वेदना पांढऱ्या कपाळामागची ...

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्याकडून बुलडाणा जिल्ह्यातील ‘वाडी’ या गावाविषयी मी अनेक वेळा ऐकलं होतं. त्या गावातल्या शेतकऱ्यांच्या आत्‍महत्यांची कल्पना त्यांनी दिली होती. त्या घटना मनात रुतल्या होत्या.
Sandeep Kale writes about the pain of farmer which society have not seen yet
Sandeep Kale writes about the pain of farmer which society have not seen yetsakal
Updated on
Summary

‘वाडी’ला जायचं. तिथं आत्महत्या का होतात, हे नेमकं जाणून घ्यायचं

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्याकडून बुलडाणा जिल्ह्यातील ‘वाडी’ या गावाविषयी मी अनेक वेळा ऐकलं होतं. त्या गावातल्या शेतकऱ्यांच्या आत्‍महत्यांची कल्पना त्यांनी दिली होती. त्या घटना मनात रुतल्या होत्या. बुलडाण्यातल्या एका कार्यक्रमाला गेलो होतो. या वेळी नक्की ठरवलं होतं, की ‘वाडी’ला जायचं. तिथं आत्महत्या का होतात, हे नेमकं जाणून घ्यायचं होतं. त्या दिवशी मी बुलडाण्यावरून ‘वाडी’ला निघालो. रस्त्यांची अवस्था फारच वाईट. रस्त्याने चालणाऱ्या बायका शेताच्या दिशेने निघाल्या होत्या.

मी निरीक्षण करत होतो, फार कमी बायकांच्या कपाळावर कुंकू दिसत होतं. आमची गाडी एका झाडाखाली थांबवली. बाजूला असलेल्या विहिरीवरच्या नळावर माझी नजर गेली. तिथं जाऊन मी पाणी प्यायलो. त्या विहिरीपासून काही अंतरावर एक आजी एका बैलाचं दावण हातामध्ये धरून त्या बैलाला पाणी पाजत होती. दुसरी महिला एका छोट्याशा झोपडीमध्ये आणलेली भाकरी वर शिक्यामध्ये बांधून ठेवत होती. त्या दोन माउली आपापल्या कामाला लागल्या होत्या. मी परत गाडीच्या दिशेने निघालो. मी चालत असताना मला हाक एकू आली, ‘‘दादा, जराशी मदत करा ना, इकडं या ना.’’ बैलाला पाणी पाजणाऱ्या त्या आजी मला सरपणाचा भारा उचलण्यासाठी मदतीसाठी आवाज देत होत्या. मी गेलो. मी आजीच्या जवळ जाताच आजींच्या हातामध्ये दावण असलेला तो बैल माझ्या अंगावर एकदम चाल करून आला. आजी त्या बैलाला म्हणाल्या, ‘‘शांत हो राजा.’’ तो बैलही शांत झाला. आजी माझ्याकडे बघत म्हणाल्या, ‘‘या बैलाला प्यांटवाला माणूस दिसला, की तो त्या माणसाच्या अंगावर धावून जातो.’’

आजींनी त्या बैलाला एका झाडाला बांधलं. त्या आजी एकदम थकल्या होत्या. मी आजींना म्हणालो, ‘‘हे सगळं काम तुम्ही एखाद्या गडी माणसाला सांगायचं ना..!’’ आजींनी मला उलट प्रश्न केला, ‘‘कोणाला सांगायचं... घरात कोणीतरी गडी माणूस पाहिजे ना! ’’

मला काही कळेना. आजी पुन्हा म्हणाल्या, ‘‘आता घरात माणूस शिल्लक उरला नाही. अगोदर नवरा गेला आणि मग एकुलता एक मुलगा गेला.’’ मी सुन्न झालो. अंगावर काटा आला. आजी मला म्हणाल्या, ‘‘अरे बाबा, कधी जेवला होतास? दोन घास तरी खाऊन जा.’’ मी ‘नको’ म्हणालो. त्या म्हणाल्या, ‘‘लाजू नकोस बाबा ये, माझ्याकडं रस्त्याने ये-जा करणारी माणसं नेहमी जेवतात.’’ मलाही त्या आजींशी बोलायचं होतं, मी होकार दिला. मी जवळ येताच झोपडीमध्ये असणाऱ्या त्या बाईंनी खांद्यावरचा पदर डोक्यावर घेतला. त्या बाईंच्याही कपाळावर कुंकू नव्हतं. त्या बाईंनी बांधून ठेवलेली भाकरी त्या आजींसमोर ठेवली. खूप वेळ गेला. त्या महिलेने माझ्याकडे कधी नजर वर करूनही पाहिलं नाही. असं वाटत होतं की, त्या बाईमधला उत्साह, जगण्याची उमेद सगळं काही संपून गेलं असावं. मी जेवताना त्या बाईंना म्हणालो, ‘‘ताई, आपण जेवणार नाही का?’’ त्यावर त्या बाईंनी ‘नाही’ची नुसती मान हलवली.

त्या गावात जाऊन सगळा विषय समजून घेण्यापेक्षा त्या दोन्ही महिलांच्या डोळ्यांमध्ये मला सगळा विषय दिसत होता. मी आजींना म्हणालो, ‘‘एकच बैल दिसतोय, दुसरा कुठं गेला?’’ आजी म्हणाल्या, ‘‘काय सांगायचं बाबा, आता पाच वर्षं झाली, माझ्या मुलानं या जगाचा निरोप घेऊन.

त्या आजी सांगत होत्या ते शांतपणानं मी ऐकून घेत होतो. मी ज्या आजींशी बोलत होतो, त्यांचं नाव धुरपता संभाजी कानवले. आजींचे यजमान संभाजी कानवले यांनी दहा वर्षांपूर्वी आत्महत्या केली. बँकेचं कर्ज आणि अधिकाऱ्यांचा वाढत चाललेला ‘तगादा’ त्याला कारणीभूत होता. ‘तुम्ही आत्महत्या करा, आम्हाला काही देणंघेणं नाही. पण बँकेचे थकलेले हप्ते तातडीने भरा,’ असं त्या बँकेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं. कानवले यांचं शेत अगदी मुख्य रस्त्याला लागून होतं, त्यामुळे सुटाबुटात येणारे अधिकारी नेहमी शेतावर यायचे. सतत पाच-सहा वर्षं निसर्गाने साथच दिली नाही. चार एकर शेती असूनही आमची ही वाईट अवस्था. विहीर, घर, मुलीचं लग्न, बियाण्यांसाठी कर्ज घेतलं होतं. बँकेचं व्याज आणि सातत्याने थकलेलं कर्ज यातून संभाजी यांना सावरता आलं नाही. त्यांनी आत्महत्या करून यातून स्वतःची सुटका करून घेतली.

‘‘आत्महत्या केल्यावर सरकारकडून मिळणाऱ्या चार पैशांतून बँकेत असणारा कर्जाचा मोठा आकडा थोडा कमी झाला. संभाजी यांच्या पश्चात आजींनी त्यांच्या गणेश आणि आकांक्षा या मुलांना मोठं केलं, त्यांना प्राथमिक शिक्षण दिलं. मुलगी आकांक्षाचं लग्न केलं. मुलगा गणेशकडं कारभार दिला, त्याचंही लग्न करून दिलं. मुलाला मूलबाळ नाही, हे दुःख मनात होतं; पण आज ना उद्या होईल याची आशा होती. पुन्हा त्या दोन वर्षांमध्ये बँकेच्या अधिकाऱ्यांचा सातत्याने तगादा सुरू झाला. ‘‘शेती विका, नाहीतर काहीही करा; पण आमचं थकलेलं खातं पैसे भरून बंद करा.’’

आमच्याकडे असणारा नापिकीचा शाप काही थांबला नव्हता. जे माझ्या नवऱ्याचं झालं, तेच माझ्या मुलानं केलं. एके दिवशी भल्या पहाटे माझा मुलगा शेताकडं आला. ज्या विहिरीसाठी बँकेकडून घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी आमच्या दोन पिढ्या जिवाचं रान करत होत्या, त्याच विहिरीमध्ये माझ्या नवसाच्या मुलानं गळ्याला दगड बांधून उडी घेतली.’’

मी गावात पोहोचलो. रविकांत तुपकर यांच्या माध्यमातून काही शेतकऱ्यांचे संपर्क क्रमांक मी घेतले होते. त्यांना मी भेटलो. सगळेजण आजींच्या सुरामध्ये सूर मिसळून बोलत होते. ‘‘जिल्ह्यात असणारी जिल्हा बँक त्या जिल्ह्यातले सगळे राजकीय पुढारी एकत्रित येऊन बुडवतात. ती बँक चालावी, या बँक बुडवणाऱ्यांचं पुनर्वसन व्हावं, यासाठी त्या बँकेला विशेष अनुदान देण्याची तरतूद मंत्रिमंडळामध्ये केली जाते. या देशामध्ये हजारो कोटी रुपयांचं कर्ज घेऊन विजय मल्ल्यासारखे अनेकजण बँकांना बुडवतात, पसार होतात. त्या बँकेला वाचवण्यासाठी सरकारकडून विशेष पद्धतीची तरतूद होते. त्यांना कर्जाची रक्कम परत करा, असं कोणी म्हणत नाही. केंद्रात बसणाऱ्या सर्वोच्च माणसापासून ते जिल्ह्यामध्ये बसणाऱ्या सर्वोच्च माणसापर्यंत ठरवून केलेली ही मोहीम असते. फक्त गरिबांना कर्ज परत द्या, म्हणून ‘तगादा’ नोटीस, आत्महत्या करण्यासाठी मजबूर केलं जातं.’’ हे सगळं मला त्या गावातला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता उमेश राजपूत बोलून दाखवत होता.

मी त्या गावातल्या छोट्या-छोट्या मुलांशी, तरुणांच्या गटांशी बोललो; प्रचंड उत्साही, हुशार असणारे ते तरुण होते. पण, गावामध्ये असलेली आत्महत्या करण्याची मानसिकता इथं कायम रुजली की काय, अशी भीती वाटत होती. त्या गावात फेरफटका मारताना दहा बायकांमध्ये दोन बायकांच्या कपाळावर कुंकू असेल, अशी परिस्थिती होती. त्या माय-माउलींना काय वाटत असेल? येणारी पिढी कुणाचा आदर्श घेऊन मोठी होईल? असे एक-दोन नाही, तर कित्येक प्रश्न माझ्या मनास पडले होते. हा प्रश्न एका ‘वाडी’ गावाचा नाही; जिथं जिथं शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात, त्या प्रत्येक गावातला हा विषय आहे. इथं असणारा मतदार मतदान करताना बोटाला शाई लावतो की तंबाखूचा चुना, असा प्रश्न पडणं साहजिक होतं. शेतकऱ्यांची होणारी फसवणूक, अडवणूक, लुबाडणूक, त्याच्या मागचं गणित हे त्या बाईच्या कुंकवापर्यंत येऊन थांबतं, हे कुणालाही कधी कळणार नाही. तुम्ही-आम्ही फक्त शेतकऱ्याची आत्महत्या झाली की ‘अरे बापरे’ एवढंच म्हणून या विषयावर तिथंच थांबतो. कधी थांबणार हे सगळं...?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.