनच मैला वाहतूक, स्वच्छतागृह साफसफाई करून घेतली जात आहे. या जातिभेदावर अधिवेशनातच गांधीजींनी नाराजी व्यक्त केली आणि स्वच्छतागृह साफसफाईचे काम स्वतः हाती घेतले. प्रत्येकाने स्वतःची स्वच्छता स्वतःने केली पाहिजे, यासाठी आग्रह धरला.

गांधीजींच्या जन्मदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत’ ही एक जन चळवळ सुरू केली. परंतु, आजही गांधीजींचे ‘स्वच्छ भारता’चे स्वप्न पूर्ण झालेले नाही. सध्या देशाची पत स्वच्छता, आरोग्य, पर्यावरणसंवर्धन या बाबींमध्ये घसरत चाललेली आहे, हे संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालामधून स्पष्ट होते. गांधीजींनी आश्रमामधून स्वच्छतागृहांवर अनेक संशोधने केली. आपल्या देशामध्ये फ्लश असलेले शौचकूप उपयोगाचे नाहीत, असे त्यांचे अनुमान होते. त्यामधून जास्त प्रमाणात पाणी वापरले जाते आणि सांडपाणी तयार होते. यावर पर्याय म्हणून शौचकूप हा दोन टाक्‍यांचा असला पाहिजे आणि त्यामधून खतनिर्मिती झाली पाहिजे आणि पाणी वापर कमी झाला पाहिजे. शौचकूपावर प्रयोग करणाऱ्यांना त्यांनी प्रोत्साहन दिले होते. ‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत असे शौचकूप स्वीकारण्यात आले, ही स्वागतार्ह बाब आहे.

 नवी परिभाषा
काही शहरांत सांडपाणी शौचकूपामध्ये फ्लशिंगसाठी वापरले जात आहे. आज सांडपाणी प्रक्रिया करणे आणि ते पुन्हा वापरणे नगण्य प्रमाणात असल्याने त्याचा परिणाम नैसर्गिक साधनसंपत्तीवर होत आहे, त्यामुळे अनेक शहरे बकाल झाली. नद्या, तलाव, सरोवरांची अशीच अवस्था आहे. गांधीजींच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे स्वच्छता, साफसफाई, प्रदूषणनिर्मूलन, आरोग्य, पर्यावरणसंवर्धनासाठी विकेंद्रित रचना आवश्‍यक आहे. त्यात लोकसहभाग हवा. त्याशिवाय स्वच्छतेची परिपूर्ण उपाययोजना करता येत नाही. परंतु, हे कुणी गांभीर्याने घेताना दिसत नाही. त्यामुळे आज गंगा-गोदावरीपासून मुळा-मुठा, पंचगंगेपर्यंत समाज, सरकारचे यासंदर्भात काही देणेघेणे राहिलेले नाही. स्वच्छतेच्या गुणवत्तेचा परीघ संकुचित होत आहे. बाटलीबंद म्हणजे स्वच्छ आणि बाहेरील ते सर्व टाकाऊ, ही स्वच्छतेची नवीन परिभाषा होत आहे.

आरोग्य, पाणी हे स्वच्छतेशी निगडित असणारे विषय आता प्रदूषणाच्या समस्या बनलेल्या आहेत. प्रदूषणाचे प्रश्न जागतिक समस्यांचाही भाग असतात, जसे हवामानबदल. त्याचा सामना प्रत्येकास करावा लागेल. म्हणून, गांधीजींचे तत्त्वज्ञान आजही तितकेच महत्त्वाचे आहे. स्वच्छता ही बाहेरून कोणीतरी लादून येत नसते, तर ती स्वतः अंगीकारावी लागते, त्यामध्ये कृती आहे. स्वच्छतेसाठी स्वतः पुढाकार घ्यावा लागतो, मनोबल वाढवावे लागते. ही कुणा दुसऱ्यावर सोपवण्याची गोष्ट नाही. अगदी शासनावरसुद्धा नाही. म्हणून, प्रत्येकाने स्वच्छतेमध्ये सहभाग घेतला पाहिजे. स्वतः स्वच्छतादूत झाले पाहिजे. गांधीजींच्या काळी पाणी-पर्यावरण संसाधनांचे प्रश्न तितकेसे गंभीर नव्हते, तरीसुद्धा स्वच्छता आणि नैसर्गिक साधनसंपत्ती टिकवण्याच्या अनुषंगाने त्यांनी स्वतः प्रयोग करून त्यास चालना दिली आणि समाजघटकांना अंगीकारण्यास प्रवृत्त केले. त्यामुळेच ‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत तरुणांनी पुढाकार घेऊन नवनवीन प्रयोग करणे अपेक्षित आहे.

गांधीजींचा चष्मा आपल्याला एक पाऊल पुढे टाकण्यासाठी प्रेरित करीत आहेच. आज प्रत्येकाने घरातूनच स्वच्छतेची डोळसपणे सुरुवात करणे गरजेचे झाले आहे. कचरा घराच्या कुंपणाबाहेर किंवा दारात येणाऱ्या घंटागाडीत टाकून नुसते भागणार नाही. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जाते का ते पाहणे प्रत्येकाचे कर्तव्य असणार आहे. कारण, आपली घरे आता साधीसुधी राहिलेली नसून ती कारखानासदृश झालेली आहेत. फोफावलेल्या चंगळवादी जीवनशैलीमुळे पाणी, ऊर्जा, वस्तुवापर वाढलेला आहे. आता घराघरांमधून पेट्रोकेमिकल्स, फवारलेला भाजीपाला, साफसफाईची रसायने, इलेक्‍ट्रॉनिक वेस्टपर्यंत घातक कचरा बाहेर पडू लागलेला आहे. त्यामुळे स्वतः स्वच्छतेमध्ये लक्ष घातल्यास टाकाऊ घटक वेगळे करण्याचे महत्त्व प्रत्येकाला घरपातळीवर समजणार आहे. त्यानंतर या कचऱ्याचे करायचे काय? हा विचार डोक्‍यात घोळू लागेल.

जलसुरक्षेचा अभ्यासक्रम
खतनिर्मितीचा गांधीजींनी सांगितलेला मार्ग जरी अवलंबला, तरी ओल्या कचऱ्याचे (स्वयंपाकघरात अन्न तयार करताना झालेला) खत बनवता येईल. इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू, प्लॅस्टिक वेगळे करून योग्य जागी पुनर्वापर करता येतील. पाण्यामध्ये वापरले जाणारे अनेक सफाई रसायन, साबण हे विघटनशील असणारे वापरल्यास त्याचा जलप्रदूषणावरील भार कमी करता येईल. शून्य कचरा निर्माण करणारी घरे निर्माण झाल्यास गांधीजींना अभिप्रेत असणारी स्वच्छता प्रत्यक्षात अवतरण्यास वेळ लागणार नाही. स्वछता निर्माण झाल्यास देशाची शान तर वाढेलच, त्याचबरोबर पर्यटनातून अर्थकारणही साधता येईल. नैसर्गिक साधनसंपत्ती वाढीसाठीसुद्धा स्वच्छता महत्त्वाची आहे. पुढील पिढीच्या शाश्वत विकासासाठी याचे महत्त्व आहे. गरजेसाठी भरपूर आहे; पण लोभासाठी नाही, या आशयाचे गांधीजींचे विधान प्रसिद्ध आहे. स्वच्छता आणि नैसर्गिक संवर्धनाची सांगड गांधीजींनी उत्कृष्टरीत्या घालून दिलेली आहे. त्यासाठी काम करण्यासाठी आता जनमानस तयार होणे गरजेचे आहे. मेंढा-लेखासारखे छोटे गाव गांधीजींच्या विचाराने जल-जंगल-जमीनचा अधिकार प्राप्त करून ग्राम स्वराज्याचे स्वप्न साकारत आहे. हीच प्रेरणा घेऊन गाव-शहरपातळीवरील पाण्याच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र राज्य जलसाक्षरतेचा अधिनियम संमत करून त्यादृष्टीने कामास लागलेले आहे. पुढील वर्षी शालेय पातळीवर ‘जलसुरक्षा’ हा अभ्यासक्रमसुद्धा येऊ घातलेला आहे. गांधीजींचा स्वच्छता आणि नैसर्गिक साधनसंपत्ती जतन करण्याचा संदेश घेऊन महाराष्ट्रातील जलसेवक/स्वच्छतादूत वर्ध्याच्या सेवाग्राममध्ये एकत्र येऊन या मार्गावर चालण्याचा निर्धार करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.