‘‘बाबासाहेबांचं गाणं म्हणा.’’ कोणी म्हणत होतं, ‘‘शिवाजी महाराजांचा पोवाडा म्हणा.’’ आपल्या पहाडी आवाजात कधी न ऐकलेली दर्जेदार विचारांची गाणी म्हणून ते शाहीर समोरच्यांची मनं जिंकत होते.
मी त्यादिवशी कोल्हापूरहून निघालो. निघताना कऱ्हाडचे आमचे बातमीदार, माझे सहकारी सचिन शिंदे यांचा मला फोन आला. म्हणाले, ‘‘संदीप तुम्ही या वेळी कऱ्हाडला थांबून आमचा पाहुणचार घ्यायचा आहे, मला बाकी काही सांगू नका.’’ सचिन यांचा आग्रह मला या वेळी टाळता येणार नव्हता, हे मला माहीत होतं. कऱ्हाडमध्ये कुठे भेटायचं हा निरोप सचिन यांनी मला फोनवरून दिला होता. कोल्हापूरहून सुरू झालेला प्रवास कऱ्हाडच्या कोल्हापूर नाक्याजवळ येऊन थांबला. सचिन माझी वाट पाहत होते. आमची भेट झाली. बाजूला असलेल्या एका लस्सीच्या छोट्या दुकानाजवळ आम्ही बसलो. खूप गप्पा झाल्या. आमच्या गप्पा रंगल्या असताना माझ्या कानांवर पहाडी आवाज पडला. मी पहिल्यांदा दुर्लक्ष केलं; पण तरीही पुनःपुन्हा त्या गाण्याकडे माझं लक्ष जात होतं.
माझे सहकारी सचिन यांना मी विचारलं, ‘‘कोण आहेत हे गाणारे?’’ सचिन म्हणाले, ‘‘शाहीर लोखंडे आहेत. लोखंडे परिवर्तनाच्या विचारांचं गाणं खूप तल्लीन होऊन गातात. कविता, गाणं ते स्वतः लिहितात. अनेक ठिकाणी कार्यक्रम करून आयुष्यभर या माणसाने समाजप्रबोधनाचं काम केलं.’’ सचिन मला त्या लोखंडे शाहिरांना घेऊन एक एक विषय सांगत होते. माझ्या कानांवर एकीकडे सचिन यांचं बोलणं पडत होतं, तर दुसरीकडे शाहिरांच्या गाण्याच्या आवाजाने अंगावर शहारे येत होते.
भीमा तुझ्या रक्ताचे घोडे हुशार झाले...तोडून दावणीला सारे पसार झाले...सचिन यांना म्हणालो, ‘‘चला आपण त्या शाहिरांची भेट घेऊ.’’ सचिन पुढे आणि मी मागे निघालो. बाकी लोक जसं तिथं जाऊन शाहिरी ऐकत होते, तसं मी आणि माझा सहकारी तिथं जाऊन गाणं ऐकायला पाठीमागे जाऊन थांबलो. कोणी म्हणत होतं, ‘‘बाबासाहेबांचं गाणं म्हणा.’’ कोणी म्हणत होतं, ‘‘शिवाजी महाराजांचा पोवाडा म्हणा.’’ आपल्या पहाडी आवाजात कधी न ऐकलेली दर्जेदार विचारांची गाणी म्हणून ते शाहीर समोरच्यांची मनं जिंकत होते.
शाहिरांची मैफल संपली. एकेक करून लोक पांगायला लागले. सचिन यांनी माझी आणि त्या शाहिरांची ओळख करून दिली. शाहिरांची गाणी, ओळख, त्यांचं बालपण, त्यांनी लिहिलेली सगळी गाणी, कविता, कथा... लोककलेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचं काम करणारा प्रत्येक माणूस शेवटी उपेक्षितच राहतो, त्याच्या आयुष्यामध्ये उपेक्षिताचं जगणं वाढून ठेवलेलं असतं, तसंच शाहीर लोखंडे यांच्याविषयी झालं होतं. ‘त्याही’ सगळ्या वातावरणामध्ये ते शाहीर भरभरून जगत होते, हे महत्त्वाचं होतं. प्रचंड संकटं आली, वेगळी वादळं आली, त्या सगळ्या संकटांना तोंड देत शाहीर लोखंडे यांनी आपलं समाजप्रबोधनाचं काम अविरतपणे सुरूच ठेवलं होतं. शाहिरांशी बोलताना माझ्या अंगावर काटा येत होता.
समाजपरिवर्तनाच्या चळवळीमध्ये शाहीर लोखंडे यांचा प्रवास कमालीचा होता. कधी गाण्यांच्या मैफिलीमध्ये मिळणाऱ्या प्रतिसादावरून लोककला आजही लोकांना किती हवीहवीशी वाटते याचे दाखले माझ्यासमोर येत होते. शाहीर सांगत होते, मी ऐकत होतो. माझ्या बाजूला बसलेले सचिन शिंदे आमच्या दोघांचं अगदी शांतपणे ऐकून घेत होते.
मी ज्या शाहिरांशी बोलत होतो, त्यांचं नाव थळेंद्र रामचंद्र लोखंडे (९०११०३५७०३), गावाचं नाव मनव, तालुका कऱ्हाड. वयाच्या सातव्या वर्षी शाहीर लोखंडे यांच्या वडिलांनी त्यांना गाणं म्हणायला शिकवलं. शाहीर लोखंडे मला सांगत होते, ‘‘१९८९ चा तो काळ. माझे मित्र अनिल थोरात यांच्या सान्निध्यात राहून मी गाणं लिहायला शिकलो. समाजप्रबोधनाची गाणी लिहीत जायची. त्या गाण्यांच्या माध्यमातून एकीकडे मनोरंजन आणि दुसरीकडे त्या मनोरंजनामधून सामाजिक परिवर्तन असं मी लिहीत गेलो. वामनदादा कर्डक यांच्यासारखे अनेक जण माझा आदर्श होते. ‘कवन बरसात’ हा माझा कार्यक्रम सगळीकडे प्रसिद्ध होता. अवघ्या राज्यभरात मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून पोहोचलो.’’
‘‘खरी कविता अनुभवांमधून येते. खरं गाणं अनुभवातून सुरांच्या ध्वनीतून रक्ताच्या धमन्यांमध्ये जातं. माझंही तसंच होतं. माझे वडील शिक्षक होते, ते दारूच्या प्रचंड आहारी गेले होते. बापाला तुम्ही दारू का पिता, हे विचारायची मी हिंमत केली नाही; पण जे जे दारूच्या आहारी गेले, त्यांना मी बोलतं केलं, त्यातून मला माझा बाप दारू का प्यायचा हे कळालं. ते शब्दांमध्ये मांडलं होतं -
भूतकाळाची गर्दी जेव्हा मेंदूमध्ये दाटते,
मास्तर त्याचवेळी बघा मला दारू प्यावी वाटते...
म्हणणं तुमचं मास्तर सगळं मला पटतं,
काय करायचं पटून आज पोट माझं थकतं,
या थकलेल्या पोटासाठी झटताना माझी शक्ती जेव्हा संपते,
मास्तर त्याच वेळी बघा मला दारू प्यावी वाटते...’’
शाहिरांच्या शब्दांमध्ये कमालीचा ‘बाज’ होता. इतकं सगळं लिखाण केलं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत कार्यक्रम केले. आता उतारवयात उदरनिर्वाहासाठी शाहीर लोखंडे एकाच्या एका छोट्याशा लॉजवर रात्रपाळीला काम करतात. मी शाहिरांना विचारलं, ‘‘तुम्हाला सर्वाधिक आवडणारी व्यक्ती कोण?’’ शाहीर म्हणाले, ‘‘मला व्यक्ती नाही, प्राणी आवडतात. लहानपणी आमच्या घरी एक बैल होता, त्याचं नाव मी पंजाब ठेवलं होतं. काही कारणास्तव तो बैल मेला, तेव्हा आम्हा सगळ्यांना दुःख झालं. आजही माझ्या घरामध्ये एक बैल आणि एक कुत्रा आहे. बैलाचं नाव सुलतान आहे. राजू मुळे या माझ्या मित्राने कंदी पेढे वाटून त्या बैलाचं नाव सुलतान ठेवलं. अशोकराव थोरात नावाच्या एका व्यक्तीने हा बैल एक जाहीर कार्यक्रम घेऊन मला दान केला. दुसऱ्या एका मित्राचा बैल आणि माझा बैल असे दोन्ही बैल घेऊन मी माझी कोरडवाहू असलेली दीड एकर जमीन कसतो. मी गावातून कामाच्या निमित्ताने शहरात येतो, तेव्हा माझ्या बायकोचा साथीदार म्हणून तो बैल माझ्या घराच्या ओसरीवर बांधलेला असतो.’’
मधल्या काळात शाहीर लोखंडे यांचा मोठा अपघात झाला. त्या अपघातात त्यांच्या पायाचा पंजा पूर्णपणे निकामी झाला. काही मित्रांनी पैसे एकत्रित करून शाहीर यांच्यावर इलाज केला, त्यानंतरही ते डगमगले नाहीत. शाहिरांच्या बोलण्यामध्ये, त्यांच्या वागण्यामध्ये कमालीचा करारीपणा स्पष्टपणे जाणवत होता. त्यांच्या स्पष्टपणामुळे कदाचित त्यांच्या वाट्याला दारिद्र्य आलं असेल.
आपल्या लेखणीच्या, कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजामध्ये चाललेला दांभिकपणा सातत्याने खोडून काढायचं काम आयुष्यभर शाहीर लोखंडे यांनी केलं. शाहीर लोखंडे रहात असलेल्या ‘मनव’ या गावात आम्ही गेलो. आम्ही घरी येताच बैल जोरजोराने ओरडत होता.
‘‘आलो रे बाबा, आलो रे बाबा’’ असं म्हणत शाहीर लोखंडे त्या बैलाच्या पाठीवरून हात फिरवत होते. तो बैलही जिभेने शाहिरांच्या हाताला चाटत होता. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो घरामध्ये लागले होते. दोन-तीन पिशव्या शाहीर लोखंडेंच्या हस्ताक्षरांत लिहिलेल्या गाणी, कवितांनी भरलेल्या होत्या. जुने फोटो, अनेक कार्यक्रम. शाहीर लोखंडेंना कदाचित कुणी मोठी संधी दिली नसावी. कदाचित शाहीर लोखंडे यांनासुद्धा मिरवणं आवडत नसावं. फुशारक्या मारणं, सत्कार स्वीकारणं, कुठल्यातरी संमेलनाचा अध्यक्ष होणं, हे शाहिरांना आवडत नसावं. म्हणूनच कदाचित त्यांच्याजवळ असलेलं इतकं मोठं ज्ञानाचं भांडार आज दारिद्र्य आणि दुर्लक्षतेच्या वातावरणात पिशवीमध्ये कुजून जात आहे. त्यांच्या डोळ्यांमध्ये असलेले अश्रू वेदना मांडून मांडून केव्हाच संपून गेले होते. आईची आठवण काढा, मेलेल्या बैलाची आठवण काढा, वडिलांची आठवण काढा, भोगलेल्या यातना डोळ्यांसमोर आणा... शाहीर अगदी स्वाभिमानाने तो एक काळ होता असं म्हणून, मी विचारलेल्या नाजूक प्रश्नाचं उत्तर सहजपणे देत होते. ‘माझी परिस्थिती फार वाईट होती’, असं ते कधीही बोलले नाहीत. त्यांची सातत्याने एकच खंत होती ती म्हणजे, ‘‘माझ्याकडे असलेल्या शब्दरूपी हिरे-मोत्यांना माणुसकीचं मार्केट मिळालं नाही. माझ्याकडे येऊन अनेकांनी या हिरे-मोत्यांचे संदर्भ वापरले, कुणी माझंच आहे म्हणून वापरलं. मी कधीही माझ्या शब्दांना, आवाजाला स्वतःची प्रॉपर्टी समजलं नाही.’’
आम्हाला ते सगळं साहित्य दाखवत दाखवत शाहीर लोखंडे त्यांच्या आईविषयी आम्हाला सांगत होते, ‘‘माझी जन्म देणारी आई वेगळी होती, मला वाढवणारी आई वेगळी होती. बरं ह्या दोघीही सख्ख्या बहिणी होत्या. तागूबाई ही माझी जन्म देणारी आई. मी अडीच वर्षांचा असताना माझी आई मरण पावली. माझ्या वडिलांनी माझ्या मावशीला, माझ्या आजोबांना विनंती करून दुसरी बायको करून घेतलं होतं.’’ शाहीर लोखंडे यांचा मुलगा स्वास्तिक बोलताना म्हणाला की, ‘‘माझ्या वडिलांनी मला संपत्तीच्या रूपाने काहीही मागे ठेवलं नाही, किंवा कमावलेलं नाहीये; पण त्यांचं शब्दरूपी भांडार, त्यांचं नाव माझ्या आयुष्यासाठी सगळ्यात मोठी देण आहे.’’ आम्हाला घरात वेगवेगळं साहित्य, फोटो दाखवताना शाहीर लोखंडे काहीतरी गुणगुणत होते. मी त्यांना म्हणालो, ‘‘जरा मोठ्या आवाजात म्हणा की.’’ लाजतील ते शाहीर कसले.
उद्धवदादा बकऱ्या वाटून दुष्काळ हाटेल का?
रेल्वेसारखं वेगळं बजेट सांगा, शेतीसाठी फुटेल का?
शिवशाहीचा मूळ पाया मेंदूत माझ्या घोळतो आहे,
जमेल तसं ऐकून घ्या, आता खरा महाराष्ट्र बोलतो आहे...
शाहीर लोखंडे सुरात म्हणत होते. गाणं शब्दबद्ध करायची, लिहायची कला शाहीर लोखंडेंना मिळाली होती. दारिद्र्याचा आवाज, याबाबत शाहिरांची पत्नी नाराज होणं अगदी साहजिक होतं; पण शाहीर मात्र एकदम राजेशाही थाटात, ‘मला समाज सुधारायचा आहे, समाजामध्ये परिवर्तन होणार आहे’ या भावामध्ये आणि तंद्रीमध्येच बोलत होते.
आम्ही तिथून निघालो. मला माहीत नव्हतं, त्या शाहिरांच्या मोत्यासारख्या विचारांचं काय होणार आहे. मला एवढं मात्र दिसत होतं की, शाहीर यांनी आत्तापर्यंत या सगळ्या प्रवासामध्ये जे काही केलंय, जे काही करण्याचा प्रयत्न केलाय, त्यातून निश्चितच समाज सुधारण्याचं काम झालं. शाहीर उपेक्षित राहिले, शाहीर कुणाच्याही दृष्टीस आले नाहीत; पण ज्यांना ज्यांना शाहीर भेटले, ज्यांनी ज्यांनी शाहिरीच्या माध्यमातून काही चांगलं ऐकलं, त्या प्रत्येकाच्या मनात शाहीर आहेत. त्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये आपल्या शब्दांच्या माध्यमातून लोकशाही फुलवण्याचं काम, लोकांना जागं करण्याचं काम शाहीर लोखंडे यांनी केलं. ज्या लोकांना सामाजिक प्रश्नांमध्ये जगण्याचं बळ शाहिरांनी दिलं, त्या लोकांनीसुद्धा आता शाहिरांना भरभरून देण्याची ही वेळ आहे, हे बरोबर आहे ना!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.